Wednesday, April 19, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४१

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४१



क्रमशः पुढे चालू.....

 अंबाला, “ मरण आले तरी बेहत्तर पण या सर्व आपल्या वाताहतीस जबाबदार असलेल्या व्यक्तीस आपण धडा शिकवायचाच. आपण शिकलेली सर्व विद्या पणाला लावायची. काही दिवसातच महाशिवरात्र येत आहे. सदर काळात महाशिवरात्रीचा उत्सव राजधानी जवळील नगरात असतो. तेव्हा खूप गर्दी होते. या गर्दीचा फायदा घ्यायचा. तेव्हा त्या वेशांतर करून कधी भिकारी कधी वृद्ध असे रूप पालटून त्या तेथून वावरू लागल्या. सदर नगराचा काना कोपरा माहीत असल्याने त्या काळजी पूर्वक वावरू लागल्या. पहाता पहाता महाशिवरात्र जवळ आली. महादेव नगरात व्यापारी देवड्या सजू लागल्या. मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. होती. त्या ठिकाणी अनेक प्रांतातील यात्रेकरू उतरू लागले होते.

अंबाला एका भिकारनीचे रुप घेऊन तिथे वावरत होती. त्यामुळे सैनिक तिला हटकत नव्हते. मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांकडून तिची उपेक्षा होत असे. सर्व लोक हिन वागणूक देत लाथाडत. तर काही भिक्षा देत असत. ज्या नगरात तिच्या समोर अनेकजन नतमस्तक उभे असत. तिथे तिची चाललेली उपेक्षा पाहून त्रिशलेस वाईट वाटत होते तिच्या अंतरात वेदना होत होत्या. या ग्रहदशेबद्दल तिने शिवशंकरास अनेक दूषणे दिली. ज्या शिवलिंगाची त्या प्राणपणे पूजा करत होत्या. तोच त्यांची परीक्षा पहात होता. पण त्याने दिलेल्या या वेदना आठवत त्या पेठेच्या एका बाजूस आडोशाला आल्या. तेथील एका बोळात त्या उभा राहून भिक्षेत मिळालेला पाणीभात खाऊ लागल्या. अंबालेच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिला आपली माता अरूणावतीची खूप आठवण येत होती. इतक्यात त्यांना नगर दवंडी ऐकू आली. त्या दोघी काळजीपूर्वक ऐकू लागल्या.

दवंडी वरून नगरातील भव्य अशा मार्गपथावरून महाराज वेददत्त यांचा पुत्र महारुद्र शिवदर्शनास येत आहे, हे समजले. प्रचंड अशा सैन्याच्या बंदोबस्तात हत्तीवरून राजनैवेद्य आणण्यात येत होता. अंबालेस त्यास पाहण्याचा मोह आवरत नव्हता. ती त्या भव्य मार्गावर एका कोपऱ्यात उभे राहून त्यास पाहण्याचा प्रयत्न करत होती. पण तितक्यात तेथे उभारलेल्या माणसाने तिला ढकलले. ती जवळील गटारात पडली. त्यातील एक तिला कृष्ण वर्णी दरिद्री अराजना (राक्षसिन) म्हणाला. तिच्या मनात आले की क्षणाचाही वेळ न घालवता त्याचे मुंडके छाटावे. पण तिने आपला राग नियंत्रित केला. व ती त्रिशले जवळ आली. त्रिशलेन तिची व्यथा जाणली. व तिने आपल्या खांद्यावर पाय देण्यास सांगितले. तशी ती तेथील कथड्यावर एक व त्रिशलेच्या खांद्यावर दुसरा पाय देऊन उभा राहिली. आता अंबाला तिच्या खांद्यावर उभा राहिल्याने तिला नगर रस्त्यावरून चाललेली मिरवणूक दिसू लागली. तिने पाहिले महारुद्र हा रथामध्ये बसला होता. तो शांत होता. पण त्याच्या शेजारी एक सुंदर मुलगी होती. ती आनंदाने त्याच्या जवळ बसली होती. ते दृश्य पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आले. व हृदयात तीव्र वेदना निर्माण झाली. व ती खाली उतरली. तिचा पडलेला चेहर पाहून त्रिशलेन त्याचे कारण विचारले. तेव्हा ती शांत बसली. तिचे पाणावलेले डोळे पाहून त्रिशला धीर देत म्हणाली, “ हे बघ मी तुझी व्यथा जाणते तू महारुद्रास पाहून हिरमुसली आहेस.त्याच्या बरोबर दुसरी युवती होती का?”

असा प्रश्न विचारताच अंबाला हो म्हणाली.

तेव्हा त्रिशला तिला म्हणाली, “ हे बघ विस्मरण मानवास दिलेली महत्त्वाची देणगी आहे. त्यामुळेच मानव जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगू शकतो. अन्यथा तो दुखात बुडाला असता. महारुद्र तसा पाहता चांगल्या स्वभावाचा आहे. त्याचे स्नेहबंध जर का इश्वराने जर त्या कन्येशी बांधले असतील तर आपण कशाला दुःखी व्हावे. वास्तव जीवन जगतेवेळी असे अनेक दुर्धर प्रसंग घडत असतात. त्यास विसर व आपल्या पुढील संग्रामाच्या तयारीस लाग. मला एवढेच वाटते.” अंबाला शांतपणे ऐकून घेत होती.

दुसऱ्या दिवशी यक्षिणीगाण असल्याने राज्यातील तसेच इतर भागातील अनेक यक्षिणी तिथे हजर झाल्या होत्या. महाराज वेददत्त यांनी देवाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसाठी मंदिर खुले झाले होते. पहाता पहाता यात्रा भरून गेली होती. यात्रेच्या धामधुमीत संध्याकाळ केव्हा झाली हे समजलेच नाही. त्या दोघी काही आहार विकत घेऊन संध्या समयी तेथून बाहेर पडल्या. व त्यांनी नदी पार केली. व त्या अरण्यात आल्या. तिथे त्यांनी येथे येण्यापूर्वीच आपली शस्त्रे लपवून ठेवली होती. तिथे आल्यावर त्यांनी थोडा आहार केला. तदनंतर त्यांनी आपला पेहराव बदलला. शस्त्र सज्ज होऊन त्या पुढे राजधानी नगराकडे चालल्या. रात्रीच्या अंधारात चमकणारी चंद्रकोरीचा प्रकाश व झुडपात काजवे तेवढं चमकत होते त्यांच्या अंधूक उजेडात त्या शिवशंकराचे नाव घेत त्या निघाल्या. अरण्य वाटेने त्या राजधानी नगराजवळ आल्या. तेथील महालात जाणाऱ्या गुप्त मार्गा पैकी अरण्य मार्ग बंद केला होता. व आता राजधानी नगरा जवळील तलावातील मार्ग तेवढा शिल्लक होता. त्या तिथे पोहोचल्या. तिथे पहारा कमी होता. उत्सव असल्याने सर्व सैन्य तिकडे गुंतले होते. त्यामुळे इकडे सुरक्षा कमी होती. त्यांनी आपल्या शरांना बेशुद्ध करणारी औषधी लावली. व त्या एका एका शिपायाचा वेध घेत त्या पुढे निघाल्या. त्यांनी पहार्याचे सर्व शिपाई बेशुद्ध केले. व त्या तलावात शिरणार इतक्यात वीरभद्र तिथे आला. तो तेथील प्रभाग अधिकारी होता. त्यावर सूरक्षेची जबाबदारी होती. तो शूर व ताकदवर होता. त्या दोघींनी त्यावर ही शर चालवले. त्याने त्यांचे ते शर निष्प्रभ केले. तेव्हा त्रिशलेन इशारा केला. अंबाला आपली तलवार उपसून त्यासमोर चालून गेली. आता त्याच्याशी हातघाई करावी लागणार होती. तो शूर होता पण त्याचा सामना आता आंबेशी होता. अंबा पुढे तलवार उपसून धजावली व लढू लागली. तिचे लढाई कौशल्य पाहून तो चकित झाला.

त्याने ओळखले की ती एक स्त्री आहे. तिचा आत्मविश्वास तोडण्यासाठी तो म्हणाला, “ तू एक स्त्री माझ्यासमोर एका तांब्याच्या शिक्क्याप्रमाणे आहेस. मी आचार्य वृषभ यांच्या शिष्यांचा खात्मा करून राजधानी जिंकलेला वीर. तू तर एक नार शस्त्र टाक व शरण ये तुला राणी सारखी ठेविन.”

तेव्हा अंबालेने आपल्या तलवारीने त्यावर हल्ला चढवला. तिची ती राज तलवार अंधारात देखील चमकत होती. अत्यंत वेगाने ती हलत होती. तिचा प्रतिकार करताना त्याची दमछाक होत होती. तिचे लढणे पाहून तो खूपच भारावला. इतक्यात त्रिशलेन आपल्या भात्यातील एक शर काढला व अचूक वेध घेतला. त्याच्या पाठीत तो शर लागला. तो मुर्छीत होऊन पडला. अंबाला त्रिशलेजवळ आली. व तिला म्हणाली, “ त्यास ठार मारलेस.”

त्रिशला, “ नाही उगाच निर्दोष माणसाची हत्या नको. म्हणून फक्त त्याला बेशुद्ध केलं. व त्या दोघी तलावात उतरल्या. व त्या गुप्त वाटेने महलाकडे निघाल्या.

क्रमशः पुढे......


No comments:

Post a Comment

This is not government websites only private , here deta is a calect to gather our saround see and hearing deta so you check to government websites and agree whit it.

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...