Friday, April 7, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३५

 अंबाला एका राजकुमारीची    प्रेमकथा भाग ३५

क्रमशः पुढे चालू......



पार केल्यावर त्या लपत छपत नगराधिकाऱ्याच्या प्रासादाकडे सरकल्या. सर्व प्रासादातील व्यवहार आटोपले होते. नगरनायक झोपी गेले होते. पहारा कमी होता. काही ठिकाणी दिवट्या फक्त तेवत होत्या. अंधारातून त्या दोघी मागील बाजूपासून नगरनायक झोपलेल्या ठिकाणी त्या आल्या. तिथे पहारा देत असलेल्या सैनिकास त्यांनी सावध होऊ न देता ठार केले. त्याचे मुंडके कापून त्यांनी नाल्यात फेकले.

तेथील वृक्षाच्या साहाय्याने गच्चीत त्या उतरल्या. मागील बाजूच्या स्नानगृहातून त्या प्रासादात घुसल्या. व वाटेत येणाऱ्या सर्व खोल्या न्याहाळत चालल्या. प्रत्येक वाटेतील शिपाई सावध न होऊ देता मारत त्या पुढे नगरनायकाच्या मुलाच्या खोलीत गेल्या.तो सावध होऊन प्रतिकार करणार इतक्यात त्यास बेशुद्ध त्यांनी केले. शेवटी त्या दोघी नगरनायकाच्या कक्षात आल्या. त्यांच्या पत्नीस जी पलंगावर झोपली होती तिला बेशुद्ध केले. व नगरनायकास सावध करून त्यांनी उठवले. ती त्यास मारणार इतक्यात तो ओरडला, “ नको नको, मला मारू नका. तुम्हाला हवे तेवढे मी धन देतो. पण मला मारू नका.”

तेवढ्यात अंबालाने त्याच्या पुढे आपली तलवार धरली. ती राजेशाही तलवार पाहताच तो म्हणाला, “महाराज मला माफ करा . मी तुमचा गुन्हेगार आहे. पण मी तर हे तुमच्या पत्राच्या सांगण्याने केले. तेव्हा चुकीस क्षमा असावी. व मज जीवनदान द्यावे.”

त्याचे बरळने ऐकूण अंबालाने त्याच्या कंठावर तलवार ठेवून त्यास विचारले. की त्याने महाराज जयवर्धन यांचा विश्वासघात का केला.

तेव्हा नगरनायक थरथरत, “ पण आपण कोण आहात?”

अंबाला, “ मी महाराज जयवर्धन यांची विश्वासू सहकारी आहे. तू जर सत्य सांगितले तर आपल्यावर कृपा घडेल.”

तो बोलू लागला. त्याच्या बोलण्यातून गुप्त रहस्य उलगडत होते. त्याने एक मोहोर उमटवलेल एक राजपत्र दाखवले. ते तिने ताब्यात घेतले. व नगरनायकाचा तत्काळ शिरच्छेद केला. व त्या दालनातून त्या बाहेर पडल्या. तोपर्यंत प्रसादात कल्लोळ माजला होता. सैन्य सावध झाले होते. त्या दोघी वाटेत येणाऱ्या प्रत्येकास यमसदनी धाडत गच्चीत पोहोचल्या. तेथील वृक्षावरून खाली उतरल्या. व नाल्याकडे सरकल्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नाल्यात घुसल्या. व पोहत पोहत नाल्याच्या खालील बाजूस गेल्या. तेथील आडव्या वृक्षाच्या खोडास पकडुन बाहेर पडल्या. व अंधाऱ्या रात्री नगराबाहेर पडून घनदाट अरण्यात शिरल्या. आता त्यांचे नाल्यातून पोहल्याने सर्व अंग भिजले होते. तेथून त्या आपल्या वस्तीच्या दिशेने अरण्यवाटेने त्या निघाल्या. अंधार्या रात्री काजवी पिशवीच्या प्रकाशात त्या वेगाने निघाल्या. अरण्य मार्ग आता त्यांना बरेच माहीत झाले होते. अरण्य भरपूर चालून त्या पुढे आल्या होत्या. पहाट होऊ लागली होती. या सर्व मोहिमेत अंगाला चांगलेच ओरखडे पडले होते. त्या अरण्य वाटेने नदीतीरी आल्या. व त्यांनी पाहिले नदीस चांगलाच पूर आला होता. त्यांनी पूर्वी प्रमाणे नदी पार केली. व अरण्यात पुन्हा जाऊन आपली वस्त्रे बदलून त्या आपली शिरस्त्राने घेऊन आपल्या वस्तीवर परत आल्या.

…. …… …… ….. ……….

इकडे नगरनायकाचे मुंडके एका बाजूस पडले होते. त्याच्या प्रेतावर त्याची पत्नी शोक करत होती. सैनिक हत्यारांचा शोध घेत होते. पण त्या दिवशी सर्वत्र मुसळधार पाऊस व सर्वत्र आलेले नदी नाल्यांना पाणी व चिखलयुक्त परिसर, तसेच पावसाळी वातावरण व भयंकर अंधारी रात्र हत्यारांना पकडण्यास अडचण निर्माण करत होती. सगळीकडे अफवा पसरत होत्या. काही म्हणत होते महाराज वेद्दत्तांचे हे काम आहे. तर काही आचार्य वृषभ यांच्या शिष्यांचे हे काम असणार. राज्यपदावरील हक्कावरून हत्या झाली असावी. असे बोलत होते. कारण हल्लेखोरांनी कोणतेही धागेदोरे मागे ठेवले नव्हते. त्यांच्याशी लढताना जायबंदी झालेल्या शिपायांना त्यांच्या घोषाधारी पोषाखामुळे त्यांचे चेहरे पाहता आले नाहीत. नगरच्या बाजूला असणाऱ्या लांब लांब वस्त्या व गर्द झाडी यामुळे चौकशी कशी करायची. त्यात नगरातील विरुद्ध असणाऱ्या सर्वांना आधीच तुरुंगात घातले होते. तरी त्यांवर संशय खाणार कसे. शेवटी शांत बसून मार्ग पाहणे चालू झाले.

इकडे अंबाला व त्रिशलाने आपल्या गुप्त ठिकाणी येऊन त्यांनी आपली वस्त्रे बदलून त्या पुन्हा वस्तीवर नजर चुकवून घरात शिरल्या. महदव्वा अजून उठली नव्हती. सिपना सोबत असलेने ती लवकर उठून आपल्या घरी जेवण तयार करणेसाठी गेली होती. महदव्वा गाढ झोपली होती. तिची गुंगी उतरली नव्हती. त्या आपापल्या कामाला लागल्या. त्रिशलेन चूल पेटवली व तिच्यावर घरातील एका रांजनात ठेवलेले सडलेले तांदूळ शिजत टाकले व थंडावलेले अंग त्या शेकत बसल्या. भिजल्याने खूप थंड वाजत होती. तसेच रानातून जाताना अनेक काटेकुटे लागले होते. ते काढत शेकत त्या बसल्या. महदव्वेस जाग आली होती. ती त्यांच्या जवळ आली. तिने अंबालेच्या शरीरावर हात फिरवला व ओरखडे कशाने पडले हे विचारले.

तेव्हा अंबाला म्हणाली, “ काल मासे पकडताना एक वेतकाठी लागून पडले. इतक्यात तिथे सिपना आली. ऐव्हाना तिला त्याविषयी बरीच माहिती झाली होती. पण ती कोणाशी काही सांगत नव्हती. ती महदव्वेस काही जेवण घेऊन आली होती. त्या दोघींना पाहून केव्हा अआलात हे बोलणार इतक्यात त्रिशलाने तीस इशारा केला. तेव्हा तिने आपले बोलणे बदलले.

सीपना, आंबालेकडे पाहत, “काही म्हणेनास वर्षाऋतू मध्ये तुझा काळा रंग उतरतो. व तुझी कांती उजळू लागते बघ.”

तिने असे म्हणताच महदव्वा म्हणाली, “ गप्प सिपने तुझी दृष्ट लागेल तिला.”

तेव्हा अंबेकडे त्रिशलेच लक्ष गेलं. व तिच्या लक्षात आले की अंबालेची काजळी उतरत आहे. तेव्हा तिने लगेच रात्री एकांतात तिला पुन्हा काजळी लावली. व ती पुन्हा कृष्ण वर्णी दिसू लागली.

…. ….. ……. ….. …… …..

क्रमशः पुढे......

Wednesday, April 5, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३४

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३४



क्रमशः पुढे चालू.....

घरी आल्यावर त्रिशलेन पाहिलं की अंबेच्या हाती जखम आहे. तिने त्याविषयी विचारणा केली. तेव्हा शेजारील सिपना ही तिच्यासोबत होती. तिने सर्व हकीकत सांगितली.

अंबेशी ती बोलू लागली. थोड्या वेळाने सीपना निघून गेली. महदव्वा पण झोपली होती. आंबेस शांत पाहून त्रिशलेन विचारलं तेव्हा ती बोलू लागली.

त्रिशला, “ अशी मुखस्तंभ का आहेस.”

अंबाला, “ मी त्या तरुणास पाहिले. आज अगदी जवळून,”

त्रिशला, “ त्यात काय विशेष.”

अंबाला, “ आपणास वाटतो तितका तो शांत नाही. त्याच्या अंगावर मी काही व्रण पाहिले. जे तलवारी व भाल्याच्या वारांचे होते.”

त्रिशला, “ त्यात काय एवढं, असेल एखाद्या मोहिमेवर तो.”

अंबाला, “ आज काल जर एखादा संघर्ष झाला असेल. तो फक्त आचार्य वृषभ यांच्या आश्रमातील. मला वाटते. तो त्या मोहिमेत सामील असेल.”

त्रिशला, “ त्याने आपल्याला पाहिले नाही ना. मग सोड.”

अंबाला, “ पण माझी साखळी हरवली त्याचे काय?”

त्रिशला, “ हे बघ ते विसर कारण शिव ही कोणाचीही देवता आहे. मग कोण ओळखेल. व इथे कोणी इतका श्रीमंत नाही. जो सुवर्ण साखळी घालेल. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. इथे चौकशी होणार नाही. व हा विचार करण्यापेक्षा आपण पुढील योजना तडीस नेली पाहिजे. कारण आपणास पुढे नगर नायकाचा बदला घ्यायचा आहे.”

 नगर नायकाचा काटा काढण्यासाठी त्या योजना आखणी करू लागल्या. त्यासाठी नगरनायकाचा वाडा व तेथील पहारा पाहाणीसाठी व काही खरेदीसाठी त्यांनी नगरात जायचे ठरवले . घरातील पाणी पिण्यासाठी एक मोठाला माठ हवा होता. तसेच काही जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी त्या पेठेत गेल्या.

पेठेत आल्यावर त्या प्रत्येक देवडी न्याहाळत निघाल्या. तेथून पुढे काही अंतरावरच नगर नायकाचा वाडा होता. तांबड्या मातीने सारवलेल्या घरांच्या रांगेतून त्या पुढे निघाल्या. खरेदी विक्रीचा वार असल्याने पेठेत गर्दी होती. जागोजागी पहारा होता. कारण सदर पेठ ही नगर नायकाच्या ताब्यात होती. व राजधानी सुध्दा. व आचार्य वृषभ यांच्या हत्येमुळे नगरनायक सावध झाला होता. व त्याने पहारा वाढवला होता. नगर नायकाने अपरांत राज्यातून एक सैन्य तुकडी ही मागवली होती. व त्यामुळे एका लष्करी छावणीचे रुप तिजवर आले होते. नगर मोठे होते. पण झाडीमुळे तिथे अलिप्तता तिथे होती. पुढील कडक पहाऱ्यामुळे तिथे जाणे अवघड होते. मात्र मागील बाजूस झाडी होती. त्यातील एक वृक्ष हा त्या महालाच्या गच्चीस लागून होता. तेथे मागील बाजूस एक नाला होता. व त्या परिसरात विषारी सर्पांचा वावर होता. त्यामुळे कोणीही तिकडील बाजूस जात नसे. वाड्याची पाहणी करून त्या पुन्हा पेठेत घुसल्या. व तेथे त्यांनी अफू व काही चामडे एका व्यापाऱ्याला कडून खरेदी केले. तसेच शिवनावळीचे साहित्य ही त्यांनी एका ठिकाणाहून घेतले. व कुंभारवाड्यात जाऊन माठ खरेदी केला. त्यात सर्व आवश्यक साहित्य खरेदी करुन भरले. व त्या परतल्या.

वस्तीवर येण्यापूर्वी त्यांनी ते चामडे व शिवणावळीचे साहित्य बाहेर अरण्यात लपवले. व माठ अन् जीवनावश्यक साहित्य घेऊन त्या वस्तीवर परतल्या. व काही ना काही कारणास्तव त्या तिथे जात. व त्या चामड्यापासून त्यांनी सुंदर असे गुडघ्यापर्यंत पाय सुरक्षित ठेवणारी व हस्त सुरक्षा आवरणे बनवली.

जी अत्यंत जाड होती. त्या रोज रानात जात पण महदव्वा मात्र त्यांना काही बोलत नसे. कारण त्याच तिला सांभाळत होत्या. ती त्यांच्या धाडसाचे कौतुक करीत असे.

त्या दोघी नगरनायकाचा काटा काढण्यासाठी योजना आखनिस लागल्या. योग्य संधीची वाट पाहू लागल्या.

कुंतल प्रदेशात वर्षाराणीचे आगमन दरवर्षी होत असते. तिच्या मध्यावधी काळात पुनर्वसु नक्षत्रात तर जास्तच जोर येत असे. शेतकी कामात अनेक लोक गुंतत असत व रप रप बडवणाऱ्या पर्जण्याच्या दिवसात राज्य नगरातील पहारा कमी होत असे. याच संधीचा फायदा करून घेण्याचे अंबालाने ठरवले. व ती त्रिशलेसवे तयारीला लागली. नगरात जाणारी एक वाट ही नदीच्या मार्गे जात होती. उगम प्रदेशात नदीच्या ती असल्याने ती लांघणे तसे अवघड नव्हते. मात्र तिथे पाण्याचा वेग अती तीव्र असे. दक्षिण कुंतल हे पर्जन्याचे आगर होते. या प्रदेशात वेत बेटे पुष्कळ होती. ती नदी तीरावर अशी वाढली होती की एकप्रकारे वक्र कमानीचे प्रवेशद्वारच बनवत. या दिवसात तांदूळ व नागली यासारखी पिके इथे जास्त घेत असल्याने त्यांची लागन लवकर होई. व लोक घरात राहणेच पसंत करत असत. याच वेळेचा फायदा घ्यायचे अंबाला व त्रिशलेन ठरवले. योजने नुसार त्यांनी एक दिवस निवडला. त्या दिवशी पावसाने अधिकच जोर धरला होता. नदीतील मच्छीचे कालवण त्रिशलेने बनवले. महदव्वेस जेवण वाढले. त्या ही जेवल्या. नंतर त्यांनी एक तांबूल महादव्वेला खायला दिला. त्यामध्ये त्रिशलेन अफू घातली होती. तिच्या गुंगिने ती वृद्धा निद्रिस्त झाली. तिला घराच्या आतील भागात झोपवून शेजारील सीपनेस लक्ष देण्यास सांगून त्या दोघी बाहेर निघाल्या. बाहेर पाऊस पडत असल्याने जाणे अशक्यच एखादा मुसळ आयनात कोसळावा तशा वेगाने कोसळत होता. त्या दोघींनी वेताच्या बारीक कांबट्यांपासून बनवलेले शिरस्त्राण धारण केले होते. त्यांनी ते आपल्या डोक्यावर परिधान केले होते.

त्या वस्तीवरुन निघाल्या. वर्षा ऋतू त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. त्या जवळील अरण्यात गेल्या. तिथे त्यांनी गुप्तरित्या लपवलेली शस्त्रे व आपली चामडी वस्त्रे त्यांनी जिथे ठेवली होती ती घेतली. तेथील एका कपारीत असणाऱ्या गुहेत त्यांनी पेहराव बदलला. व वरती आपला गुप्त पोशाख घातला. थोड भिजल्याने चामड्यास उग्र वास येत होता. पण आता त्या चांगल्याच सरावलेल्या होत्या. पेहराव केल्यानंतर त्या अरण्य वाटेने नगराकडे चालू लागल्या. पुढे नदीकाठी आल्या. नदीला भरपूर पाणी आले होते. नदितिराने त्या उगम बाजूस असणाऱ्या वेत वनात आल्या. तिथेही भरपूर पाणी होते. त्या नदी तुंबात शिरून वेत बेटाजवळ आल्या. आपली शिरस्त्राने बाजूला ठेवली. व डोक्याला दुसरे वस्त्र बांधले. व आपली शस्त्र नीट बांधून त्या बेटावर चढून त्या शेंड्याकडे सरकल्या. नदीच्या पलीकडे असणारी बेटे सुध्दा वाकल्याने त्यांची गुंफण झाली होती. अलीकडील बेटातून वर चढून पलीकडील बेटावर जाऊन त्या नदीपार गेल्या. नदीपार गेल्यावर त्या नगराकडे सरकल्या. तिथे पोहोचेपर्यंत त्याना संध्याकाळ झाली. तिथे गेल्यावर त्यांनी एका जागी आडोसा शोधून आपल्या कडील बंद पिशवीतील सुखामेवा खाल्ला. व पुढे नगराकडे गेल्या. नगर वेशीवर पहारा सौम्य होता. त्यांनी दुसरीकडून नगरात प्रवेश केला. आता रात्र चांगलीच झाली होती. नगर नायकाच्या महाला मागे नाल्यास लागून असलेल्या किर्र झाडीत त्या गेल्या. झाडीच्या गच्च पणामुळे पावसाचा शिडकावा जाणवत नव्हता. तेथे अल्प फलोपहार घेऊन त्या अंधार वाटेने नाल्यात उतरल्या. नाल्यास पाणी आल्याने तेथील सर्प दुसरीकडे गेले होते. व सुरक्षित पेहराव केल्याने त्यांना घाबरण्याची गरज नव्हती. नाला पार करण्यासाठी सुरक्षित जागा त्यांनी हेरली. एका वृक्षाच्या साहाय्याने त्यांनी तो पार केला. 

क्रमशः पुढे.....

Friday, March 31, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३३

 अंबाला एका राजकुमारीची प्रेमकथा भाग ३३


क्रमशः पुढे चालू.....

विश्रांती घेताना महारुद्र त्या शरांचे निरीक्षण करू लागला. तेव्हा त्याला साखळीची आठवण झाली. त्याने ती आपल्या कमरे भोवतालच्या पिशवीत ठेवलेली होती. ती त्याने काढली व तो ती बारकाईने निरीक्षण करू लागला. तेव्हा त्या साखळीवर कोरलेली देवता त्याने पहिली. ती शिवाची मूर्ती दिसत होती. व ती एक सुवर्ण साखळी होती. त्या साखळीची जडण घडण ही पारध्यांच्या गळ्यातील साखळी सारखी होती. पण ती सुवर्ण साखळी होती. व या प्रदेशात इतका कोणीही पारधी श्रीमंत नव्हता. की जो सुवर्ण साखळी तयार करेल. पण ती एका पारधी स्त्रीची होती हे मात्र पक्के होते. त्यानंतर तो त्या शरांना न्याहाळू लागला. त्यातील एक शर जो आश्रमातील खांबनिस लागला होता. तो त्याने घेतला. ज्याने संधान झाले नव्हते. त्याने तो तेथील एका लोटक्यात पाणी घेऊन बुडवला. तर पाण्यावर एक तवंग निर्माण झाला. ते पाणी त्याने बाजूला नेवून ठेवले. एक पक्षी आला व त्याने ते पाणी प्राशन केले. तो थोड्या अवधीत मरून गेला. त्यावरून ते विषारी शर आहेत हे त्याने जाणले. त्याचे निरीक्षण करतेवेळी त्याला जाणवले की वेतापासून बनलेल्या त्या शराची टोके अत्यंत टोकदार होती. व त्याची रचना अत्यंत निमुळती अशी होती. मागील बाजूस पिसे व मध्यभागी अत्यंत तासिव तो शर होता.

महारुद्रला त्या शराचे निरीक्षण करता त्यास त्या पारधी युवतीची आठवण झाली. त्या दोघीही शूर आहेत. व त्याला त्रिशलाने मारलेल्या शरांची आठवण झाली. त्यानंतर त्यास अंबाला आठवली. व तिच्या आठवणी जाग्या झाल्या. व तिला भेटण्याची तीव्र जाणीव त्याला झाली. व त्याने प्रातदिनी तिला भेटायला जाण्याचा निश्चय केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो प्रथम आपल्या वस्तीवर गेला. त्याने आपल्या माता पित्याची भेट घेतली. व तो अन्न सेवन करुन तेथून नदीच्या वाटेला लागला. नदीवर आल्यावर त्याने पाहिले तिथे कोणी नव्हते. नदीच्या पुढील भागात उन्हाळी पाण्याची गरज भागवणे साठी पारधी व भिल्लानी बंधारा घातला होता. त्याने नदीत पाणी तुंबले होते. त्याने आपले धारदार शस्त्र कमरेस बांधले. व आपला धनुष्य व बाण पाठीस बांधून त्याने पाण्यात उडी टाकली. व नदीपार करून तो पारधी वस्तीच्या हद्दीत आला. व वस्तीच्या वाटेला लागला. त्याला आता बऱ्याच पारधी लोकांची ओळख झाली होती. तो हर तऱ्हेने अनेक जणांना मदत करत असल्याने त्याला लोक अदबीने बोलत असत. अनेक भिल्ल व पारधी युवती त्याच्याशी सख्य करण्यासाठी प्रयत्न करत असत. अनेक भिल्ल कुमारींनी त्यास लग्नाची मागणी घातली होती.

पण त्याची नजर त्या पारधी कुमारिकेवर आली होती. वाटेने जाताना त्याला अनेक मुलींचा कालवा ऐकू आला. त्याने पाहिले वाटेच्या बाजूच्या रानात एक भला मोठा आम्रवृक्ष होता. त्याला आंबे लगडलेले होते. त्याखाली मुली गलका करून होत्या. वरून एक युवती त्यांकडे आंबे टाकत होती. महारुद्राला वाटले. की आपणही त्यांना आंबे काढून द्यावे त्याने नेम धरून काही आंबे पाडले. अचानक पडणाऱ्या आंब्याना त्या मुली गोळा करण्यासाठी खाली वाकल्या. वृक्षावर बसलेली युवती ते आंबे तोडायचे सोडून बाण कुठून येतं आहेत हे न्याहाळू लागली. पण गर्दपानांतून ते दिसेनात. अचानक एक शर एक घोस तोडण्यासाठी महारुद्राने मारला. पण अचानक वारा जोरात वाहू लागला. व त्याने बाणाची दिशा बदलली व तो थेट त्या युवतीच्या उजव्या दंडात लागला. तिचा तोल गेला ती फांदीस लोंबकळली व तिने शेजारील वेलींच्या जाळीत उडी घेतली. मुलींनी एकच गलका केला. व त्यांनी तरुणीला बाजूला आणले.

महारुद्राने ओळखले की आपला शर कुणाला तरी लागला आहे. तो लगेच तिथे गेला. व त्याने त्या मुलींना बाजूला सारले व तो त्या मुलीजवळ गेला. तिला पाहताच त्याला धक्का बसला. ती अंबाला होती. तो चटकन तिच्या जवळ गेला

तिच्या दंडाजवळ लागलेला शर त्याने काढला. रक्त ओघळू लागले. त्याने क्षणाचा विलंब न करता आपल्या शरीरावरील वस्त्र फाडले. व ते तिच्या जखमेवर बांधू लागला. सर्व मुली त्याला दूषणे देवू लागल्या. काहींनी त्याच्या पाठीत आंबे मारले. थोड्या वेळाने त्या शांत झाल्या. त्याचे ध्यान त्या मुलींकडे नव्हते. त्याने जवळील झाडाची काही औषधी पाने तोडली. . व ती हातावर चोळून तिच्या जखमेवर लावली. व त्यावर वस्त्र बांधले. रक्त वाहायचे थांबले. इतक्यात काही मुली जवळील पानाचा द्रोण करून पाणी घेऊन आल्या. पाणी शिंपडले न तिला शुद्ध येऊ लागली. महारुद्राच्या डोळ्यातून पाणी पडू लागले. अंबालेस शुद्ध यावी म्हणून ते प्रयत्न करू लागले. शेवटी तिला शुद्ध आली. तिने पाहिले. की आपण एका पुरुषाच्या मांडीवर विसावलो आहोत. ती चटकन उठली. व तिने त्याकडे पाहिले. महारुद्र तिच्यासमोर शांतपणे बसलेला व त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू सर्व काही सांगत होते. ती त्याच्याकडे पाहून हसू लागली. अचानक तिचे लक्ष त्याच्या दंडावरील जखमांकडे गेले. त्यावरून तिने लगेच हेरले की हा त्या दिवशी रात्री त्या आश्रमावर हल्ला करणाऱ्यात होता. तिने त्याला पूर्ण न्याहाळले. त्याचे ते पिळदार दंड एखाद्या बळकट पैलवाणास लाजवेल असे होते. पण तिने त्याला अगतिकच पाहिले होते. ती चटकन उठली. व तेथील मुलांसमवेत चालू लागली. तिच्या हातातील त्या जखमेतून तीव्र वेदना उमटत होत्या. ती निघालेली पाहता तो चटकन तिच्या जवळ आला. व म्हणाला, “मला माफ कर. मी आंबे पाडून देण्याच्या हेतूने शर चालवला होता.”

अंबाला, “ ते मी जाणते. तुम्ही माझ्याबरोबर नेहमी शरणागत असल्यासारखे का येत असता. तसे येत जाऊ नका.”

असे बोलून ती तेथून निघून गेली.

…..

क्रमशः पुढे......

Wednesday, March 29, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३२

 अंबाला एका राजकुमारी ची 

प्रेमकथा भाग ३२



क्रमशः पुढे चालू......

त्या तिथून निघाल्यावर अर्ध्या वाटेवर आल्या. तेव्हा आंबलेच्या लक्षात आले की आपल्याला दिलेली दुश्यलेने साखळी होती ती आता आपल्या गळ्यात नाही. तेव्हा त्या पुन्हा माघारी तिथे गेल्या. तेव्हा महारुद्राचे साथीदार तिथे सर्व आश्रमातील साहित्य आपल्या ताब्यात घेत होते. अंबाला लपत छपत आचार्यांशी झटापट झालेल्या ठिकाणी आली. तिथे तिने शोध घेतला. पण ती साखळी तिला सापडली नाही

त्यामुळे कोणाला कळायच्या आत त्यांनी तेथून जायचे ठरवले. व त्या निघाल्या. तेथून थेट त्या आपली वस्त्रे लपवलेल्या ठिकाणी गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी पोशाख बदलला व पुढे जिथे तलवार लपवली होती तिथे परत आल्या. तिथे अंबालेन आपली वस्त्रे व शस्त्रे लपवली. व त्या महदव्वेस पाठवून दिलेल्या गावी गेल्या. तिथे एक दोन वस्ती टाकून त्या पुन्हा आपल्या राहत्या ग्रामी परतल्या.

वाटेत येताना त्यांना एका वाटसरूकडून आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर झालेल्या हल्ल्याची बातमी समजली. पण त्यावर जास्त भाष्य न करता त्या आपल्या पारधी वस्तीवर निघून आल्या.

जिथे तिथे आचार्य वृषभ यांच्या आश्रमावरील हल्याची चर्चा सुरू होती.

जो तो म्हणे की आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर हल्ला करून महाराज वेददत्त यांनी राजधानी वरील हल्ल्याचा बदला घेतला. त्या तिघी आपल्या पारधी वस्तीतील घरी आल्या. व घरात महदव्वेला सोडून रानात अन्न गोळा करण्यास गेल्या. रानात गेल्यावर त्यांनी महदव्वेस आणायला जाताना जी शस्त्रे व वस्त्रे अरण्यातील ढोलीत ठेवली होती. ती जाऊन घेऊन त्या आल्या. व ती आपल्या वस्ती बाहेरील अरण्यात एक विशाल वृक्ष शोधून त्याच्या ढोलीत ठेवली. त्यातील फक्त धनुष्य त्यांनी घेतला व त्या पुन्हा रानातून निघाल्या. अरण्यातील एक वेत तोडून अंबा व त्रिशलाने पुन्हा त्याचे शर बनवले. व त्यांच्या साहाय्याने अनेक फळे त्यांनी काढली. तसेच इतर रानमेवा देखील गोळा केला. व त्या घरी परतल्या.

…. ….. ….. …… …… …… ……

इकडे आचार्य वृषभांना ठार मारल्यावर महारुद्राने आपल्या साथीदारांना अन्य कोणी जिवंत आहे का ते पाहण्यास सांगितले. व काहीना मारलेले शर पुन्हा काढून घेण्यास सांगितले.

त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या साथीदारांनी ते शर काढून घेतले व महारुद्रच्या पुढ्यात आणले. त्याने त्यातील निराळे शर काढले. ज्यांची घडण निराळी होती. जे त्या कृष्णवस्त्र धारण केलेल्या त्रिशलाने मारले होते. तो आचार्य यांना लागलेला शर त्याने उपसला. तेव्हा त्यास आचार्य वृषभ यांच्या मृत देहाजवळ पडलेली साखळी सापडली. ती त्या वीरांगनेची असल्याची जाणीव त्यास झाली. त्याने ती कोणी पहायच्या आत लपवली. व सर्व पुरावे नष्ट करून तो व त्याचे साथीदार तिथून आपल्या जखमी साथीदारांना घेऊन आपल्या सुरक्षित अरण्यातील युद्ध सराव तळावर आलीत. तेथे त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी जातिनिशी महाराज वेददत्त गुप्तरित्या तिथे आले. त्यांना गुप्त हेरांच्याकरवी आचार्य यांच्या आश्रमावरील हल्ल्याची बातमी समजली होती. त्यांनी त्या ठिकाणी येऊन महारुद्राचे कौतुक केले. व त्यास दक्षिण कुंतल प्रदेशाचा नगर नायक नेमण्याचे ठरवले. त्यासाठी राजधानी शत्रूकडून जिंकून घ्यायची व दक्षिण नगर नायकास हरवून तो प्रदेश जिंकण्याची जबाबदारी महारुद्रावर सोपवली.

…… ……. …… …… …….

क्रमशः पुढे.......

अंबाला भाग ३१

 अंबाला भाग ३१



क्रमशः पुढे चालू.....

ते पंधरा सोळाजन होते. त्यातील चार पाच जण आचार्य वृषभ यांच्या कुटीत शिरले. व त्यांनी आचार्य समजून वार केला. त्यात त्यांची पत्नी जखमी झाली. ती ओरडत उठली. त्यामुळे झोपलेल्या आचार्यांना जाग आली. ते सावध झाले. व त्यांनी तलवार उपसली. व त्या तोंड रुमालाने झाकलेल्या. महारुद्रच्या साथीदारांनी ते दोन हात करू लागले. या सर्व हातघाईत आचार्यांच्या बाजूच्या दालनातील शिष्य जागे झाले. व त्यांना त्यांच्यावरील संकटाची चाहूल लागली. व ते ही शत्र घेऊन बाहेर पडले. तोपर्यंत आचार्यांनी त्यांच्याशी संघर्ष करत त्यांना कुटीबाहेर आणले. कुटी मध्य अंगणात आता चांगलीच हातघाई चालू झाली. त्यातून महारुद्राच्या साथीदारांनी त्यातील काही शिष्य आपल्या बाणांच्या साहाय्याने टिपले. त्यांची हातघाई पाहून त्रिशला आंबेस म्हणाली, “चल माघारी.”

तेव्हा अंबा म्हणाली, “आता चालून आलेली ही संधी पुन्हा मिळनार नाही. शत्रूचा शत्रू आपला मित्र. व मला वाटते इथे आपली जास्त गरज आहे. कारण या सराईत आचार्य शिष्यांशी सामना करणे अवघड आहे. व हे योध्दे जास्त वेळ टिक मारणार नाहीत.

त्या दोघींना तो महारुद्र व त्याचे साथीदार आहेत हे माहीत नव्हते. कारण त्या सर्वांनी तोंडावर रुमाल बांधले होते. ते अत्यंत त्वेषाने लढत होते. महारुद्र तर जीवाचे रान करून त्यांच्याशी मुकाबला करत होता. त्याचे हातघाई केलेले साथीदार जखमी होत होते. थकत होते. एकटा महारुद्र किती वेळ त्यासमोर टिकेल. महारुद्रचे जखमी साथीदार मागे हटत होते. तसेच त्यांची आयुधे ही कमकुवत होती. सराईत युद्ध करणाऱ्या आचार्यांच्या शिष्यांपुढे त्यांचा निभाव लागणे कठीण होते. भाले व वेतकाठीने किती वेळ ते लढणार. तरी देखील ते प्रतिकार करत होते.

 महारुद्राच्या साथीदारांनी मारलेले बाण अचार्यांचे शिष्य चुकवत पुढे सरकत होते.

लढता लढता आचार्य वृषभ महारुद्राला म्हणाले, “ कोण आहेस तू? इथे येण्याचे प्रयोजन सांग.”

महारुद्र, “ मी तुमचा काळ आहे. बदला घेण्यासाठी आलोय.”

आचार्य वृषभ, “ तुला माझी ताकद माहीत आहे का? महाराज जयवर्धनांच्या सैन्याचा जिथे निभाव लागला नाही तिथे तू किती वेळ टिकशील. शरण ये.”

महारुद्र, “ महराज जयवर्धनांचे सैन्य. म्हणजे मी नव्हे. ज्यांचा तू विश्वासघात केलास. तुझ्या बऱ्याच दुष्ट शिष्यांना मी यमसदनी धाडले. आता तुला फक्त त्यांच्याकडे पाठवायचे आहे.”

आचार्य वृषभ, “ तू व तुझे साथीदार माझ्यापुढे जास्तवेळ टिकणार नाहीत.”

महारुद्र हरतर्हेने त्यांच्याशी मुकाबला करत होता. पण थोड्याच वेळात त्याची तलवार तुटली. व आचार्य वृषभ त्यास मारणार इतक्यात अंबलाने इशारा केला. त्रिशलाने एक बाण सोडला. तो आचार्यांच्या हातावर लागला. त्यांचे लक्ष तिकडे गेले. तेव्हा त्यांना घोषाधारी तोंड बंधिस्त असे कृष्णवर्णी पेहराव केलेले दोन योद्धे दिसले.

इतक्यात बाण सोडत त्रिशलेने आचार्यांचे अनेक शिष्य टिपले. तिचे अचूक शर संधान पाहून आचार्य चिडले. इतक्यात अंबालाने आपली तलवार काढली. व चपळता दाखवून आचार्य वृषभ यांच्या एका शिष्यास ठार करून त्याचे मुंडके छाटले. ते एखाद्या चेंडू सारखे आचार्यांच्या पायात पडले. इतक्यात महारुद्र वेगाने बाजूला झाला. व त्या घोषाधारी वीर योद्ध्यांकडे पाहू लागला.

अचार्य, “ ए नेभळट विरा असे बेसावध विरांना मारताना तुला लाज वाटत नाही. असे मागून वार तरस करतात शूरवीर नाही.”

अंबाला, “ मला नेभळट व तरस म्हणणारे तुम्ही कुठल्या अंगाने सिंह शोभता. ज्यावेळी तुम्ही महाराज जयवर्धन यांच्या माघारी नगरावर हल्ला केला. व राजमाता अरूणावती यांचा घात केला त्यावरून तर तुम्ही लबाड लांडग्या सारे आहात. हे सिद्धच केलाय.”

आचार्य, “ तुझा व त्याचा काय संबंध.”

अंबाला, “ संबंध माझी तलवारच सांगेल.”

आचार्य, “आवाजावरून तर तू एक स्त्री वाटतेस.”

अंबाला, “ माझ्या आवाजावर व शरीरावर जाऊ नका. मी पण पहातेच तुम्ही किती शूर आहात ते. वाचवा स्वतला.”

असे म्हणत ती आचार्य वृषभ यांच्या अंगावर धाऊन गेली. व त्यांच्याशी लढायला लागली. आत्यंतिक विजेच्या वेगाने तिचे अंग हलत होते. आचार्यांचे उरलेले शिष्य टिपत ती लढत होती. त्रिशाला ने एक हुकमी स्त्री शर काढला. जो अत्यंत घातक होता. व तिने अचार्यांवर नेम धरला. अंबाला आचार्यांच्या शिष्यांना यमसदनी धाडून अचार्यांशी दोन हात करू लागली. तिची हालचाल पाहून ती एक वीरांगना आहे हे आचार्यांनी ओळखले. महारुद्र ते दृश्य पाहून स्तंभित झाला. ज्या अचार्यांशी लढताना तो व त्याचे सहकारी यांची दमछाक झाली होती. तिथे त्यांना कृष्णवर्णीय नाजूक देहाची वीरांगना असलेली मूर्ती तलवारबाजित मात देत होती. थोड्या वेळाने त्रिशलाने इशारा केला. तिचा इशारा समजला त्यानुसार अंबाला खाली झुकली. व वेगाने त्रिशलाने सोडलेल्या बाणाने आचार्यांचे हृदय छेदले. आचार्य खाली कोसळले.

इतके अचूक संधान महारुद्राने दुसऱ्यांदा पाहिले होते. एक त्रिशला व आता ही नेमबाज. आचार्यांचे काम फत्ते झाल्यावर त्रिशलेने इशरा केला. तसे चपळाईने अंबाला तिच्याजवळ गेली. व त्या तिथून निघाल्या.

त्यांना जाताना पाहून महारुद्र, “थांबा , आपला परिचय तरी करून द्या.”

घोषाधारी अंबाला, “ तू आमच्या विषयी जास्त जाणून घेऊ नकोस त्यापेक्षा तुझ्या जखमी साथीदारांना वाचव.”

असे बोलून त्या जवळील झाडीत गुप्त झाल्या.

क्रमशः पुढे.......


अंबाला भाग ३०

 अंबाला भाग ३०



क्रमशः पुढे चालू......

वेताच्या काढलेल्या काठ्या बांधताना आंबेच्या हाताचे बोट चुकून टोकास लागले. व तिच्या बोटाला छोटीशी इजा झाली. तिच्या तोंडातून माते असे स्वर निघाले. व तिला राजमातेची आठवण झाली. व डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते रक्ताळलेले बोट तिने तोंडात घातले. ते पाहून महारुद्र पुढे झाला. त्याने तिथे जवळपास रान औषधी शोधली व चटकन तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटावर बांधली. ती चटकन बाजूस झाली. व उभा राहिली. त्याने ते वेत वेळूने घट्ट बांधले. अंबालाने चटकन तो डोईवर घेतला. व ती चालू लागली. तो तिच्याकडे पाहत राहिला. पाठमोऱ्या तिच्या देहातील लावण्य भर उन्हात ही लकाकत होते. ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिच्याकडे पहातच राहिला. ती दिसेनाशी झाल्यावर तो मागे वळला. त्याने त्या बेटातील काही काठ्या काढल्या. व तो ही आपल्या वस्तीकडे निघाला. वस्तीवर आल्यावर त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक धनुष्य व शर तयार केले. व त्या शरांच्या टोकाला त्यांनी विष लावले. व ते गट्टे गुप्त जागी अरण्यात लपवले.

इकडे अंबाला त्या काठ्या घेऊन येऊन तिने घरात बसून तिने अनेक शर तयार केले. व त्याच्या तोंडाला विषारी औषधी लावली. वृध्द महदव्वेस आपल्या बहिणीला भेटायची इच्छा झाली. त्यामुळे त्रिशला तिला सोडण्यासाठी गेली होती. ती तिला सोडून परत आली.

महदव्वा नसल्याचा फायदा अंबेने घ्यायचे ठरवले. आपल्या मातेस ठार मारून आपल्याला परागंदा करणाऱ्यास शिक्षा करण्याचे तिने ठरवले. तिने जवळील पेठेतून त्रिशलेस काही वस्त्रे आणावयास सांगितले. त्याप्रमाणे त्रिशलेने जवळील पेठेत जाऊन काही कृष्णवर्णीय वस्त्रे विकत आणली. व त्या दोघींनी आचार्य वृषभाच्या आश्रमावर हल्ला करण्याचा निश्चय केला. त्याची योजना त्या आखू लागल्या. व त्यांनी योजना आखली.

काही दिवसांनी महदव्वेस परत बहिणीकडून आणण्याचे कारण ग्रामनायकास सांगून त्या तेथून बाहेर पडल्या.

ग्रामातून बाहेर पडल्यावर त्या गावाबाहेरील अरण्यात गेल्या. जिथे त्यांनी गुप्त जागी उंच वृक्षाच्या ढोलीत आपली शस्त्र लपवून ठेवली होती. तिथे गेल्यावर त्यांनी आपला पेहराव बदलला. व आपली शस्त्रे तिने काढली. ज्यामध्ये अंबालेची धारदार तलवार होती. जी तिला तिच्या लहानपणी तिच्या मातेने दिली होती. ती न्याहाळताना तिला आठवले की याच तलवारीच्या बळावर तिने अपरांत देशी त्रिशलाची छेड काढणाऱ्या त्या युवकांचे काम तमाम केले होते. तिने तिची धार पाहिली. व त्या अरण्य वाटेने आचार्य वृषभ यांच्या आश्रमाच्या दिशेने निघाल्या. आता अरण्य म्हणजे त्यांना त्यांचे अंगणच वाटत होते. त्यांनी आपला पेहराव बदलला. व आपली वस्त्रे गुप्त जागी लपवली. व त्या आश्रमाच्या दिशेने निघाल्या. अनेक अरण्यातील ओढे नाले व नदी पार करत त्या परिसरात पोहोचेपर्यंत त्यांना सांज झाली. तिथे जाताना वाटेतील रानफळे व औषधी ज्या त्यांनी जाताना तोडून घेतल्या होत्या. तसेच पन्हाळीचे पाणी जे आपल्या कातडी पिशवीत भरले होते. ते त्यांनी एका उंच वृक्षाखाली बसून निवांत फळे खाल्ली व पाणी पिले. व अंधार होण्याची त्या वाट पाहू लागल्या.

महारुद्र देखील आपल्या सहकाऱ्यांन समवेत आचार्यांवर सुड उगवण्यासाठी निघाला. त्याने आश्रमाच्या उत्तर बाजूने हल्ला करावयाचे ठरवले. त्या बाजूच्या अरण्यात येऊन तो ही रात्र होण्याची वाट पाहत आपल्या साथीदारांसमवेत तिथे दबा धरून बसला. अमावस होऊन गेली होती. थोड्याच वेळात रात्र झाली. त्यामुळे किट्ट काळोख होता. आचार्यांना माहीत होते. की प्रधान वेददत्त आपल्या विरुद्ध कार्यवाही थेट करू शकत नाहीत. व छुपा हल्ला करण्याचे धाडस कोणी करेल. हा त्यांचा भ्रम थोड्याच वेळात दिर होणार होता.

आचार्यांच्या आश्रमात सर्व शिष्य आपला दिनक्रम आटोपून झोपी गेले होते. तसेच मध्यभागी असणाऱ्या आचार्य वृषभ यांच्या कुटिभोवती असणाऱ्या कुटीत राजधानीवर हल्ला करणारे शिष्य धुंद होऊन पडले होते. भोजन झाले होते. व ते विश्रांती घेत झोपी गेले.

रात्रीचा मध्य प्रहर येताच त्या दोघी आश्रमाच्या दक्षिण पूर्व भागाकडून आश्रमाच्या विभागात आल्या. तिथे गोशाळा होती. गाई रवंथ करत होत्या. तेथून त्या लपत छपत तिथून पुढे निघाल्या. त्या बाजूस सहसा कोणी नसे. तिथून शिरकाव करून त्यांनी तिथे असणाऱ्या दोघांना यमसदनी सावध न होऊ देता धाडले. व मागील स्नान गृहाकडून त्या पुढे सरकल्या.

इकडे महारुद्र आपल्या साथीदारांच्या मदतीने पुढील बाजूने आश्रमात आला. आश्रमाच्या प्रवेश दारावरील देवडीत असणाऱ्या दोघांना त्याने संपवले. व आश्रमातील असणारी एक एक कुटी गाठत तेथील दुष्ट शिष्यांना यमसदनी धाडत त्या पुढे निघाल्या. त्रिशला व अंबाला मागील बाजूने शिष्य विश्रांती घेत असलेल्या दालनात आल्या. तिथे आचार्य यांचे शिष्य एका ओळीने झोपले होते. त्यातील बरेचसे चेहरे तेथील छोट्याशा दिव्यांच्या प्रकाशात दिसत होते. जे आंबेने ओळखले. अंबेच्या डोळ्यात निखारे उमटले. डोळ्यासमोर नगरावरील हल्ल्याचा प्रसंग उभा राहिला. नगर तट्टावर शर सोडणारे बरेचजण त्यात होते. जे आंबेने आपल्या मातेच्या निगराणीत पाहिले होते. तिने त्रिशलेस इशारा केला. तिने एक छोटे शस्त्र काढले. ज्यात अनेक सुया सारखी अस्त्रे होती. व तिने अंदाज घेत एका एका स अचूक नेम धरून मारले. ज्याने ते जागीच गतप्राण झाले. तेथून त्या बाहेर पडल्या पुढे एकामागून एक आश्रमाच्या कुटी दालनातील शिष्य टिपत त्या एका ठिकाणी आल्या. त्या दालनातील शिष्यांची शिकार करून बाहेर पडणार इतक्यात त्याना बाहेर हालचाल जाणवली. . त्यांनी कुटी दालनातील गवाक्षातून पाहिले की काही गुप्त पेहराव केलेल्या व्यक्ती शस्त्रे घेऊन आचार्य वृषभ यांच्या कुटिकडे जात आहेत. ते त्रिशलेने पाहिले. तिने अंबालेस संकेत दिला. तिने पाहिले. आता आपली योजना फसते की काय असे वाटले.

क्रमशः पुढे.....


अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...