Friday, February 24, 2023

अंबाला भाग २०

 अंबाला भाग २०



आचार्य यांचा आश्रम विशाल व खूप मोठा होता. निसर्गरम्य अशा सह्याद्री पर्वत श्रृंखलेत असल्याने त्या परिसरात अजस्त्र अशी वनसंपदा होती. महारुद्र तेथील अरण्यातून वेगवेगळी फळं गोळा करून आणून देऊन तो सर्वांच्या भोजनाची तयारी करत असे. तो हळूहळू त्यांच्या वेगवेगळ्या कला पाहून त्याचे अनुकरणाने वेगवेगळ्या कला शिकला.

आचार्य यांची देखील तो सेवा करीत असे. आचार्य यांनी त्यास स्वसंरक्षण व वाचन लेखन करण्यास शिकवले. त्यामुळे त्यास अश्मक व कुंतल प्रदेश तसेच अपरांत देशातील भाषांचा वापर करणे त्यास जमू लागले. तो एक भिल्ल असलेने त्याने आश्रमातील साधूंनाही बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणेस शिकवले. ज्याने एखादे प्रदेशात भिक्षा न मिळाल्यास भिक्षू अशा तऱ्हेच्या वस्तू बनवून विकतील व उदरनिर्वाह करतील.

 दिवस सरू लागले. महारुद्र गुरू परवानगीने आपल्या माता पित्यास भेटनेस जात असे. आता सहा वर्ष झाली त्यास या आश्रमात येऊन. त्याने तिथे बरेच विद्यार्जन केले. त्याचा स्वभाव ओळखून आचार्यांनी त्यास राज्यशास्त्र, व इतर सर्व ज्ञान दिले. ज्याने तो एक कुशल वीर म्हणून तयार झाला.

सहा वर्षात त्याने बारा वर्ष घ्यायचे ज्ञान ग्रहण केले. विद्यार्जन झाल्यावर आचार्यांनी त्यास रीतसर निरोप दिला. त्या बरोबर आपल्या काही शिष्यांना देखील निरोप दिला. मेघदूत आचार्यांच्या सांगण्याने ते धम्म प्रचारार्थ निघून गेले. महारुद्राने गो दान करून आचार्य यांचा निरोप घेतला. निरोप घेताना आपण शिकवलेल्या विद्येचा दुरुपयोग वा कुणा निर्दोष व्यक्तीस त्रास न देण्याचे वचन त्यांनी घेतले.

तेथून निरोप घेतल्यावर महारुद्रास ती कृष्णवर्णी कन्या आठवली. तो तिच्या शोधार्थ पून्हा त्या महादेव नगरात गेला. तेथे त्याने सर्वत्र शोध घेतला. पण ती त्यास दिसली नाही. शेवटी निराश होऊन तो परतला. व थेट दक्षिण कुंतल प्रदेशातील आपल्या गावच्या दिशेने मार्गस्थ झाला. वाटेत एका नगरात थांबून तिथे काही रोजगार करून त्याने काही द्रव्य मिळवले. तद नंतर त्याने तेथील लोहाराकडून एक सुंदर तलवार बनवली. तसेच काही शस्त्रे ही बनवली. नंतर तो आपल्या वस्ती वर आला. त्याने तिथे येताना आपल्या भिल्ल लोकांना सुधारून त्यांचा विकास करायचे ठरवले.

महारुद्र आता खूप मोठा झाला होता. तारुण्याची लक्षणे त्यात दिसू लागली होती. नियमित व्यायामाने त्याने आपले शरीर कसोशीने तयार केले. आता तो सुंदर गौरवर्णी रंगाचा देखणा तरुण पाहून सर्व त्याकडे पहात असतं. भिल्लम व सिंघणेस अभिमान वाटे. व त्यांना आपल्या कष्टाचे चीज झाल्या सारखे वाटे. त्याने अनेक भिल्ल तरुणांना एकत्र करून त्याने त्यांना शस्त्र ज्ञान दिले. व आपली वस्ती ही सुधारली. तसेच अनेक भिल्ल कुमारांना स्वावलंबी केले. त्यामुळे भिल्लांची प्रगती झाली.

पण सदर काळात महाराज जयवर्धन यांच्या राज्यावर परचक्र चालून आले होते.

…… ……. ……. ……. ….. ….. …… ……

महाराज जयवर्धन यांचा राजपाट चांगला चालला होता. त्यांच्या राज्यास अश्मक खोऱ्यातील बंडखोरीने ग्रासले होते. उत्तर सीमेवरून होणाऱ्या हल्ल्यांनी राज्याचा हा परिसर अशांत असे. उत्तर सीमेवरील राजे नेहमी कुरघोडी करत. महाराज जयवर्धन आपल्या प्रजेची काळजी मुलांप्रमाणे घेत असत. त्यांनी केलेली सुधारणा तसेच राज्यमार्ग यातायात व कृषी क्षेत्रातील प्रगती याने राज्याची भरभराट झाली होती. त्यामुळे कुंतल प्रदेशाची ख्याती सर्वदूर पसरली होती. त्यामुळे परराज्यातील लोक तिथे येऊन वास्तव्य करू लागले होते. विस्तृत नगरे, नगरांची व्यवस्था, व्यापारी क्षेत्रात झालेली प्रगती पाहून अन्य राज्यांचा जळफळाट होत असे. शत्रूचे हेर राज्यातून फिरत असतं. त्यांच्या कारवायांमुळे राज्याच्या उत्तर प्रांती नेहमी कोणते ना कोणते संकट येत असे. महाराज जयवर्धन यांनी अनेक बंडखोरांना शासन केले होते. पण काहीना काही घडे. प्रधान वेददत्त राजपाटात मदत करत असत. राजकुमारी ही आता तरुण झाली होती. ती त्या गुप्त मार्गे राजमहाला बाहेर जात असे. पण आता राज्यातील अशांतता निर्माण झाल्यामुळे महाराजांनी सर्वत्र कड्क व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे गुप्त मार्गावर ही पहारा ठेवला. त्यामुळे राजकुमारीच्या सर्व योजनांवर निर्बंध आले होते. राजकुमारी रूप पालटून गुप्त मार्गे जाते हे महाराणी अरुणावती यांच्या पट्ट दासीने हेरले होते. तिने ही गुप्त वार्ता राणीच्या कानावर घातली होती.

महाराणी अरुणावती एके दिवशी महालातील मुख्य दालनात बसल्या होत्या. अनेक दासी त्यांच्या सेवेत होत्या. इतक्यात दुश्यला त्यांच्या समोर आली. व त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन,

दुशला, “ महाराणींचा जयजयकार असो.”

महाराणी अरुणावती, “ बोल दुशले काय वार्ता आहे.”

दुश्यला, “ महाराणी मी एक विशेष वार्ता सांगणार आहे. तरी….”

महाराणी अरूणावती, “ एकांत..”

इतर सेवक व दासी कक्षा बाहेर जातात. महाराणी व दुश्यला दोघीच तिथे त्या दालनात असताना…

दुश्यला त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजत ते ऐकूण महाराणी,

“ मला वाटलेच होते. की राजकुमारी काही ना काही आगळीक खोड्या करतेय. आजपासून त्या ठिकाणी कडक पहारा ठेवा. व मध्यरात्री गुप्त भुयारी मार्ग दुसऱ्या मार्गे बंद करावा. मुजवून द्यावा. त्या परिसरातत गुप्त पहारा ठेवावा.”

महाराणीच्या सांगण्यानुसार त्या दिवशी दुश्यलाने दोन खात्रीचे सैनिक घेऊन तो गुप्त मार्ग जंगलाच्या वाटे मुजवला. व जंगल वाटेवर पहारा बसवला. व ही वार्ता येऊन महाराणींना सांगितली. बातमी ऐकूण महाराणी निश्चिंतत झाली.

गुप्त मार्गावर पहारा बसताच राजकुमारीस हि वार्ता समजली. तिला राग आला. ती थेट महाराणीच्या कक्षात आली. तेथे आल्यावर चिडलेली अंबाला, “एकांत…..”

सर्व दासी व सेवक तिथून बाहेर जातात. ते गेल्यावर

अंबाला, “ आई साहेब आपण गुप्त मार्गावर पहारा का ठेवलात.”

महाराणी अरुणावती, “ महालाच्या व आपल्या सुरक्षेसाठी.”

अंबाला, “ मी आता मोठी झालेली आहे. मी स्वतःच संरक्षण करू शकते.”

अरूणावती, “ थोडीशी विद्या ग्रहण केलं की जास्त आपल्याला कळतं अस नाही.”

अंबाला, “ याचा अर्थ…”

अरुणावती, “ बुद्धिवान लोकांना स्पष्टीकरण द्यावे लागत नाही.”

अंबाला, “ याचा अर्थ तुम्ही आम्हास बुद्धिहीन समजता तर.”

अरुणावती, “ हो. जर आपण सुज्ञ असता तर असे गुप्त मार्गे ये जा करून महालाची सुरक्षा धोक्यात नसती आणली असती.”

अंबाला, “ या बद्दल माफी असावी. पण…”

आरुणावतीं, “ पण वगैरे काही नाही. आपल्या काळजीस्तव आम्ही तो निर्णय घेतला आहे. उत्तर सीमेवर शत्रू डेरा टाकून आहे. राज्य सुरक्षेसाठी महाराज गुंतलेत. अन् तुम्ही तुमच्या या तारुण्य सुलभ गौण विचारातून बाहेर या. व पाहा. उद्यापासून शिपायांच्या देखरेखीत राज्याचा हालहवाला पाहून घ्या. आपणास नगरात प्रकट फिरण्याची मुभा देण्यात येईल. पण काळजी घ्या.”

महाराणींचे बोलणे ऐकताच ती चिडून अंतपुरात आपल्या दालनात गेली. नंतर महाराणीनी तिची तिथे जाऊन समजूत काढली.

……. ……. .. .. …….. …… ….

क्रमशः पुढे……


अंबाला भाग १९

 अंबाला भाग १९



क्रमशः पुढे चालू.....

तेव्हा महारुद्र त्यास म्हणाला, “मी देखील त्या व्याघ्रास ठार मारले नाही. त्यास बेशुद्ध केले.”

अशा प्रकारे गप्पा मारत ते बसले. तेवढ्यात महारुद्राच्या मनात विचारांचे काहूर उठल. व त्यास आपण युद्धकलेत तरबेज व्हायचे आहे हे जाणवले. तो त्या साधुस म्हणाला, “ हे महाराज मला आपल्या पंथाकडून शस्त्रज्ञान प्राप्त होईल का?”

साधू, “ हे सर्व आमच्या भिक्षुकांच्या आचार्यांवर अवलंबून आहे.”

तेव्हा भिल्लम म्हणाला, “ आपण तेवढी कृपा करून या मुलास विद्या दान द्यालल का?”

साधू, “ ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहीन. जर का आचार्यांनी मान्य केले तर ठीक. अन्यथा मी यास परत पाठवून देईन.”

थोड्या वेळाने ते तिथून उठले. व पुढे मार्गस्थ झाले. पुढे काही कोस चालल्यावर तेथे एका तिकटीवर ते आले. भिल्लम व त्याच्या सहकाऱ्यांनी दक्षिण दिशेस प्रयाण केले. व महारुद्र आपल्या माणसांचा व पित्याचा निरोप व आशीर्वाद घेऊन त्या भिक्षुरुपी साधूच्या मागे चालू लागला. ते पुढे पूर्व दिशेस निघाले. मजल दर मजल करत ते पुढे एक टेकडी पार करून पुढे एका ग्रामी आले. तिथे आल्यावर सांज झाली. तिथे एका मंदिरात असणाऱ्या ओवरीत त्यांनी आश्रय घेतला. त्या दिवशी रात्री त्यांनी तेथील लोकांकडून भिक्षा मागून आणलेल्या सिध्यातून अन्न शिजवून घेतले. व ते खाल्ले. त्या रात्री ते ग्रामातील लोकांचा देवविधी कार्यक्रम असलेने तिथे कथा सांगितली जाणार होती. सदर ठिकाणी एक श्वेतवस्त्र परिधान केलेला ब्राह्मण कुमार ज्याच्या हाती वीणा नावाचे वाद्य होते. त्याने जय नामक हिंदू धर्म ग्रंथातील तत्वज्ञान सांगितले. तसेच एकलव्य व गुरू द्रोण यांची कथा पण सांगितली. ते त्यांनी श्रवण केली. दोन प्रहरानंतर समारोप झाला. तदनंतर ते तिथे झोपी गेले. प्रातकाली महारुद्र उठला. व त्याने त्या साधूस उठवले. तदनंतर तेथील जवळील विहिरीवर त्यांनी जाऊन स्नान केले. नंतर मंदिर परिसरातील लोकांच्या घरून आणलेली भिक्षा ग्रहण करून त्यांनी पुढे प्रस्थान केले. आता महारुद्र व त्या साधू मध्ये चांगलीच जवळीक निर्माण झाली होती. ते दोघे पुढे मजल दरमजल करत आश्रमात पोहोचले. तेथील निसर्गरम्य असे वातावरण होते. सुंदर उपयुक्त अशा औषधी व फळा फुलांच्या वनसंपदेचे नटलेले ते ठिकाण पाहून महारुद्रास बरे वाटले. तिथे गेल्यावर महारुद्राचा परिचय त्या साधूने अचार्यांशी करून दिला. व येण्याचे त्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा आचार्य महारुद्राकडे पाहत बोलले.

 आचार्य मेघदूत, “ हा काही भिक्षू नाही. सदर विद्या ही फक्त बुध्द धर्मीय साधूस दिली जाते. जे चारिका करत धम्म प्रचारार्थ परदेस गमन करतात. व हा तर एक भिल्ल आहे. जो निरपराध पशू पक्षी यांची शिकार करत फिरतो. हा जर घर संसार त्यागून बुध्द धर्म अनुयायी होत असेल. व धम्म प्रचारार्थ दीक्षा घेत असेल. व त्यानंतर अर्धे तप तो सेवा रूपे इथे घालवत असेल तर त्यास ही विद्या दिली जाऊ शकते.”

आचार्यांचे बोल ऐकूण महारुद्रला खूप वाईट वाटले. कारण संसार त्याग करून म्हणजे आपल्या माता पित्याचा त्याग करणे होय. व तो एकमेव भिल्लम व सिंगनेचा मुलगा होता. त्या कारणे त्याने त्यास विरोध दर्शवला. तेव्हा तो निरोप घेऊन जाऊ लागला. साधू त्याची विनवणी करू लागला. तेव्हा आचार्यांनीनी त्यास विचारले. की तो संसार का त्यागून भिक्कू होत नाही.

 तेव्हा त्याने आपली सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा आचार्य मेघदूत यांनी त्याला विद्या ज्ञान देण्याचे ठरवले. मात्र त्याकडून वचन ही घेतले. की सदर विद्या तो कुणा निर्दोष व्यक्तीवर उपयोग करणार नाही. यासंबंधी वचन घेतले. व त्यास राहण्याची परवानगी दिली. अल्पावधीतच महारुद्राने आपल्या वर्तनातून व कार्यातून सर्वांचे मन जिंकले.

क्रमशः पुढे......



अंबाला भाग १८

 अंबाला भाग १८



क्रमशः पुढे चालू.....

त्याने त्यांकडे पाहिले. व तो त्यांस म्हणाला, “ शांततेनं पाहा की उगाच कशाला बोलत बसलाय.”

त्याचे हे बोलणे ऐकून त्या दोघींनी त्याकडे कठोर नयन कटाक्ष टाकला. त्याने त्या दोघींकडे पाहिले. तो घाबरला. कारण कोणत्याही स्त्रीने त्याकडे अशा नजरेने पाहिले नव्हते. तो घाबरलेला पाहून अंबालेस व त्रिशलेस हसू आले. त्याची ती अवस्था पाहून अंबाला हसू लागली. तिचे हसताना त्या काळ्या रंगात ही सौंदर्य खुलून दिसत होते. महारुद्राने अनेक स्त्रिया पहिल्या होत्या. पण त्या रात्री तेथे असणाऱ्या दिवटीच्या प्रकाशात खुलणारे ते सौंदर्य हे काही निराळेच होते. आपण तिच्यापेक्षा रंगात उजळ असलो तरी ती एक सुंदरतेची मूर्तीच आहे असे त्यास जाणवत होते. तिला सारखे पहात रहावे अशी अभिलाषा त्याच्या मनात जागृत झाली. व तो तेथून मागील बाजूस जाऊन बसला. व तीस न्याहाळू लागला. तिच्याकडे पाहण्यासाठी एक अदृश्य शक्ती त्यास खेचत होती. नृत्य पहात पहात तो तीस पहात होता.

आपणास एक अपरिचित दृष्टी न्याहाळत आहे हे अंबालेस जाणवले. पण तिला आता तिथे शांत राहावे लागणार होते. त्रिशलेच्या नजरेत महारुद्र अंबालास न्याहाळत आहे हे लक्षात आले. ग्रहणात जसे एक ग्रह दुसऱ्याच्या आड यावा. तसे त्रिशला त्या दोघांमध्ये उभा राहिली. महारुद्रला जाणवले की त्या दोघींनी त्यास पाहताना पाहिले आहे. त्याने आपली नजर नृत्य पहाण्याकडे वळवली. पण तो अधून मधून पाहत असे. थोड्या वेळाने त्रिशला अंबालेस खूणवून चलनेस सांगू लागली. अंबाला व त्रिशला तेथून उठल्या. व निघाल्या. थोड्याच समयात त्या गर्दीत दिसेनास्या झाल्या. थोड्याच वेळात त्या तेथून लपत छपत राजमहालाकडे जाणाऱ्या त्या गुप्त मार्गाकडे रवाना झाल्या. काही वेळातच त्या अरण्यातील गुप्त मार्गाजवळ आल्या

व त्या दोघींनी भुयारात प्रवेश केला. त्यांनी दिवटी लावली. व त्या महलाकडे गेल्या. व पुन्हा महालात येऊन त्यांनी मार्ग बंद केला. महालात आल्यावर राजकुमारीने सौंदर्य प्रसाधने लावून स्नान केले. व त्या दोघी झोपी गेल्या.

इकडे महारुद्राची नजर त्या अनोळखी मुलीला शोधत राहिली. पाहता पाहता रात्र सरली. नृत्याचा कार्यक्रम सरला. व दुसऱ्या दिवशी उत्सवाचा समारोप झाला. सर्व यात्रेकरू आपापल्या ग्रामी निघाले. भिल्लम व त्याचे सहकारी ग्रामस्थ आपल्या ग्रामी जाण्यासाठी सामानाची आवराआवर करू लागले. महारुद्र मात्र ती कृष्ण कांती असणारी कन्या कुठे दिसते का ते पाहू लागला. पण ती त्यास दृष्टीस पडली नाही.

सर्व भिल्लांसमवेत आता भिल्लम आपल्या प्रदेशाकडे मार्गस्थ झाला. वाटेतील तटिनीवर स्नान करून ते पुढे निघाले. मजल दर मजल करत ते अप्रांत देशाच्या बाजूने आपल्या देशी जाणार होते. कारण त्या कारणे त्याना नावीन्यपूर्ण निसर्ग पहावयास मिळणार होता. अनेक जंगले , नद्या पार करत ते पुढे मार्गस्थ झाली. वाटेत सुरक्षित ठिकाणी विश्रांती करत ती मार्गक्रमण करू लागली. काही अंतर गेल्यावर मध्य कुंतल प्रदेशातून जाताना त्याना एका वाटसरूची किंकाळी ऐकू आली. तसे सर्व  दचकले. त्यांनी पाहिले एक व्याघ्र एका भगवी वस्त्रे घातलेल्या एका वाटसरूवर एक व्याघ्र हल्ला करत आहे. त्याने त्याच्या पायाचा लचका तोडला आहे. व तो एका झाडावर जखमी अवस्थेत चढलेला होता. व तो व्याघ्र त्यास त्या वृक्षाखाली थांबून पकडण्यासाठी प्रयत्न करत होता.

महारुद्राने क्षणाचा विलंब न करता आपल्या पाठीवरील भात्यातील एक शर काढला. व अचूक नेम धरून शर सोडला. वायु वेगाने तो शर निघाला. पाहता पाहता तो शर त्या व्याघ्रास लागला. व तो तिथे बेशुद्ध पडला. ते सर्व तिथे गेले.  तो साधू खाली उतरला. त्याच्या पायातून रक्त ओघळत होते. त्यास सर्वांनी सावरले. थोडे पाणी दिले. तदनंतर भिल्लमाने आपल्या जवळील औषधी त्याच्या जखमेवर लावली. नंतर त्यास ते धीर देवू लागले. या सर्व घटनेत तो इतका घाबरला की त्याने आपल्या चिवरात लघुशंका केली. त्यास आधार देत त्यांनी उठवले. ती सर्वजण त्यास घेऊन बाजूस चालत चालत गेलीत.  त्यास आधार देत ते पुढे निघाले. काही अंतर चालल्या नंतर एका ग्रामाची हद्द लागली. काही घरे दिसू लागली. सुरक्षित अरण्य त्यांनी पार केले होते. ते ग्राम एका वेतांच्या बेटांनी वेढलेले होते. वाटेत एका वळणावर तेथील एका विहिरी शेजारील एका आम्रवृक्षाखाली ती विसावलीत. थोडा वेळ विसावा घेतल्याने त्यास बरे वाटू लागले. भिल्लानीं वाटेत गोळा केलेली फळे त्यांनी तेथे बसून खाल्ली.

भिल्लमाने त्याला विचारले, “महाशय नमस्कार आपण कोण आहात व त्या निबीड अरण्यात कशासाठी गेला होतात.”

साधू, “ मी अपरांत देशाचा रहिवासी असून मी बुद्ध धर्म प्रसारक आहे. आमच्या पंथाचे असंख्य अनुयायी असून बोधिसत्व विचारांचा प्रसार करणे हे आमचे कार्य आहे. मी हल्ली या धर्मात नवीनच रुजू झाल्याने मला शस्त्र विद्येचे ज्ञान नाही. म्हणून मी त्या व्याघ्र हल्यापासून आपले संरक्षण करू शकलो नाही. मी यामध्ये नवीनच असल्याने कुंतल आपरांत राज्य सीमेवर असणाऱ्या मठात शस्त्र व शास्त्र विद्या घेण्यासाठी तिकडे जात असता. हा विदारक प्रसंग मजवर घडला.”

तेव्हा भिल्लम म्हणाला,  “ पण आपण साधू पुरुष असताना आपणास शस्त्र विद्येची आवश्यकता का असते.”

साधू, “ आताच आपण पाहिलेल्या घटनेनुसार मजवर व्याघ्र हल्ला झाला. अशा प्रकारे आम्ही साधू धर्म प्रचारात वेगवेगळ्या प्रांती चारिका करत जात असतो.  वाटेत अनेक ठिकाणी वाटमाऱ्या होत असतात. त्यापासून संरक्षण करण्यासाठी आपणास ही विद्या शिकविली जाते. यामध्ये आपण प्रतिस्पर्धी योध्यास कोणतीही इजा न करता त्याची शुद्धा हरपवणे इतकेच कौशल्य शिकवले जाते.  तसेच अती हिंस्र जीव जेव्हा अस्तीत्व हिरावून  घेऊ लागल्यास त्यास नष्ट कसे करावे  हे देखील शिकवले जाते.  या कौशल्याने  आम्ही हिंसा न करता आपल्याला पुढील मार्गी जाणे सुकर होते. मघाशी त्या व्याघ्रास मला बेशुद्ध करावयाचे होते. पण त्याचा तो अचानक हल्ला त्यामुळे सावध होण्यास वेळच मिळाला नाही.

क्रमशः पुढे.......



Friday, February 17, 2023

अंबाला भाग १७

 अंबाला भाग १७



क्रमशः पुढे चालू......

महारुद्र आता चांगलाच मोठा झाला होता. तो धनुर्विद्येत निष्णात झाला होता. परंतु त्यास आपल्यात काहीतरी कमीपणा जाणवत होता. त्याला तो भयानक प्रसंग आठवला की त्याच्या अंगावर काटा येई. व डोळ्यात अंगारे फुलत असत. अन् मन बदला घेण्यासाठी पेटून उठत होते. त्यासाठी तो सराव करत असे. आता तो खूप मोठा झाला होता. रानात जाणे, वेगवेगळी औषधे जमवणे, शेत कामात मदत करणे , तसेच नगरात जाणे, अशा प्रकारे तो सर्व व्यवहार करू लागला.

उत्तर कुंतलात राजधानी पासून जवळ असणाऱ्या महादेव मंदिरात दरवेळी एक मोठा उत्सव भरत असे. प्रांता प्रांतातून अनेक शैवपंथी लोक येत असत. अनेक भगवाधारी लोकांची तर जत्राच उतरे. मोठा महाशिवरात्रीचा उत्सव तेथे भरत असे. भिल्लमाने देखील महारुद्रास शिवदर्शनास घेऊन जायचे ठरवले. तो आपल्या वस्तीवरील भिल्ल बांधवांना घेऊन महादेव दर्शनास निघाला. पायी मजल दरमजल करत प्रवासात कुठे निवारा भेटेल तिथे थांबत. तसेच धर्मशाळेत थांबत ती पुढे चालली. पुढे त्यांना कुंतल प्रदेशातील एक विशाल तटिनी किनारी आली. महादेवाचे तीर्थक्षेत्र जवळीच एका नगरात होते. त्या सर्वांनी वाटेत त्या नदीकिनारी आल्यावर स्नान केले. तेथे अनेक प्रांतातून साधूंचे जथ्थे आलेले होते. महादेव नगरकडे त्यांच्या व लोकांच्या अनेक रांगा लागल्या होत्या.

भिल्लम व त्याच्या सहकाऱ्यांनी नदीत स्नान संध्या करून ते नदीपार आले. जंगल वाटेने पुढे मुख्य मार्गावर आले. तो मार्ग महादेव मंदिर असणाऱ्या नगराकडे जात होता. उत्सवामुळे अनेक लोकांची यातायात होती. पुढे ते थोड्या वेळातच नगरात पोहोचले. हिरव्या गर्द झाडीत असलेल्या नगरात पुष्कळ लोकांची गर्दी जमली होती. वाद्ये वाजत होती. अनेक स्त्री पुरुष साजशृंगार करून महादेव दर्शनास आली होती. पेठेमध्ये अनेक दुकाने सजली होती. जवळच मंदिरास लागून असलेल्या सदावर्तेत भोजन व्यवस्था केली होती. महाराजांनी दर्शन घेतल्यानंतर यात्रेस जोर चढत असे. तोपर्यंत इतरांना दर्शनास मज्जाव होता. महाराज प्रभातीच दर्शन घेऊन राजधानीस गेले होते. त्यामूळे इतर लोकांची दर्शनास रांग लागली होती. भिल्लमाने महारुद्र व आपल्या सहकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले. व तो पेठेमध्ये आला. महारुद्र खूप आनंदात होता. कारण त्याने यापूर्वी कुंतल प्रदेशातील दक्षिण भगातील गर्द झाडी शिवाय काही जास्त पाहिले नव्हते. आज त्यास उत्सवामुळे खूप काही पाहायला मिळाले होते. उत्सवात फिरून दिवसभर त्याने उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला व संध्याकाळी तो आपले वडील व वस्तीवरील लोक जिथे थांबले होते तिथे आला. भिल्लमास त्याची काळजी वाटत होती.त्या दिवशी त्यांनी अन्नछत्रात जेवण केलं. व रात्री धर्मशाळेत विश्रांती करायचे ठरवले. पण तेथे खूप गर्दी असल्याने त्यांनी बाहेर पाल मारून राहणे पसंत केले. त्या रात्री मंदिर प्रांगणात चौकावर नृत्य कार्यक्रम असल्याने ती रात्र त्यांची तो पाहण्यात जाणार होती. अनेक लोक तो कार्यक्रम पाहण्यात घालवणार होते. रात्र झाली. सर्वांनी जेवण केले. सर्व जण तेथे आले. तेथे मंचकावर यक्षिणी हजर झाल्या. सैनिकांच्या पहार्यार्त नृत्याचा व गायनाचा कार्यक्रम सुरू झाला. यामधे प्रथम गणेश वंदन, तदनंतर शिवलीला, तद नंतर भिलिनीची कथा नृत्यातून सांगण्यात येत होती. भिल्ल थोड्या अंतरावर बसले होते. महारुद्र बाजूला आपल्या वर्गातील मुलांत बसून नृत्य पहात होता. नृत्याचा आनंद अनुभवत होता.

महाराज जयवर्धन दुसऱ्या दिवशी पूर्व प्रांतातील बंडखोरांना शासन करण्यास जाणार असल्याने ते नृत्य महोत्सवास जाणार नव्हते. यासाठी महाराणी अरुणावती कार्यक्रमास हजर राहणार होत्या. सुरक्षा कारणास्तव महारानींनी तिथे महोत्सवात राजकुमारी अंबालेस नेले जाणार नव्हते. कारण राज्यातील व राज्याबाहेरील अनेक लोक तिथे आलेले होते. त्यात एखाद्या शत्रू राज्यातील हेर ही असू शकतो. या कारणे अंबालेस मज्जाव केला होता. त्यामुळे यक्षिणी नृत्य पाहण्याच्या आंनादावर विरजण पडले होते. राजकुमारी आपल्या महालात तळमळू लागली. तिची ही तळमळ त्रिशलेस दिसत होती. पण तिचा नाईलाज होता. कारण महलाबाहेर व तेथे शिव मंदिर नगरात ही कडक पहारा होता.

राजकुमारी अंबालेने तरीदेखील तिथे जायचे ठरवले. त्यासाठी धाडस करायचे त्रिशलेने ठरवले. .

राजप्रासादातील आपल्या कक्षातील दिवे राजकुमारीने मालवले. व आपल्या दास्यांना तिने कक्षाबाहेर घालवले. व प्रात. सूर्योदयापर्यंत कोणीही कक्षात यायचे नाही व तिने त्याना बाहेर घालवले. थोडा वेळ झोपेचे नाटक केले. नंतर त्या दोघींनी सर्वत्र सामसूम झाल्याचे पाहिले. व त्या स्नानगृहात आल्या. तेथील चुलीवरील भांड्यांची कालिक त्रिशलेने काढली व ती अंबालेच्या हातापायावर लावली. ते पाहून राजकुमारी म्हणाली, “ त्रिशले याची काही आवश्यकता आहे का?”

त्रिशला, “ होय, कारण आज तेथे सक्त पहारा आहे. व तुला पहारेकरी सहज ओळखतील तेव्हा…”

अंबाला, “ पण या कालिकेने माझे सौंदर्य बिघडेल त्याचे काय. मजकडे कोणी पाहणार देखील नाही.”

त्रिशला, “ तुला या रंगात जो कोणी पसंत करेल तोच तुझा राजकुमार समज. नाहीतर गोरी कातडी पाहिल्यावर अनेकजन भाळतात. खर प्रेम तुला या रंगातच भेटेल. यातच कोणतरी पसंत करेल तुला.”

राज कुमारी अंबाला, “ पण आज रात्री अंधारात कोण पाहिलं. व आपण तर यक्षिणी गान पाहणार आहोत.”

त्रिशला, “ राजमहालात अनेक ललना नृत्य करणाऱ्या असताना तुम्हास तिकडे का जावे वाटते.”

अंबाला, “ इथे सर्व नतमस्तक असतात. बाहेर सर्व खुले असते. त्यातील कौतुक काही औरच असते.”

त्रिशला राजकुमारीच्या अंगावर कालिक लावते. व त्या दोघी नेहमीप्रमाणे त्या गुप्त मार्गातून बाहेर पडून त्या नगरात गेल्या. मंदिर प्रांगणात शिपायांची नजर चुकवून त्या एका छोट्या आळीतून तेथे गेल्या. तेथे कोठे जागा भेटते क ते पाहू लागल्या. राजकुमारीच्या कृष्ण कांतीमुळे कोणीही जवळ बसन्यास जागा देईना. शेवटी त्या एका बाजूस जाऊन बसल्या. व नृत्य पाहू लागल्या. नृत्याचा आनंद घेऊ लागल्या. नृत्य करणारी नर्तिका यक्षिणी असलेने तिचे नृत्य कधीही महालात होत नसे. ती देवसेवेशी संबंधित होती. अशा अनेक यक्षिणी राज्यातील तेथील अनेक ग्रामात असत. त्या देवी नृत्य सादर करत. देवसेवा करत. त्यांचे नृत्य हे रजनर्तिकींपेक्षा सरस असे. अंबाला शेजारी अनेक निमवर्गातील स्त्रिया बसल्या होत्या. नृत्य पाहताना एक खांबनी अडवी येत होती. त्या कारणे नृत्य पहाण्यात व्यत्यय येत होता. अंबाला तेथून उठली व मागे गेली. तिथे एका कट्यावर छोटीशी जागा होती. तिथे जाऊन बसली. व नृत्याचा आनंद घेऊ लागली. थोड्या वेळाने तिच्या जवळ त्रिशला आली. व दोघी यक्षिणी गान ऐकू लागल्या. तीन प्रहर होताच घंटा नाद झाला. त्रिशला तिला चलण्यास खुणावू लागली. पण अंबाला ऐकेना. त्या दोघींची खुसर फुसर एकूण तिथे जवळच मुलात बसलेल्या महारुद्रास कार्यक्रम पहाताना त्रास होऊ लागला.

क्रमशः पुढे,....


अंबाला भाग १६

 अंबाला भाग १६



एके दिवशी नगरातून फिरत असताना राजकुमारी अंबालेस एका ठिकाणी दोन गडगंज असे पहिलवानासारखे धिप्पाड देहाची दोन माणसे एका अबला स्त्रीस बडवत वेशा व्यवसाय करणेसाठी घेऊन जात होते. तेव्हा आंबालेने त्यास पाहिले. व जवळून जाणाऱ्या पांथस्थाकडे चौकशी केली असता तो त्यांना म्हणाला, “ सदरहू स्त्री ही एका शेतमजूराची असून त्याने विवाहासाठी काढलेले रीन फेडले नाही. याकारणे रिन देणाऱ्या इसमाने आपले दोन गावगुंड पाठवून दिले. व ते त्याच्या पत्नीस ओढुन घेऊन निघालेत या नगरा बाहेरील गणिका म्हणजे वेश्या वस्तीत त्या स्त्रीस त्यांनी विकले. आहे व त्यासाठी तिला ते घेऊन जात आहेत.

आंबालेस हे समजताच तिला या गोष्टीचा खूप राग आला. व राज्यातील चाललेला गदारोळ व रयतेचे दुःख तिच्या लक्षात आले. सदर स्त्रीस सोडवणे हेच प्रयोजन मनात धरून ती त्यांच्या मागोमाग. निघाली. पेठेतील अनेक लोक तिच्याकडे दयाळू नजरेने पाहत होती. त्या स्त्रीस सोडवणेसाठी ती पाठोपाठ निघाली. तेवढ्यात तिचा हात धरुन त्रिशलेने थांबवले. व ती म्हणाली, “ आपणास त्यांना अडवने शक्य नाही. व आपण इथे जास्त काही हालचाल करू शकत नाही. जर काही आगळीक केली तर असे पितळ उघड होईल. तेव्हा शांतपणे राहणे योग्य.”

अंबाला मात्र त्या स्त्रीस सोडणुकीसाठी धडपडत होती. तिची तीव्र इच्छा झाली होती. तिने त्रिशलाचा हात झटकला व त्या दोन पहिलवाना पाठोपाठ ती जाऊ लागली. ते त्या स्त्रीस मारत झोडत घेऊन चालले होती. त्याने त्या स्त्रीचे अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. तिच्या अंगावरील वस्त्रे जागोजागी फाटलेली होती. पेठेच्या शेवटी गवळीवाडा लागत असे. गवळी वाड्यातून पुढे गेल्यावर वेशावस्ती लागत असे. सदर स्त्रीस ते गवळीवाड्याच्या अरुंद गल्लीतून घेऊन निघाले. अंबाला त्या स्त्रीस सोडवू इच्छित होती. पण तिला काय करावे सुचेना. तेव्हा तिने पाहिले की गवळीवाड्यात एका ठिकाणी एक पोळ एका खूंटिस बांधला होता. जो सारखे आपले दावे सुटावे म्हणून तडफडत होता. अंबालेने धाडसाने नजर चुकवून कमरेची कट्यार घेऊन त्या पोळाचा दोर कापला. दावे कापताच तो पोळ त्या अरुंद वाटेने धावू लागला. गवळी वाड्यात जोराचा गलका झाला. तो पोळ थेट त्या स्त्रीला ओढत नेणाऱ्या त्या दोन पहिलवानांच्या दिशेने निघाला. वाटेत येणारे सर्वजन इकडे तिकडे धावू लागले. पाठीमागे चाललेला कल्लोळ पाहून त्या दोन पहिलवानांनी मागे पाहिले. इतक्यात तो पोळ त्यांजवळ आला. त्याला पाहून त्यांनी त्या स्त्रीस सोडले. व ते धावू लागले. त्या पोळाने त्या दोघांना चांगलेच गवळीवाड्याच्या शेवट पर्यंत पळवले. या परिस्थितीचा फायदा त्या स्त्रीने उचलला. व ती धावू लागली. पुढे पेठेत आल्यावर तिला त्रिशलेने थांबवले. व तिचा हात धरून तिने तीस नदीकडे नेले. वाटेत अंबाला त्यांना येऊन भेटली. त्यांनी तिची विचारपूस केली. व तिचे ऋण विचारले. तिने सांगितलेल्या द्रव्या इतके शिक्के तिला दिले. व तिचे कौशल्या विचारले. ती स्त्री सुंदर बांबूच्या वस्तू बनवत होती. तेव्हा तिच्या व्यवसायासाठी तिने आणखी काही सिक्के दिले. व त्रिशलेस सोबत पाठवून ऋण फेडून तिची व्यवस्था लावणेस सांगितले. व ती पुढे अरण्याकडे गेली. त्रिशला ते काम करून अरण्यात अंबाला जिथे थांबली होती तिथे आली. नंतर त्यांनी इकडील तिकडील अंदाज घेतला. व त्या गुप्त मार्गात शिरल्या. व महालात आल्या. अंबाला व त्रिशला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा नगरात त्या मार्गाने वेशभूषा पालटून जात असत

….. ….. ….. ….. …..

क्रमशः पुढे....


Saturday, February 11, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग १५

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १५



असे बोलून त्या पुन्हा मागे फिरल्या व महालाच्या आतमध्ये आल्या. येताना तो गुप्त दरवाजा त्यांनी नीट बंद केला. गवाक्षाची जाळी नीट त्यांनी आत आल्यावर लावली. व दालनात आल्यावर आपापल्या जागी त्या निद्रिस्त झाल्या. आता त्या दोघींना दुसऱ्या मार्गाविषयी उत्सुकता लागली. त्याविषयी जाणण्याची जिज्ञासा जागृत झाली. त्या दोघी योग्य संधीची वाट पाहू लागल्या. व एके दिवशी तो योग चालून आला. त्या दोघींनी एके दिवशी रात्री त्या मार्गाने पुन्हा जाऊन त्या मार्गाचा शोध घेतला. त्यांना तो मार्ग नगराजवळील एका जंगलात निघत असल्याचे आढळले. तो राजधानी पासून जवळ असलेल्या एका नगरा जवळील जंगलात एका जाळीत निघत होता. तेथून थोड्याच अंतरावर राज्यातील एक छोटे नगर होते. ते एक धार्मिक नगर होते. तेथील पेठ लहान जरी असली तरी राजधानी पेक्षा मोठी उलाढाल तेथे होत होती. राजकुमारीला तो गुप्त मार्ग माहीत झाल्याने ती आता सहज राजमहालाबाहेर जाऊ शकत होती. ती आता योग्य संधीची वाट पाहू लागली.

महाराज जयवर्धन यांना राज्यातील राज्यव्यवस्था पाहण्यासाठी राज्यातील प्रत्येक नगराची भ्रमंती करावी लागे. त्यामुळे त्यांना राज्यातील प्रत्येक विभागाची पाहणी करावी लागे. त्यामुळे त्यांना वारंवार नगराबाहेर जावे लागे. तसेच प्रधनांना देखील जावे लागे. तेव्हा नगराचा व येथील राज्यकारभारात महाराणी अरूणावतींना लक्ष द्यावे लागे.

त्यावेळी राजकुमारी व महालातील कामकाजावरून महाराणी अरूणावती यांचे लक्ष लागत नसे. त्या वेळेचा फायदा घ्यायचे अंबाला ने ठरवले.

राज्याच्या उत्तर विभागातील व्यवस्था लावण्यासाठी महाराज जयवर्धन व प्रधान वेददत्त गेल्यामुळे कुंतल प्रदेश व नगर कारभाराची पाहण्याची जबाबदारी महाराणी अरुणावतींवर आली होती. त्यामुळे त्या राज्यव्यवस्था लावण्यात व्यस्त होत्या. या संधीचा फायदा घ्यायचे राजकुमारीनी ठरवले. राजकुमारीने आपल्या कक्षातील सर्व दासिणा आपल्या कक्षात न येण्याचा आदेश दिला. व गरज भासली तर त्रिशला आहे हे तिने स्पष्ट केले. त्यामुळे सर्व दासी तेथून निघून गेल्या. त्या गेल्याचे पाहताच राजकुमारी ने आपल्या शयन जागेवर काही लोड ठेवून झाकून दिले. व त्यावर शाल पांघरली. व त्रिशलेने आणलेली वस्त्रे तिने परीधान केली. व त्रिशलेनेही नवखा पेहराव केला. व त्या दोघी त्या गुप्त मार्गाने बाहेर पडल्या. तेथून बाहेर पडताच राजकुमारीला आपण मुक्त झालो आहोत असे वाटू लागले. राजकुमारी त्या अरण्यात बागडू लागली. तेथून त्या दोघी शेजारील त्या धार्मिक नगरात गेल्या. . कोणी ओळखू नये म्हणून राजकुमारीने आपल्या मुखावर रुमाल बांधून घेतला. त्या नगरात गेल्या. त्या पुढे नगरात प्रवेश करताना तिथे त्यांना एक कुंभार पेठ लागली. तेथून त्या निघाल्या. ग्रीष्म ऋतू असल्याने तेथे अनेक प्रकारची मडकी विक्रीस ठेवली होती. एका दुकानासमोर मडक्यांची मोठी उतरंड होती. तेथे एक काळसर पुरुष ज्याने श्वेत वस्त्र धारण केले होते. त्याच्या अंगावर उपरणे होते. ज्याच्या डोक्यास केसरी पागोटे होते. तो तेथील वृध्द कुंभाराशी हुज्जत घालत होता.

कुंभार,“ आपणास जर का मातीचे भांडे खराब लागले असेल तर बदलून देतो.”

तो इसम, “ देतो म्हणून कुणास सांगतो आहेस. तुने दिलेल्या त्या मडक्यात  माझ्या कारभारणीने ठेवलेले दूध ते वाया गेले त्याचे काय.”

कुंभार, “ महाशय आपण त्यात आधी पाणी ठेवून चाचपणी करावयास हवी होती.”

तो इसम, “ तू मज अक्कल शिकवू नको. तुझे मडके खराब होते. तेव्हा तू मला मडके तर दिलेच पाहिजेत. शिवाय त्यात ठेवून वाया गेलेल्या दुधाचे मूल्य ही दिले पाहिजेस.”

असे बोलून त्या उपरणे धारण केलेल्या इसमाने त्या कुंभाराकडून दोन मडकी तर घेतलीच पण जाताना उतरंड घसरवली. त्यात एक दोन मडकी फुटली. त्याने त्या कुंभाराच नुकसान झाले.  तो कुंभार हताश होऊन पाहत राहिला. तो इसम तेथून जाते वेळी अंबालेने त्याचे निरीक्षण केले, तर त्याच्या अंगावरील जानव्याने व डोक्यावरील शेंडीने तो एक ब्राह्मण आहे हे तिने  ओळखले. त्या दोघी त्या कुंभाराजवळ आल्या. त्रिशलेने कुंभरास विचारले, की त्या माणसाकडे नुकसान भरपाई का मागितली नाही. त्यास असे कसे जाऊ दिले.

कुंभार, “तो उच्च वर्णीय ब्राह्मण असून त्याचे लागे बांधे प्रधानजीच्या घरापर्यंत आहेत. व त्यास दिलेल्या मडक्यांची त्याने एक छदाम ही दिली नाही. उलट कारण सांगून माझी दोन मडकी घेऊन गेला. व जाताना माझं नुकसान करुन गेला. त्या विरुद्ध कोणी तक्रार ही करत नाही त्याची ओळख या पेठेच्या नायकापासून ते राजवाड्यापर्यंत आहे.”

त्रिशला, “ महाराज जयवर्धनांकडे का तक्रार करत नाहीत.”

कुंभार, “ महाराज जयवर्धन जरी न्यायी असले तरी राज्याची व्यवस्था व इतर कामी ते गुंतलेले आहेत. व एका छोट्याशा कारणे त्यांना त्रास देणे योग्य नव्हे. आम्ही सुरक्षित आहोत. दोन वेळ भोजन मिळते त्यात समाधान मानितो.”

अंबालेस मात्र या घटनेचा राग आला होता. तिने त्या ब्राह्मनास धडा शिकवण्याचे ठरवले. व त्रिशलेस इशारा करून ती त्याच्या मागे गेली. तो पेठेतील एका कोपऱ्यात उभा होता. तिथेच थोड्या अंतरावर एक स्त्री स्वच्छतेच काम करत होती. अंबालेन तिथे जाऊन त्या स्त्रीचे हातातील झाडू काढून घेतला . व त्रिशलेस दिला व सूचना केली. तिचा इशारा समजून त्रिशलेने  तिच्या हातातील तो झाडू घेत स्वच्छता करू लागली. तो इसम थोड्या वेळाने  तिच्या जवळून जाताना तिने उगाच धक्का दिला. व स्पर्श केला. त्यामुळे तो चिडला. व त्याने तीस ढकलले. व तो म्हणाला, “ ए तूस दिसत नाही . एक पूजाविधी करणारा ब्राह्मण रस्त्याने जाताना दूर व्हावे . तुझ्या स्पर्शाने माझे उपरणे विटले ना. आता मज पुन्हा स्नान करावे लागेल.”

त्रिशला,  “ क्षमा असावी,  मी कामात मग्न होते. त्या कारणे मला माहीत नव्हते.”

ब्राह्मण, “कारणे कोणास सांगतेस. असे बोलून त्याने तीजवर आपल्या हातातील मडकी बाजूला ठेवत हात उचलला. ते पाहून त्रिशला तेथून पळाली व शेजारील छोट्याशा बोळात निघून गेली. तो ब्राह्मण तेथून पुढे सरळ नदीकिनारी गेला. ग्रीष्म ऋतू असल्याने उन्हाने पाणी कमी झाले होते. त्याने आपली मडकी एका डोहाजवळ ठेवून त्याने आपल्या अंगावरील वस्त्रे त्या नदीतील डोहाच्या काठावर उतरवून तो अंतरवस्त्रावर तो पाण्यात उतरून स्नान करू लागला. अंबाला त्याचा पाठलाग करत तेथे आली होती. तिने तो डूंबतोय हे पाहताच झाडीतून ती लपत छपत आली. व त्याची काठावरील वस्त्रे व मडकी तिने उचलली. व ती शेजारील झाडीत दिसेनाशी झाली. तेथून पुढे ती मार्गावर आली. तिने ती मडकी तेथे फोडली. व वेगाने अरण्यवाटेस लागली. व काही अवधीतच तिथे पोहोचली. गुप्त मार्गाजवळ आल्यावर तिने शहानिशा केली. त्रिशला आधीच तिथे हजर होती. तिच्या बरोबर ती जाळीतील त्या गुप्त मार्गाने शिरली. व पुन्हा महालात हजर झाली. त्या उपरण्यास व धोत्रास तिने गुप्त मार्गात लपवले. व महालातील आपल्या कक्षात ती हजर झाली. तिथे आल्यावर तिने आपला पेहराव बदलला. व ती काहीच न घडल्यासारखे महालात वावरू लागली. यामुळे तिला एक अनमोल असा आनंद प्राप्त झाला होता. तो आठवून त्या दोघी हसू लागल्या.

इकडे तो ब्राह्मण नदीतून अंघोळ करून बाहेर आला. त्याने आपली वस्त्रे पाहिली. पण ती तिथे नव्हती. त्याने इतरत्र शोधा शोध केली. पण त्यास काहीच मिळाले नाही. मडकी पण नव्हती. तेव्हा त्याने समजले की कोणत्यातरी चोराचे हे काम असणार. त्याने चोरास अनेक दूषणे दिली. व तो तेथील वृक्षाची पाने बांधून तो आपल्या वस्तीवर गेला. त्यास सर्व लोक हसू लागले.

राजकुमारी अंबाला आता नेहमी त्या वाटेने नगरात जाऊ लागली.

क्रमशः पुढे.......



अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...