Sunday, April 23, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५



क्रमशः पुढे चालू....

सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या घरी हलवले. राजकुमारी अंबाला हिला राजगादी देण्याचे ठरले. अंबालाने महालात प्रवेश केला. सर्व कारभार न्यायदंडाधिकाऱ्याकडे देवून महारुद्र प्रधान वाड्यात गेला होता. नगर दंड अधिकाऱ्याने सर्व राज्यव्यवस्था अंबालेच्या हाती सोपवली होती. सदर दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. सर्वत्र आनंदी आनंद होता. गुढ्या तोरणे सजली होती. गुप्त हेरांनी बातमी आणून दिली होती. त्यावरून ते पत्र प्रधान वेददत्त यांचे नव्हते हे सिद्ध झाले. तसेच त्यांची हत्या करणारा तो हत्यारा अपरांत देशातील राजाने पाठवल्याचे सिद्ध झाले. अंबेला आपण प्रधान वेददत्त यांच्याशी चुकीचे वागलो असे वाटत होते. तिने क्षमादान पत्र पाठवून प्रधान कुटुंबीयांना अभयदान दिले होते.

अंबाला महालात मंत्र्यांना सर्व कामकाज नेमून देऊन ती आराम करण्यास जात असताना एक शिपाई निरोप घेऊन आला. सदर सैनिकाच्या हाती एक पत्र होते. ते मिळताच तिने ते वाचण्यास सुरू केले. त्यात लिहिले होते.

प्रधान वेददत्त व भिल्लम यांचा पुत्र महारुद्र यांचा राजकुमारी यांना नमस्कार आपण मोठ्या मनाने आम्हास माफ केले. त्याबाबत आभारी आहोत. सदर राज्यव्यवस्था आपल्या हाती सोपवून आम्ही सर्व प्रधान कुटुंबीय इथून प्रस्थान करत आहोत. तरी आपणास प्रधानाच्या महालाचे सर्व दस्त ऐवज व इतर धन ठेवून आम्ही जात आहोत. तरी आपण सदर राज्यपदी योग्य प्रधान निवडावा व कारभार पहावा.

आपला सेवक

महारुद्र

ते पत्र वाचताच अंबालेस दुःख झाले. तिच्याजवळ त्रिशला आली. तिने तो मजकूर पाहिला. ती आंबालेस म्हणाली, “आंबाले तुजसाठी या विरक्त पुरुषा इतका योग्य वर मिळणार नाही. त्याच्या मनात आले असते तर तो राज्यावर आपला हक्क दाखवू शकला असता. तसेच अनेक सैन्य त्यास अंकित आहेत. तरी देखील त्याच्या या त्यागी वृत्तीने दाखवून दिले की तोच योग्य वर आहे. व आपण शिव मंदिरात त्यास दिलेले वचन पूर्ण करायला हवे. तू जर त्याला थांबवले नाहीस तर महादेव तुला क्षमा करणार नाहीत.”

अंबाला चटकन राजमहालातून बाहेर पडली. तिने एक अश्व स्वार महारुद्र ज्या वाटेने नगराबाहेर गेला त्या दिशेला पाठवला. व ती देखील काही अश्वस्वार घेऊन निघाली.

राज्य मार्गावर एका वळणावर महारुद्रास व त्याच्या बरोबर चाललेल्या त्याच्या कुटुंबास त्या अश्वस्वाराने गाठले. व राजकुमारी अंबाला आपणास भेटण्यासाठी येत आहे. असे त्याने सांगितले.

महारुद्राच्या मनात विचारांचे काहूर माजले. थोड्याच वेळात अंबाला तिथे दाखल झाली. अश्वावरून उतरून ती त्याच्या समोर आली. राज पेहराव्यात ती खूप सुंदर दिसत होती. पण तिच्याकडे पाहणे चुकीचे असल्याने महारुद्राने मान खाली घातली. ज्याच्या मागे अनेक ललना लागलेल्या असताना तो तिच्यापुढे नतमस्तक पाहून अंबालेस राग आला. ती त्यास म्हणाली,

“ आपण आम्हास असे न भेटता जाणे योग्य नव्हे.”

महारुद्र, “ पण मी आपणास पत्र पाठवले होते.”

अंबाला, “ असे न भेटता जाऊन आपण एक गुन्हा केला आहे. व यासाठी आपणास शिक्षा देण्यात येत आहे.”

महारुद्र, “ कोणती शिक्षा.”

अंबाला, “ आपणास विवाह करावा लागेल.”

महारुद्र, “ कोणाशी?”

अंबाला, “ माझ्याशी.”

तिचे ते शब्द ऐकताच तो

महारुद्र,  “ नाही मी फक्त कृष्णवर्णी इंद्रावतीशिवय कोणाशीही विवाह करणार नाही.”

अंबाला, ( हसत) “ मी आहे तुमची इंद्रावती. जिच्यासाठी तूम्ही  तो पण जिंकलात. या राजकुमारीला आपल्या जीवनात थोडीशी जागा मिळेल का?”

तिच्या तोंडून ते वाक्य एकताच त्यास राहवले नाही. तो तिच्याकडे वर तोंड करून पाहू लागला. त्याने आपले हात तिच्या हाती दीले. ती त्यास सर्व कुटुंबासमवेत महादेव मंदिरात घेऊन गेली. तिथे त्रिशला हजर होती. तिने ठरल्या प्रमाणे सर्व तयारी केली होती. त्या ठिकाणी अंबाला व महारुद्र यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

तदनंतर महारुद्र राजा व अंबाला महाराणी झाली. व ते दोघे सुखात आपला राजपाट सांभाळू लागले. पुढे त्याने आपला मित्र विरभद्र याच्याशी त्रिशलेचा विवाह करून दिला. व शत्रू  देश अपरांत राज्यावर हल्ला करून त्याने ते राज्य जिंकून घेतले. व तेथे आपला मित्र वीरभद्रची राजा म्हणून निवड केली. व त्या प्रदेशावर वीरभद्र व त्रिशला सुखाने राज्य करू लागली.

अशा प्रकारे कुंतल देशाच्या या कन्या सुखाने राजपाट सांभाळू लागल्या.

समाप्त


Saturday, April 22, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४४

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४४





क्रमशः पुढे चालू.......

अश्वावर स्वार होऊन निघून आलेल्या अंबालेस अन्न गोड लागेना झाले होते. ती कोणत्याही नगरात राहण्यापेक्षा अरण्यात राहू लागली. पण ज्या त्रिशलेस ती मागे टाकून आली होती. तिच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली होती. अरण्यात राहून तेथील नदीवर अंघोळ केल्यामुळे तिची काजळी धुवून जाऊ लागली. तिच्या मनात त्रिशलेस सोडवण्याची उत्कट भावना जागृत होत होती.

पण आता तिला सोडवणे कठीण झाले होते. आता ती पुन्हा गौरवर्णीय दिसू लागली होती. जंगलात राहून त्रासलेली अंबाला नगराजवळील ग्रामी आली. असता तिला समजले की त्रिशलेस सुळावर चढवले जाणार आहे. पण तिला दिलेली शिक्षा अन्याय कारक होती. कारण राज्यात कोणत्याही स्त्रीस सुळावर चढवले जात नव्हते. व त्रिशलेस सुळावर चढवले जाणार असल्याचे समजल्या पासून ती बेचैन झाली. तिने जवळून जाणाऱ्या एका वाटसरू कडून माहिती मिळवली. व तेथून जाताना एका घरामागील सुकत घातलेली एका नारीची वस्त्रे तिने उचलली. व ती अरण्यात गेली. आता तिची तिला लाज वाटू लागली. कारण स्वतःच्या बदल्यासाठी तिने त्रिशलेस मृत्यच्या जबड्यात टाकले होते. आपले काहीही होवो. आपण त्रिशलेस या मृत्यूच्या सापळ्यातून वाचवायचे तिने ठरवले.

तो काळा दिवस उजाडला. दोन दिवसांनी फाल्गुन अमावस्या होती. अंबाला एका वृक्षाच्या ढोलीत विसावली होती. अचानक तिला एक काळसर्प चावत आहे. व एक काळसर रंगाचा पुरुष तिच्या रक्षणार्थ भाला घेऊन उभा आहे. असे स्वप्न पडले. तिला जाग आली. तिने पहिले सर्वत्र उजेड पडला आहे. पुर्व क्षितिजावर रविराज उगवला आहे. ती तेथून खाली उतरली. व नदीवर आली. तिने तिथे स्नान केले. व स्नान करतेवेळी तिला नदीपालिकडे एक शिव मंदिर दिसले. सदर मंदिर जुन्या काळातील एका राजवटीत बांधले गेले होते. प्रांगणातील नंदीवरून तिने ते शिव मंदिर असल्याचे ओळखले. प्रभातीची वेळ असल्याने कोणी तिथे नव्हते. ती तिथे गेली. मंदिरात अनेक कोळीस्टके होती. तिने बाजूच्या झुडपातील डहाळ्या काढल्या. व संपूर्ण मंदिर झाडून काढले. व स्वच्छ केले.

त्यानंतर तिने आपल्या अंगावरील वस्त्र ओले करून नंदी व शिव पिंडीस पाणी घातले. नंतर तेथील जवळील रानातील फुले फळे व बिल्वपत्रे तिने वाहिली. व नमस्कार केला. व त्रिशलेच्या सुटकेविषयी तिने प्रतिज्ञा केली. व साकडे घातले. व पुन्हा अरण्यात आली. व आपला पेहराव बदलला. व आपली तलवार तिने एका बांबूच्या काठीत लपवली. व एका वृध्द म्हातारीचा पेहराव करून ती राजधानी नगराच्या दिशेने निघाली.

नगरात आल्यावर ती वृध्द म्हातारी प्रमाणे काठी टेकत चौकशी करत ती त्या वधस्थंभ असणाऱ्या नगरातील मध्य चौकात असणाऱ्या प्रांगणाकडे निघाली. शिपाई त्रिशलेस ढकलत ढकलत त्या ठिकाणाला घेऊन चालले होते. वाटेत नगरातील व राज्यातील अनेक लोकांची गर्दी झाली होती. तिला अनेक लोक दगड मारत होते. व राज्यद्रोही देखील म्हणत होते. अंबाला गर्दीतून वाट काढत तिकडे निघाली. लोकांचे कडे तोडत ती पुढे जाताना एक स्त्री तिला म्हणाली, “ अहो आजीबाई, तिथे काही अन्न वाटणार नाहीत. एवढ्या गडबडीने निघालाय.”

वृध्द वेशातील अंबाला, “तेच पाहायला जातेय मुली मी, की ती धाडशी कुंतल कन्या कोण आहे ते.”

ती सरळ त्या निर्माण केलेल्या वधस्तंभाजवळ असणाऱ्या गराड्यात आली. तिथे त्रिशलेस बांधले होते. तिच्या शरीरावर चाबकाचे वळ होते. अंगावरील कपडे फाटलेली होती. तिच्या भोवती शिपायांचा पहारा होता. जवळच असणाऱ्या उंच असनावर महारुद्र, राजमाता श्यमलाता व दरबारातील मंत्री अन् राज्य न्यायदंड अधिकारी विराजमान झाले होते.

अंबाला सैन्याचा गराडा न्याहाळत आत शिरण्यासाठी पाहू लागली. व एके ठिकाणी असणाऱ्या बांबूच्या पोकळ खिंडारातून ती आत शिरली. तिथे आल्यावर सैनिकांनी तिला हटकले. तेव्हा तिने त्या पहारेकरू सैन्यास ढकलले. व ती आत शिरली. व त्रिशलेजवळ जाऊन तिने तिला मिठी मारली. ते पाहताच त्रिशला तिला म्हणाली, “आंबे कशाला आलीस इथे, जा निघून.”

तेवढ्यात जवळचे सैनिक धावले. व तिला पकडण्यास धजावले. आंबालेने लगेच आपल्या हातातील काठीत लपलेली तलवार उपसत त्या सैनिकास म्हणाली, “थांबा तिथे नाहीतर एकेकास यमसदनी धाडेन.”

तिचा तो कठोर आवाज ऐकताच सैन्य थबकले. व तिच्या हातातील तलवारीला पाहू लागले. ती त्याना परिचयाची वाटली. इतक्यात महारुद्र आपल्या सिंहासनावरून उठत “ कोण आहेस तू. व या राजद्रोही स्त्रीचा व तुझा संबंध काय?”

वृध्द वेशातील अंबाला त्यास म्हणाली, “ त्रिशला राजद्रोही नाही. व तिने नाही मारले प्रधान वेददत्त यांना, ते दुसऱ्या शत्रूकडून मारले गेले. व राजद्रोहाचे म्हणत असाल तर प्रधान वेददत्त हे राज्याचे खरे द्रोही आहेत. त्याचा हा घ्या पुरावा.”

श्यामलता, “ पण तू कोण आहेस. व तुझा या राजघराण्याशी संबंध काय? व एखाद्या जबाबदार व्यक्तीवर तू जे आरोप करत आहेस. त्यास शिक्षा देण्याचा अधिकार तुला कोणी दिला.”

अंबाला, “ राजमाता मला ओळखले नाही का? मी आहे अंबाला, राजकुमारी अंबाला, महाराज जयवर्धन व महाराणी अरूणावती यांची कन्या.”

ती आपला वृध्द स्त्री पेहराव टाकून ती उभा राहिली. तिने आपला डोक्याचा टोप काढून टाकला.

अंबाला असे म्हणताच जो तो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तिच्या हातात राज तलवार चमकत होती.

महारुद्र तिच्याकडे पाहू लागला. ती सूर्याच्या तेजाने तळपत होती. तिचे लांबसडक काळेभोर केस उन्हात चमकत होते. व ती एखाद्या सुंदर देवतेप्रमाणे दिसत होती. तिला पाहताच त्या कृष्णकुमारी इंद्रावतीची आठवण झाली. तो तिच्याकडे पहातच राहिला.

महारुद्र, “ आपण स्वतःस राजकुमारी म्हणता याचा काही पुरावा.”

अंबाला, ( हसत)“ पुरावा हा घ्या. ही माझी कुलदेवता शिव शंकराचे प्रतीक असणारी साखळी. व माझी ही राज्यतलवार. व ती राज्य न्यायदंड अधिकाऱ्यांना प्रधान वेददत्त यांचे ते पत्र देते.

त्यामुळे तिथे असणारी सर्व रयत अंबालेस पाठिंबा देते. व त्रिशलेस सोडण्यास सांगू लागतात. एकच गलका होतो. शिपाई ही अंबालेस ओळखतात व तिला न्याय मिळाला पाहिजे. ती राज्याची खरी वारस आहे. हे बोलू लागतात. तेव्हा पुरावे तपासून राज्य न्याय दंडाधिकारी सर्वतोपरी निर्णय महारुद्र वर सोपवतात.

महारुद्र, “ सर्व पुरावे पाहून व तेथील जनमत पाहून निर्णय जाहीर करतो.

“ सदर घटने नुसार आपणास झालेले कष्ट व आपणावर आलेली संकटे पाहता, तसेच इतर सादर पुरावे पाहता आपण या राज्याच्या खऱ्या वारस आहात. त्यामुळे एका राज्यपद अधिकारी व्यक्तीस शासन करणेचा मज अधिकार नाही. इथून पुढील निर्णय राज्याचे वारस या नात्याने आपण घ्याल. मी व माझे कुटुंब तुम्हास झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. व सदर राज्य पदावरील माझा हक्क मी सोडत आहे. तसेच मी व माझे कुटुंबीय हे राज्य सोडून जात आहोत. यासाठी मला एक सप्ताहाची मुदत मिळावी. व जर आपणास वाटले की प्रधानाच्या गुन्ह्याची शिक्षा मज द्यावी तर ती भोगण्यासाठी मी तयार आहे.”

असे बोलून आपला निर्णय देवून तो निघून गेला. महाराणी श्यामलता दुःखी होऊन निघून गेल्या. महारुद्राच्या या न्यायीवृत्तीने लोक प्रभावीत झालीत. व त्याचा जयजयकार करू लागली.

….. ….. ….. …… …..

क्रमशः पुढे.....

Friday, April 21, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४३

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४३



क्रमशः पुढे चालू.......

 तो वेगाने महालात आला. त्याने तिथे आल्यावर सर्व पाहणी केली. महाराज मृत झाल्याचे कळले. त्यास वाईट वाटत होते. त्याने शिपायांना शोध घेण्यास सांगितले. व शत्रू कोठून आला याचा अंदाज बांधून तो अश्वदल घेऊन बाहेर पडला. व वेगाने अश्वदलाची दिशा बदलून तलावाकडे तो निघाला. व काही सैन्य अरण्याकडील गुप्त भूयाराकडे त्याने पाठवले. व तो वेगाने तलावाजवळ आला.

 तिथे आल्यावर त्याने तेथील पहार्यावरील सैन्य पाहिले. ते बेशुद्ध होते. त्याने त्यातील एका सैन्याला लागलेला तिर त्याने उपसला व पाहिला. त्याने तो दिवटीच्या उजेडात न्याहाळला. तेव्हा त्याच्या लक्षात आले. की आश्रमावरील हल्ला करणाऱ्या त्या दोन घोषाधारी आक्रमक वीरांगनांकडे असेच शर होते. त्याने आपल्या सैन्याना सावध होण्यास सांगितले. व तो आपला मित्र वीरभद्राजवळ आला. त्याने पाहिले की तो मुर्च्छीत पडला आहे. त्याने ओळखले की हा हल्ला करणाऱ्या त्या दोन महिलाच असणार. पण त्या असे का करत असाव्यात याबाबत त्याच्या मनात गूढ वाढले होते. व राजमहालावरील त्यांच्या अशा प्रकारच्या हल्ल्याने त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

इतक्यात एक शिपाई सांगत आला. की तलावाच्या पलीकडे कोण तरी बाहेर पोहून पडत आहे. तेव्हा महारुद्राने आदेश दिला. व अश्वदलातील जवान तिकडे निघाले. त्या दोघी तोपर्यंत पाण्याबाहेर आल्या होत्या. त्या आता खूप थकल्या होत्या. दुपारचा खाल्लेला ताकयुक्त पाणीभात केव्हाच जिरला होता. तरी देखील त्यांना लढावे लागणार होते. अश्वदलातील सैन्य येताना पाहून त्रिशला व अंबाला दोघीही आपल्या भात्यातील तिरांनी वेध घेऊ लागल्या. दिवटीच्या उजेडात त्यांनी सैन्य टिपण्यास सुरुवात केली. पण त्यांचे शर लागूनही ते पुढे येत होते. कारण ते विशेष चिलखती अश्वदल होते. तेव्हा अंबा म्हणाली, “ कंठ”

त्रिशलाने शर कंठ धरून नेम सोडले. व ते सैन्य पटापट खाली पडू लागले.

अश्वदल नायकाने ते हेरले. व दोनच दिवट्या ठेवून ‘अधोमुख' असे उच्चार त्याने केला. सर्व सैन्य खालच्या दिशेला आपल्या माना झुकवून वेगाने येऊ लागले. त्या दोघींनी त्यांची सूचना ऐकली होती. त्या वेगाने तलावा जवळील झाडीत घुसल्या. आता अंधारात त्यांना शोधणे कठीण होते. त्या वनाच्छादित भागात गर्द झाडे आता त्या दोघींच्या साहाय्यास आली होती. अंधाराचा फायदा घेऊन त्या एक एक सैन्य कापू लागल्या. महारुद्र त्या किती वीर आहेत हे जाणून होता. त्याने लगेच आदेश दिला व राखीव सैन्य तुकडी बोलावली. तुकडी हजर झाली. व वेगाने झाडीत घुसू लागली. त्या दोघींनी आता लढत राहण्यापेक्षा निसटून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या तुकडीने त्या विभागास घेरले होते. महारुद्र देखील तिथे आला

त्रिशला ही तिरंदाजित हुशार होती. तिला अंबाले प्रमाणे तलवार बाजी जमत नव्हती. अंबाला अष्टपैलू होती. त्रिशलेने पाहता पाहता झाडीतून लपत छपत तिन चार शिपाई टिपले. पण तीच्या भात्यातील शर संपले होते. तिने तो चाप व भाता तिथेच फेकला. व तेथील मृत शिपायाची तलवार तिने उचलली व ती वाटेत येईल त्यास हातघाई करत चालली. इतक्यात एका राखीव दलातील शिपायाच्या हातास तिचा धनु लागला. त्याने तो उचलून तेथील मृत शिपायाला लागलेला शर काढला. व नेम धरून शर सोडला. तो शर त्रिशलेच्या दंडाजवळील खुबनीत लागला. ती कोसळली. ती खूप थकली होती. आता लढणे कठीण झाले. अंबाला तिच्या जवळ आली. व तिला चलण्यास विनवू लागली.

तेव्हा त्रिशला म्हणाली, “माझी साथ, फक्त इथवर व माझा बदला ही पूर्ण झाला आहे. तेव्हा तू निघ. नाहीतर माझ्यासोबत तू ही मरशील.”

अंबाला, “ जीवनाच्या या रणांगणात मी तुला सोडून जाणार नाही. मरण आले तरी चालेल.”

त्रिशला, “ मुर्खासारखे बोलू नकोस. तुला शपथ आहे माझी. तू निघ. माझी साथ इथवरच.”

त्रिशला विणवत होती. शेवटी अंबाला वेगाने समोरील शिपायांना मारत पुढे गेली. व एका वळणावर बाहेर पडली. तिथे एका अश्वदलातील विरास खाली पडून ती घोड्यावर स्वार झाली. व वेगाने नाहीशी झाली. बाकीच्या अश्वदलातील सैन्याने तिला पकडणेचा प्रयत्न केला. पण ते पकडू शकले नाहीत.

इकडे त्रिशलेस कैद करण्यात आले. महारुद्राने तिला कारागृहात पाठवले.

इकडे अश्वस्वार जे  अंबालेच्या मागे गेले होते. ते महारुद्राजवळ आले. व त्यांनी त्यास सांगितले. की तो घोशाधारी  शत्रू हातून निसटला.

महारुद्र त्याचा शोध घेण्यास सांगून  महालात आला. महालात शोक चालू होता. तिथे आल्यावर तो चिडला.  व त्या कारागृहात कैद केलेल्या बुरखाधारी ललनेस ठार मारण्यास निघाला.  तेव्हा मंत्री महोदयांनी त्यास अडवले. व ही वेळ हा विचार करण्याची नसून विचारपूर्वक त्या महिलेच्या साहाय्याने महाराजांच्या हत्यारांपर्यंत पोहोचता येईल. त्याने मग महाराजांचा अग्नी संस्कार केला.

दुसऱ्या दिवशी त्रिशलेस जाग आली. तिला जाग आल्याचे पाहताच शिपाई निरोप घेऊन गेला. महारुद्र तिला पाहणेस आला. बंधिखाण्याचे दरवाजे जोरात आपटत तो तिच्या समोर आला. विस्कटलेल्या अवस्थेतील आपले केस सावरत ती त्यास बघून हसत. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला या गोष्टीचा जराही पश्चाताप वाटत नव्हता. तिने आपले केस बाजूला सारले. महारुद्र तिला पाहताच

महारुद्र, “कोन त्रिशला तू हे काय केलेस. व या मागे तुझा हेतू काय?”

त्रिशला, “ मी माझा बदला घेतलाय.”

महारुद्र, “ कसला बदला महाराज वेददत्त यांसारख्या प्रजेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस मारून तू कठोर गुन्हा केला आहेस. व तुझा दुसरा साथीदार कोण होता? व इंद्रावती कुठे आहे.”

त्रिशला, “ तू लावलेल्या अग्नीकांडात ती नष्ट झाली.”

महारुद्र, “ काय मी लावलेलं अग्निकांड, छे हे माझ्यावर चुकीचे आरोप करतेस. माझं इंद्रावतीवर प्रेम होत. अन् जर का मला तिला मारायची असती तर तिच्यासाठी एवढा उपद्व्याप मी केलाच नसता. तसे पाहता आमचे प्रेम तुलाच पसंत नव्हते.”

त्रिशला, “ मी काही मूर्ख नाही. संपूर्ण  पारधी वस्तीत आमच्याच सदनास आग लागली. कारण तुझ्या या राजे जिवनात अंबा आडवी आली होती. व आमच्या शरीराची राख होण्याआधी तू बोहल्यावर चढत आहेस. हा पुरावा काय कमी आहे. व मी महाराज वेददत्त यांना नाही तर प्रधान वेददत्त यांना शासन केले आहे. व मला या करणीचा जराही पश्चाताप होत नाही.”

महारुद्र, “ हे तू खोटं बोलतेस.  सांग इंद्रावतीचे काय केलेस तु? त्या अग्नितून तू वाचलीस मग इंद्रावती कुठे आहे?”

त्रिशला, “ मला मरण आले तरी चालेल. पण मी मात्र सांगणार नाही.”

महारुद्र तुरुंग अधिकाऱ्यास तिच्यावर कठोर उपाय करून तिच्या साथीदाराची नावे वदवून घेण्यास सांगतो. तसेच इंद्रावतीचा पत्ता देखील काढण्यास सांगतो. व तेथून निघतो. जाताना त्याच्या मनात विचारांचे  काहूर माजू लागले. अनेक प्रश्न त्याच्या मनात उठू लागले. राहून राहून त्यास वाटत होते की इंद्रावती जिवंत आहे. व या त्रिशलेने तिचे काही बरेवाईट केले असणार.

त्याने त्रिशलेवर तेथील तुरुंग अधिकाऱ्यास सांगून अनन्वित अत्याचार केले. खूप त्रास सहन करूनही त्रिशलेने ब्र शब्द ही काढला नाही.

इकडे महालात महाराणी श्यामलतेशी महारुद्राने चर्चा केली. तेव्हा त्यास एवढेच समजले की त्रिशला ही एक दासी कन्या आहे. व तिथे महालात राजकुमारी अंबालाच्या सेवेत होती.

 तेव्हा महारुद्राने कृष्णरुपी इंद्रावतीची चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की अशी कोणतीही कृष्णकुमारी दासी व अन्य नोकर नव्हती.

त्याच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्याने कसून चौकशी केली. पण काही कळले नाही. शेवटी तिला न्यायदंडाधिकार्यांपुढे सादर करण्यात आले. साक्षी पुरावे तपासले. असता. महाराजांवर एका मृत सैन्याने हल्ला केला होता. व तो यांचाच साथीदार ठरवणेत आले. व तिला मृत्यदंडाची शिक्षा देण्यात आली. ती ही भर चौकात ज्यामुळे दुसरे कोणीही पुन्हा राजवाड्यातील व्यक्तींवर हल्ला करताना कचरेल यासाठी राजधानीतील भर चौकातील शेजारी असणाऱ्या प्रांगणात फाल्गुन वद्य अमावशेच्या आधी दोन दिवसापूर्वीच्या दिवशी तिला मृत्यदंड देण्याचे ठरले. व त्याची तयारी सुरू केली.

….. ..... ….. …..


क्रमशः पुढे.....


Wednesday, April 19, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४२

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४२



क्रमशः पुढे चालू......

रात्रीच्या अंधारातून वाट काढत त्या भुयारात शिरल्या. कोणत्या ठिकाणी दिवट्या असतात याचा त्यांना अंदाज होता. त्यांनी त्या जागा चाचपल्या. तेव्हा त्यांना ती जागा सापडली. त्यांनी तेथील दिवळीतील तेल घालून ती दिवटी पेटवली. व त्या निघाल्या. त्या माग काढत महालाजवळ आल्या. पायऱ्या चढूण त्या वर गेल्या. त्या पायऱ्या ओळखीच्या होत्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या चडून त्या राजप्रासादाजवळील त्या गुप्त दरवाजा जवळ आल्या मासोळी विरुद्ध दिशेने होती. पण मासोळीच्या विरुध्द बाजूला एक चक्र होते. ते त्या दोघींनी फिरवण्यास सुरवात केली. खूप दिवस दरवाजा उघडला न गेल्यामुळे तो उघडणे अवघड होते. पण खूप प्रयत्न करून शेवटी त्या दोघींनी तो उघडला. त्या खोलीत आल्या. व तेथून जवळील अंबालाच्या स्नानगृहातून आत आल्या. तिथे आल्यावर ते रांजण त्यांना दिसले. ज्या स्नानगृहात अंबाला स्नान करत होती. तेथून त्या पुढे दालनात आल्या. जिथे अंबाला निद्रा घेत असे. त्यांनी पाहिले तिथे कोणतरी झोपले होते. अंबालेने दिवटीच्या उजेडात पाहिले ती उत्तर नगर नायकाची मुलगी होती. तिला खूप राग आला. व ती तिला मारणार इतक्यात त्रिशलेने अंबालास मागे खेचले. व आपल्या जवळील शिशितील औषध रुमालात घेऊन त्या मुलीस बेशुद्ध केले. तेथून त्या पुढे सरकल्या. तो महाल त्यांच्या परिचयाचा होता. वाटेतील शिपायांना बेशुद्ध करत मारत त्या दोघी प्रधानाच्या दालनात आल्या. तिथे वेददत्त झोपले होते. शेजारी शामलता ही होत्या. त्रिशलाने दासींना व इतर सैन्यांना बेशुद्ध केले. तसेच महाराणी श्यामलता यांना ही बेशुद्ध केले. व त्या दोघी झोपलेल्या महाराज वेददत्त यांजवळ आल्या. व त्यांना जागे केले. त्यांनी जागे झाल्यावर पाहिले की त्यासमोर दोन कृष्ण पोशाख घातलेल्या तरुण युवती होत्या तयांच्या हाती तलवारी होत्या. 

त्यांना पाहताच महाराज वेद दत्त, “ कोण आहात, व असे माझ्या कक्षात येऊन माझ्यावर हल्ला करण्याचे धाडस करून तुम्ही जिवंत सुटाल असे वाटते.”

अंबाला , आपली तलवार दाखवत, “ओळखते का ही तलवार तुम्हाला? यमसदनी पाठवणेसाठी आलोय आम्ही. तुमचा साक्षात काळ बनून महाराज वेददत्त.”

महाराज वेददत्त, “ पण मी तुमच्या वर कोणता असा अन्याय केलाय ते सांगा.”

अंबाला, “ संपूर्ण राज्य घशात घातले. अन् वरती मानभावी बोलणे करता शोभत नाही आपल्याला, स्वतःच्या राजाशी असा दगा फटका करून निर्दोष असल्याचा आव आणू नका.”

महाराज वेददत्त, “ पण मी हे राज्य माझ्या मनगटाच्या व हिंमतीच्या बळावर घेतलेय. तुमचा यासी संबंध काय?”

अंबाला व त्रिशला तोंडावरील घोषा काढतात.

त्रिशला, “ पहा या चेहऱ्यांना ओळखता का? ओळखत नसाल तर ओळख करून देते. मी आहे दासी देवकीची सुता त्रिशला, व ही आहे कृष्णरुपधारी अंबाला, राजकुमारी अंबाला.”

अंबाला हे नाव ऐकताच वेददत्त आश्चर्याने

“ तू जिवंत आहेस, खूप बरे वाटले. पण तू तर त्या हल्यात मरण पावली होतीस ना. मग ती प्रेते कुणाची?”

अंबाला, “ तुम्ही आम्हाला मारण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता. पण परमेश्वराला ते मान्य नव्हते. महादेव कृपेमुळे मी वाचले. पण तुमच्या दगाबाजीमुळे महाराणी अरुणावतींना प्राण गमवावा लागला.”

महाराज वेददत्त, “ पण या घटनेशी माझा तिळमात्र संबंध नव्हता. मी तेव्हा उत्तर स्वारीवर होतो.”

अंबाला, “ हो तुम्ही उत्तर स्वारीवर होताच पण त्याच दरम्यान आचार्य वृषभ व दक्षिण नगर नायकाशी संधान साधून होतात. व तुमच्या सांगण्याने त्यांनी राजधानी नगरावर हल्ला चढवला. व त्यावेळी नगराचे रक्षण करताना महाराणी अरूणावतीना वीरमरण आले. पण तुमचाच डाव नगर नायकाने उलटवला. व तुम्हास राजा मानण्यास नकार दिला. तेव्हा आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर हल्ला चढवून शक्तिहीन करून आपला स्वार्थ साधलात. व राजे झालात.”

महाराज वेददत्त, “ पुराव्या अभावी फक्त आपला क्रोधाग्नी शमविण्यासाठी तुम्ही माझ्यावर आरोप करीत आहात. तू म्हणत असशील तर आताच या घटकेला मी या राजेपदाचा राजीनामा देतो.”

अंबाला, “ ज्या राज्याने माझे माता पिता हिरावून घेतले. ते राज्य माझ्या काय कामाचे. व पुरावा म्हणत असाल तर तो मी बरोबर आणलाय. वाच त्रिशले ते पत्र जे प्रधान वेददत्त यांनी दक्षिणनगर नायकास लिहिले होते.

त्रिशलाने ते पत्र काढले. व ती वाचू लागली

महाशय,

दक्षिणनगर नायकास आपला मित्र वेददत्त यांचा नमस्कार असो. महाराज जयवर्धन हे कर्काच्या नांगीत व मगरीच्या तिड्यात सापडल्यासारखे झाले आहेत. उत्तर सीमेवर होणारे हल्ले परतवण्यासाठी मी महाराज जयवर्धन यांसमवेत जात असून सदर राजधानी नगराचा ताबा तुम्ही घ्यावा. व यासाठी आपले आप्त आचार्य वृषभ यांची मदत घ्या. बाकीचे नंतर पाहू.”

                         आपला मित्र प्रधान

वेद दत्त.

वेददत्त यांनी ते मोहोर बंद पत्र पाहिले. तेव्हा ते म्हणाले हे पत्र मी दिलेले नाही.

अंबाला , “ शिक्का तर आपलाच आहे.”

महाराज वेददत्त, “ तरी ही हे पत्र माझे नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या शेजे शेजारी असणारी तलवार घेण्याचा प्रयत्न केला. तोच अंबालेने त्यांच्या हातावरवारर केला. इतक्यात त्रिशलाने ती तलवार दूर केली. व त्यांना म्हणाली, “महाराज वेद दत्त मी दासी देवकी ची सुता. जिच्यावर आपण अनन्वित अत्याचार महालात करत होतात. ते मी पाहिलेत. त्याच काय.”

महाराज वेददत्त, “ तुझ्या मातेने जे काही मज दीले ते काही उपकार नाही केले. ती एक दासी होती. जी आपल्या मुलीला घेऊन दारोदार भिक मागत होती. मी तिला आश्रय दिला. दोन वेळचे अन्न दिले. तुला राजमहालात ठेवली. व तिने मला जे दिले ते स्वइच्छेने या उपकाराची परतफेड होती.”

इतक्यात एक तीर वेगाने आला व त्याने महाराज वेद दत्त यांच्या कंठाचा वेध घेतला.

अंबालेने त्रिशलेस इशारा केला. त्रिशलेने वेगाने हालचाल केली व कमरेची धारदार भाल्यासारखी निप घेऊन तिने ती अचूक फेकली. ती त्या मारेकऱ्यास लागली. तो जागीच ठार झाला. त्या दोघी वेददत्त यांजवल गेल्या. पण ते मृत झाले होते. इतक्यात महालातील सैन्य सावध झाले. ते वेद दत्त यांच्या दालनात आले. त्यांनी महाराजांना मृत पाहिले. व त्यांनी शिबंदीचा पहारा कडक केला. एकच दंगा झाला. त्या दोघी सावध होऊन पुन्हा माघारी निघाल्या. व गुप्त मार्गात शिरल्या. त्यांचा मागोवा घेत काही सैन्य त्या गुप्त मार्गात शिरले. इकडे एक घोडेस्वार वेगाने महादेव नगराकडे महारुद्राला संदेश देण्यास गेला. संदेश मिळताच तो वेगाने महलाकडे निघाला. वाटेत विचार करता त्याच्या लक्षात आले की महालाचा पहारा कडक असताना मारेकरी कुठून गेले.

क्रमशः पुढे....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४१

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४१



क्रमशः पुढे चालू.....

 अंबाला, “ मरण आले तरी बेहत्तर पण या सर्व आपल्या वाताहतीस जबाबदार असलेल्या व्यक्तीस आपण धडा शिकवायचाच. आपण शिकलेली सर्व विद्या पणाला लावायची. काही दिवसातच महाशिवरात्र येत आहे. सदर काळात महाशिवरात्रीचा उत्सव राजधानी जवळील नगरात असतो. तेव्हा खूप गर्दी होते. या गर्दीचा फायदा घ्यायचा. तेव्हा त्या वेशांतर करून कधी भिकारी कधी वृद्ध असे रूप पालटून त्या तेथून वावरू लागल्या. सदर नगराचा काना कोपरा माहीत असल्याने त्या काळजी पूर्वक वावरू लागल्या. पहाता पहाता महाशिवरात्र जवळ आली. महादेव नगरात व्यापारी देवड्या सजू लागल्या. मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. होती. त्या ठिकाणी अनेक प्रांतातील यात्रेकरू उतरू लागले होते.

अंबाला एका भिकारनीचे रुप घेऊन तिथे वावरत होती. त्यामुळे सैनिक तिला हटकत नव्हते. मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांकडून तिची उपेक्षा होत असे. सर्व लोक हिन वागणूक देत लाथाडत. तर काही भिक्षा देत असत. ज्या नगरात तिच्या समोर अनेकजन नतमस्तक उभे असत. तिथे तिची चाललेली उपेक्षा पाहून त्रिशलेस वाईट वाटत होते तिच्या अंतरात वेदना होत होत्या. या ग्रहदशेबद्दल तिने शिवशंकरास अनेक दूषणे दिली. ज्या शिवलिंगाची त्या प्राणपणे पूजा करत होत्या. तोच त्यांची परीक्षा पहात होता. पण त्याने दिलेल्या या वेदना आठवत त्या पेठेच्या एका बाजूस आडोशाला आल्या. तेथील एका बोळात त्या उभा राहून भिक्षेत मिळालेला पाणीभात खाऊ लागल्या. अंबालेच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिला आपली माता अरूणावतीची खूप आठवण येत होती. इतक्यात त्यांना नगर दवंडी ऐकू आली. त्या दोघी काळजीपूर्वक ऐकू लागल्या.

दवंडी वरून नगरातील भव्य अशा मार्गपथावरून महाराज वेददत्त यांचा पुत्र महारुद्र शिवदर्शनास येत आहे, हे समजले. प्रचंड अशा सैन्याच्या बंदोबस्तात हत्तीवरून राजनैवेद्य आणण्यात येत होता. अंबालेस त्यास पाहण्याचा मोह आवरत नव्हता. ती त्या भव्य मार्गावर एका कोपऱ्यात उभे राहून त्यास पाहण्याचा प्रयत्न करत होती. पण तितक्यात तेथे उभारलेल्या माणसाने तिला ढकलले. ती जवळील गटारात पडली. त्यातील एक तिला कृष्ण वर्णी दरिद्री अराजना (राक्षसिन) म्हणाला. तिच्या मनात आले की क्षणाचाही वेळ न घालवता त्याचे मुंडके छाटावे. पण तिने आपला राग नियंत्रित केला. व ती त्रिशले जवळ आली. त्रिशलेन तिची व्यथा जाणली. व तिने आपल्या खांद्यावर पाय देण्यास सांगितले. तशी ती तेथील कथड्यावर एक व त्रिशलेच्या खांद्यावर दुसरा पाय देऊन उभा राहिली. आता अंबाला तिच्या खांद्यावर उभा राहिल्याने तिला नगर रस्त्यावरून चाललेली मिरवणूक दिसू लागली. तिने पाहिले महारुद्र हा रथामध्ये बसला होता. तो शांत होता. पण त्याच्या शेजारी एक सुंदर मुलगी होती. ती आनंदाने त्याच्या जवळ बसली होती. ते दृश्य पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आले. व हृदयात तीव्र वेदना निर्माण झाली. व ती खाली उतरली. तिचा पडलेला चेहर पाहून त्रिशलेन त्याचे कारण विचारले. तेव्हा ती शांत बसली. तिचे पाणावलेले डोळे पाहून त्रिशला धीर देत म्हणाली, “ हे बघ मी तुझी व्यथा जाणते तू महारुद्रास पाहून हिरमुसली आहेस.त्याच्या बरोबर दुसरी युवती होती का?”

असा प्रश्न विचारताच अंबाला हो म्हणाली.

तेव्हा त्रिशला तिला म्हणाली, “ हे बघ विस्मरण मानवास दिलेली महत्त्वाची देणगी आहे. त्यामुळेच मानव जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगू शकतो. अन्यथा तो दुखात बुडाला असता. महारुद्र तसा पाहता चांगल्या स्वभावाचा आहे. त्याचे स्नेहबंध जर का इश्वराने जर त्या कन्येशी बांधले असतील तर आपण कशाला दुःखी व्हावे. वास्तव जीवन जगतेवेळी असे अनेक दुर्धर प्रसंग घडत असतात. त्यास विसर व आपल्या पुढील संग्रामाच्या तयारीस लाग. मला एवढेच वाटते.” अंबाला शांतपणे ऐकून घेत होती.

दुसऱ्या दिवशी यक्षिणीगाण असल्याने राज्यातील तसेच इतर भागातील अनेक यक्षिणी तिथे हजर झाल्या होत्या. महाराज वेददत्त यांनी देवाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसाठी मंदिर खुले झाले होते. पहाता पहाता यात्रा भरून गेली होती. यात्रेच्या धामधुमीत संध्याकाळ केव्हा झाली हे समजलेच नाही. त्या दोघी काही आहार विकत घेऊन संध्या समयी तेथून बाहेर पडल्या. व त्यांनी नदी पार केली. व त्या अरण्यात आल्या. तिथे त्यांनी येथे येण्यापूर्वीच आपली शस्त्रे लपवून ठेवली होती. तिथे आल्यावर त्यांनी थोडा आहार केला. तदनंतर त्यांनी आपला पेहराव बदलला. शस्त्र सज्ज होऊन त्या पुढे राजधानी नगराकडे चालल्या. रात्रीच्या अंधारात चमकणारी चंद्रकोरीचा प्रकाश व झुडपात काजवे तेवढं चमकत होते त्यांच्या अंधूक उजेडात त्या शिवशंकराचे नाव घेत त्या निघाल्या. अरण्य वाटेने त्या राजधानी नगराजवळ आल्या. तेथील महालात जाणाऱ्या गुप्त मार्गा पैकी अरण्य मार्ग बंद केला होता. व आता राजधानी नगरा जवळील तलावातील मार्ग तेवढा शिल्लक होता. त्या तिथे पोहोचल्या. तिथे पहारा कमी होता. उत्सव असल्याने सर्व सैन्य तिकडे गुंतले होते. त्यामुळे इकडे सुरक्षा कमी होती. त्यांनी आपल्या शरांना बेशुद्ध करणारी औषधी लावली. व त्या एका एका शिपायाचा वेध घेत त्या पुढे निघाल्या. त्यांनी पहार्याचे सर्व शिपाई बेशुद्ध केले. व त्या तलावात शिरणार इतक्यात वीरभद्र तिथे आला. तो तेथील प्रभाग अधिकारी होता. त्यावर सूरक्षेची जबाबदारी होती. तो शूर व ताकदवर होता. त्या दोघींनी त्यावर ही शर चालवले. त्याने त्यांचे ते शर निष्प्रभ केले. तेव्हा त्रिशलेन इशारा केला. अंबाला आपली तलवार उपसून त्यासमोर चालून गेली. आता त्याच्याशी हातघाई करावी लागणार होती. तो शूर होता पण त्याचा सामना आता आंबेशी होता. अंबा पुढे तलवार उपसून धजावली व लढू लागली. तिचे लढाई कौशल्य पाहून तो चकित झाला.

त्याने ओळखले की ती एक स्त्री आहे. तिचा आत्मविश्वास तोडण्यासाठी तो म्हणाला, “ तू एक स्त्री माझ्यासमोर एका तांब्याच्या शिक्क्याप्रमाणे आहेस. मी आचार्य वृषभ यांच्या शिष्यांचा खात्मा करून राजधानी जिंकलेला वीर. तू तर एक नार शस्त्र टाक व शरण ये तुला राणी सारखी ठेविन.”

तेव्हा अंबालेने आपल्या तलवारीने त्यावर हल्ला चढवला. तिची ती राज तलवार अंधारात देखील चमकत होती. अत्यंत वेगाने ती हलत होती. तिचा प्रतिकार करताना त्याची दमछाक होत होती. तिचे लढणे पाहून तो खूपच भारावला. इतक्यात त्रिशलेन आपल्या भात्यातील एक शर काढला व अचूक वेध घेतला. त्याच्या पाठीत तो शर लागला. तो मुर्छीत होऊन पडला. अंबाला त्रिशलेजवळ आली. व तिला म्हणाली, “ त्यास ठार मारलेस.”

त्रिशला, “ नाही उगाच निर्दोष माणसाची हत्या नको. म्हणून फक्त त्याला बेशुद्ध केलं. व त्या दोघी तलावात उतरल्या. व त्या गुप्त वाटेने महलाकडे निघाल्या.

क्रमशः पुढे......


Sunday, April 16, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४०

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४०

क्रमशः पुढे चालू.....


महारुद्र हा राजकुमार आहे ही बातमी संपूर्ण राज्यभर पसरली. तशी ती पारधी वस्तीवर देखील येऊन थडकली. ही बातमी कळताच त्रिशला व आंबालेस म्हणावा तितका आनंद झाला नाही.

इकडे महारुद्र राजकुमार आहे, हे सिद्ध झाल्याने त्यास राज्यकारभारात लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे तो अंबालेस भेटू शकत नव्हता. त्याची अस्वस्थता महाराज वेददत्त यांनी ओळखली. व त्याबाबत दासांकडून जाणून घेतले. तेव्हा तो एका पारधी कुमरिकेच्या प्रेमात पडल्याचे समजले. त्यांनी गुप्त हेरांना तिच्याबाबत माहिती काढण्यास सांगितले. ते कामाला लागले. पारधी वस्तीत फिरून जाणून घेऊ लागले.

ते पारधी वस्तीत फिरत असताना आंबालेस व त्रिशलेस त्यांचे वागणे खटकले. त्या दोघींनी ओळखले की त्यांच्यावर कोणतरी पाळत ठेवत आहे. व ही पुढील धोक्याची चाहूल आहे. त्या मुद्दाम त्या हेरांपुढे गप्पा मारत असत. येत्या काही दिवसात इंद्रावती महाराणी होणार आहे. असे थट्टेने बोलत.

हेरांनी त्यांचे बोलणे ऐकले व महाराज वेददत्त यांच्या कानावर ही बातमी घातली.

महाराज वेददत्त यांना वाटत होते की महारुद्राने एका राज घराण्यातील कन्येशी विवाह करावा. यासाठी त्या पारधी कन्येस ठार मारले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपल्या विश्वासू तरबेज खाजगी अंगरक्षकास पाठवले.

हेरांची टेहळणी थांबल्याचे दिसताच त्या दोघींनी जाणले की लवकर एखादे संकट येणार आहे. व त्यांनी सुरक्षेसाठी महदव्वेस तिच्या बहिणीच्या घरी पोहचते केले. व आपली शस्त्रे त्यांनी रात्रीच्या समयी घरी आणून ठेवली. व त्या दोघी रात्रीच्या वेळी फेराफेराने पाळत ठेवू लागल्या. गस्त घालू लागल्या. अचानक त्यांना एका रात्री काही संशयास्पद हालचाल घराबाहेर दिसली. गुप्त शिपाई वेशांतर करून अंबालेस मारण्यास आले होते. दार वाजले. अंबालेने त्रिशलेस जागे केले. व त्या शस्त्र घेऊन स्वसंरक्षणास सिद्ध झाल्या.

अंबालेन आपली मोठी तलवार काढली. त्यांनी घरातील तेवणारा दीप विझवला. दार उघडून कोणतरी आत आले. हे लक्षात घेऊन अंबाला कुडाच्या दरवाजामागे लपली. व तो इसम आत येण्याची वाट पाहू लागली. तो धूर्त माणूस आत यायला मागील दरवाजा ही वाजू लागला. त्याला बांधलेले काथ्याचे दोर कापले जाऊ लागले. इतक्यात छतावर काहीतरी हालचाल व आवाज जाणवू लागला. त्या दोघी वेगवेगळ्या ठिकाणी लपल्या. व अंधारात स्वत:ला अन् एकमेकींना ओळखण्यासाठी त्यांनी खड्यांची काकनं घातली. त्या दोघी सावध झाल्या. अंबालेने पुढील दरवाजातून येणाऱ्याचे पाय कलम केले. व नंतर त्रिशलेन दुसऱ्याचे सिताफिणे मुंडके कलम केले. तसेच वरुन छतावरून येणार्यास देखील त्यांनी यमसदनी धाडले. बाहेरील राहिलेल्या दोघांच्या लक्षात आले. की आतमध्ये आपले साथीदार मारले जात आहेत. तेव्हा त्यांनी पेटते गोळे छतावर टाकले. व बाहेरून दारे व कुडास आग लावली. व वस्तीवरील लोक सावध होण्याआधी, ते पाळले.

त्या दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. छतावर गवात असल्याने अग्नीने जोर धरला. पहाता पहाता अग्नी वेगाने पसरू लागली. चपळाईने आपली शस्त्रे व मोहरांची थैली घेऊन त्या दोघी मागील बाजूस आल्या. व तेथील कुड कापून त्या बाहेर पडल्या. व अंधाराचा फायदा घेऊन त्या पाहता पाहता अरण्यात घुसल्या. अंधार वाटेने त्या अरण्य वाटेला लागल्या. आता त्या दोघींच्या मनात अनेक प्रश्न उमटत होते. ‘की हे कोणी केले असेल?’

इकडे अग्निचा चटचट आवाज होऊ लागला. त्यामुळे आजूबाजूचे पारधी जागे झाले. पण त्यांना ती आग विझवणे शक्य नव्हते. शेवटी त्यांनी ती आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच ती इकडे तिकडे पसरणार नाही याची काळजी घेतली. त्या अग्नीने त्यांचे राहण्याचे ठिकाण भस्मसात झाले दुसऱ्या दिवशी राखेत काही अस्थी सापडल्या. त्या पारध्याने एका कलशात गोळा केल्या. सर्वांना दुःख झाले. हेरांनी ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचवली. महारुद्रास ही बातमी समजताच तो फार दुःखी झाला. तो लगेच तिथे आला. व त्याने त्या झालेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. पण काही केल्या आगीचे कारण समजले नाही. त्याला खूप वाईट वाटले. इंद्रावतीने आपणास फसवले असे तो म्हणून तो स्वतः ला संपवणेस निघाला. मात्र महाराज वेददत्त व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्यास समजावले. काही काळ निघून गेला. आता महारुद्र हळूहळू सावरू लागला. महाराज वेददत्त यांनी याच घटनेचा फायदा घ्यायचे ठरवले. महाराजांनी त्यास राज्याच्या कामकाजात गुंतवले. व त्यांनी त्याच्या लग्नाची बोलणी उत्तर विभाग नगर नायकाच्या मुलीशी करण्याचे ठरविले. व तशी बोलणी चालवली. महारुद्राने यास विरोध केला. परंतु त्यांनी बोलणी चालवली.

….. …… ……. …… ……

अग्नी कांडातून बाहेर आल्यावर त्या दोघी महदव्वेस ठेवलेल्या तिच्या बहिणीकडे आल्या. पुढे सुरक्षेच कारण सांगून त्या तिला घेऊन तिच्या दूरच्या भावाच्या घरी अपरान्त देशी निघाल्या. महदव्वच्या बहिनिस त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. कारण कोणतरी चौकशी करत तिच्याकडे येईल व महदव्वेला तिच्या भावाकडे अपरान्त देशी सोडण्यास त्या निघाल्या. वाटेला महदव्वा अनेक प्रश्न विचारू लागली. तेव्हा त्यांनी दुषलेचे महाराज जयवर्धन यांच्या घराण्याशी राज्यपातळीवर असणाऱ्या जवळीकीमुळे आपल्याला हे कष्ट उपसावे लागत आहेत. व त्या खडतर प्रवास करून महदव्वेस तिच्या भावाकडे सुरक्षित ठेवून त्या परतल्या.

आता त्या दोघींपुढे सर्वात मोठे आव्हान होते ते पार करण्यासाठी त्या निकराच्या तयारीने निघाल्या. अरण्यात राहून त्यांना तेथील प्राण्यांचा चांगलाच अभ्यास झाला होता. मिळेल त्या ठिकाणी विसावा घेत त्या पुन्हा सह्याद्रीपार करून कुंतल प्रदेशात आल्या. अरण्यातून चालून थकल्यावर त्या एका विशाल शिळेवर विसावल्या. वाटेत एका धर्मशाळेत त्रिशलेला मिळालेल्या माहितीनुसार त्याआधारे त्रिशलेस आंबालेस दिवचण्याची संधी मिळाली. ती म्हणाली, “ काय अंबाला, तुझा जीवनसाथी दुसऱ्या कन्येशी विवाह बंधनात बंधिस्त होण्यास निघाला आहे. काय तुझ्यासाठी लावलेला पण जिंकतोय बघ. तू मृत झाल्याची वार्ता समजताच थोडे दिवस दुःखाचे नाटक करून लगेच बोहल्यावर चढतोय म्हणे, व उत्तर नायकाच्या मुलीशी विवाह करतोय.”

अंबाला, “ करेना, नाहीतर तुला तो माझ्या जीवनात नकोच होता.”

त्रिशला, “ नाहीतर मलाच म्हणत होतीस ना, की त्याचे तुझ्यावर प्रेम आहे. मग दुसऱ्या दिवशीच का नाही त्याने आत्मदहन केले. प्रेम, प्रीत या गोष्टी फक्त दंतकथेत शोभून दिसतात. वास्तव जीवनात पुरुषांना स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू आहे. एखादे वस्त्र वापरा व फेकून द्या. नाहीतर दासी बनून त्यांची सेवा करत राहावी लागते. माझ्या मातेवरील अत्याचार याचेच द्योतक आहे.”

अंबाला, “ तुझ्या अंतर्मनात पुरुषांविषयी द्वेष भरून राहिला आहे. पण तू हे विसरतेस की पुरुषांच्या सहवासात स्त्री चारित्र्याचे रक्षण होते.”

त्रिशला, “ माझ्या पित्याने केले ना माझ्या मातेचे शीलरक्षण व पुढे दिले या जगाच्या समुद्रात ढकलून. प्रधानाच्या घरचे दास्यत्व पत्करून अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. तुझ्या कारणे मी सुरक्षित राहिले नाहीतर माझी ही वाताहत झाली असती. परमेश्वर जाने आपली ही व्यथा, पण पुढील वाटचाल आपली अत्यंत बिकट आहे. कारण आपल्यावर हल्ला करणारा शत्रू काही साधा सुधा नाही. तो ताकदवान आहे. त्यास नष्ट करणे सोपे नाही.”

क्रमशः पुढे....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...