अंबाला भाग २७
क्रमशः पुढे चालू.....
तिचा हिरमुसलेला चेहरा पाहून,
त्रिशला, “ तू कोण आहेस हे विसरू नकोस.त्या युवकाने फुले वाहिली तेव्हाच मी ओळखले त्याच्या मनात काय भाव आहे ते.”
अंबाला, “ त्यात काही विशेष वाटत नाही मला. त्याचे प्राण मी वाचवले म्हणून त्याने ती वेणी पाठवली.”
त्रिशला, “ हे बघ तुला चार भींती बाहेर असणार जग माहीत नाही अजून. हे तरुण असेच असतात. अशाप्रकारे जवळीक साधतात अन् नंतर सोडून देतात.”
अंबाला, “ पण तू तर म्हणाली होतीस की या वर्णात जो कोणी तुला पसंत करेल तो तुझा राजकुमार.”
त्रिशला, “ हे बघ त्याच्या गोऱ्या कातडीस भाळू नकोस. तू कोण आहेस? तो कोण आहे? याचे जरा भान ठेव.”
अंबाला, “ मी कोण आहे. ज्या स्त्रीस स्वतःचे घर नाही. जिचे सर्व काही परमेश्वराने हिरावून घेतलेय
अशी अगतिक अबला आहे मी.”
त्रिशला, “ मी असता तू काळजी कशाला करतेस.”
अंबाला, “ तू, तुला तर मी कित्येक वेळा संकटातून वाचवले आहे. तू एक स्त्री आहेस. तुला ही काही मर्यादा आहेत. काही दिवसांनी तुला ही विवाह करावा लागेल. त्या नंतर मी काय करावे?”
त्रिशला, “ म्हणून काय त्या भिल्लांच्या म्हणण्याने नाचणार आहेस का तू. हे पहा जे माझ्या मातेने केले तसे तू ही करू नकोस.”
अंबाला, “ काय केले तुझ्या मातेने ते तू मला सांगितले नाहीस आजवर.”
त्रिशला, “ अशाच प्रकारे परचक्रात सापडल्यावर भिल्ल सहवासाने माझी माता एका भिल्ल कुमाराच्या प्रेमात पडली. व त्याने मी पोटात असताना माझ्या मातेस सोडून दिले. माझ्या मातेस खूप हाल् वनवास भोगावाव लागला. दासी म्हणून तिला प्रधानाच्या घरी राहावे लागले. तू जर का नसतीस तर माझे काय झाले असते हे मलाच माहीत नाही. तू मला एक दासिपुत्री न समजता एक सखी समजून जे शस्त्र व शास्त्र ज्ञान दिलेस. त्यामुळे मी आज एक वीरांगना म्हणून तुझ्यापुढे उभा आहे. मला संपूर्ण जन्मात हे धाडस जमले नसते. तेव्हा उपकार कर्त्यास विसरणे हे मला रुचत नाही. व तू ही एक राजकुमारी असताना या गोष्टीचा विचार कर की तो दिसावयास देखणा असताना, एक राजकुमार शोभेल असा राजबिंडा असताना, त्याच्या प्रेमात अनेक युवती पडू शकतात. तरी देखील तो तुझ वर भाळला मला तरी यात काही गौड बंगाल वाटते. तेव्हा तू सावध रहा. आजही तो नदीतिरावर फिरत होता. आपण इथे आश्रित आहोत. तेव्हा आपण सावध राहिले पाहिजे.”
इतक्यात बाहेरून वृध्द महदव्वा येताना पाहून त्रिशलेने व अंबालेने हा विषय बंद केला. त्या दोघी आपल्या कामास लागल्या. त्रिशलेने महारुद्राचा ससेमिरा चुकवण्यासाठी काही दिवस गावाबाहेर असणाऱ्या छोट्या झऱ्याचे पाणी भरावयाचे ठरविले. व त्या तेथून पाणी भरु लागल्या. तेव्हा चैत मास असल्याने पाणवठ्याचे पाणी एका छोट्या पन्हाळीत रूपांतरित झाले होते. तरी देखील त्या तिथूनच पाणी भरत. त्यामुळे नदीवर त्यांचे जाणे बंद झाले. महारुद्र नदीवर येत असे. पण ती न दिसल्याने तो निराश होत असे. त्याचे कोणत्याही कामात लक्ष लागेना झाले होते. वारंवार तिची आठवण यायची. आपला व तिचा काहीतरी जवळचा संबंध आहे असे त्यास वाटे. एखाद्या वाघास अथवा कोणाही मल्लास तो एका मुठीत लोळवेल. अशी त्याची ताकद होती. पण त्या युवतीस पहिल्यापासून त्याचे हृदय एक अनोळखी वेदना त्यास देत होते.
आता त्याचा पाय व्यवस्थित झाला होता. महारुद्रने नदीपार जाऊन तिचा शोध घ्यायचे ठरविले. आपल्या मित्रांना एक डाव शिकवून त्याने सराव करायला सांगितले. व तो काही काम आहे हे सांगून तिथून निसटला. व थेट त्याने नदी गाठली. त्याने नदी पार केली. तिथे असणाऱ्या वेताच्या बेटा जवळून तो पुढे निघाला. व थेट पारधी वस्तीच्या वाटेला लागला. त्याच्याकडे धनुष्य बाण व भाला होता. तसेच एक छोटी पिशवी ही होती. त्यात त्याने काही झाडाची फळे घेतली. व तो निघाला.
पारधी वस्ती वाटेवरील हिरव्यागार बांबूच्या वाटेने तो निघाला. त्याला पुढून सिपना येताना दिसली. त्याने तिला थांबवले. व तो त्या कृष्णवर्णी मुली विषयी विचारू लागला. तेव्हा त्याला सीपना म्हणाली,
“ ती इंद्रावती आहे. आमच्या वस्तीवर मध्यभागी असणाऱ्या महदव्वा आजीची ती नात आहे.”
महारुद्र, “ ती आता कुठे भेटेल.”
त्याचा हा प्रश्न ऐकूण सिपना गप्प झाली. व ती मुक उभा राहिलो. तेव्हा महारुद्राने तिला आपल्या पिशवीत असणारी रानफळे देवू केली. तेव्हा ती पाहताच सिपनेच्या तोंडास पाणी सुटले. पण एका अनोळखी युवकास असे आपल्या सखीची माहिती देणे योग्य नव्हे हे तिने जाणले. व ती म्हणाली, “मला माहित नाही. व असे तू विचारू नको. तूला टाळण्यासाठीच त्या नदीवर येत नसाव्यात.”
ती नकार देवून नदीस आपल्या दुसऱ्या सखिसवे गेली. तिच्या मैत्रिणी त्याकडून फळे घे असे सुचवत होत्या. मात्र तिने ते टाळले.
सिपनेने माहिती दिली नाही. तरी तो निराश झाला नाही. व पारधी वस्तीवर तो गेला. त्याने बारकाईने निरिक्षिले तेव्हा त्यास पारधी वस्तीवर मध्यभागी सुरेख अशी बांधणी असणारे महदव्वेचे घर दिसले. तो थेट तिथे गेला. घराच्या अंगणात पोहोचला. ते सुंदर नक्षीने सजवले होते. त्याने दारात उभे राहून पाणी मागितले.
दारात याचक आलेला पाहून महदव्वा आतून पाणी घेऊन आली. पाणी देत तिने त्या युवकास न्याहाळले. व विचारले.
“ तू भिल्ल कुमार आहेस ना?”
महारुद्र, “ हो इकडे शिकारी साठी आलो होतो. पाहतो इकडे अरण्यात काही मिळते का?”
महादव्वा, “ पण नदीपार ही अरण्य आहे ना?”
महारुद्र, “ हो आहे की, पण तिकडे भरपूर वेळा शिकार केली. आता इकडे पाहतो. काही मिळते का ते?”
त्याने पाणी पिऊन तृष्णा भागवली. व तो अरण्य वाटेस गेला. तिथे त्याला त्या युवतीचे काही दर्शन झाले नाही. तो पुढे अरण्यात गेला. तिथे त्याने काही रानमेवा गोळा केला. तसेच एकदोन रानकोंबडे मारले. व पुढे शोधत असताना त्यास जाळीतून काहीतरी खुसुर फूसर आवाज ऐकू येवू लागला. तयाने पाहिले एक ससा त्यास पळताना दिसला. त्याने एक बाण चापावर चढवला व सोडला. पण तोपर्यंत एक दुसरा शर त्या सश्यास येऊन लागला. व तो ससा तिथे आडवा झाला होता. तो तिथे गेला. तोपर्यंत त्याच्या पुढ्यात त्रिशला आली. व तिने तो ससा उचलला व त्याकडे पहात ती म्हणाली, “ हा ससा आम्ही संधान केला असून तो आमच्या मालकीचा आहे.”
तो काहीही न बोलता स्तब्ध उभा राहिला. व त्याने इकडे तिकडे पाहिले. तर त्याला दूर अंतरावर अंबाला हातात धनु घेऊन उभा असलेली दिसली.
क्रमशः पुढे......
