Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३६. Show all posts
Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३६. Show all posts

Friday, April 7, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३६

 अंबाला एका राजकुमारीची

 प्रेमकथा भाग ३६

क्रमशः पुढे चालू......




नगरनायक मृत पावल्याने तेथील प्रदेशात अराजकता निर्माण झाली. या घटनेचा फायदा उचलण्याचे महाराज वेददत्त यांनी ठरवले. व त्यांनी महारुद्रच्या अखत्यारीत सैन्यदल देऊन त्यास राजधानी व दक्षिण प्रांती असणारी शत्रू सैन्याच्या ताब्यातील नगरे जिंकण्यास पाठवले. महारुद्राने एकामागून एक नगरे जिंकण्यास सुरवात केली. नियोजनबद्धरित्या त्यांनी दक्षिण प्रांतातील उठाव मोडून काढण्यास सुरुवात केली. दक्षिण भागातील एक एक नगर जिंकत त्याने अपरान्त राजाचे सैन्य मागे पिटाळले. त्या सैन्यानी शेवटी राजधानी नगराचा ताबा घेतला. व ते प्रतिकार करू लागले. तेव्हा नगराची संपूर्ण नाकेबंदी महारुद्राने केली. त्यामुळे ते सैन्य नगरात कोंडले गेले. पण नगरतट्टाची शिबंदी फोडता येईना. तेव्हा त्याने व्युव्हरचना तयार केली. चांगले चांगले तिरंदाज घेऊन त्याने दक्षिन बाजूने नगरावर हल्ला चढवला. त्यासाठी त्याने सराईत पारधी नवयुवकांची योजना केली. पारधी लोक नेमबाजीत पटाईत होते. त्यात काही भिल्लकुमार ही होते. त्यांनी दक्षिण दरवाजा उघडणेसाठी तेथील बाह्य पहारा मोडून दरवाजावर रानातून गोळा करून आणलेली लाख ओतली. व त्यावर अग्निबाणांचा वर्षाव केला. लाख कडाडून पेटली. व त्या दरवाजास आग लागली. पण आचार्य वृषभ यांच्या शिष्यांनी ती विझवली. व दरवाजाची शिबंदी फोडू दिली नाही. शेवटी महारुद्राने अरण्यातील विशाल वृक्षाचा बुंधा आणून दरवाजा धडकी देवून मोडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा कठीण होता. शेवटी कमी पहारा बाजूने एक तुकडी घेऊन महारुद्राने चाल केली.

तिरंदाजांची मदत घेत त्यांनी पुढे एका बाजूने तटावर चढून प्रवेश केला. व दरवाजा उघडला. बाकीचे सैन्य आत घुसले. जोरदारपणे रणकंदन झाले. व महारुद्राने राजधानी जिंकून घेतली.

महाराज वेददत्त व महाराणी शामलता तिथे नंतर आल्या. व राजधानी ताब्यात घेतल्यामुळे त्याना खूप आनंद झाला. वेददत्त व शामलता या महालात आल्या. महारुद्राची दक्षिण प्रांतनायक पदी नेमणूक केली. व ते राज्यपाट सांभाळ करू लागले. पण वेददत्त यांना दुसऱ्या काळजीने ग्रासले. कारण एक मुलगा मरण पावला. तर दुसरा मतिमंद व राजकुमारी अंबालाचे देखील काय झाले हे ठावूक नाही. अशा अवस्थेत या राज्याचे पुढे काय होणार ही काळजी त्यांना लागली.

...... ....... ........

महारुद्राच्या पराक्रमाने त्यास दक्षिण नगर प्रदेशाचा कारभार मिळाला होता. त्यामुळे सर्व भिल्लांची ताकद त्या प्रदेशात वाढली होती. त्याने भिल्ल व पारधी वस्त्या सुधारणेस सुरुवात केली होती. तो आता आपल्या मातापित्याबरोबर दक्षिण भागातील नगरात असणाऱ्या भव्य प्रासादात राहू लागला. व आपल्या प्रामाणिक सहकाऱ्यांना आपल्या विभागातील ग्रामांचा प्रमुख नेमले. तो नगरात जरी राहत आसला तरी त्याचे मन अस्वस्थ होते. कारण त्यास त्या कृष्ण कुमारीचे वेड लागले होते. त्यास अनेक सुंदर युवतींनी लग्नाची मागणी घातली होती. तो दिसायला देखणा असल्याने त्याच्या मागे अनेक तरुण युवती लागल्या होत्या. पण त्यांमध्ये त्यास सौंदर्य दिसत नव्हते. त्याच्या नजरेसमोर फक्त ती पारधी युवती तरळत होती. त्याने तिला मागणी घालण्याचे ठरवले.

इकडे अंबाला व त्रिशला नेहमीप्रमाणे रानात कंदमुळे गोळा करत होती. खूप कष्ट केल्यावर थकून त्या दोघी एका उंच शिळेवर बसल्या होत्या. महारुद्र नगरनायक झाल्याची वार्ता त्यांना समजली होती. त्या दोघी थोडा वेळ त्या जंगलातील शिळेवर विसावल्या होत्या. त्यात त्रिशला आंबालेस म्हणाली, “ अंबा महालात राजवैभवात लोळणारी तू व तुझ्यासमोर तेथील मऊशार मखमली अशा पसरलेल्या पायघड्या निघून जाऊन, आपल्या नशिबाशी देवाने असा खेळ केला, की आपली सर्व सुख हिरावून घेतली. किती काळ हा आपला वनवास. ज्या मुलिसमोर नतमस्तक होणारे शिपाई कुठे? व ह्या पारधी वस्तीतल्या व इतर हिंस्र नजरा कुठे? त्यांच्याशी सामना करता आपल्याला सुळावरील पोळी घेण्यासारखा अनुभव येत आहे.”

अंबाला, “ होय, पण या निसर्ग रम्य अशा महालात जगण्याची सवय झाली आहे. फक्त काही कष्ट उपसावे लागत आहेत, पण मी आता ठरवल आहे.”

त्रिशला, “ काय ठरवल आहेस?.”

क्रमशः पुढे....


अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...