अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ११
क्रमशः पुढे चालू.....
क्रमशः पुढे चालू....
भिल्ल स्थिर स्थावर झालेले पाहून राज्य प्रतिनिधीने त्या सोबत असणाऱ्या सैन्यांची दुसऱ्या कामी नेमणूक केली. अशा प्रकारे छोटी छोटी अनेक गावे त्या परिसरात तयार झाली. भिल्ल लोकांच्या वस्तीच्या विरुद्ध बाजूस नदीच्या पलीकडे अनेक पारधी वस्त्या होत्या. पारधी समाजातील लोक शिकार व अन्य छोट्या कामात समाधान मानत असलेने त्यांची वस्ती ही भिल्लांच्या पेक्षा कमी प्रगत होती. शिकार मासेमारी करते वेळी त्यांचा एकमेकांशी संबंध येत असे. पण भिन्न संस्कृती असलेने त्यात एकोपा नव्हता.
भिल्लम व सिंघणा त्या लहान मुलाचा इतका छान सांभाळ करत असे. की कोणालाही तो त्यांचा मुलगा वाटावा.तो आपला पुत्र नाही हे गुपित त्यांनी ह्रद्यातच बंधीस्त ठेवले होते. महारुद्र देखील आता भिल्ल मुलांत राहून हळूहळू मोठा होऊ लागला होता. भिल्लमास वाटत होते की आपला मुलगा देखील इतर सर्व शस्त्र विद्यात निपुण व्हावा. असे वाटत होते. यासाठी भिल्लमाने आपल्या मुलास जवळील एका नागरी शेजारी असणाऱ्या मठात राहणाऱ्या व राजे घराणे तसेच वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना विद्या शिकवणाऱ्या आश्रमात घालावयाचे ठरविले. या योजनेने तो आपल्या मुलास तेथे घेऊन गेला.
तेथील आश्रमात तो अचार्यांकडे गेला. तिथे गेल्यावर
भील्लम, “ नमस्कार आचार्य, हा माझा मुलगा असून त्यालाही शस्त्र कलेचे ज्ञान मिळावे असे मला वाटते.”
आचार्य वृषभ, “ आपला परिचय.”
भिल्लम, “ मी आपल्या नगरापासून दूर अंतरावर राहणाऱ्या भिल्ल वस्तीचा नायक असून माझे नाव भिल्लम आहे. व हा माझा पुत्र महारुद्र.”
भिल्ल नायक हा शब्द ऐकताच आचार्य विचारात पडले. व त्यास ते म्हणाले, “ मी भिल्ल लोकांना शिकवत नाही. ते माझ्या नियमात बसत नाही. तरी देखील तुझ्या मुलाचे गुण तपासून पाहतो. व मग माझा निर्णय सांगतो.”
असे बोलून त्यांनी त्या मुलास जवळील आम्रवृक्षावरील पाच आंबे काढण्यास सांगितले. महारुद्राने जवळील धनुष्य घेऊन त्यावर शर ठेवून चाप ओढला व एका शराच्या संधानात त्याने पाच आंब्याचा घोस खाली पाडला. त्याचे ते अचूक संधान पाहून आचार्य व इतर शिष्य आश्चर्यचकित झाले. आचार्य विचार करू लागले. त्यांनी भिल्लमला सांगितले की जर तू विद्या देण्याच्या बदल्यात दोन गाई दान दिल्यास. तरच आपण त्या बालकास शिकवू असे त्याने सांगितले.
भिल्लम उदास झाला. व तेथून निघून आला. पण त्याने आपल्या मनात पक्का निश्चय केला होता, की काही झाले तरी आपण आपल्या या मुलास विद्या शिकवायची. त्यानंतर त्याने आपल्या पुत्रास वस्तीवर पोहचवले. वस्तीवर आल्यावर महारुद्र आपल्या सवंगड्यासवे खेळावयास निघून गेला. सर्व भिललांची मुले त्याच्या आज्ञेत वागत असत. त्याना महारुद्र फार आवडतं असे. त्यास पोहोचवल्यावर भिल्लम सरळ नगराकडे निघून गेला. नगरात आल्यावर तो नगरातील पेठेत गाईच्या किंमतीची चौकशी करू लागला. शेवटी त्यास एका गवळ्याकडून समजले की एक गाय खरेदी करण्यास दोन सुवर्ण मोहोरा लागतील. त्याने खूप कष्ट करायचे ठरवले.
नगरातून फिरत असताना एक दवंडी ऐकू आली. तो तेथे गेला. त्याने त्या दवंडी देणाऱ्यास विचारले, की दवंडी कशाची आहे. तेव्हा दवंडीवाला म्हणाला की राज्यातील राजधानी पासून ते कुंतल प्रदेशापर्यंत एक राज्यमार्ग केला जाणार आहे. तरी त्यासाठी काही मजूर हवे आहेत. राज आज्ञेने मी ही दवंडी देत आहे. ज्याला काम करावयाचे आहे त्याने आपले नाव नोंदणी करावी. त्यास योग्य मजुरी राजनियमाने दिली जाईल. भिल्लमाने दवंडीवाल्यास विचारले.
भिल्लम, “ कोणाकडे नाव नोंदवावे लागेल?”
दवंडीवाला, “ येथील नगरनायकाकडे.”
भिल्लम, “ आभारी आहे.”
असे बोलून भिल्लम तेथून आपल्या वस्तीवर आला. तेथील भिल्लांना समजावून त्याने आपले व त्यांचे नाव नोंदवले. व ते कामावर रुजू झाले. पाहता पाहता चार मासात तो मार्ग तयार झाला. त्या कामाच्या मोबदल्यात प्रत्येकास योग्य बक्षीस मिळाले. भिल्लमास आठ सुवर्ण मोहरा मिळाल्या. तो आनंदाने आपल्या वस्तीवर आला त्याला आता वाटत होते की महारुद्र आता विद्या शिकणार, त्याने ती रात्र कशीबशी ढकलली. व तो दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी भिल्लम महारुद्रास घेऊन नदीवर गेला. त्या दोघांनी स्नान केले व आपली वस्त्रे परिधान करून ती दोघे पुढे नगरात गेली. तिथे गेल्यावर त्यांनी गवळीवाड्यातून दोन गाई खरेदी केल्या. त्यानंतर ती नगरा शेजारील आचार्य वृषभांच्या आश्रमात गेली. त्या आश्रमात आल्यावर तेथे एका विशाल अशा वृक्षाखाली आचार्य वृषभ बसलेले होते. त्यासमोर जाऊन त्याने त्या गाई सादर केल्या. महारुद्र व भिल्लमास पाहून आचार्य उभे राहिले. आपल्या दाढीवरून त्यांनी हात फिरवला. व वैचारिक नजरेने त्यांनी त्यांकडे पहिले. त्यांना पाहून भिल्लम म्हणाला, “ नमस्कार मी आपल्या सांगण्याने या दोन गाई आपणापुढे सादर केल्या आहेत. तरी आपण कृपा करून माझ्या या मुलास विद्यादान व शस्त्र ज्ञान द्यावे.”
आचार्य वृषभ, (आश्चर्य मुद्रेने त्या गाईकडे पहात) “ठीक आहे तू उद्या तुझ्या मुलास इकडे सोडू शकतोस.”
असे बोलून त्यांनी आश्रमातील एका शिष्यास बोलावले. व त्या दोन गाई घेऊन जाण्यास सांगितले. भिल्लमाने व महारुद्रने वाकून नमन केले. व ते निघून गेले. ते गेल्यावर गाई बांधून आचार्य वृषभ यांचा शिष्य तिथे आला. व आचार्यास म्हणाला, “ आचार्य आपण या मुलास विद्यार्जन देणार.”
आचार्य, “ नाही, त्यास दास म्हणून राहावे लागेल.”
शिष्य, “ पण आपण त्यांकडून गो दान घेतले आहे.”
आचार्य, “ आश्रमात गो दान करतातच लोक. याचा अर्थ आपण त्यास सकळ विद्या देणं होत नाही. हे तू पाहसिलच “
दुसऱ्या दिवशी भिल्लम आपल्या मुलास घेऊन तिथे आला.त्याने व महारुद्राने वाकून नमस्कार केला. आचार्यांनी मुलास सोडण्यास सांगून भिल्लमास एका मासाने येण्यास सांगितले.
महारुद्राला सोडून भिल्लम निघून गेला. महारुद्र आश्रमात राहू लागला. पण आचार्य त्यास ज्ञान दान करण्यापेक्षा इतर कामेच जास्त त्याकडून करून घेत असत. त्याला फक्त कथा ऐकावयास बसवत असत. अन्यथा इतर कोणतेही ज्ञान त्यास दिले जात नसे. शस्त्र विद्या शिकवण्यासाठी आचार्य इतर शिष्यांना घेऊन दूर रानात जात. तेव्हा महारुद्र स्वयंपाक घरातील अचार्यांच्या हाताखाली काम करी. आश्रमातील शिष्य त्यास सारखे कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देत. त्याचे अंथरूण ओले करत. कधी त्याचे अन्न जेवत असताना पपाणीणी ओतत. इतर शिष्य हे भालाफेक, तलवारबाजी व अन्य कलात निपुण होते. ते महारुद्रास छळत, त्याकडून हिन कामे करून घेत. पाहता पाहता मास संपला. चंद्राची एक प्रदक्षिणा पूर्ण झाली. आपल्या मुलास सोडून एक मास झाले होते. आपल्या मुलास भेटण्यास भिल्लम आचार्यांच्या आश्रमात आला
भिल्लमाने पाहिले की आपला महारुद्र तेथे विहिरीचे पाणी भरत आहे. तो तडक त्याजवळ गेला. आपल्या पित्यास पाहताच महारुद्राला अश्रू अनावर झाले. तो रडू लागला. त्याच्या अंगावरील व्रण पाहून भिल्लमास वाईट वाटले. महारुद्राने आश्रमातील सर्व व्यवहार त्यास सांगितला. त्याने आपल्या पित्यास घट्ट मिठी मारली. त्याचा हा अवतार पाहून भिल्माचे डोळे पाणावले.त्याने अचार्यास याचा जाब विचारायचे ठरवले. तो आचार्यांच्या समोर गेला व आपल्या मुलाच्या अवस्थे विषयी त्याने आचार्य यांना प्रश्न विचारला.
आचार्य वृषभ, “ त्याच्या योग्यता व पायरी नुसार मी त्यास ज्ञान दिले.”
भिल्लम, “ आपण शस्त्र विद्या शिकवावी म्हणून मी त्यास आपल्याकडे घातले असता त्यास शस्त्र विद्या व आवश्यक ते ज्ञान दिले नाही. आश्रमातील इतर शिष्य त्यास वंचित ठेवतात.”
आचार्य, “ मी त्यास त्याच्या योग्यतेनुसार ज्ञान दिले. मी त्यास ज्ञान देईन असे सांगितले होते. शस्त्र ज्ञान देईन असे केव्हाही सांगितले नव्हते.”
भिल्लम , “ आपण मज फसविले आहे. मला आता इथे माझ्या मुलास ठेवायचे नाही. व माझ्या गायीही मी घेऊन जातोय.”
असे बोलून तो आश्रमाच्या मागे असणाऱ्या आश्रमातील गवळवाड्यातील गाई सोडून आणावयास गेला. आचार्य वृषभ यांनी आपल्या शिष्यांना इशारा केला. लगेच सर्व शिष्य गोळा झाले.
आचार्य यांनी इशारा केला. शिष्य भिल्लमावर चाल करून गेले. त्यांनी त्याला सावरायला वेळ दिला नाही. त्यांनी हरप्रकारे त्यास मारले इतके की त्याची शुद्धा हरवली. लहान महारुद्र अडवण्यास गेला असता. त्यास ही काही शिष्यांनी मारले. एकाचवेळी अनेक जनधावून आल्याने प्रतीकार करणे जमेना. महारुद्र व त्याच्या पित्यास बेशुद्ध होईपर्यंत मारल्यावर आश्रमापासून दूर जंगली भागात नेऊन टाकले. व ते निघून आले. संध्याकाळी तिसरा प्रहार होण्यास आला तरी ते बेशुद्ध होते. सुर्य मावळतीला अस्ताला निघाला होता. त्याची किरणे महारुद्राच्या चेहऱ्यावर पडली. महारुद्रास शुद्ध येऊ लागली. त्याला मावळतीच्या सूर्याचे दर्शन झाले. शुध्दीवर आल्यावर त्याने इकडे तिकडे पाहिले. तर त्याला त्याचे वडील भिल्लम बेशुद्ध पडलेले दिसले. त्यांच्या अंगावरील कपडे फाटलेली होती. जागो जागी जखमा झाल्या होत्या. आपल्या वडिलांचाचा तो बेशुद्ध देह पाहून त्या मुलास काही सुचेनासे झाले. तरी देखील त्याने त्यास हलवून पाहिले. ते उठत नाहीत म्हंटल्यावर त्याने आजूबाजूला कोठे पाणी मिळते का ते पाहिले. त्यास कोठेही पाणी आढळले नाही. सुर्य अस्ताला चाललेला होता. थोड्याच वेळात रात्र होणार होती. व हा अरण्य प्रदेश असल्याने हिंस्र श्वापदे या परिसरात येणार हे त्यास जाणवले. त्याने आपल्या वडिलांच्या निश्चल पडलेल्या देहाकडे पाहिले. त्यांच्या कमरेला एक कट्यार व त्या शेजारी एक छोटीशीटी थैली त्यास दिसली. जी एका गोपात बांधली होती. त्याने कित्येक वेळा आपल्या वडिलांना त्याने तिर करताना पाहिले होते. त्याने छनाचाही विलंब न करता ती कट्यार काढून घेतली. व त्या परिसरात तो इकडे तिकडे पाहू लागला. त्यास एक वेताचे बेट दिसले. त्याने त्यातील काही ओल्या काठ्या कापण्यास सुरूवात केली. त्या कापून घेऊन तो आपल्या पित्या जवळ आला.
क्रमशः पुढे......





