अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३७
क्रमशः पुढे चालू.....
अंबाला, “ इथून पुढील लढा माझा मी एकटीने लढायचा ठरवल आहे. माझ्या या लढ्यात तू विनाकारण भरडली जात आहेस.”
त्रिशला, “ नाही मी यात भरडली जात नाहीये. अन् हा लढा फक्त तुझा नाहीये माझा पण आहे. माझी माता देखील या हल्यात मारली गेली आहे. व जीवनाच्या या दुर्धर काळात मी तुला सोडून जाणार नाही.आपले नाते फक्त मैत्रीचे नाही. तर ते अतूट स्नेहबंधनाने बांधले गेलं आहे.”
अंबाला, “ पण इथून पुढील संकटात तुझा जीव ही जाईल.”
त्रिशला, “ त्याची पर्वा नाही संघर्ष करायचा तर दोघींनी व यश मिळवायचं तर ते ही दोघींनी.”
अंबाला, “ पण यापुढे आपली योजना काय असेल. ती कशी अखायची याचा विचार करतेय.”
त्रिशला, “ त्यासाठी परमेश्वराने आपल्याकडे अमोघ अशी देणगी दिली आहे.”
अंबाला, “ ती कोणती?”
त्रिशला, “ आपले लावण्य, तुला कृष्णवर्णी केली असली तरी तुझे सौंदर्य त्यातूनही उमलते व त्यावर भाळून महारुद्रासारखा भिल्ल कुमार तुझ्या प्रेमात पडू पाहतोय,”
अंबाला, (आश्चर्याने)“पण तो साधा माझ्याजवळ जरी फिरकला तरी तुझी आग होताना मी पाहिलीय.”
त्रिशला, “ होय , ते खर आहे. पण आज तो नगरनायक आहे. व त्यामुळे तो आपल्या शेवटच्या चरणाची पायरी होऊ शकतो.”
अंबाला, “ पण त्याचा असा वापर करणे मला तरी योग्य वाटत नाही. व तसे पाहता तो मला आता जवळपास देखील फिरकू देणार नाही. कारण मी ऐकलंय त्याला अनेक युवतींनी मागणी घातली आहे. व त्या सुंदर ललना सोडून तो कशाला या कृष्णवर्णीय मुलीमागे लागेल. छे छे.”
त्रिशला, “तू पुरुषांना ओळखत नाहीस. त्याने इतके वेळा तुझ्याभोवती एखाद्या फुलपाखरासारख्या घिरट्या घातल्या आहेत. पण जराही तुला धक्का लावला नाही. तसेच जर त्याच्या मनात आले असते. तर तो तुला उचलून घेऊन जाऊ शकला असता. त्याला तुझ्या ह्रद्यावरी स्वामित्व मिळवायचे आहे. यालाच प्रेम म्हणतात.”
अंबाला, “ पण मी माझ्या स्वार्थासाठी त्याचा वापर करणे पाप आहे. व त्यास जर मी कोण आहे हे कळले तर त्यास धक्काच बसेल. व एखादा पर पुरुष माझ्या जीवनात मी परीक्षा घेऊनच घेईन.”
त्रिशला, “ पण आपणास बदला घ्यायचा आहे. आपला शेवटचा शत्रू महालात आहे समजलं काय? तू त्याची परीक्षा घे. पण जास्त तानू नकोस. कारण जास्त ताणले की तुटते.”
अंबालाने तिच्या म्हणन्याकडे दुर्लक्ष केले. व ती आपल्या कामात राहिली.
एकदा ती नेहमीप्रमाणे नदीला पाणी भरण्यासाठी निघाली असता तिला समोरून एक घोडेस्वार येताना दिसला. त्याने अंगावर उंची वस्त्रे घातलेली होती. तिने दुरूनच पाहून उगाच संकट नको म्हणून खाल मान घालून ती निघाली. थोड्याच वेळात तो घोडेस्वार तिच्याजवळ आला. घोड्यावरील स्वार खाली उतरला व त्याने तिच्याजवळ जात हटकले. तेव्हा तिने वर तोंड करून पाहिले. व न पहिल्यासारखे करून ती पुढे जाणार इतक्यात त्याने तिची वाट अडवली. व तिचा हात धरला.
तसे तिने त्याकडे पाहिले. तिने ओळखले की तो महारुद्र आहे ते. त्याने आपल्या बरोबर आणलेली सुवर्णमाला तिच्यासमोर धरली. ती त्याकडे पाहून हसली. व तेथून नदीकडे धावत गेली. ती हसल्याचे पाहून तो खुश झाला. व तिच्यामागे गेला. ते नदीच्या काठी गेले. नदीचे पाणी खळाळत वाहत होते. अनेक झाडांच्या निसर्गरम्य अशा सानिध्यात नदीच्या वाहत्या पाण्यात प्रतिबिंब न्याहाळत उभा असणारी विशाल झाडे. व थोड्याच अंतरावर असणारे वेताचे बेट ज्याचे प्रतिबिंब नदीच्या संत वाहत्या पाण्यात पडले होते. अंबालाने त्या पाण्यात आपले हातपाय धुतले व नदीच्या शीतल जलाने आपली मातीची कळशी धुवून स्वच्छ पाण्याने भरली. अनेक पाखरे तिच्या जवळील पाण्यात तृष्णा भागवून शेजारील वेताच्या बेटात उडून गेली. अंबाने भरलेली घागर काठी ठेवली. व ती पाण्याबाहेर आली. आतापर्यंत शांत निरीक्षण करणारा महारुद्र तिला म्हणाला, “ मला तहान लागली आहे. पाणी मिळेल का?”
अंबाला, “ जवळच इतकी सुरेख नदी वाहत आहे. आपण तिजकडे मागावे.”
महारूद्र, “ पण आपल्या हातच्या पाण्यात एक मधुर चव आहे असे आम्ही ऐकलयं. तेव्हा…”
अंबाला, “ मी काही मधमाशी नाही, जी मकरंदाचे मधात रूपांतर करणारी. जिच्या हातात चव असायला. एक साधारण पारधीकन्या आहे.”
असे बोलत तिने त्याकडे पाहिले त्याचा पेहराव पाहून तो एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. त्याला पाहताच कोणीही त्याच्या प्रेमात पडावे. पण हा या कृष्णवर्णीय कन्येत काय पाहतोय. याची परीक्षा घेतलीच पाहिजे. असे तिने मनात योजले.
ती त्यास चेष्टेने म्हणाली, “ नमस्कार महोदय, आपण आता राजाश्रय धारीत एक अधिकारी आहात. व मी अतिसामान्य पारधी कन्या, आपण असे अलंकार विभूषित आहात. व आपणास दिलेले हे ऐश्वर्य, सौंदर्य पाहता आपणास अनेक सुंदर मुली चालून येत असतील. तेव्हा आपण त्याना वरायचे सोडून माझ्या सारख्या कृष्णवर्णीय रुपी ललनेत असे काय पाहता, मी आपल्या राजपदास शोभेल आशी नाहीये. की आपली दासी ही सुंदर असेल. तेव्हा मजसोबत कोणी पाहिले तर आपणास कोणतरी हसेल. आपण माझ्यात एवढे काय पाहिले? याविषयी आपले प्रयोजन काय ते सांगावे.”
महारुद्रास तिचे बोलणे झोंबले. तो तिच्याकडे पाहत.
क्रमशः पुढे........
