अंबाला भाग २५
महारुद्राची माता सिंघणेने शिवव्रत ठेवले होते. महारुद्राची उन्नती व्हावी तसेच शिवकृपा व्हावी म्हणून ती महादेवाची पिंड करून त्याची पूजा करत असे त्यासाठी लागणारे बेलाचे झाड जवळच होते. परंतु त्यास म्हणावी तशी पाने नव्हती. तसेच पूजेस अन्य लोक ही त्या झाडाची पाने नेत असलेने ते वटले होते. बाकी बिल्व पत्राची बहुसंख्य झाडे नदीपलिकडे पारधी वस्ती शेजारी होती. तिने महारुद्राला नदी पलीकडून बिल्व पत्रे आणायला सांगितले. तो नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसह युद्धाभ्यास सराव करण्यासाठी जाणार होता. पण मातेचा आदेश असलेने त्याने प्रथम बेलपत्र आणून द्यायचे ठरवले. नंतर त्याने युद्धाभ्यास सराव करायला जायचं मनात पक्के केले. त्याने आपली वस्त्रे घातली. व कमरेस तलवार एका हातात धनुष्य दुसऱ्या हातात पिशवी पाठीवर भाता असा पेहराव करून तो नदीच्या वाटेस लागला. सकाळचा प्रहर होता. तो नदीतिरी आला. नदीच्या पाण्यात अंदाज घेत शिरला. व त्याने ती नदी पार केली. पोहत तो पैलतीरावर आला. त्याचवेळी घरात पाणी नसलेने ते आणावयास अंबाला घरातील मातीची घागर घेऊन शेजारील सिपणे समवेत पाणी आणावयास निघाली. रोज ती व त्रिशलेबरोबर पाणी आणायला जात असे. मात्र त्या दिवशी घरा शेजारील पारधी कुटुंबातील वस्तलेस प्रसव वेदना सुरू झाल्याने त्रिशला तिथे मदतीसाठी गेली होती. त्यामूळे घरातील सर्व कामाचा भार अंबालेवर पडला होता. तेथे तिचा वावर इंद्रावती नावाने होता. ती आपले नाव इंद्रावती सांगत असे. शेजारील सिपणा व अंबाला पाणी आणावयास नदीकडे निघाल्या. नदी मार्गावर दोन्ही बाजूस अनेक बांबू व वेताची बेटे होती. नदी मार्गावर वाकून ती एकमेकात गुंतली होती ज्याने वक्राकार अर्ध कमान झाली होती. ज्यातून जाताना एक सुखद गारवा मिळत होता. त्या गर्द दाटिने एक निराळे सौंदर्य खुलत होते. प्रभाती वाहणाऱ्या झुळझुळ वाऱ्याने वेळूंचे सुमधुर बासरी वादन चालले होते. त्या वेळी त्या मार्गावरून त्या दोघी पाण्यासाठी लगबगीने निघाल्या होत्या.
अचानक वाटेत कुठून तरी आवाज ऐकू आला. तिने आवाजाच्या दिशेने पहिले तेव्हा त्यांना वाटेकडेला असणाऱ्या बिल्वपत्र वृक्षाच रानात काहीतरी पडल्याचे जाणवले. त्या दोघींनी आपले घडे सावरत उंच टेकावर उभे राहून पाहिले. तेव्हा त्यांना तिथे रानात एक तरुण बेलवृक्षाखाली तळमळताना दिसला. तिने तिथे जाऊन पाहिले. एक सुंदर युवक तिथे पडला आहे. व एक सर्प त्या शेजारून जात आहे. तिने सफाईदारपणे त्या सर्पास शेपटी कडून धरले व गरगर फिरवत लांब फेकून दिले. ती त्या युवका शेजारी आली. तिने सर्पदंश झालेली जागा हेरली. त्या जागेच्या वरील बाजूस तिने आपले उपरणे फाडून बांधले. व त्या दंश केलेल्या जागेवर आपल्या कमरेच्या शस्त्राने घाव केला. रक्त ओघळू लागले.
लगेच सिपनेस ती म्हणाली की लवकर धावत जा व वृध्द बाईसाकडून सर्प दंशावार औषध घेऊन ये.
अंबाचे बोल ऐकून सीपना वेगाने धावत वस्तीवर गेली. व वस्ती बाहेर असणाऱ्या वृध्द बाईसाकडून तिने औषधी घेतली. व परत आली. ती येईपर्यंत त्या तरुणास शुद्ध आली होती. आंबेने केलेल्या वाराने त्याचे विषयुक्त रक्त वाहिले होते.
तो शुध्दीवर येण्यापूर्वी आंबेचे लक्ष त्याकडे गेले. त्याचे गौर कांती असणारे पिळदार सौंदर्य सुर्य किरणात तेजस्वी दिसत होते. वाटे कोणी राजपुत्रच असावा. तो खूप देखणा होता. तिच्या मनात त्यास कुठेतरी पाहिले आहे असे वाटले. तिला लगेच आठवले की तिने महादेव उत्सवावेळी यक्षिणी नृत्यावेळी तिने पाहिलं होतं. त्याचे शरीर कठीण वज्रासारखे होते. व त्याच्या हातात बिल्वपत्र असल्याने तो महादेव उपासक असावा याचा तिने अंदाज बांधला. आज महादेवाचा वार असल्याने तो पूजेसाठी बेलपत्र न्यायला आला असावा.
थोड्याच कालावधीत सिपना इंद्रावती इंद्रावती म्हणत आंबले जवळ आली. व आपल्या जवळील औषधी जी पळस पानात बांधली होती . ती तिने अंबेकडे दिली. ती तिने त्याच्या तोंडत टाकली. ती त्याने बंद डोळ्याने घेतली. महारुद्रास आता शुद्धा आली होती. त्यास शुद्धा आल्याचे पाहताच अंबाला त्याच्यापासून थोडी दूर झाली. त्याला आता आपल्या समोर एक कृष्णवर्णी तरुणी व एक लहान मुलगी दिसत होती. त्याने तिच्याकडे पाहिले. त्यास शुद्ध आल्याचे पाहताच सिपना म्हणाली, “ तुझे आयुष्य मोठे व त्या महादेवाची कृपा म्हणून तू वाचलास. नाहीतर आता यमदेवाच्या दरबारात उभा असतास.”
अंबाला, “ शुभ बोल सिपने , चल आता पाण्याला खूप कामे आहेत. आता तो शुध्दीवर आलाय.”
असे बोलून त्या निघून गेल्या. पारध्यांच्यात राहून अंबाला पक्की पारधी झाली होती. शुध्दीवर आल्यावर तिच्या पाठमोऱ्या देहाकडे तो पाहतच राहिला. ती पाणी भरायला गेली. त्याच्या मनात विचार घोळू लागले. या युवतीस आपण कुठेतरी पाहिलेय पायात वेदना जाणवत होती. उपरण्याच्या तुकड्यांनी बांधलेला पाय त्याने सावरला. व बेलपत्र घेऊन तो वस्तीकडे निघाला. त्या दोघी नदीवर गेल्या त्यांनी झुळझुळ वाहणारे नदीचे पाणी भरून घेतले. व त्या घरी निघून गेल्या.
बिल्वपत्रे घेऊन महारुद्र पुन्हा नदीपार करून घरी गेला. त्याने आपल्या मातेस बिल्वपत्रे दिली. तिचे लक्ष महारुद्राच्या पायाकडे गेले. व त्यास जखमेचे कारण विचारले. तेव्हा त्याने सर्प दंशाचा वृत्तान्त कथन केला. तेव्हा सिंघणेने महादेवाचे आभार मानले. व आपल्या पुत्रावरील अरिष्ट टळले म्हणून दृष्ट काढली. व ‘महादेवाची कृपा झाली व ती मुलगी ऐनवेळी संकटात धावून आली. तिला देव सुखात ठेवू देत.’ असे बोलून तिने महारुद्राला वेताच्या वाकी पलंगावर बसवले. व घरातील विषबाधेवरील औषधी खायला दिली. व ती महादेव पूजेस लागली. पूजाविधी आटोपून तिने महारुद्रास जेवण दिले. व भिल्लम काही कामानिमित्त बाहेर गेला असल्याने वाट पहात बसली.
महारुद्राने जेवण आटोपले व तो बाहेरील पडवीत असणाऱ्या वाकाच्या पलंगावर पहुडला. त्याच्या नजरे समोर ती मुलगी तरळत होती. तिचे सौंदर्य कृष्ण वर्णात देखील उठून दिसत होते. तो दिवसभर विचार करत राहिला. त्याचे मित्र सराव करण्यास बोलवण्यास आले. तेव्हा त्याने त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला. त्याच्या मनात तिचे प्रतिबिंब उमटले होते. मनात वाटत होते की आपण तिला कुठेतरी पाहिले आहे. रात्री जेवणं करुन अंथरूणावर पहुडल्यावर त्यास अचानक आठवले. की त्यानें तिला महादेव उत्सवावेळी पाहिले होते. ती कृष्णवर्णीय मुलगी ती हीच आहे. व त्याच्या गालावर स्मितहास्य उमटले. व तो स्वप्नरंजनात रमून गेला.
क्रमशः पुढे.......
