Saturday, January 14, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ६

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ६




अश्मक खोऱ्यातून आलेली पारध्यांची व भिल्लांची कुटुंबे चक्रवातामध्ये सापडली त्यामुळे भरकटून गेली होती. अचानक आलेल्या या संकटामुळे कुंतल प्रदेशात इकडे तिकडे फिरणार्या त्या कुटुंबातील एक भिल्ल जोडपे वाट चुकले. त्या जोडप्यातील पुरुष भिलम व त्याची पत्नी सिंगणा हे दोघेजण त्या घनदाट अरण्यातून भटकत होते. भिल्लं हा धाडसी असल्याने त्याच्या सोबत सिंघणा आपल्याला सुरक्षित समजत होती. अचानक त्यांना एका घाळीच्या कोपऱ्यातून एका जाळीतून त्यांना एका लहान मुलाचे रडणे ऐकू आले. तसे भिलम चौकस नजरेने कानोसा घेत आवाजाच्या दिशेने आपल्या पाठीवरील भात्यातील शर काढून तो धनुष्यावर चढवत पुढे आला. त्याला कड्याशेजारील जाळीत काट्यांमध्ये एक लहान मूल अडकलेलं त्याला दिसले. त्याच्या छाती शेजारील कोपऱ्यात छोटे जखमेच निशाण दिसत होत.

भिल्लमाने पाहिलं की जाळीच्या खाली एका घळीत एक भुकेली वाघीण फिरत होती. ती त्या मुलाचे भोजन करण्याचे इराद्यात होती.त्याने अचूक नेम धरला. व तिर सोडला. तो शर सरसर करत त्या वघिनिसा लागला.त्या शरावरील औषधाने ती वाघीण थोड्याच कालावधीत बेशुद्ध अवस्थेत गेली.

त्या काटेदार जाळीस आपल्या कमरेभोवती असणाऱ्या धारदार शस्त्राने चिरत त्याने त्या लहान मुलास बाहेर काढले. त्याच्या अंगात घुसलेले काटे त्याने काढून टाकले. त्याच्या बरोबर असणारी व सुरक्षित अंतरावर उभी असणारी त्याची पत्नी त्याच्या जवळ आली. लहान मुलाला पाहताच तिला खूप आनंद झाला.

 ती नव्हर्यास म्हणाली, “ही अरण्य देवाची कृपाच म्हणायची. आपल्या निपुत्रिक जीवनात या मुलामुळे नवीन आशा निर्माण झाली. यासारखे भाग्य ते काय?”

असे बोलत तिने त्या मुलास आपल्या जवळ घेत कुरवाळले तिच्याकडे पाहत तिचा नव्हरा भिल्लम म्हणाला, “ मला वाटते हे बालक काही साध्या सुध्या घरातील नाही त्याच्या कानातील कर्णफुले व इतर आभूषण पाहता हा मुलगा कोणी राजघराण्यातील वाटतो.ते बघ तिकडे रेशमी वस्त्र पडले आहे.”

सिंघणा, “ ते काही नाही. मला ते माहीत नाही. या वेळी अशा या जंगलात हे मला महादेवाने दिलेलं वरदान आहे. व मी हे कोणालाही देणार नाही.”

भिल्लम, “ अन् जर का कोणी पकडले व विचारले तर.”

सिंगणेने, त्याच्या अंगावरील वस्त्रे काढून टाकली. त्याच्या गळ्यातील कनक धातूची माळा काढून आपल्या जवळील झोळीतील एक धारदार शस्त्र काढून त्याच्या कानातील कुंडले कापून तिने काढली. व आपल्या जवळ असणाऱ्या कातडी पिशवीतील एक सुती कापड तिने काढले . त्यात बालकास घेतले. व त्याचे अलंकार व वस्त्र गुंडाळून तिने त्या पिशवीत तळाला टाकले. व सुती कपड्यात गुंडाळून त्या बालकाच्या जखमांवरून ती हात फिरवू लागली. हात फिरवताना त्या मुलाची शुद्ध हरपली. व त्यास ग्लानी आली. ते पाहून तत्काळ तेथील पळस पानाचा द्रोण करून जवळील तटिणीचे पाणी घेऊन भिल्लम आला. त्याने त्या पाण्याचे शिंतोडे त्या मुलाच्या अंगावर शिंपडले. त्याला थोडी शुद्ध आली. त्यास थोडे पाणी पाजले. पाणी प्यायल्याने चेतना अंगात जागृत झाली. ते मूल शुध्दीवर आले. व सिंगणेचे मुखाकडे आश्चर्य मुद्रेने पाहू लागले. भिल्लमालादेखील त्याचा मोह झाला.

तो आपल्या पत्नीस म्हणाला, “खरोखर परमेश्वर दयाळू आहे आपल्या जीवनात हे बालक आशेचा किरण म्हणून आले. आपण याचा सांभाळ करूया. व आपलेच बाळ समजून त्याला पुत्राप्रमाने ठेवूया. पण आपल्याला इथून निघाले पाहिजे.

ती वाघीण थोड्याच वेळात सावध होईल. ते दोघे त्या ठिकाणाहून निघाले. थोड सुरक्षित अंतर पार त्यांनी केलं. वाटेतून जाताना भिल्लमाने रानातील काही औषधी गोळा केली. त्याचा रस काढून त्याने त्या बालकास पाजला. थोडा मद देखील पाजला.तसेच काही औषधी गोळा करून त्याचा त्याने अर्क काढला व त्या बालकाच्या जखमेवर लावला. त्याला थोडी हुशारी आली.

त्या हिरव्यागर्द अरण्यातून उंच उंच अशा अजस्त्र झाडं वेलीतून वाट काढत ते दोघे सावधरित्या वाट चालू लागले. वाट चालताना भिल्लम सिंघणेस म्हणाला, “ काही म्हण सिंघणे या वाघिणीचे तावडीतून हा मुलगा कसा वाचला याचेच मज आश्चर्य वाटते.”

सिंघणा, “ कसा म्हणजे त्या वाघिणीने बालकास पकडले तेव्हा तिचा पाठलाग केला असेल कोणीतरी त्यामुळे तिला भोजन करणेस अवसर मिळाला नाही. ती जेव्हा या काटेरी जाळीवरून उडी मारून जाताना हे बालक इथे पडले व या जाळीत अडकले. व या काट्यांमुळे तिला त्यास पकडता आले नाही.”

भिल्लम, “ मला देखील तसेच वाटते.”

सिंघणा, “ पण आपण पुढे काय करायचे की असेच भटकत राहायचे. आपण जातीने भिल्ल असून देखील आपणास या पारध्यांमध्ये राहावे लागते. मला वाटते आपल्या भागातील आणखी भिल्ल कुटुंबे स्थलांतरित होऊन या कुंतल प्रदेशात आली असतील. आपण त्यात मिसळावे व आपल्या भिल्ल लोकांची वस्ती करावी. व स्थिर स्थावर जीवन जगावे.”

भभिल्म, “पण त्यासाठी आपण सीमावर्ती भागातून जंगलवाटेने दक्षिण प्रदेशात जायला हवे. महाराज जयवर्धन यांचे राज्यात आपणास योग्य तो न्याय मिळेल. व राहावयास जागा ही.”

असे बोलत चालत ती दोघे रानातील फळे , कंदमुळे, खात तसेच काही पक्षांची शिकार करत , त्यातून आपला चरितार्थ चालवत बालकास मिळेल तो रस व मद पाजत ते पुढे निघाले होते.

पुढे जाते वेळी वाटेत एक मोठी तटिनी लागली. तिथे एका वृक्षाखाली ते विश्रांती घेत होती, इतक्यात ते लहान बालक रडू लागले. त्याला भूक लागली होती. भिल्लमाने इकडे तिकडे पाहिले. कोण प्राणी दिसतो का? तेव्हा त्याला रानात एक हिरणी दिसली. तिच्या मागे लहान मृगाचे पिल्ले दिसले. त्यावरून ती दुधाळ असल्याचंही समजले. त्याने एक शर धनुष्याला वर चढवला. व तिला मारून बेशुद्ध केले. व जवळील वेलिनी बांधली. थोड्या वेळाने ती शुध्दीवर आली. तिच दुग्ध त्याने महतप्रयासाने काढले. ते काढताना त्या हरिणीने त्यास खूप उपद्रव दिला. तरी त्याने तिचे दूध काढले. व बालकास पाजवले. ते बालक ते दूध पिऊ लागले. ते पाहताना हरिणीने केलेल्या भिलमाच्या अंगावरील जखमा पाहून सिंघणा म्हणाली, “ काय हे दुर्दैव देवा, मज मूल नाही तरी या बालकास पाजण्यापुरती तरी दुग्ध धारा द्यायची होतीस. किती हे कष्ट उपसावे तिचं बोलणे ऐकून भिल्लम म्हणाला, “परमेश्वरास कशाला दोष द्यावा. या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा किती चांगले जीवन आपणास त्याने दिले आहे. ते काही कमी नाही.”

थोडा वेळ विश्रांती घेऊन ते दोघे त्या बालकास घेऊन मार्गस्थ झाले.पुढे अरण्य संपताच एक छोटीशी वस्ती लागली. वस्ती वरून वाटत होते की ते एक खेडेगाव असावे. ग्रामातील बहुसंख्य घरे मातीची तसेच कुडाची होती. त्यावर रान गवताने शाकारणी केली होती. ग्रामाचे भोवती उंचच उंच बांबूच्या बेटांची कुंपणे होती. कुंपणाऊच आत कुडाची छोटी छोटी घरे सुंदर दिसत होती. सारवलेली अंगणे व भोवती वेगवेगळी फळ, फुल झाडे शोभा देत होती. गावचे वेशीवर पहारा नव्हता. ते त्या ग्रामात आले. तिथली बरीच लोकं कृषी व्यवसाय करत असलेने शेतकीची कामे करणेस ते बाहेर गेले होते. काही छोटी बालके अन् वृद्धांची उपस्थिती जानवत होती. भिल्लम व त्याची पत्नी तिथे जाताच त्याना एका घराच्या बाहेर अंगणात एक वृद्धा तिथे दिसली. त्यांना पाहून तिने त्याना बोलावले. तिच्या अंगावरील वस्त्रे पाहता ती एक शेतकरी महिला वाटत होती. भिल्लम व सिंघणेस पाहून तिने त्यास विचारले, “ आपण कोण आहात. व येथे कशासाठी व कोठून आला आहात.”

तेव्हा भिल्लम म्हणाला, “ आम्ही भिल्ल जमातिची असून आम्ही अश्मक खोर्याचे रहिवासी होतो. परचक्र आल्याने आमची रयत परागंदा झाली. व येथील राज्यात आलोत. परवा झालेल्या चक्रवाताने आमची कुटुंबे विखुरली गेली. आम्ही दोघे व आमचे बालक या रानात भटकून कोठे आसरा मिळतो का ते पहात होतो. इतक्यात ही वस्ती दिसली व येथे आलो आहोत.”

वृद्धा म्हणाली, “ यासाठी तुला जवळील नगर नायकाचे पत्रक घ्यावे लागेल. त्याच्या परवानगीने तुला राजा जयवर्धन यांच्या राज्यात राहण्याची अनुमती मिळेल.”

इतक्यात सिंघणेच्या हातातील रडणारे बालक पाहून ती वृद्धा म्हणाली, “ बाळ रडत आहे. त्यास दुग्धपान का करत नाहीस.”

सिंघणा म्हणाली, “ कसे करू, गेली कित्येक दिवसांपासून अर्धपोटी अवस्थेत आम्ही आहोत. व त्याला आम्ही दुग्ध कुठले देऊ.थोडे फार तांदळाचे दाणे व पीठ मिळाले तर बरे होईल. त्यास थोडी पेज तरी पाजेन.”

वृद्धा, “ठीक आहे. मी पाहते घरात काय आहे ते.”

असे बोलून त्या वृद्धाने त्यांना बाहेरील ओसरीत बसवले. व ती तडक आतमध्ये गेली. व एका पत्रावळीवर देवडीतल्या मडक्यातील पाणीभात घेऊन त्यावर थोडे दही तिने घातले. व ते घेऊन बाहेर आली. व त्या स्त्रीस देत म्हणाली, “ तुम्ही दोघे याचे सेवन करा. मी बालकास थोडे दूध देते.”

 असे बोलून ती आतमध्ये गेली. व देवडीतल्या शिंकाळ्यावरून थोडे दूध तिने एका करवंटीमध्ये काढले. व ते आणून त्या बालकास दिले. ते पाहताना ती सिंघणेस म्हणाली, “बालक खूपच सुंदर आहे. त्याचे काय नामाभिधान ठेविले.”

सिंघणा म्हणाली, “ परागंदा झालेल्या लोकांना ना घर ना दार, कसले आले नामाभिधान. भटकंती करत फिरावे लागले. त्यामुळे पोट भरावे की नाम ठेवावे. हाच प्रश्न आम्हापुढे आहे. त्यामुळे नाम ठेविले नाही.”

वृद्धा म्हणाली, “ या ग्रामामध्ये मध्यभागी एक भट्ट राहतो. येथील लोकांचे दैव व्यवहार तोच पाहतो. त्याकडे जा तो ठेवील योग्य नाम. अन्यथा ज्या बालकाचे नामाभिधान झाले नाही ते बालक भूत योनीत जाते असे येथे समज आहे. तेव्हा आपण त्यास योग्य दक्षिणा द्यावी व हा संस्कार करावा असे मज वाटते.”

त्या वृद्धाचे बोलणे ऐकूण सिंघणा घाबरली. ती व भिल्लम दिलेला आहार घेऊन बालकास दूध पाजून वृद्धेस नमन करून त्या भटाचे घरी निघाली.

फिरत फिरत ती गुरे वाड्या जवळून चौकशी करत वस्तीच्या मध्यभागी असणाऱ्या एका ओसरी वजा घराजवळ आलीत. तेथे आल्यावर भिल्लमा

क्रमशः पुढे......

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ५

अंबाला  एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ५



  पुढे......

नगर व्यवस्था लावून महाराणीचा लवाजमा पुढील प्रवासास मार्गस्थ झाला. प्रधान पत्नी थोड्याशा दुःख सागरातून सवरल्या होत्या. त्यांनाही हितगुज साधत महाराणीची स्वारी पुढे निघाली. वाटेतील अनेक ग्रामाच्या व्यवस्था लावून त्यांची स्वारी राजधानीच्या दिशेने निघाली. पुढे राज्यमार्ग लागला. जो राजधानीकडे जात होता. प्रत्येक गावातील रयतेच्या समस्या ऐकत त्याचे निराकरण करत त्या निघाल्या होत्या. राजधानी मार्गावरील प्रत्येक गावांना भेटी देत रथ शेवटी राजधानीत आला. राजधानीतून जाताना पेठ लागे. तेथील विशाल प्रासाद व भव्य राजवाडे तसेच इतर ठिकाणे मन आकर्षित करणारे ते वैभव होते. दोन्ही बाजूस असणारी पेठेतील विविध दुकाने तसेच तेथील लोकांची घरे मन आकर्षित करत होती. व्यापारी येणाऱ्या गिर्हाईकांना मालाची देवघेव करत होते. ती विविध वस्त्रे आभूषणे , धान्य व कलाकुसरीच्या वस्तूंनी, विविध गृहपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने असणारी दुकाने पाहून मन प्रसन्न होत होते. वेगवेगळी हातमागावर विणलेली वस्त्रे तर खूपच छान दिसत होती. अशा या पेठेतून महाराणीची स्वारी राजवाड्याच्या दिशेने निघते. वाटेत असणाऱ्या प्रधनांच्या वाड्यासमोर रथ थांबतो. त्यातून प्रधान पत्नी व दोन दासी उतरल्या. व प्रधान पत्नी आपल्या महालात जड अंतःकरणाने गेल्या. महाराणीचा रथ पुढे मार्गस्थ होतो.

प्रधान पत्नी आत महालात आल्यानंतर त्याना आपल्या लहान मुलाची आठवण होते व त्या पुन्हा शोक करू लागल्या. इतक्यात त्यांच्या दालनात प्रधान वेददत्त आले. ते आल्याचे दासीने श्यामलतांना सांगितले. वेद्दत्त शामलते जवळ येऊन बसले. त्याना पाहून श्यामलता पुन्हा रडू लागल्या. प्रधान पण रडू येत होते. पण त्यांनी शोक आवरला. व आपल्या खास अंग्रक्षकास बोलण्यास सांगितले. अंगरक्षकास दासी बोलावून घेऊन आली. अंगरक्षक विभुव आत दालनात आला. त्याला पाहून प्रधान वेददत्त म्हणाले, “ विभुव तुम्ही महाराणीच्या सेनेतील एक स्वार घ्या व आपले शस्त्रधारी शीलेदर घेऊन सदर ठिकाणी जाऊन पुन्हा तपास करा व आमचे चिरंजीवांचा शोध घ्या.”

वीभुव, “ जी, मी लगेच निघतो.”

विभुव् लगेच निघाला.

प्रधानपत्नी श्यामलता प्रधानांच्या छातीवर हुंदके देत रडू लागल्या. दासी त्यांनां सावरू लागली. पण त्यांना खूप रडू येत होते. प्रधानमंत्री त्याना आपल्या काळजावर दगड ठेवून समजावू लागले.

“ श्यामलते असा शोक करणे बरे नव्हे आपण एक विरपत्नी आहात.”

श्यामलता, “ नाथ ही आपल्यावर किती दुष्ट वेळ आली. ज्या परमेश्वराने सुंदर फुल दिले ते त्यानेच असे का दूर केले. ती वाघीण, कोण्या जन्मीचा बदला घेण्यास आली. तिच्या ताब्यात आपले कोवळे बालक रत्नाकर कसे सापडले.”

त्या रडू लागल्या. प्रधानमंत्री त्याना समजावून सांगू लागले. थोडा वेळ थांबून पुन्हा राज्य दरबारी कामकाज असलेने ते आपल्या पत्नीचा निरोप घेऊन निघून गेले. श्यामलता शोक करत राहिली. दासी त्यांना सावरत होती. थोड्या वेळाने त्या झोपी गेल्या.

…………. …… …… …..

प्रधान पत्नीना सोडून महाराणीचा रथ हा राजवाड्याच्या दिशेने मार्गस्थ होतो. थोड्याच वेळाने महाराणीचे राजमहालात आगमन झाले. राणीनी दासीला स्नानगृहात पाणी काढण्यास सांगितले. त्या तेथे गेल्या. त्यांनी स्नान केले. तदनंतर त्यांनी दासीला विश्रांती घेणार असल्याचे सांगितले. अल्प फलाहार करून त्यांनी एकांत स्वीकारला. व त्या विश्रांती घेण्यासाठी शयनगृहात गेल्या. थोड्या वेळाने महाराज जयवर्धन यांचा नगर प्रदक्षिनेसेस गेलेला रथ राजमहालात दाखल झाला. राजमहालात आल्यावर महाराणी आल्याचे समजताच त्यांनी दासीला निरोप पाठवून चौकशी केली. तेव्हा महाराणी विश्रांती घेत आहेत हे त्यांना समजले. काही घटिके नंतर महाराणीना जाग आली. त्या दासी दुस्यलेस हाक मारतात. दासी हजर होते. तीने त्यानां महाराज आल्याचे सांगतले. महाराणी आपले आवरले. त्यांनी महाराजांना अंतपुरात बोलवून आणण्यास दासीला सांगीतले. दासी दुस्यलाने जाऊन महाराजांना बोलावून आणले. महाराज आले नंतर अंतपुरात महाराणी व महाराज यांमध्ये प्रवासात घडलेल्या घडामोडी व राज्यातील इतर घडमोडी यावर एकांतात चर्चा होते. प्रधान पुत्राचे वाईट झाल्याने राजा राणी दुःखी होतात. व ते त्यांचे महाली जाऊन सांत्वन करुन आले .महाराज जयवर्धन आपल्या राज्याची व्यवस्था लावून राज्यपाठ सांभाळत होते. एके दिवशी राज्य दरबार भरलेला होता. राज्याचा कारभार व इतर घडामोडींवर राजा, प्रधान व मंत्री चर्चा करत होते. इतक्यात एक द्वारपाल आत मध्ये दरबारात आला.

द्वारपाल, “ महाराजांचा जयजयकार असो. पूर्व उत्तरप्रांताचे विभाग नगरनायक आपणास भेटू इच्छितात. व त्यासाठी आपली अनुमती मांगत आहेत.”

महाराज, “ अनुमती आहे.”

सेवक निघून गेला. थोड्याच वेळात तो व त्या पाठोपाठ पूर्व विभागाचा नगरनायक आत महालात दाखल झाला.

पूर्व प्रांतनायक अनंग, “ महाराजाचा जयजयकार असो. महाराज मी उत्तर पूर्व विभागाचा नायक आहे. आपला हा भाग अश्मक खोऱ्यास लागून आहे. नेहमी परचक्र व अवर्षन या समस्यांना आम्हाला तोंड द्यावे लागते. तरी या वर्षी पर्जन्य कमी झाले. वरूणी देवाच्या अवकृपेमुळे रयतेचे जगणे दुस्वर झाले आहे. तरी अन्नधान्य तुटवडा मोठ्या प्रमाणात झाल्याने रयत परागंदा होण्याच्या मार्गी आहे. तरी आपण यासाठी काही मदत करावी. जेणे हा प्रांत उजाड व भकास होणार नाही. रयत आस लावून बसली आहे.”

महाराज जयवर्धन, “आपली व्यथा आम्हास गुप्त हेरांनी तसेच आपण पाठवलेल्या दुताकरवी समजली. तेव्हा आपल्या राज्यासाठी आम्ही राज्य अंबारातून काही धान्य देत आहोत. तसेच आपल्या भागात जिथे शक्य असेल तिथे तलाव विहिरी खुदाई करणेस राजदरबारतून योग्य निधी पाठवला आहे. तो दोन तीन दिवसात सर्व पोहोचेल. तसेच त्या विभागातील नगर सूरक्षेसाठी आम्ही वास्तू विशारद पाठवत आहोत. त्यांची व्यवस्था तुम्ही करावी. ते नगर सुरक्षेसाठी योग्य रचना करतील. ती आपण बांधून घ्यावी. यासाठी आम्ही तुम्हाला निधीसाठी राजपत्र देत आहोत. तसेच सीमा सुरक्षेसाठी गस्त वाढवावी तसेच योग्य खबरदारी घ्यावी.”

 महाराज लेखानिकास आदेश देतात. लेखनिक पत्र तयार करतो. ते पत्र महाराजांनी पूर्व नगर नायक अनंग यास दिले. तो ते घेऊन द्रव्य निधी असणाऱ्या खजानिसाकडे महाराजाची अनुमती घेऊन निघून गेला.

क्रमशः पुढे………


Saturday, January 7, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग४

 

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा

भाग ४




नगर दरवाजा उघडण्यास विलंब लागला म्हणून महाराणी क्रोधित झाल्या होत्या. परंतु सीमावर्ती नगर असलेने त्या बाबत त्या काही बोलल्या नाहीत. राग आवरता घेऊन त्यांनी सारथ्यास आपला रथ अतिथी गृहकडे न्यायला लावला. नगरीतील त्यांनी अतिथी महलाकडे प्रस्थान केले. नगरीच्या मुख्य पेठेतून रथ पुढे देवी भगवती देवीच्या मंदिरा जवळून निघाला. तेव्हा महाराणीनी सारथ्यास रथ थांबवण्यास सांगितला. त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतले. कारण प्रधान पत्नीच्या मुलाबाबत जे घडले. त्या दुःखातून त्या सावरलेल्या नव्हत्या. तेव्हा त्यांनी रथ पुढे नेला. प्रधान पत्नी अश्रू ढाळताना त्यांना दिसल्या. तेव्हा महाराणी म्हणाल्या, “ आपण प्रधान पत्नी आहात. असा शोक करणे बरे नव्हे. घडलेली घटना ही वाईटच होती. पण काय करणार आपण. विधिलिखित कोणी बदललेले आहे का? तेव्हा आपण सावरावे. व देवीमातेकडे मागणं मागा तुमचा पुत्र जिथे कुठे असेल तिथे सुरक्षित राहू दे.”

प्रधान पत्नीनी बाहेरून हात जोडले व डोळे बंदकरून मागने मागितले. थोड्या वेळात महारणीचा काफिला नगराच्या अतिथी महालात आला. नगराच्या मध्यभागी असणारा तो महाल चारी बाजूंनी उंच अशा भिंतींनी बंदिस्त होता. त्याचा मुख्य दरवाजा उत्तरेस होता. पेठेच्या मध्यवर्ती असलेने तो महाल मुख्य रस्त्यावरून सुरेख दिसत होता. त्यामध्ये अनेक लहान मोठी विशाल दालने होती. ती राजेशाही लोकांसाठी असलेने त्याची निगराणी चांगली होती. तेथे एक मध्यभागी विहीर होती. ती संपूर्ण उन्हाळ्यात सुद्धा भरलेली असायची. ती संपूर्ण तेथील पाण्याची गरज भागवत होती. त्यामुळे तो स्वयंपूर्ण वाडा भासत होता. महालाच्या मुख्य‌‌ दरवाजाशी अश्वरथ उभा राहिला. महाराणी रथातून उतरल्या. पाठोपाठ प्रधान पत्नी ही खाली उतरल्या. व त्यांनी आपल्या काफिल्यासह आत प्रवेश केला. महाराणी येण्यापूर्वी. तेथील सेवकांनी सर्व व्यवस्था लावली होती. प्रवासाने थकलेले सैनिकांना विश्रांती घेण्यासाठी महाराणीनी  सांगितले त्ले व महाराणी अरूणावतीनी आपल्या स्नानाची व्यवस्था दासी दुश्यलेस करायला सांगितले. तेव्हा दासी दुश्यला महाराणींची स्नान व्यवस्था लावण्यासाठी गेली. तिने सेवकाकरवी महालाच्या त्या मध्य भागातील विहिरीतून पाणी काढले. व स्नान गृहातील रांजनाखाली जाळ घातला. त्यामधे सुगंधी द्रव्ये घातली. व तिने थोड्या कालावधीत पाणी तापवून इस्वान करण्यासाठीं कुंडात काढले. तसेच प्रधान पत्नीच्या दालना शेजारील स्नान गृहात एका दासीला त्यांनी प्रधानपत्नीसाठी स्नान तयारी करण्यास सांगितले. व दुश्यला महाराणीच्या दालनात आली. दुश्यलेस पाहून

अरूणावतीं महाराणी, “ दासी दूश्यला, यावेळी तुम्ही जातीन प्रधानपत्नीकडे पाहा. कारण त्यांना पुत्र शोक झाला आहे. व त्यांना सांत्वन करण्याची जास्त गरज आहे. तरी तुम्ही आम्हास सोडून प्रधानपत्नीकडे पहावे. व दुसर्या दासीला आमच्या सेवेस पाठवावी.”

दुश्यला, “ महाराणी मी प्रधानपत्नीची व्यवस्था नीट लावली आहे. तिकडील चिंता नसावी. मी पुढील प्रस्थानाची व्यवस्थापन व येथील व्यवस्था लावण्यास मुख्य नायकाशी चर्चा करण्यास जाणार आहे. तरी आपल्या सेवेस दुसऱ्या दासीला पाठवते.”

असे सांगून ती निघून गेली. व तिने दुसऱ्या दासीला राणीकडे पाठवले. दुसरी दासी थोड्याच वेळात हजर झाली.

सुचित्रा दासी, “ महाराणीचा विजय असो. दासी सुचित्रा आपल्या सेवेत हजर आहे. व बाहेर एक सेवक अल्ल आहे. व आपणास भेटू इच्छितो.”

महाराणी, “ त्यास आत बोलवं.”

दासी बाहेर गेली व सेवकास बोलावून घेऊन आली.”

सेवक, “ महाराणींचा जय असो. आपल्या सांगण्या नुसार मी आपला निरोप नगरपट्ट नायक सुरेंद्र याकडे पोहोचवला असून ते थोड्याच वेळात आपल्या समोर हजर राहतील. त्या अबला स्त्रीस बाहेरील ओसरीत जागा दिली असून त्या दोन उन्मत्त जवान तरुणांना कारागृहात पाठवले आहे.”

महाराणी, “ ठीक आहे, जेव्हा नगरनायक हजर राहतील तेव्हा आम्हाला कळवण्यास या.”

महाराणीची आज्ञा ऐकूण तो सेवक गेला. महाराणीनी आपले स्नान आटोपले. व आपला साजश्रृंगार करून त्या पुन्हा आपल्या दालनात आल्या. दासी त्यांच्या सेवेत होती.

थोड्या वेळात नगर नायक आले. त्यांनी महाराणींच्या दर्शनासाठी आज्ञा मागितली.

दासी आत गेली. व महाराणीचा निरोप घेऊन आली. व त्यांना बाहेरील मुख्य दालनात बसावयास सांगितले. थोड्याच वेळात आरूणावतीं तेथे आल्या. आसनावर बसल्या.

नगर नायकास पाहून

महाराणी अरुणावती, “ सेवक त्या अत्याचार झालेल्या महिलेस व त्या दोन तरुणांना सादर करा.”

थोड्याच वेळात त्या स्त्रीस व त्या दोन तरुणांना हजर केले गेले. महाराणीचे काही अंगरक्षक देखील तिथे होते. महाराणीनी सर्व शहानिशा केली. व त्या युवकांचे एक एक हात कलम करण्याचा आदेश दिला. व त्या स्त्रीस त्यांच्या भावाकडे पाठवायचे ठरवले.”

 सेवक त्या दोघांना घेऊन गेले. महाराणीनी आपला मोर्चा नगर नायकाकडे वळवला. त्यांना उद्देशून महाराणी बोलली, “ नगर नायक महाराज जयवर्धन यांच्या राज्य सीमेवरील नगरातील सावळा गोंधळ आम्हास दिसला. अशाने परचक्र राज्यावर चालून यायचे. आपलं मत काय याबाबत सविस्तर तपशील द्यावा. तसेच नगर दरवाजा पासून सीमेवरील सैन्य व्यवथा कडक जरी असली तरी म्हणावा तितका बंदोबस्त नाही. तसेच नगरात येता दिसलेली अस्वच्छता ही आपल्या कार्याची पोहोचच दिसते.की आपले किती लक्ष नगराकडे आहे ते. दक्षिनापथ क्षेत्रातील लागून असलेल्या राज्यात. परराज्यातून आलेल्या परचक्रात भरडलेल्या लोकांवर अन्याय होतो तरीदेखील तुमचे लक्ष नाही. हे योग्य नव्हे.”

महाराणीचे बोलणे ऐकून नगर नायक म्हणाला, “महरणीना प्रथम माझा नमस्कार, नगरातील अस्वच्छतेबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.. कारण काल नगर पेठेचा वार असल्याने परिसर अस्वच्छ होता. तो आज स्वच्छ होईल. नगरातील सैन्य व्यवस्थेत सैन्याची कमतरता आहे. याबाबत अधिक माहिती विभाग प्रमुखांना दिली होती. आपण आम्हास सैन्य भरतीचे अधिकार द्यावेत. “महाराणी अरूणावती, “ नगर अस्वच्छतेसाठी आपण दिलेले कारण योग्य नाही. कारण ती अस्वच्छता ही काही एका दिवसाने झाली नाही. रस्त्याच्या दुतर्फा असणारे सांडपाणी पाहता या सुंदर नगरीस आपण विकृत केले. व आम्हास नको ते कारण सांगता. व राहता राहिला सुरक्षेचा प्रश्न, तर उद्या दवंडी द्यावी आम्ही जातीनिशी  नव युवकांची नेमणूक करतो. पर राज्यातून येणाऱ्या लोकांची सखोल चौकशी करून त्यांना कुंतल प्रदेशातील दख्खन भागात स्थिर करावे. ताकी त्यांना आपल्या राज्यात मानाने राहता येईल.  यासाठी नगर दंड अधिकारी यांचे पूर्ण चौकशीचे राजपत्र देणेत यावे. व त्यांना कुंतल प्रदेशात पाठवावे.”

नगर नायक शांतपणे सर्व एकत होते.

थोड्याच वेळात एक सेवक तिथे आला. महाराणीना वंदन करून म्हणाला, “ महाराणीचा जयजयकार असो दोन पारधी युवक  आपणास भेटू इच्छितात.”

महाराणी, “ त्यांची संपूर्ण तपासणी करून आत आणावे.”

सेवक बाहेर गेला. व त्या दोन पारधी पुरुषांची संपूर्ण चाचपणी करून त्यांना आत घेऊन आला.

दोन युवक पुरुष आत आले. काळ्याशार रंगाचे ज्यांनी कमरेला एक त्रिकोनाकृती रुमाल घातले होते. व ज्यांनी डोक्याला एक रुमाल बांधला होता. त्यामध्ये पक्षांची पिसे खोवली होती. अंगावर वेगवेगळ्या मण्यांच्या माळा त्यांनी धारण केल्या होत्या. ते सेवकांसवे आत आले. त्यांनी महाराणींना लवून मुजरा केला. व ते बोलण्याची अनुमती मागू लागले. महाराणीनी अनुमती दिली.

पारधी, “ महाराणींचा विजय असो. आम्ही दोघे बंधू त्या अत्याचारित महिलेचे बंधू आहोत. आम्ही अश्मक खोऱ्यातील दख्खन देवी  गोदावरी तीरी राहणाऱ्या एका ग्रामाचे रहिवासी असून आमच्या राज्यात आलेल्या परचक्रामुळे परागंदा होऊन इथे आलो आहोत. तरी आम्हाला इथे राहण्याची  परवानगी राजा जयवर्धने यांचें परवानगीने मिळाली असून देखील इथिल काही अधिकारी आम्हास त्रास देतात. त्या कारणे आमची बरीच कुटुंबे नगराबाहेर अरण्यात राहतात. दोन दिवसांपूर्वी आलेल्या चक्रवाताने आमची कुटुंबे विखुरली गेली. तरी आमच्यावर दया दाखवू. राहण्याची सुविधा द्यावी.”

महाराणी अरुणावती, “ आपणास आम्ही आमच्या राज्यात राहण्याची अनुमती देतो पणं आपण व आपली कुटुंबे यांनी राजदंडाधिकरी यांकडून राजमोहर प्राप्त पत्र घ्यावे. व कुंतल प्रदेशाच्या दक्षिण भागात आपणास राहण्याची अनुमती दिली जाईल. त्या प्रदेशात आमच्या राज्याची जनसंख्या कमी असलेने आपण त्या प्रदेशात वस्ती करावी.”

महाराणी दासीस बोलावतात. त्या स्त्रीस वस्त्रे व तीन सुवर्ण मोहोरा देवून तिच्या भावांच्या हवाली करणेस सांगीतले.  पारध्यांनी महाराणींचा जयजयकार केला. व त्याप्रमाणे ते दासीच्या मागे गेले.

महाराणी नगरनायकास,

“ नगर पट्टनायक आम्ही सांगितलेले प्रश्न त्वरित सोडवावेत अन्यथा आपले पद बरखास्त करण्यात येईल. आपण आमचे नाते संबंधातले म्हणून कोणतीही गय केली जाणार नाही.”

नगर नायक  तेथून क्षमा मागून निघून गेले. जाताना आपल्या आज्ञेनुसार  सर्व होईल. याची हमी देतात.”

नगर नायक निघून गेल्यावर  दासीला मुख्य सेवकास बोलविण्यास सांगितले. त्याला नगरदंडनायकास बोलविण्यास पाठवले. तसेच नगरातील मुख्य लोकांना ही निरोप देण्यास लावले. व त्वरित त्यांना बोलावले. राणीआज्ञा ऐकूण ते अधिकारी त्वरित हजर झाले. महाराणी अरूणावतीनी बैठक भरवली. बैठकीत

महाराणी  नगरदंडाधिकाऱ्यांना म्हणाली, “ नगरदंडाधिकरी आपणास नगराच्या सुव्यवस्थेची व कायद्याची जबाबदारी दिली आहे. तसेच नगरनायकावर नजर ठेवणेस सांगितले असता या नगरीची अशी अवस्था कशी आपण होऊ दिलीत यासारखे दुर्दैव नाही. आता पर्यंत झाले ते झाले. इथून पुढे आपण काटेकोर पाहणी करून कामाचा लेखाजोखा थेट राजदरबारी पाठवणे. तो आम्ही पहात जाऊ.  तसेच इथून पुढे अश्मक खोऱ्यातून येणाऱ्या लोकांना त्यांची योग्य चौकशी करून त्यांना कुंतल प्रदेशात पाठवण्याची व्यवस्था तुम्ही करणे. तसेच नगर पेठेचा कारभार सूरजमल पेठनायक करेल. त्यांनी सर्व स्वच्छता व कारभार पाहणे. व नगरदंडनायकानी त्याचा लेखाजोखा तपासणे. व कारागृह रक्षकांना नवीन शंभर नवयुवक सैन्य भरतीसाठी परवानगी देत आहोत. तसेच नगर सुरक्षेसाठी जिथे तट उभारता येईल तिथे उभा करा.  त्यासाठी आम्ही एक सहाय्यक प्रतिनिधी पाठवू तसेच निधी देखील पाठवला जाईल. व हे त्वरित करणेत यावे.”

 इतके बोलून महाराणीनी राजमोहोर अधिकृत लिखितपत्र त्यांना देवून त्यांवर जबाबदारी सोपवली. नंतर गुप्तहेरांची  बैठक घेऊन त्या नगराची व्यवस्था त्यांनी लावली.  दोन दिवसात सर्व कामे मार्गी लावून महाराणीनी दोन दिवस काही सैन्याकरवी प्रधान पुत्राचा काही सुगावा लागतो का ते पाहिले. पण काही क्षेम कुशल कळले नाही.

प्रधानपत्नी या पुन्हा शोक करू लागल्या. महाराणीनी पुन्हा समजूत घातली. महाराणीनी पुढे राजधानीकडे प्रस्थान करण्याचे ठरविले. व त्यांनी तसे आदेश सैन्य नायकास दिले. व प्रस्थानाची तयारी झाली.

क्रमशः पुढे...



Wednesday, January 4, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३


अंबाला एका राजकुमारी ची

 प्रेमकथा भाग ३

क्रमशः पुढे चालू...



 थोड्याच वेळात त्यांचे त्या स्थळापासून प्रस्थान झाले. पुन्हा महाराणीची स्वारी त्या वाटेने पुढे त्या नदीच्या काठाने उगमस्थानाकडून पुढ निघाली. उगम प्रदेशात नदीचे उथळ पात्र ओलांडून ती वाट पुढे सरकत होती. तिथून पुढे काही अंतर गेल्यावर छोट्या छोट्या वस्त्या लागल्या. त्या पारकरून पुढे महाराणीचा काफिला पुढे गेला. पुढे गेल्यावर त्यांना पुन्हा राज्यमार्ग मिळाला. त्या राज्यमार्गावरून पुढे गेल्यावर नदीचे सुपिक मैदान लागले. तिथे पिके डौलाने डोलत होती. सुंदर शेते सजली होती. आता वस्तीची चाहूल लागली होती. त्यामुळे आपण आता राज्याच्या शेवटी असणार्या एका नगरीत पोहोचणार या कारणे सर्व सैनिक आनंदले होते. त्या मार्गे जात असताना एक आर्त किंचाळी ऐकू आली. महाराणीनी रथस्वाराला रथ थांबवायला लावला. एक अश्वस्वार नायक तिथे आला.

महाराणी, “ नायक दोन चार सैनिक घ्या व कोण मोठ्याने ओरडत आहे ते पहा कोणी तरी संकटात सापडले आहे.”

नायक, “ जी महाराणी.”

तो लगेच चार पाच सैन्य घेऊन गेला. पाहतो तर काय पुढे मुख्य मार्गाला जोडलेल्या उपरस्त्याला एक मडके फुटले होते.त्याच वरील भाग तसाच होता. त्या मडक्याची सुंदरता राज्याचे वैभव सांगत होती. ते पाहून लगेच सैन्य आवाजाच्या रोखाने गेले. तिथे आडरानात त्याना दोन जवान व एक अबला स्त्री दिसली. तिच्या अंगावरील वस्त्रे फाटली होती. तिच्यावर वाईट प्रसंग गुजरात होता. ती निरागस नजरेने त्या सैनिकांकडे पहात होती. सैनिकांनी तिच्या अंगावर एक वस्त्र आणून दिले. व त्या दोघांना जेरबंद करून त्यांनी त्या स्त्रीस व त्या दोघांना महाराणी पुढे हजर केले. ते दोघे सोडा सोडा असे म्हणत होते. ती स्त्री हुंदके देत होती. महाराणी तोपर्यंत त्या रथातून खाली उतरल्या होत्या. त्यांपुढे त्यांना आणण्यात आले. त्यांनी त्या स्त्रीकडे पाहिले. तिचे अंगावरील कपडे फाटलेले होते. अंगावर जबरदस्ती केल्याच्या खुणा दिसत होत्या. महाराणीनी त्या स्त्रीस अभय दिले. व विचारले. “ तू कोण आहेस? तुला काय कष्ट झाले व हे दोघे कोण आहेत.”

महाराणीचे बोलणे ऐकून तिला धीर आला. तिचे अंग थरथरत होते . ती बोलू लागली.

“ महाराणी मी एक पारधी कन्या आहे. मी व माझे नातलग मूळचे अशमक खोऱ्यातील रहिवाशी तिथे परचक्र आले. व आम्ही परागंदा झालो. व या राज्यात आश्रित म्हणून आलो. दोन दिवसापूर्व आलेल्या चक्रवातामुळे आमची कुटुंबे अरण्यात असतानाविलग झाली. त्यामधे बाकीची इकडे तिकडे उदरनिर्वाहासाठी गेलीत. मी व माझे दोन बंधू या नगरीत आश्रित आलो. आम्हाला येताना नगरच्या द्वारावर सैन्याने अटकाव केला. महत प्रयत्नाने आम्हाला प्रवेश मिळाला.

तरी पण या नगरीतील काही दुष्टांची नजर माझ्यावर पडली. माझे बंधू चरितार्थ करण्यासाठी आजू बाजूस काम पाहू लागले. आज ते कामावर गेले होते. मी पाणी भरायला गेले असता माझ्या एकटेपणाचा फायदा यांनी घेऊन दुपारच्या वेळी त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न चालवला. तुम्ही मायबाप बनून आलात व माझे रक्षण केले.”

महाराणी, “ शिपाही त्यांच्या मुसक्या अवळा. व त्यांना या नगरीच्या अतिथी महालात घेऊन या तसेच या नगराच्या प्रमुख ग्रामणीस आम्ही आल्याचे कळवा. तसेच पुढे अश्वस्वार पाठवा व अतिथी महल स्वच्छ करा.”

महाराणीचा आदेश मिळताच त्या दोन तरुणांच्या मुसक्या बांधल्या. व त्यास जेरबंद केले. एक अश्वस्वार पुढे वेगाने गेला. पाठोपाठ महाराणींचा काफिला निघाला. थोड्याच वेळात ते नगराच्या वेशीच्या दरवाजावर पोहोचले. वेश दरवाजाच्या पहारेकर्याने बंद दरवाजाच्या छोट्या चौकटीतून पाहिले. रथ व सैन्य पाहताच त्याने चौकशी केली. एक अश्वस्वार पुढे झाला. त्याने ओळख पटवून दिली. महाराणी अरूणावतीचा रथ आहे हे समजताच सैन्यात खूप गडबड उसळली. त्यांनी लगबगीने दरवाजा उघडला. व नगरात प्रवेश दिला.

क्रमशः पुढे...

अंबाला एका राजकुमारीची प्रेमकथा भाग २

 

अंबाला एका राजकुमारीची प्रेमकथा भाग २



क्रमशः पुढे चालू...

महाराणी, “ सेवक आपण आजूबाजूच्या अरण्यातून लाकडे गोळा करावीत व रात्रभर अग्नीची व्यवस्था करा. ज्याने अंधाऱ्या रात्री हिंस्र श्वापदे इकडे आजूबाजूला फिरणार नाहीत.”

सेवक, “ या कामासाठी थोड्याच वेळपूर्वी दोन सेवकांना लावले आहे. त्यांनी भरपूर लाकडे गोळा केली आहेत. ज्यामुळे रात्रभर अग्नी प्रज्वलित करता येईल.” थोड्याच वेळात सर्व सेवक व सैनिक आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडतात. सुर्य अस्ताला गेला. सुंदर वाटणारे ते अरण्य रात्रीच्या अंधारात भयावह वाटू लागले होते. रातकिड्यांची किरकिर अत्यंतिक कान किट्ट करीत होती. थोड्या प्रहराने सर्वांचे भोजन झाले. व महाराणी व प्रधानपत्नी विश्रांती घ्यायला बंदिस्त रथात गेल्या. व छोट्या प्रधानपुत्राची जबाबदारी त्यांनी दासीवर सोपवण्यात आली. सैनिक पाळीपाळीने पहारा देवू लागले.

बघता बघता रात्र सरली. अग्नीच्या प्रकाशाने रानटी श्वापदे तळाभोवती फिरकली नाहीत. पहाटेच्या पक्षी कुंजनाने दुश्यला दासी उठली. तिने सैनिकांच्या मदतीने सकाळच्या भोजनाची व्यवस्था तिने केली. थोड्याच वेळात प्रभात झाली. काळोख्या रजणीचे अंथरूण दूर झाले. अरुणोदय झाला. महाराणींना जाग आली. त्यांनी रथाची कवाडे उगडून त्यांनी सूर्य नारायणाचे दर्शन घेतले. व दासीला हाक मारली. दासी दुश्यला हजर झाली.

दुश्यला, “ नमस्कार महाराणी काय सेवा करू.”

महाराणी, “ मी व प्रधानपत्नि स्नान करण्यासाठी नदीकिनारी जात आहोत. तेथे एका दासीस आमची वस्त्रे घेऊन पाठवावे.”

महाराणी व प्रधानपत्नी स्नान करण्यास नदी किनारी गेल्या. त्या नदीच्या सुंदर अशा पाण्याने त्यांनी मुखमार्जन करून आपली वस्त्रे नदीकिनारी ठेवली. व नदीच्या पाण्यात स्नान करून जलक्रीडा करून त्यांनी सूर्याची वंदना केली. व आपले आवरून त्या दोघी बाहेर आल्या. आपली वस्त्रे बदलून त्या तळावर आल्या. तिथे आल्यावर प्रधानपत्नीनी दासी दुश्यलेस एका दासीस प्रधानपुत्र रत्नाकरास स्नान घालण्यास जायला सांगितले .

दासी दुश्यलेने एका दासीस आदेश दिला. ती दासी प्रधानपुत्रास घेऊन दोन सेवाकास घेऊन स्नान घालायला गेली. तिने सेवकांस थोड्या अंतरावर उभे राहायला सांगितले. व ती नदीच्या पात्रात बालकास स्नान घालण्यास उतरली. ती रत्नाकरास स्नान घालत असताना त्याच वेळी नदीच्या पलीकडे काही अंतरावर एक काही दिवसापूर्वी व्यायलेली एक वाघीण पाणी पीत होती. खूप दिवसापासून ती उपाशी होती. तिला शिकार करता आली नव्हती. तसेच ती खूप रोडावली होती. व अश्या स्थितीत तिचे लक्ष पाण्यात उतरलेल्या दासिकडे गेले. व ती सावज टिपण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरली. भुकेली असलेने झाडीतून लपत छपत तिने अचानक हल्ला चढवला. एका फटक्यात तिने त्या दासीला ठार केले. दासीचा आवाज ऐकूण सेवक धावले. व त्यांनी भाल्याने त्या वाघिणीस जखमी केले. त्यामुळे ती आणखीच क्रोधिस्त झाली. व शेजारी असणाऱ्या बालकास गुंडाळलेल्या वस्त्रासवे घेऊन ती पळाली. पटकन तिने नदी पार केली. व ती निबीड अरण्यात दिसेनाशी झाली.

सेवक तिच्या मागोमाग गेले.

दासीचा आवाज ऐकून महाराणी अरूणावती ओरडल्या, “ सेवक धावा.”

सेवक व सैनिक नदीच्या दिशेने धावले. तिथे त्यांनी पाहिले दासी तिथे मृत पडली होती. व दोन सेवक ही दिसत नव्हते. पाठोपाठ दोन अश्वस्वार वेगाने नदी पार करून गेले.

वाघाच्या हल्ल्याचे वर्तमान समजताच प्रधान पत्नी आक्रोश करू लागल्या. त्यांची ती दयनीय अवस्था पाहून महाराणी अरूणावती त्यांना म्हणाल्या, “ आपण चिंता करू नये. सेवक व अश्वस्वार गेले आहेत. प्रधानपुत्र कुशल असेल. आपण प्रधान पत्नी आहात. असा शोक करणे बरे नव्हे.”

प्रधान पत्नी श्यामलता, “ परंतु मी एक माता पण आहे.”

व त्या मोठ्याने आक्रोश करत विलाप करू लागल्या. या विलापाणे त्यांना भोवळ आली. ते पाहून महाराणीनी दुश्यलेस पाणी आणायला सांगितले. व ते श्यामलतेच्या मुखावर शिंपडले. त्या शुध्दीवर येत व पुन्हा बेशुद्ध होत. इकडे सैनिक खूप दूरवर तसेच आसपास अरण्यात त्या वाघिणीच्या शोध घेऊ लागले. पण त्यांना खूप शोधल्यावर देखील ती सापडली नाही. चांगले पाच प्रहर शोध चालू होता. पण अरण्य घनदाट असलेने व धोक्याचे असलेने रिक्त हाताने ते सैनिक परत आले. थोड्या वेळाने श्यामलता शुध्दीवर आल्या. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. नंतर सेवकांना बोलावले व मृत दासीवर अंत्य संस्कार करण्यास सांगितले. थोड्या वेळात व्याघ्राच्या मागे

गेलेले सैनिक आले. ते महाराणीपुढे खाल मान घालून उभे होते.

महाराणी, “ अश्वस्वार मिळाले का प्रधानपुत्र.”

अश्वस्वार ,” नाही महाराणी, आम्ही संपूर्ण अरण्यात खूप लांबपर्यंत गेलो. आतील भाग अत्यंत निबीड आहे. तिथे पालापाचोळा असल्याने आम्हाला पाऊलखुणा देखील सापडल्या नाहीत. तसेच रक्ताचे डाग देखील मिळाले नाहीत. तेव्हा आम्हास शोधणे कठीण झाले.”

महाराणी रागाने बोलली, “ दासी बरोबर पहार्यावर असणाऱ्या सैनिकांना बोलवा.”

दासी सोबत त्या वेळी पाहार्यावर असणारे सैनिक थर थर कापत महाराणी समोर आले. ते खाली मान घालून उभे होते.

“ सेवक, आपण आपली पहर्याची व संरक्षणाची जबाबदारी नीट पार पाडली नाहीत.” राणी क्रोधाने बोलली.

सेवक, “ महाराणी आम्ही दासीच्या सांगण्याने शतपवलावर उभा होतो. गर्द झाडी असल्यामुळे व व्याघ्र नदी पलीकडून आल्याने व हा अचानक हल्ला झाल्याने आम्ही तिथे पोहोचोपर्यंत व्याघ्र नदीपार करून गेला होता. प्रधान पुत्र कपड्यात गुंडाळला असल्याने व व्याघ्र माता मोठी असल्याने ती वेगाने नदीपार गेली. आम्ही आटोकाट प्रयत्न केला. पण….”

महाराणी थोड्या नरमाईने

“ झाल ते काही योग्य नव्हे. आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चीन्ह निर्माण होते. आता इथे राहणे धोक्याचे आहे. वेगाने दासीचे दहन करावे. व तिच्या अस्थी भरून आणाव्यात. त्यासाठी दोन अश्वस्वार इथे थांबून हे कार्य करा. व बाकी सर्वांनी प्रस्थानाच्या तयारीस लागा.”

महाराणीनी प्रधानपत्नीस जवळ जाऊन त्यांचे सांत्वन केले.

महाराणी अरूणावती, “ झाले ते वाईटच, पण शोक करून प्रधानपुत्र परत येणार नाहीत. व आता पाच प्रहर आपण त्यांचा शोध घेतला. त्यांच्या आता मिळण्याची शक्यता कमी आहे. तर आपण आपल्या सुरक्षेसाठी पुढील यात्रेस प्रस्थान केले पाहिजे. इथे राहणे धोक्याचे आहे.”

दासी दुश्यला देखील समजावून सांगतले. शेवटी सर्वांच्या अनुरोधाने जड अंतःकरणाने त्या पुढील प्रवासास तयार झाल्या. महाराणी व प्रधनपत्नी बंदिस्त रथात बसल्या. थोड्याच वेळात त्यांनी प्रस्थान केले. काही सैन्य मागे राहिले.दासीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी….

क्रमशः पुढे……



Friday, December 30, 2022

अंबाला राजकुमारीची प्रेमकथा

 अंबाला

एका राजकुमारीची प्रेमकथा

लेखक : निशिकांत हारुगले.

दिर्घ कथा




हिरव्या गर्द झाडीतून निघालेल्या त्या वाटेवर अगदी निर्जन्य अशी शांतता होती. त्या गर्द झाडीतून निघालेली ती वाट सरळ राज्यमार्गाला जाऊन जोडत होती. दंडकारण्यात तून चाललेली ती वाट अत्यंत उंच व सदाहरित वृक्षांनी वेढलेली होती. त्या अरण्यात राहणारे पक्षी अधून मधून किलकिल आवाज करून ती शांतता भंग करत होते. थोड्याच वेळात एक रथ त्या वाटेवरून राज्यमार्गाच्या दिशेने गेला. राज्यमार्गावरून थेट तो सह्यगिरी पर्वत मलेतील एका नगराच्या दिशेनं मार्गस्थ झाला.त्या रथाच्या मधील भाग सुरक्षित बंदिस्त होता. त्याची चक्रे गोल वर्तुळाकार सुंदर अशा वेली- फुलांनी नटलेली होती. त्या आकृत्या रेखीव व शोभित होत्या. रथाला जुंपलेल्या धवल अश्वांचे शोभा वाढवत तालबद्ध संचलन करत होते. अनुकुचीदार भाले घेतलेले शस्त्र सज्ज सैनिकांचे पथक पुढे व मागे मार्ग क्रमन करत होते. त्या सैन्याकडून पाहता कोणाचेही हृदय भीतीने कंपित होईल असे ते वाटत होते. मुख्य रथाच्या मागे आणखी दोन रथ देखील होते. त्या पाठोपाठ काही अश्वस्वार व पायदळातील जवान मार्गक्रमण करीत होते. राज्यमार्गावरून यांच्या एकत्रित पथ संचलनाने धुळीचे लोट उठत होते. व कालांतराने शांत होत चालले होते. राज्य मार्ग अरण्यातून जात असल्याने संपूर्ण तहा दक्षता घेतली होती. या संचलानातील लाभ स्थानाच्या रथात बसून महाराणी अरूणावती व प्रधानपत्नी श्यामलता दुपारचा अल्पोपहार घेऊन वामकुक्षी घेत होत्या. अचानक वळणावर रथ थांबला. त्यामुळे महाराणी अरूणावतींची व श्यामलतांची निद्रा भंग पावली. त्यांनी रथाची कवाडे उघडली. व रथ का थांबला हे शेजारील सैनिकास विचारले.

महाराणी अरूणावती, “ सेवक रथ का थांबला.”

सेवक , “ थांबा महाराणी मी थोड्याच वेळात आलो.”

सेवक पुढे गेला. व लगेच मागे आला.

सेवक, “ महाराणीचा विजय असो. पुढे एक भला मोठा वृक्ष वाटेत पडला आहे. त्यामुळे रथ थांबवला गेला आहे. पुढे जाता येत नाही. ”

महाराणी, “ मग अश्र्वदल पाठवा व वाटेतून बाजूला करा. व मार्ग रिकामा करा.”

सेवक, “ क्षमा असावी महाराणी, हा वृक्ष अत्यंत जून व कैक पटीने अवाढव्य आहे. त्याला जर हटवायचे म्हंटले. तर आपल्या सैनिकांना दोन दिवस लागतील. व इथे जवळपास कोणतेही गाव नाही.”

महाराणी, “ पर्यायी मार्ग आहे का. पाहा.”

महाराणीचा निरोप सैनिक मुख्य नाईकास देतो. तो नाईक लगेच एक अश्वस्वार पाठवतो. अश्वस्वार निघून गेला. त्याला थोड्याच अंतरावर एक पादचारी पांथस्थ भेटला. त्याने राज्यातील नगराकडे जाणारा पर्यायी मार्ग विचारला.

त्या पांथस्थाने सांगितले. “काल रात्री झालेल्या वादळाने तो विशाल वृक्ष कोसळला पुढे जायचे झाले तर एक मार्ग आहे. पण तो निबीड जंगलातून जातो. व त्या मार्गे जाने धोक्याचे आहे. कारण त्या मार्गावर हिंस्र श्वापदे असतात. तोच मार्ग आहे. अन्य मार्ग इथे नाही आहे. कारण हा भाग राज्य सिमेचा असल्याने परचक्रापासून रक्षण करण्यासाठी ही योजना आहे.”

मार्गा विषयी माहिती मिळताच त्या अश्वस्वाराने कृतज्ञतेने नतमस्तक होऊन निरोप घेतला. व तो वेगाने परत आला. मुख्य नायकाला त्याने सर्व वृत्तांत सांगितला.

मुख्य नायक महाराणीकडे आला. व त्यांस

“ महाराणीचा जय असो. अश्वस्वार आलेला आहे. त्याने आणलेल्या माहिती नुसार एका पपादचाऱ्यकडून मिळालेल्या माहितीवरून पर्यायी मार्ग मिळाला आहे. पण तो सुकर नाही. तो अत्यंत घनदाट जंगलातून जात असलेने तेथे हिंस्र श्वापदे आहेत मात्र त्या मार्गाने गेल्यास आपण लवकर आपल्या राज्यातील एका नगरात पोहोचू. तेव्हा महाराणी अरूणावती बोलल्या,

“ आपण शूर राजा जयवर्धनांचे सैन्य आहोत व धाडसी मार्गाने जाताना घाबरता , ते काही नाही. आपण त्या मार्गाने मार्गस्थ होऊया.”

शेवटी महाराणीच्या आज्ञेने सेवकाने रथ मार्ग बदलला. व तो थोडा राजमार्गाने मागे आला. व राज्यमार्गास लागून असलेल्या अनभिज्ञ मार्गावरून तो संपूर्ण महारानींचा लवाजमा घेऊन निघाला. त्या घनदाट झाडीतून जाणाऱ्या त्या मार्गावरून जाणे अत्यंत कठीण होते. कारण त्या मार्गावरील झाडीतून सूर्य किरणे त्या झाडीतून क्वचित दर्शन घडतं होते.

मुख्य अश्वस्वार नायक सैनिकांना म्हणाला, “ हे पाहा आपल्याला जितक्या वेगाने जाता येईल तितका वेग वाढवून हे विपीन पार करावयास हवे. सूर्यास्त होईपर्यंत त्यांनी बरेच अरण्य पार केले होते. ते करताना काही निरागस शाकाहारी प्राणी वगळता त्यांना कोणतेही हिंस्र श्वापद दिसले नाही.

मात्र सह्याचल पर्वताची सुंदर गिरीमाला मन प्रसन्न करत होती. दिवसभर संचलन करून सैन्य खूप थकले होते. त्याना विश्रांती हवी होती. अरण्य संपले. व एका सुदंर नदीचा प्रदेश लागला. त्या नदीकाठी आल्यावर त्यांनी तेथे थांबून महाराणीकडे तो नायक गेला.

“ महरानीचा जय असो. आपण एक निबीड अरण्य पार केले असून.या प्रवासाने अश्व व सैन्य खूप थकले असल्याने श्रमहारासाठी आपण या ठिकाणी मुक्काम केला तर बरे. थोड्याच वेळात सुर्य मावळेल. व अंधाऱ्या रात्री प्रवास करणे या अरण्यातून बरे नाही.”

महाराणी अरूणावती : “ ठीक आहे. आपण रथाचे अश्व सोडून निश्चीत व्हा. व या तटीनी किनारी आमच्या रहाणेची व्यवस्था करा. तसेच सर्व सैन्य व आमच्या सर्व लवाजम्याची भोजनाची व्यवस्था करा. व आमची प्रधान दासी दुश्यला व प्रधानपुत्र रत्नाकर याला उपस्थित करा.”

महाराणीच्या आज्ञेने तो सेवक मागील रथाजवळ आला. व त्याने दासी दुशलेला महाराणीनी बोलावले असल्याचे सांगितले.

दासी दुशला मागील रथात विश्रांती घेत होती. ती आपला आळस टाकत उठली. व बाकी सेवकांना घेऊन तसेच दुसरी दासी जी प्रधान पुत्राला सांभाळत होती. तिच्यासवे महाराणी अरूणावती समोर उपस्थित झाली.महाराणीपुढे नतमस्तक होत.

“ नमस्कार महाराणी, महाराणी आपण मला बोलावलत, काय आज्ञा आहे?”

अरुणावती, “ येथे मुक्काम करायचा ठरला आहे. तरी आमच्या व प्रधानपत्नीच्या राहण्याची व्यवस्था आपण करावी. तसेच प्रधानपुत्र यांना प्रधानपत्नींकडे सोपवावे. त्यांना त्याला पाहण्याची इच्छा झाली आहे.”

जवळील दासीकडील प्रधान पुत्र घेऊन ती प्रधानपत्नी श्यामलता यांकडे ती देते.

“ हा घ्या आपला पुत्र. भारी खोडकर आहे. संपूर्ण प्रवासात अजिबात तो झोपला नाही. खूप दमवले आम्हाला याने.”

व त्यांच्या सेवेला एक दासी ठेवून आपण इतर सेवकांच्या मदतीने महाराणीच्या रहाणेची व्यवस्था ती लावण्यास गेली. थोड्याच वेळात तिने सैनिकांच्या मदतीने पालं तयार केली. तसेच भोजनाची व्यवस्था करण्यासाठी काही सैनिक फळे गोळा करण्यास काही सरपण गोळा करण्यास पाठवली. काही सैनिकांद्वारे तिने पाले बांधून घेतली. एक दोन दास्या व सेवक जेवण बनवण्यास लागले. थोड्या सेवकांनी अश्वावरून जाऊन रानातून लाख व लाकडे आणली. काहींनी अश्वांना चारा पाणी दिला.

विश्रांतीची व्यवस्था झाल्यावर ती महाराणीच्या रथाजवळ आली. व त्यांना

“ महाराणी अरूणावातींचा विजय असो. आपल्या राहण्याची व्यवस्था केली आहे.”

महाराणी व प्रधानपत्नी रथातून उतरल्या. तो पर्यंत एका सेवकाने त्यांना पाणी एका पात्रातून आणून दिले. ते पाणी घेऊन मुख मार्जन करून तसेच त्या स्वच्छ धुवून ते रेशमी वस्त्राने आपले तोंड पुसले आणि त्यांनी सेवकास बोलावले.

क्रमशः पुढे....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...