Thursday, January 26, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग ११

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा  भाग ११

क्रमशः पुढे चालू.....


क्रमशः पुढे चालू....

 भिल्ल स्थिर स्थावर झालेले पाहून राज्य प्रतिनिधीने त्या सोबत असणाऱ्या सैन्यांची दुसऱ्या कामी नेमणूक केली. अशा प्रकारे छोटी छोटी अनेक गावे त्या परिसरात तयार झाली. भिल्ल लोकांच्या वस्तीच्या विरुद्ध बाजूस नदीच्या पलीकडे अनेक पारधी वस्त्या होत्या. पारधी समाजातील लोक शिकार व अन्य छोट्या कामात समाधान मानत असलेने त्यांची वस्ती ही भिल्लांच्या पेक्षा कमी प्रगत होती. शिकार मासेमारी करते वेळी त्यांचा एकमेकांशी संबंध येत असे. पण भिन्न संस्कृती असलेने त्यात एकोपा नव्हता.

भिल्लम व सिंघणा त्या लहान मुलाचा इतका छान सांभाळ करत असे. की कोणालाही तो त्यांचा मुलगा वाटावा.तो आपला पुत्र नाही हे गुपित त्यांनी ह्रद्यातच बंधीस्त ठेवले होते. महारुद्र देखील आता भिल्ल मुलांत राहून हळूहळू मोठा होऊ लागला होता. भिल्लमास वाटत होते की आपला मुलगा देखील इतर सर्व शस्त्र विद्यात निपुण व्हावा. असे वाटत होते. यासाठी भिल्लमाने आपल्या मुलास जवळील एका नागरी शेजारी असणाऱ्या मठात राहणाऱ्या व राजे घराणे तसेच वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना विद्या शिकवणाऱ्या आश्रमात घालावयाचे ठरविले. या योजनेने तो आपल्या मुलास तेथे घेऊन गेला.

तेथील आश्रमात तो अचार्यांकडे गेला. तिथे गेल्यावर

भील्लम, “ नमस्कार आचार्य, हा माझा मुलगा असून त्यालाही शस्त्र कलेचे ज्ञान मिळावे असे मला वाटते.”

आचार्य वृषभ, “ आपला परिचय.”

भिल्लम, “ मी आपल्या नगरापासून दूर अंतरावर राहणाऱ्या भिल्ल वस्तीचा नायक असून माझे नाव भिल्लम आहे. व हा माझा पुत्र महारुद्र.”

भिल्ल नायक हा शब्द ऐकताच आचार्य विचारात पडले. व त्यास ते म्हणाले, “ मी भिल्ल लोकांना शिकवत नाही. ते माझ्या नियमात बसत नाही. तरी देखील तुझ्या मुलाचे गुण तपासून पाहतो. व मग माझा निर्णय सांगतो.”

असे बोलून त्यांनी त्या मुलास जवळील आम्रवृक्षावरील पाच आंबे काढण्यास सांगितले. महारुद्राने जवळील धनुष्य घेऊन त्यावर शर ठेवून चाप ओढला व एका शराच्या संधानात त्याने पाच आंब्याचा घोस खाली पाडला. त्याचे ते अचूक संधान पाहून आचार्य व इतर शिष्य आश्चर्यचकित झाले. आचार्य विचार करू लागले. त्यांनी भिल्लमला सांगितले की जर तू विद्या देण्याच्या बदल्यात दोन गाई दान दिल्यास. तरच आपण त्या बालकास शिकवू असे त्याने सांगितले.

भिल्लम उदास झाला. व तेथून निघून आला. पण त्याने आपल्या मनात पक्का निश्चय केला होता, की काही झाले तरी आपण आपल्या या मुलास विद्या शिकवायची. त्यानंतर त्याने आपल्या पुत्रास वस्तीवर पोहचवले. वस्तीवर आल्यावर महारुद्र आपल्या सवंगड्यासवे खेळावयास निघून गेला. सर्व भिललांची मुले त्याच्या आज्ञेत वागत असत. त्याना महारुद्र फार आवडतं असे. त्यास पोहोचवल्यावर भिल्लम सरळ नगराकडे निघून गेला. नगरात आल्यावर तो नगरातील पेठेत गाईच्या किंमतीची चौकशी करू लागला. शेवटी त्यास एका गवळ्याकडून समजले की एक गाय खरेदी करण्यास दोन सुवर्ण मोहोरा लागतील. त्याने खूप कष्ट करायचे ठरवले.

नगरातून फिरत असताना एक दवंडी ऐकू आली. तो तेथे गेला. त्याने त्या दवंडी देणाऱ्यास विचारले, की दवंडी कशाची आहे. तेव्हा दवंडीवाला म्हणाला की राज्यातील राजधानी पासून ते कुंतल प्रदेशापर्यंत एक राज्यमार्ग केला जाणार आहे. तरी त्यासाठी काही मजूर हवे आहेत. राज आज्ञेने मी ही दवंडी देत आहे. ज्याला काम करावयाचे आहे त्याने आपले नाव नोंदणी करावी. त्यास योग्य मजुरी राजनियमाने दिली जाईल. भिल्लमाने दवंडीवाल्यास विचारले.

भिल्लम, “ कोणाकडे नाव नोंदवावे लागेल?”

दवंडीवाला, “ येथील नगरनायकाकडे.”

भिल्लम, “ आभारी आहे.”

असे बोलून भिल्लम तेथून आपल्या वस्तीवर आला. तेथील भिल्लांना समजावून त्याने आपले व त्यांचे नाव नोंदवले. व ते कामावर रुजू झाले. पाहता पाहता चार मासात तो मार्ग तयार झाला. त्या कामाच्या मोबदल्यात प्रत्येकास योग्य बक्षीस मिळाले. भिल्लमास आठ सुवर्ण मोहरा मिळाल्या. तो आनंदाने आपल्या वस्तीवर आला त्याला आता वाटत होते की महारुद्र आता विद्या शिकणार, त्याने ती रात्र कशीबशी ढकलली. व तो दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी भिल्लम महारुद्रास घेऊन नदीवर गेला. त्या दोघांनी स्नान केले व आपली वस्त्रे परिधान करून ती दोघे पुढे नगरात गेली. तिथे गेल्यावर त्यांनी गवळीवाड्यातून दोन गाई खरेदी केल्या. त्यानंतर ती नगरा शेजारील आचार्य वृषभांच्या आश्रमात गेली. त्या आश्रमात आल्यावर तेथे एका विशाल अशा वृक्षाखाली आचार्य वृषभ बसलेले होते. त्यासमोर जाऊन त्याने त्या गाई सादर केल्या. महारुद्र व भिल्लमास पाहून आचार्य उभे राहिले. आपल्या दाढीवरून त्यांनी हात फिरवला. व वैचारिक नजरेने त्यांनी त्यांकडे पहिले. त्यांना पाहून भिल्लम म्हणाला, “ नमस्कार मी आपल्या सांगण्याने या दोन गाई आपणापुढे सादर केल्या आहेत. तरी आपण कृपा करून माझ्या या मुलास विद्यादान व शस्त्र ज्ञान द्यावे.”

आचार्य वृषभ, (आश्चर्य मुद्रेने त्या गाईकडे पहात) “ठीक आहे तू उद्या तुझ्या मुलास इकडे सोडू शकतोस.”

असे बोलून त्यांनी आश्रमातील एका शिष्यास बोलावले. व त्या दोन गाई घेऊन जाण्यास सांगितले. भिल्लमाने व महारुद्रने वाकून नमन केले. व ते निघून गेले. ते गेल्यावर गाई बांधून आचार्य वृषभ यांचा शिष्य तिथे आला. व आचार्यास म्हणाला, “ आचार्य आपण या मुलास विद्यार्जन देणार.”

आचार्य, “ नाही, त्यास दास म्हणून राहावे लागेल.”

शिष्य, “ पण आपण त्यांकडून गो दान घेतले आहे.”

आचार्य, “ आश्रमात गो दान करतातच लोक. याचा अर्थ आपण त्यास सकळ विद्या देणं होत नाही. हे  तू पाहसिलच “

दुसऱ्या दिवशी भिल्लम आपल्या मुलास घेऊन तिथे आला.त्याने व महारुद्राने वाकून नमस्कार केला. आचार्यांनी मुलास सोडण्यास सांगून भिल्लमास एका मासाने येण्यास सांगितले.

महारुद्राला सोडून भिल्लम निघून गेला. महारुद्र आश्रमात राहू लागला. पण आचार्य त्यास ज्ञान दान करण्यापेक्षा इतर कामेच जास्त त्याकडून करून घेत असत. त्याला फक्त कथा ऐकावयास बसवत असत. अन्यथा इतर कोणतेही ज्ञान त्यास दिले जात नसे. शस्त्र विद्या शिकवण्यासाठी आचार्य इतर शिष्यांना घेऊन दूर रानात जात. तेव्हा महारुद्र स्वयंपाक घरातील अचार्यांच्या हाताखाली काम करी. आश्रमातील शिष्य त्यास सारखे कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देत. त्याचे अंथरूण ओले करत. कधी त्याचे अन्न जेवत असताना पपाणीणी ओतत. इतर शिष्य हे भालाफेक, तलवारबाजी व अन्य कलात निपुण होते. ते महारुद्रास छळत, त्याकडून हिन कामे करून घेत. पाहता पाहता मास संपला. चंद्राची एक प्रदक्षिणा पूर्ण झाली. आपल्या मुलास सोडून एक मास झाले होते. आपल्या मुलास भेटण्यास भिल्लम आचार्यांच्या आश्रमात आला

भिल्लमाने पाहिले की आपला महारुद्र तेथे विहिरीचे पाणी भरत आहे. तो तडक त्याजवळ गेला. आपल्या पित्यास पाहताच महारुद्राला अश्रू अनावर झाले. तो रडू लागला. त्याच्या अंगावरील व्रण पाहून भिल्लमास वाईट वाटले. महारुद्राने आश्रमातील सर्व व्यवहार त्यास सांगितला. त्याने आपल्या पित्यास घट्ट मिठी मारली. त्याचा हा अवतार पाहून भिल्माचे डोळे पाणावले.त्याने अचार्यास याचा जाब विचारायचे ठरवले. तो आचार्यांच्या समोर गेला व आपल्या मुलाच्या अवस्थे विषयी त्याने आचार्य यांना प्रश्न विचारला.

आचार्य वृषभ, “ त्याच्या योग्यता व पायरी नुसार मी त्यास ज्ञान दिले.”

भिल्लम, “ आपण शस्त्र विद्या शिकवावी म्हणून मी त्यास आपल्याकडे घातले असता त्यास शस्त्र विद्या व आवश्यक ते ज्ञान दिले नाही. आश्रमातील इतर शिष्य त्यास वंचित ठेवतात.”

आचार्य, “ मी त्यास त्याच्या योग्यतेनुसार ज्ञान दिले. मी त्यास ज्ञान देईन असे सांगितले होते. शस्त्र ज्ञान देईन असे केव्हाही सांगितले नव्हते.”

भिल्लम , “ आपण मज फसविले आहे. मला आता इथे माझ्या मुलास ठेवायचे नाही. व माझ्या गायीही मी घेऊन जातोय.”

असे बोलून तो आश्रमाच्या मागे असणाऱ्या आश्रमातील गवळवाड्यातील गाई सोडून आणावयास गेला. आचार्य वृषभ यांनी आपल्या शिष्यांना इशारा केला. लगेच सर्व शिष्य गोळा झाले.

आचार्य यांनी इशारा केला. शिष्य भिल्लमावर चाल करून गेले. त्यांनी त्याला सावरायला वेळ दिला नाही. त्यांनी हरप्रकारे त्यास मारले इतके की त्याची शुद्धा हरवली. लहान महारुद्र अडवण्यास गेला असता. त्यास ही काही शिष्यांनी मारले. एकाचवेळी अनेक जनधावून आल्याने प्रतीकार करणे जमेना. महारुद्र व त्याच्या पित्यास बेशुद्ध होईपर्यंत मारल्यावर आश्रमापासून दूर जंगली भागात नेऊन टाकले. व ते निघून आले. संध्याकाळी तिसरा प्रहार होण्यास आला तरी ते बेशुद्ध होते. सुर्य मावळतीला अस्ताला निघाला होता. त्याची किरणे महारुद्राच्या चेहऱ्यावर पडली. महारुद्रास शुद्ध येऊ लागली. त्याला मावळतीच्या सूर्याचे दर्शन झाले. शुध्दीवर आल्यावर त्याने इकडे तिकडे पाहिले. तर त्याला त्याचे वडील भिल्लम बेशुद्ध पडलेले दिसले. त्यांच्या अंगावरील कपडे फाटलेली होती. जागो जागी जखमा झाल्या होत्या. आपल्या वडिलांचाचा तो बेशुद्ध देह पाहून त्या मुलास काही सुचेनासे झाले. तरी देखील त्याने त्यास हलवून पाहिले. ते उठत नाहीत म्हंटल्यावर त्याने आजूबाजूला कोठे पाणी मिळते का ते पाहिले. त्यास कोठेही पाणी आढळले नाही. सुर्य अस्ताला चाललेला होता. थोड्याच वेळात रात्र होणार होती. व हा अरण्य प्रदेश असल्याने हिंस्र श्वापदे या परिसरात येणार हे त्यास जाणवले. त्याने आपल्या वडिलांच्या निश्चल पडलेल्या देहाकडे पाहिले. त्यांच्या कमरेला एक कट्यार व त्या शेजारी एक छोटीशीटी थैली त्यास दिसली. जी एका गोपात बांधली होती. त्याने कित्येक वेळा आपल्या वडिलांना त्याने तिर करताना पाहिले होते. त्याने छनाचाही विलंब न करता ती कट्यार काढून घेतली. व त्या परिसरात तो इकडे तिकडे पाहू लागला. त्यास एक वेताचे बेट दिसले. त्याने त्यातील काही ओल्या काठ्या कापण्यास सुरूवात केली. त्या कापून घेऊन तो आपल्या पित्या जवळ आला.

क्रमशः पुढे......


Saturday, January 21, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग १०


अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १०



क्रमशः पुढे चालू......

 जवळच्या नगरात भिल्लम व त्याची पत्नी आपल्या त्या लहान बालकास घेऊन गेली. तेथे गेल्यावर त्यांनी तेथील नगरद्वारावर पहारेकर्यांकडून नगर दंड अधिकारी कुठे राहतात याची चौकशी केली. तदनंतर त्याच्या सांगण्याने ते मुख्य पेठेतून पुढे निघाले. जाताना नगर पेठेतील व्यापारी देवड्या व वास्तू पहात कोपऱ्या कोपर्या वर चौकशी करत ते त्या पेठेतील एका प्रासादरुपी सदना जवळ आलीत. त्या नगरदंड अधिकाऱ्याच्या प्रासादा बाहेर दोन शीपाई होते. त्याकडे त्याने चौकशी केली. तेव्हा त्याने त्याना तिथेच थांबवून आत तो निरोप देवून आला. नंतर थोड्या वेळाने त्यास आत बोलावणे आले. त्या शिपायाने त्याला व त्याच्या बायकोस शेजारील पडवीत नेले. तिथे ओसरीच्या कोपऱ्यात त्याना बसवले. त्याजवळील धनुष्य व भाता तिथे बाजूला ठेवण्यास सांगितला. तदनंतर तो कोठून आला. याबाबत चौकशी केली. तो परराज्यातील आहे का ते तपासले. व नंतर त्यास नगर दंडनायकांकडे नेले गेले.

नगर दंडनायकाने त्याची सखोल चौकशीकही केली. त्याजकडून शिवलिंगाची शपथ घेतली. व राज्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतल्या नंतर त्यास एक मोहोरबंद शिक्का असलेले एक राजपत्र दिले गेले. व राज्यात परराज्यातून आलेली भिल्ल कुटुंबे यांमध्ये राहण्याची अनुमती दिली गेली. त्यापूर्वी त्यांनी त्यास रानातून पाच पक्षी आणण्याची आज्ञा दिली.

भिल्लम खुश झाला. त्याने वाकून नमन केले. व ती दोघं तेथून बाहेर पडली. सिंगणाने विचारले. तेव्हा त्याने आपल्या हातातील राजपत्र तीस दाखवले. व तो त्यांना घेऊन निघाला. त्याने शिपायास आपले भिल्ल बांधव कुठे आहेत ते विचारले. तेव्हा त्या शिपायाने त्यास नगरा बाहेरील उपनगरी अरण्यात ते विसावले असल्याचे सांगितले. व त्यास आपल्यास ही एक पक्षी शिकार करून आणण्यास सांगितले.

त्याने आपले कुटुंब त्या भिल्ल कुटुंबामध्ये घेऊन आला. तिथे आपले कोण ओळखीचे आहे का ते पाहिले, पण तेथे सर्व अनोळखी फक्त एक जात असलेने एकत्र राहत होते. त्यांजवळील एका कुटुंबाच्या जवळ त्याने आपल्या पत्नी व मुलास ठेवले. व तो शिकरिस गेला. त्याने तेथील जंगलात जाऊन काही रान कोंबडे मारले. व त्यातील पाच नगर दंडाधीकार्याना दीले. एक त्या शिपायास. दिला. त्याचा हा उपहार व धाडस पाहून नगर दंडनायक खुश होऊन त्यास आश्वासन दिले. की थोड्याच दिवसात भिल्लम व त्याचे कुटुंबीय यांची राहण्याची व्यवस्था राज्याच्या दक्षिण प्रांती करण्यात येईल. तेथून निरोप घेऊन भिल्लम आपल्या पत्नीस ठेवलेल्या ठिकाणी आला. तिथे असणारी भिल्ल कुटुंबे मिळेल त्या अन्नाच्या सहाय्याने गुजराण करत होती. दोन चार दिवस तिथे राहिल्याने अनेक लोकांशी त्यांची ओळख झाली. ती एकमेकाला मदत करू लागली. पाच दिवसांना एके दिवशी राज्यनायक काही शिपाई घेऊन तिथे आला. तो आपल्या अश्वावरून खाली उतरला. त्याने तेथील विशाल अशा पिंपळ झाडाखाली सर्व भिल्लाना बोलावले.त्या सर्वांना उद्देशून तो बोलला, “ मी या राज्याचा राज्य प्रतिनिधी असून माझी नेमणूक परप्रांतातून आलेल्या प्रजेस सांभाळणे व त्यांना योग्य निवार्याची जागा देणे, यासाठी तसेच त्यांकडून राज्यहीत जोपासणे व त्यांना या राज्यात सामावून घेणे हे आहे. यापूर्वी आलेल्या काही पारधी कुटुंबांना आम्ही आश्रय दिला आहे. ते कुंतल प्रदेशातील दख्खन भागात स्थिर झाले आहेत. त्यांना ज्या तटिनी किनारी रहानेस जागा दिली आहे. तिच्या पलीकडील तीरावर भिल्ल लोकांना वस्तीस जागा द्यायचे ठरवले आहे.               

यासाठी तुम्हाला आम्ही तेथे नेणार आहोत. त्या ठिकाणी गेल्यावर तेथे वस्ती निवारे तुमचे तुम्हीच करावयाचे आहेत. यासाठी लागणारे काष्ट सामान व वेत साहित्य तसेच इतर साहित्य आपण तेथील नजीकच्या परिसरातील घ्यायचे आहे. आपण तेथील अरण्यातून सुकलेली लाकडे, फळे, व इतर अरण्य उत्पादने घेऊ शकता. पण तेथील विपीन संस्कृतीस धक्का न लावता. अजस्त्र वृक्ष राजीस धक्का लावणे हा गुन्हा समजला जाईल. सदर ठिकाणाहून जवळील नगराकडे येणारी वाट आपण तयार करायची आहे. तरी उद्या प्रातकाळी आपणास योग्य सिधा दिला जाईल. तो घेऊन तुम्ही आमच्या सैनिकांबरोबर उद्या प्रस्थान करणेचे आहे.”

 अशाप्रकारे सूचना देवून तो निघून गेला. सर्व भिल्ल निश्चीत झाले. कारण काही का असेना त्यांना राहावयास आसरा मिळणार होता. व या राज्याचे रहीवासी ते झाली होते.

दुसऱ्या दिवशी राजप्रतिनिधी पुन्हा आला. त्याने काही बैलगाड्या आणल्या होत्या त्यातील धान्य थोडे थोडे भिल्ल लोकांना वाटण्यात आले. नंतर त्या भिल्लांना प्रस्थानाचे आदेश दिले. सर्व भिल्ल कुटुंबे त्या सैनिकांच्या मागोमाग निघू लागले. सदरची नगरी सोडून ते कुंतल देशाच्या वाटेला लागले. वाटेतील मजल दरमजल गावे करत ती सर्व.राजधानी जवळून पुढे दक्षिण कुंतल प्रांताच्या दिशेने निघाली. खूप दूरचा प्रवास असलेने. काही अंतरावर ते लोक विश्रांती तथा वस्ती टाकत ती पुढे चालली. अखेरीस ती सर्व कुंतल प्रदेशातील दख्खन भागात असणाऱ्या निबीड अरण्यात आलीत. तेथील वातावरण एकदम गंभीर स्वरूपाचे होते. उंच उंच असे वृक्ष , त्यावर चढलेल्या अजस्त्र वेली व तेथून वाहणाऱ्या तटिनी व रानात विहारणारी रंगीबेरंगी फुलपाखरं व पक्षी यांनी सजलेली ती अरण्ये ,त्या भागात अनेक प्रकारची वेताची बेटे एक मनमोहक दृश्य बनवत होती. अशा या शोभा आणणाऱ्या परिसरात त्यांना आणण्यात आले. तेथे आल्यावर तो राज्य प्रतीनिधी काही सैन्याच्या देखरेखी खाली त्याना ठेवून निघून गेला.

तिथे आल्यावर सर्व भिल्ल कुटुंबे विचारात पडली. पुढे काय करायचं. तेव्हा भिल्लम पुढे आला . व त्यांना म्हणाला, “ हे पहा महाराज जयवर्धन यांचे कृपेमुळे आपणास निवासाची जागा मिळाली. आपल्यातील पुरुषांनी एकत्र येऊन वस्ती तयार करू. व आपल्यातील काही स्त्रिया जंगलं परिसरातून अन्न गोळा करतील व काही लहान मुलांना सांभाळतील.”

भिल्लमाचे बोलणे सर्व लोकांना पटले. त्यांनी सैनिकांकडून काही कुराडी व इतर हत्यारे मागितली. सैनिकांनी शेजारील नगरातून त्याना आवश्यतेनुसार त्यांनी आणून दिली.

ती हत्यारे मिळताच भिल्लानी नदीपासून सुरक्षित अंतरावर जेथे कमी झाडे होती अशी आपल्या राहण्यास जागा निवडली. नंतर त्यांनी शेजारील भागातील काही वृक्षांच्या फांद्या निवडल्या व त्या तोडल्या तसेच बांबूची बेटे तोडून जाडसर वेळी व दोरखंड वापरून त्यांनी प्रत्येक कुटुंबाला वेगवेगळी त्यांनी घरे तयार केली. घराला कुडाच्या भिंती तयार केल्या. त्या खूप उंच होत्या. त्यानंतर स्त्रियाकडून चिखल पाल्याने लिंपून घेतल्या गेल्या. सर्वांनी एकत्रित केलेल्या या मदतीने थोड्याच दिवसात भिल्लांची सुंदर वस्ती निर्माण झाली. एका सधन ग्रामासारखी ती दिसत होती. त्यांचे कार्य पाहून सैनिक सुद्धा आश्चर्य चकित झाले होते. कारण इतक्या कमी वेळेत इतकी सुंदर वस्ती ती ही इतर गावांसारखी त्यांनी बनवली होती. व आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. रानातून त्यांच्या स्त्रियांनी बरेच अन्न धान्य ,फळे लाकडे, गोळा केली. प्रत्येक भिल्लास धार्मिक पूजा करून गृह प्रदान केले गेले.

काही दिवसांनी राज्यनायक पाहणी करण्यास आले आता त्याने भिल्लांची वस्ती पाहता आश्चर्य व्यक्त केले. कारण भिल्लांनी खूपच सुंदर घरे बांधली होती. ते पाहून त्यानां स्थीरस्थावर करण्याचे हेतूने त्यांना जमिनी कसण्यास देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे राज्य दरबारातून परवानगी घेतली. व भिल्लाना नदी किनारी त्या प्रदेशात काही जमिनी मोजून कसण्यास दिल्या. तसेच वस्ती शेजारी काही जमिनी कसण्यास अनुमती राजदरबारातून देण्यात आली. त्यांना लागणारे साहित्य हे तेथील जवळील नगराच्या नगरदंड अधिकारी यांनी दिले. यामुळे काही काळातच भिल्लाची प्रगती झाली. भिल्ल स्त्रिया रानातून औषधी, फळे व इतर वस्तू गोळा करत व शेजारील नगरात विकत. याने तेथील नगराचा व्यापार वाढला. व भिल्लांची प्रगती ही होऊ लागली. भिल्लमाच्य पुढाकाराने आपली प्रगती झाली. म्हणून त्या सर्व भिल्लानी भिल्लमास आपल्या ग्रामाचा ग्रामणी केले.

क्रमशः पुढे.....


Thursday, January 19, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग ९

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग ९



क्रमशः पुढे चालू.....

महाराजांच्या आज्ञेने प्रधानाच्या प्रासादातील दासीने आपल्या मुलीस राजकुमारी अंबालाच्या सेवेत पाठवले. अंबालाचा प्रासाद म्हणजेच राजमहालात आल्यावर तेथील झगमगाट पाहून ती मुलगी कावरी बावरी झाली. ती तेथील रजावैभव पाहून जरा घाबरली. दासी तिला घेऊन राजकुमारीच्या कक्षात गेली. तिथे जाताना ती विचार करत होती. तिने आजपर्यंत ऐकलेल्या राजे राजवाड्यांच्या कथांमध्ये तेथील शिष्टाचार कडक असतात हे ती जाणून होती. तिला ते आठवले. ती तेथील एका खांबाला उभा राहिली. थोड्या वेळाने अंबाला आतील दालनातून बाहेर आली. त्या मुलीस पाहून तिच्याजवळ आश्चर्य मुद्रेने पहात तिला म्हणाली,

“ तुझ नाव काय आहे?”

मुलगी, “ माझं नाव त्रिशला आहे. मी आपल्या राज्यात आश्रित होऊन आलेल्या व येथे स्थाईक झालेल्या एका पारधी कुटुंबातील मुलगी आहे.”

अंबाला तिला न्याहाळत.ती दिसावयास निम गौर गोधुम वर्ण असणारी नाकी डोळी छान असणारी अशी बावरलेली त्रिशला तिला खूप आवडली. ती तिच्या जवळ गेली. तिचे हात तिने आपल्या हातात घेतले. खूप दिवसांनी तिला एक सखी भेटली होती. अंबाला तिच्याशी मैत्री करून राहू लागली. तिच्या सोबत खेळताना तिला खूप आनंद होई. ती काही दिवस तिच्या सोबत राही. एखादे दिवशी रात्री आपल्या मातेकडे जात असे. नित्य एक जिवलग असे पट्ट ऋणानुबंध त्या दोघींमध्ये निर्माण झाले.

राजकुमारी सोबत राहून ती राज्य शिष्टाचार शिकली होती हळूहळू ती ही त्या महालाची एक भाग झाली होती. त्रिशलेच्या येण्यामुळे राजकुमारी खुश होती. राजकुमारी जस जसी मोठी होईल तस तसे तिच्या शिक्षणासाठी अनेक पारंगत तज्ञ शिक्षक व गुरुवर्य यांची नेमणूक महाराज जयवर्धन यांनी केली. काही कालावधीतच राजकुमारी सर्व कलांमध्ये पारंगत झाली. त्या तलवारबाजी दांडपट्टा, भेदन ,कला, नृत्य, भाला फेक, शस्त्र निर्मिती या सर्व क्षेत्रात प्रवीण झाली. तिच्या सोबत त्रिशला ही तरबेज झाली. अश्व स्वारीत देखील ती तरबेज झाली. ती जसी दिसण्यास सुंदर होती. तशी ती सर्व कलांत निपुण होती. तिच्या सोबत त्रिशला ही. त्या दोघी आता घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या.

आपल्या मातेस भेटण्यास त्रिशला जात असे. त्यामुळे तिला नगरातून मुक्त फिरता येई. तेथील गंमती जमती तिला अनुभवता येत. त्या ती अंबालेस सांगत असे. राजकुमारीस वाटे की आपण ही राज्यात फिरावे तेथील गंमती जमती पहाव्यात. पण सदैव तिच्या भोवताली पहारा असे. ज्याने तीस बाहेर मुक्त फिरता येत नसे. ती जेव्हा अश्वस्वारी असो वा नगर प्रदक्षिणा ती बाहेर जाताना तिच्या सोबत नेहमी सैनिक असत. व नगरातून जाते वेळी तिच्या समोर येणारा प्रत्येक इसम हा नत मस्तक असे. ज्यामुळे तिला एखादा शुक पिंजऱ्यात अडकावा तसे आपण राजमहालात अडकलो आहोत असे वाटे. अश्व स्वारी ही नगराबाहेर होत असे. त्याने तिथे जनसंपर्क जास्त नसे. तिला ही नगरात जावे वाटे. मोकळे स्वातंत्र हवे होते. तिची ही घुसमट तिने आपल्या सखी जवळ त्रिशलेजवळ व्यक्त केली.त्यावर त्या दोघी काहीतरी उपाय शोधू लागल्या.

…… …… …… …… … … ….

क्रमशः पुढे......

Tuesday, January 17, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग ८

 अंबालाा एका राजकुमारी ची प्रेमकथा  भाग ८




क्रमशः पुढे चालू....

राज्यपाट व्यवस्थित चालला होता. एके दिवशी महाराणी अरूणावतीना बरे वाटत नव्हते. त्या मंचकावर पहुडलेल्या होत्या. जवळच दासी वारा घालत होती. प्रभात समया पासून त्यांना पित्त विकाराचा त्रास सुरू झाला. त्यात कोरड्या उलट्या चालू झाल्या. वैद्यांना प्राचारण करण्यात आले. वैद्यांनी हाताची नाडी परीक्षा केली. त्यांना जाणवले की महाराणीना दिवस गेलेत. त्यामुळे त्यांना हा त्रास सुरू झाला होता. दासीला ही बातमी कळताच तिने सर्व प्रासादात ती कळवली. महाराजांना ही बातमी कळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्व मंत्री व लोक महाराणींचे व महाराजांचे अभिनंदन करू लागले. राज्य भर आनंदी वातावरण निर्माण झाले..

दिवस झपझप सरू लागले. महाराणीचे डोहाळे झाले. पुढे ग्रीष्म ऋतू चालू झाला. महाराणीना उष्माज्वराचा त्रास सुरू झाला. त्या वन विहाराला उपवनात गेल्या.

बरोबर काही दासी व अश्वस्वार होते. उपवनात फिरत असताना उपवनास लागून असलेल्या आमराईमध्ये त्या गेल्या. तिथे सर्वत्र गारवा पसरलेला होता. झाडास लागलेल्या आम्र कैऱ्या ग्रीष्म ऋतूच्या महिन्यात मन प्रसन्न करत होत्या. त्या वनातून फिरताना अचानक महाराणीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्या वनात लोळू लागल्या. दासी त्यांना सावरू लागली. दासी दुष्यलताने सैनिकांना बोलावले. व त्यांनी एका सैनिकास रज्यवैद्याना बोलवणेस सांगितले. अश्वस्वार निरोप घेऊन गेला.

इकडे महाराणी व्याकूळ होऊन लोळू लागल्या. थोड्याच वेळात त्यांनी एका कन्येस जन्म दिला. या सर्व क्रियेत त्यांची शुद्धा हरपली. दुसऱ्या दासीने त्या कन्येला घेतले. त्या कन्येला रेशमी कपड्याने तिने पुसले. इतक्यात तिथे वैद्य आले. त्यांनी उपचार केले. महाराणीना शुद्ध आली. दासी दूष्यलेने रथ आणावयास सांगितला. रथ आणला गेला. वेगाने महाराणीना रथात बसवून महालाकडे नेले गेले.

महाली आल्यावर यथायोग्य उपचार केले गेले. नंतर कन्येला योग्य स्नान घालून नटवले गेले. या सर्व दगदगित महाराणीना विश्रांती हवी होती. त्या त्यांच्या अंतपुरात विश्रांती घेऊ लागल्या.

महाराज जयवर्धन यांना कळल्यावर त्याना खूप आनंद होतो. सर्व राज्यभर आनंद उत्सव साजरा केला गेला. पुढे बाराव्या दिवशी नामकरण विधी पार पडला. बालिकेचा जन्म ग्रीष्म ऋतूत आंबेवणात झाल्यामुळे तिचे नाव अंबाला ठेवले गेले. त्या दिवशी राज्यातील प्रमुख नगरात नगरभोजन ठेवले गेले. अनेक लोकांनी याचा लाभ उचलला. प्रधान पत्नी मात्र नाराज होत्या. कारण त्यांनी आपला पुत्र गमावला होता.

राजकुमारी थाटा माठात वाढू लागली. जयवर्धन यांची ज्येष्ठ कन्या असलेने तिच्या बरोबर खेळण्यास कोणी लहान बालक नव्हते. तिच्यासाठी पुष्कळ खेळणी होती. दासी होत्या. पण त्यामध्ये स्पर्धक वा क्रीडा करावे असे समवयस्क कोणी नव्हते. त्यामुळे राजकुमारी नाराज असे.

एके दिवशी राजकुमारी अंबाला शांतपणे प्रासादात प्रांगणात बसली असता प्रधान वेद दत्त यांचे आगमन झाले. त्यांनी राजकुमारीस शांत बसलेले पाहिले. व ते तिच्या जवळ सानिध्यात गेले. व तिला उदासीनतेचे कारण विचारले.

प्रधान वेददत्त, “ राजकुमारी अंबाला यांच्या चेहऱ्यावरील हास्य कोणी पळवले असावे. जर का कळले तर त्यास शिक्षा करण्याचा मनोदय आहे आमचा.”

राजकुमारी अंबाला, “ आमच्या चेहऱ्यावरील हास्य पळवून घेऊन गेले आपणच. या चार भिंतीच्या विशाल राजमहालात आम्हाला आपण व महाराज यांनी कोंडून ठेवलंय. मजसवे क्रीडा करण्यास देखील कोणी नाही आहे.”

प्रधान वेददत्त, “ काळजी करू नये. मी महाराजांना सांगून एक दासी तुमच्या सेवेत पाठवून देईन.”

अंबाला, “ नकोत आम्हास दास दास्या त्यांचे चेहरे सदा नतमस्तक असतात. आम्हास एखादी सहचारिणी हवी.”

प्रधान वेददत्त, “ ठीक आहे. आम्ही पाहू एखादी सहचारिणी तुमच्यासाठी.”

अंबाला, “ खरंच.”

प्रधान वेददत्त, “ हो खरंच, पण यासाठी एक हास्य तरी गाली यावे.”

अंबाला हसली. प्रधानाना वंदन करून पुन्हा खेळायला दासीसवे गेली.

प्रधान वेददत्त यांनी राजकुमारीची व्यथा महाराजांना सांगितली. त्यावर उपाय म्हणून प्रधानांच्या प्रसादात पारधी समाजातील दासी देविका जिला एक लहान मुलगी होती. तिला राजकुमारीचे सेवेत ठेवण्याची अनुमती मागितली. यावर ते व महाराज यांनी खूप चर्चा केली. शेवटी महाराजांनी दासी पुत्रिस ठेवण्याची अनुमती दिली.

क्रमशः पुढे.....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग ७

 

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग ७



क्रमशः पुढे...... चालू

भिल्लमाने आतील बाजूस कोण आहे का ते वाकून पाहिले व त्याने हाक मारली. थोड्याच वेळात आतील बाजूस एक काळाशार धिप्पाड पुरुष बाहेर आला त्याच्या डोक्याचे मुंडण केले होते. व त्याला शेंडी होती. तिच्या खालच्या टोकास एक गाठ होती. त्यावरून तो ब्राह्मण आहे ते ओळखले. त्याच्या कपाळी असणारे भस्म पाहून व गळ्यातील रूद्र माळ, तो शैव असल्याची खात्री करून देत होती. तो बाहेर येताच भिल्लमास म्हणाला, “ आपण कोण व येथे यायचे काय प्रयोजन आहे.”

भिल्लमाने आपला परिचय करून दिला. व त्याने बालकांचे नामकरण करण्याच्या हेतूने आल्याचे सांगितले. ब्राम्हणाने बारकाईने पाहिले व तो त्यास म्हणाला,

“ ठीक आहे, पण सदरहू मुलाचे नामकरण करताना मज दक्षिण हवी.”

भिल्लम त्याकडे आशाळभूत नजरेने पाहत होता.

“ या गरीब परागंदा माणसाकडून काय मिळेल.”

ते ऐकूण तो ब्राह्मण म्हणाला,” हे पहा नामकरण विधी करण्यासाठी तुस दक्षिणा द्यायलाच हवी. मी असे रोज फुकट काम करू लागलो. तर एक दिवस माझी बायका मुले मज परागंदा करायची. हे बघ तुज दक्षिणा देणे जमत नाही. पण शेजारील अरण्यातून एक मडके भरून मध घेऊन ये. मी नामकरण करेन. आहेस का तयार.”

भिल्लम, ” जी.”

त्या ब्रह्मणाने आपल्या पत्नीस हाक मारली. ती आतून एका रांजनावरील मडके घेऊन आली. ते आपल्या पतीच्या हाती देऊन गर्विष्टतेने आत निघून गेली.

भिल्लमाची पत्नी पतिकडे पहात , “नको तो विधी. आपण जाऊ येथून नंतर करू नामकरण. मधावरील माशा खूप डंख मारतात. जीव घेतील त्या आपला.”

भिल्लम म्हणाला, “ तू घाबरु नकोस, मी अत्यंत हुशारीने आणेन मध बघ तू. चल आता.”

भिल्लम त्या भटाचे घरील ते लहान मडके घेऊन आपल्या पत्नी व त्या मुलासवे त्या ववृध्दम्हातारीचे घरी आला. त्याने त्या वृद्ध म्हातारिस हाक मारली. ती आतून बाहेर आली.व त्या भिल्लमाच्या हातातील मडके पाहून म्हणाली, “ काय आहे, व हे मडके कशासाठी?”

भिल्लम म्हणाला, “ नामकरण विधी करण्यासाठी त्या ब्राह्मण देवाने दक्षिणारूपी मध हवा आहे असे सांगितले. तेव्हा मी अरण्यातून जाऊन येईपर्यंत आपण थोडा माझ्या पत्नी व मुलास आश्रय द्यावा ही विनवणी करतो.”

वृद्धा म्हणाली, “ छोट्याशा नामकरण विधीसाठी मडके भरून मध मागवला. त्याच्या पितरानी तरी पाहिला होता का मडकेभरून मध. दरिद्री व पांथस्थास लुबाडने पाप असते हे त्या ब्राह्मनास काळत नाही का? या ग्रामी दुसरा कोणी ब्राह्मण नाही म्हणून इतका तयाने तोरा दाखवावा”

भिल्लम म्हणाला, “ असू देत. त्याचे पाप पुण्य त्या जवळी. मी एका दिवसात मध गोळा करून आणतो. व माझ्या मुलाचे नामकरण करतो.तरी मी परराज्य रहिवासी असता त्याने नामकरण विधी करण्याचे कबूल केले हे ही नसे थोडके.”

वृद्धा म्हणाली, “ धर्म शास्त्रानुसार त्याने नामकरण करणे हे त्याचे काम असता नकार देणे योग्य नव्हे. तरी या शिशिर ऋतू मध्ये मडके भरून मद मिळणे अशक्य आहे. वनश्रीला फुले ही मधूमासी असतात. मज वाटते तू त्यात थोडी युक्षाच्या रसाची काकवी मिसळावी जेणे करून तुझे काम सोपे होईल.”

भिल्लम म्हणाला, “ पण हे करणे पाप आहे. व आपण अनुभवी असता असा सल्ला कसे देता.”

वृद्धा म्हणाली, “ ही कृष्ण लीला आहे. फसगत करणाऱ्यास फसवणे पाप नाही.”

भिल्लम म्हणाला, “ ते काही असो. आपण मी येईपर्यंत माझ्या पत्नी व मुलास येथे आश्रय द्यावा.”

वृद्धा म्हणाली , “ ठीक आहे. मी माझ्या गवळवाड्यात तिजला ठेवीन. तुला मध पाहिजे असेल तर पूर्व दिशेस सह्य पर्वतास लागून एका दरीमध्ये गुहा आहे. तिथे हा मध मिळेल. पण सावधान तेथील मधमाशी आत्यंतिक क्रोधित . त्याचा डंख म्हणजे मृत्यूच.”

तेव्हा भिल्लमाने ते मडके व त्या वृध्देकडून आणखी एक मडके घेऊन तो रानात आपल्या पत्नीचा निरोप घेऊन निघून गेला.

दुसऱ्या दिवशी त्याने महतप्रयास करून रानातून मध गोळा केला. त्यास एक जुने मोहोळ मिळाले. ज्यातील औषधी मध त्याने काढीला. ते काढनेस जाण्याआधी त्याने उग्रवास असणारी वनस्पतीची पाने चेचून अंगी लावली. व तो मध गोळा करून त्याने दोन्ही मडकी भरली. त्याची कावड करून त्याने खांद्यावर घेतली. तसेच रानातील काही फळे कंदमुळे त्याने एका कापडी पिशवी मध्ये घेऊन तो परत आला. तो पर्यंत त्या वृध्देने त्याच्या पत्नीस आपल्या गवळवड्यात ठेवले. तिला अन्नपाणी दिले. तसेच बालकास दूध दिले. भिल्लम आला. तेव्हा त्याच्या डोक्यावर असणारी थैली व खांद्यावरील मध मडक्यांची कावड पाहून वृद्धा त्यास म्हणाली. “खरोखर तू खूपच धीट आहेस. पण तुझ्या अंगावरचे काटे काढले पाहिजेत. अन्यथा विष पसरेल. त्याने आपल्या खांद्यावर असणारी कावड ओसरीत ठेवली. तसेच ती पिशवी ही. त्याची पत्नी सिंघणा तिथे आली. ती त्याच्या अंगावरील काटे काढू लागली. थोड्याच वेळात तिने ते कार्य केले. तो पर्यंत त्या वृध्द म्हातारीने तुरटीचे तुकडे व काही झाडपाला आणुनी दिला. व सिंघणेस त्यावरचे उपचार सांगितले. त्यातील एक तुरटीचा खडा घेऊन तिने त्याच्या अंगी जखमांवर फिरवला. व रान औषधी लावली. त्याने त्यास गारवा लाभला. त्याने थोडा विसावा घेतला. त्यास बरे वाटू लागले.

त्या नंतर ती दोघे त्या ब्राह्मनाकडे गेली. तेथे त्यास मधाने भरलेले मडके त्याने दिले. ब्राह्मणाने ते मडके बाहेरील ओट्यावर पूजाविधी करतात तेथे ठेवले. ब्राह्मणाने आतून आपल्या पत्नीस कलश भरून पाणी आणावयास सांगितले. व सिंघनेस बालकास स्नान घालण्यास सांगितले. त्या सुगंधी सोमुळ पाण्याने तिने बालकास स्नान घातले. नंतर त्याला पुसून त्या ब्राम्हणाने आपल्याकडील एक सुती वस्त्र दिले. त्यात त्या बालकास घेऊन ती व भिल्लम त्यापुढे पाटावर बसले. त्याने मंत्र म्हंटले. व त्याने भिल्लमास त्याची माहिती विचारली. ती घेऊन तो ब्राह्मण मंत्र म्हणत बोलला, “ आपण आर्य व अनाऱ्यांचे वंशज आहात. सदरहू जाती भिल्ल असता. त्याकारणे आपला उमादेवीशी संबंध येतो. शिवपत्नी उमा हिने भिल्लीनीचा अवतार घेतला. त्या कारणे आपण शिव उपासक आहात. त्यान्वये मी या बालकाचे नाम महारुद्र ठेवत आहे. असे बोलत त्याने मंत्रोच्चार केला. जवळील एक आम्र पर्ण त्याने घेतले. ते मध व तुपात बुडवून त्याने बालकास चाटवले. नंतर कान फुंकून त्याने बालकाचे नाम ठेविले. शंखध्वनी केला. व एक श्वेत वस्त्र त्यास दीले. त्यानंतर त्या बालकाचा अशा प्रकारे नामकरण संस्कार केला. तदनंतर भिल्लम व सिंघणाने त्याचा निरोप घेतला. व ती दोघे त्या वृध्दाकडे आली. तीस थोडा मध व फळे देवून त्यांनी अभिवादन केले. व निरोप घेतला.

निरोप घेताना वृध्दा त्यांना म्हणाली, “ जवळील नगर नायकाचे पत्र घेऊन त्याद्वारे येथे रहाणेची अनुमती घ्या. व एके ठिकाणी स्थावर व्हा.”

तिचे सांगते ऐकूण ती दोघे जवळील नगराच्या दिशेने मार्गस्थ झाली.

क्रमशः पुढे.......

Saturday, January 14, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ६

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ६




अश्मक खोऱ्यातून आलेली पारध्यांची व भिल्लांची कुटुंबे चक्रवातामध्ये सापडली त्यामुळे भरकटून गेली होती. अचानक आलेल्या या संकटामुळे कुंतल प्रदेशात इकडे तिकडे फिरणार्या त्या कुटुंबातील एक भिल्ल जोडपे वाट चुकले. त्या जोडप्यातील पुरुष भिलम व त्याची पत्नी सिंगणा हे दोघेजण त्या घनदाट अरण्यातून भटकत होते. भिल्लं हा धाडसी असल्याने त्याच्या सोबत सिंघणा आपल्याला सुरक्षित समजत होती. अचानक त्यांना एका घाळीच्या कोपऱ्यातून एका जाळीतून त्यांना एका लहान मुलाचे रडणे ऐकू आले. तसे भिलम चौकस नजरेने कानोसा घेत आवाजाच्या दिशेने आपल्या पाठीवरील भात्यातील शर काढून तो धनुष्यावर चढवत पुढे आला. त्याला कड्याशेजारील जाळीत काट्यांमध्ये एक लहान मूल अडकलेलं त्याला दिसले. त्याच्या छाती शेजारील कोपऱ्यात छोटे जखमेच निशाण दिसत होत.

भिल्लमाने पाहिलं की जाळीच्या खाली एका घळीत एक भुकेली वाघीण फिरत होती. ती त्या मुलाचे भोजन करण्याचे इराद्यात होती.त्याने अचूक नेम धरला. व तिर सोडला. तो शर सरसर करत त्या वघिनिसा लागला.त्या शरावरील औषधाने ती वाघीण थोड्याच कालावधीत बेशुद्ध अवस्थेत गेली.

त्या काटेदार जाळीस आपल्या कमरेभोवती असणाऱ्या धारदार शस्त्राने चिरत त्याने त्या लहान मुलास बाहेर काढले. त्याच्या अंगात घुसलेले काटे त्याने काढून टाकले. त्याच्या बरोबर असणारी व सुरक्षित अंतरावर उभी असणारी त्याची पत्नी त्याच्या जवळ आली. लहान मुलाला पाहताच तिला खूप आनंद झाला.

 ती नव्हर्यास म्हणाली, “ही अरण्य देवाची कृपाच म्हणायची. आपल्या निपुत्रिक जीवनात या मुलामुळे नवीन आशा निर्माण झाली. यासारखे भाग्य ते काय?”

असे बोलत तिने त्या मुलास आपल्या जवळ घेत कुरवाळले तिच्याकडे पाहत तिचा नव्हरा भिल्लम म्हणाला, “ मला वाटते हे बालक काही साध्या सुध्या घरातील नाही त्याच्या कानातील कर्णफुले व इतर आभूषण पाहता हा मुलगा कोणी राजघराण्यातील वाटतो.ते बघ तिकडे रेशमी वस्त्र पडले आहे.”

सिंघणा, “ ते काही नाही. मला ते माहीत नाही. या वेळी अशा या जंगलात हे मला महादेवाने दिलेलं वरदान आहे. व मी हे कोणालाही देणार नाही.”

भिल्लम, “ अन् जर का कोणी पकडले व विचारले तर.”

सिंगणेने, त्याच्या अंगावरील वस्त्रे काढून टाकली. त्याच्या गळ्यातील कनक धातूची माळा काढून आपल्या जवळील झोळीतील एक धारदार शस्त्र काढून त्याच्या कानातील कुंडले कापून तिने काढली. व आपल्या जवळ असणाऱ्या कातडी पिशवीतील एक सुती कापड तिने काढले . त्यात बालकास घेतले. व त्याचे अलंकार व वस्त्र गुंडाळून तिने त्या पिशवीत तळाला टाकले. व सुती कपड्यात गुंडाळून त्या बालकाच्या जखमांवरून ती हात फिरवू लागली. हात फिरवताना त्या मुलाची शुद्ध हरपली. व त्यास ग्लानी आली. ते पाहून तत्काळ तेथील पळस पानाचा द्रोण करून जवळील तटिणीचे पाणी घेऊन भिल्लम आला. त्याने त्या पाण्याचे शिंतोडे त्या मुलाच्या अंगावर शिंपडले. त्याला थोडी शुद्ध आली. त्यास थोडे पाणी पाजले. पाणी प्यायल्याने चेतना अंगात जागृत झाली. ते मूल शुध्दीवर आले. व सिंगणेचे मुखाकडे आश्चर्य मुद्रेने पाहू लागले. भिल्लमालादेखील त्याचा मोह झाला.

तो आपल्या पत्नीस म्हणाला, “खरोखर परमेश्वर दयाळू आहे आपल्या जीवनात हे बालक आशेचा किरण म्हणून आले. आपण याचा सांभाळ करूया. व आपलेच बाळ समजून त्याला पुत्राप्रमाने ठेवूया. पण आपल्याला इथून निघाले पाहिजे.

ती वाघीण थोड्याच वेळात सावध होईल. ते दोघे त्या ठिकाणाहून निघाले. थोड सुरक्षित अंतर पार त्यांनी केलं. वाटेतून जाताना भिल्लमाने रानातील काही औषधी गोळा केली. त्याचा रस काढून त्याने त्या बालकास पाजला. थोडा मद देखील पाजला.तसेच काही औषधी गोळा करून त्याचा त्याने अर्क काढला व त्या बालकाच्या जखमेवर लावला. त्याला थोडी हुशारी आली.

त्या हिरव्यागर्द अरण्यातून उंच उंच अशा अजस्त्र झाडं वेलीतून वाट काढत ते दोघे सावधरित्या वाट चालू लागले. वाट चालताना भिल्लम सिंघणेस म्हणाला, “ काही म्हण सिंघणे या वाघिणीचे तावडीतून हा मुलगा कसा वाचला याचेच मज आश्चर्य वाटते.”

सिंघणा, “ कसा म्हणजे त्या वाघिणीने बालकास पकडले तेव्हा तिचा पाठलाग केला असेल कोणीतरी त्यामुळे तिला भोजन करणेस अवसर मिळाला नाही. ती जेव्हा या काटेरी जाळीवरून उडी मारून जाताना हे बालक इथे पडले व या जाळीत अडकले. व या काट्यांमुळे तिला त्यास पकडता आले नाही.”

भिल्लम, “ मला देखील तसेच वाटते.”

सिंघणा, “ पण आपण पुढे काय करायचे की असेच भटकत राहायचे. आपण जातीने भिल्ल असून देखील आपणास या पारध्यांमध्ये राहावे लागते. मला वाटते आपल्या भागातील आणखी भिल्ल कुटुंबे स्थलांतरित होऊन या कुंतल प्रदेशात आली असतील. आपण त्यात मिसळावे व आपल्या भिल्ल लोकांची वस्ती करावी. व स्थिर स्थावर जीवन जगावे.”

भभिल्म, “पण त्यासाठी आपण सीमावर्ती भागातून जंगलवाटेने दक्षिण प्रदेशात जायला हवे. महाराज जयवर्धन यांचे राज्यात आपणास योग्य तो न्याय मिळेल. व राहावयास जागा ही.”

असे बोलत चालत ती दोघे रानातील फळे , कंदमुळे, खात तसेच काही पक्षांची शिकार करत , त्यातून आपला चरितार्थ चालवत बालकास मिळेल तो रस व मद पाजत ते पुढे निघाले होते.

पुढे जाते वेळी वाटेत एक मोठी तटिनी लागली. तिथे एका वृक्षाखाली ते विश्रांती घेत होती, इतक्यात ते लहान बालक रडू लागले. त्याला भूक लागली होती. भिल्लमाने इकडे तिकडे पाहिले. कोण प्राणी दिसतो का? तेव्हा त्याला रानात एक हिरणी दिसली. तिच्या मागे लहान मृगाचे पिल्ले दिसले. त्यावरून ती दुधाळ असल्याचंही समजले. त्याने एक शर धनुष्याला वर चढवला. व तिला मारून बेशुद्ध केले. व जवळील वेलिनी बांधली. थोड्या वेळाने ती शुध्दीवर आली. तिच दुग्ध त्याने महतप्रयासाने काढले. ते काढताना त्या हरिणीने त्यास खूप उपद्रव दिला. तरी त्याने तिचे दूध काढले. व बालकास पाजवले. ते बालक ते दूध पिऊ लागले. ते पाहताना हरिणीने केलेल्या भिलमाच्या अंगावरील जखमा पाहून सिंघणा म्हणाली, “ काय हे दुर्दैव देवा, मज मूल नाही तरी या बालकास पाजण्यापुरती तरी दुग्ध धारा द्यायची होतीस. किती हे कष्ट उपसावे तिचं बोलणे ऐकून भिल्लम म्हणाला, “परमेश्वरास कशाला दोष द्यावा. या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा किती चांगले जीवन आपणास त्याने दिले आहे. ते काही कमी नाही.”

थोडा वेळ विश्रांती घेऊन ते दोघे त्या बालकास घेऊन मार्गस्थ झाले.पुढे अरण्य संपताच एक छोटीशी वस्ती लागली. वस्ती वरून वाटत होते की ते एक खेडेगाव असावे. ग्रामातील बहुसंख्य घरे मातीची तसेच कुडाची होती. त्यावर रान गवताने शाकारणी केली होती. ग्रामाचे भोवती उंचच उंच बांबूच्या बेटांची कुंपणे होती. कुंपणाऊच आत कुडाची छोटी छोटी घरे सुंदर दिसत होती. सारवलेली अंगणे व भोवती वेगवेगळी फळ, फुल झाडे शोभा देत होती. गावचे वेशीवर पहारा नव्हता. ते त्या ग्रामात आले. तिथली बरीच लोकं कृषी व्यवसाय करत असलेने शेतकीची कामे करणेस ते बाहेर गेले होते. काही छोटी बालके अन् वृद्धांची उपस्थिती जानवत होती. भिल्लम व त्याची पत्नी तिथे जाताच त्याना एका घराच्या बाहेर अंगणात एक वृद्धा तिथे दिसली. त्यांना पाहून तिने त्याना बोलावले. तिच्या अंगावरील वस्त्रे पाहता ती एक शेतकरी महिला वाटत होती. भिल्लम व सिंघणेस पाहून तिने त्यास विचारले, “ आपण कोण आहात. व येथे कशासाठी व कोठून आला आहात.”

तेव्हा भिल्लम म्हणाला, “ आम्ही भिल्ल जमातिची असून आम्ही अश्मक खोर्याचे रहिवासी होतो. परचक्र आल्याने आमची रयत परागंदा झाली. व येथील राज्यात आलोत. परवा झालेल्या चक्रवाताने आमची कुटुंबे विखुरली गेली. आम्ही दोघे व आमचे बालक या रानात भटकून कोठे आसरा मिळतो का ते पहात होतो. इतक्यात ही वस्ती दिसली व येथे आलो आहोत.”

वृद्धा म्हणाली, “ यासाठी तुला जवळील नगर नायकाचे पत्रक घ्यावे लागेल. त्याच्या परवानगीने तुला राजा जयवर्धन यांच्या राज्यात राहण्याची अनुमती मिळेल.”

इतक्यात सिंघणेच्या हातातील रडणारे बालक पाहून ती वृद्धा म्हणाली, “ बाळ रडत आहे. त्यास दुग्धपान का करत नाहीस.”

सिंघणा म्हणाली, “ कसे करू, गेली कित्येक दिवसांपासून अर्धपोटी अवस्थेत आम्ही आहोत. व त्याला आम्ही दुग्ध कुठले देऊ.थोडे फार तांदळाचे दाणे व पीठ मिळाले तर बरे होईल. त्यास थोडी पेज तरी पाजेन.”

वृद्धा, “ठीक आहे. मी पाहते घरात काय आहे ते.”

असे बोलून त्या वृद्धाने त्यांना बाहेरील ओसरीत बसवले. व ती तडक आतमध्ये गेली. व एका पत्रावळीवर देवडीतल्या मडक्यातील पाणीभात घेऊन त्यावर थोडे दही तिने घातले. व ते घेऊन बाहेर आली. व त्या स्त्रीस देत म्हणाली, “ तुम्ही दोघे याचे सेवन करा. मी बालकास थोडे दूध देते.”

 असे बोलून ती आतमध्ये गेली. व देवडीतल्या शिंकाळ्यावरून थोडे दूध तिने एका करवंटीमध्ये काढले. व ते आणून त्या बालकास दिले. ते पाहताना ती सिंघणेस म्हणाली, “बालक खूपच सुंदर आहे. त्याचे काय नामाभिधान ठेविले.”

सिंघणा म्हणाली, “ परागंदा झालेल्या लोकांना ना घर ना दार, कसले आले नामाभिधान. भटकंती करत फिरावे लागले. त्यामुळे पोट भरावे की नाम ठेवावे. हाच प्रश्न आम्हापुढे आहे. त्यामुळे नाम ठेविले नाही.”

वृद्धा म्हणाली, “ या ग्रामामध्ये मध्यभागी एक भट्ट राहतो. येथील लोकांचे दैव व्यवहार तोच पाहतो. त्याकडे जा तो ठेवील योग्य नाम. अन्यथा ज्या बालकाचे नामाभिधान झाले नाही ते बालक भूत योनीत जाते असे येथे समज आहे. तेव्हा आपण त्यास योग्य दक्षिणा द्यावी व हा संस्कार करावा असे मज वाटते.”

त्या वृद्धाचे बोलणे ऐकूण सिंघणा घाबरली. ती व भिल्लम दिलेला आहार घेऊन बालकास दूध पाजून वृद्धेस नमन करून त्या भटाचे घरी निघाली.

फिरत फिरत ती गुरे वाड्या जवळून चौकशी करत वस्तीच्या मध्यभागी असणाऱ्या एका ओसरी वजा घराजवळ आलीत. तेथे आल्यावर भिल्लमा

क्रमशः पुढे......

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...