अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १५
असे बोलून त्या पुन्हा मागे फिरल्या व महालाच्या आतमध्ये आल्या. येताना तो गुप्त दरवाजा त्यांनी नीट बंद केला. गवाक्षाची जाळी नीट त्यांनी आत आल्यावर लावली. व दालनात आल्यावर आपापल्या जागी त्या निद्रिस्त झाल्या. आता त्या दोघींना दुसऱ्या मार्गाविषयी उत्सुकता लागली. त्याविषयी जाणण्याची जिज्ञासा जागृत झाली. त्या दोघी योग्य संधीची वाट पाहू लागल्या. व एके दिवशी तो योग चालून आला. त्या दोघींनी एके दिवशी रात्री त्या मार्गाने पुन्हा जाऊन त्या मार्गाचा शोध घेतला. त्यांना तो मार्ग नगराजवळील एका जंगलात निघत असल्याचे आढळले. तो राजधानी पासून जवळ असलेल्या एका नगरा जवळील जंगलात एका जाळीत निघत होता. तेथून थोड्याच अंतरावर राज्यातील एक छोटे नगर होते. ते एक धार्मिक नगर होते. तेथील पेठ लहान जरी असली तरी राजधानी पेक्षा मोठी उलाढाल तेथे होत होती. राजकुमारीला तो गुप्त मार्ग माहीत झाल्याने ती आता सहज राजमहालाबाहेर जाऊ शकत होती. ती आता योग्य संधीची वाट पाहू लागली.
महाराज जयवर्धन यांना राज्यातील राज्यव्यवस्था पाहण्यासाठी राज्यातील प्रत्येक नगराची भ्रमंती करावी लागे. त्यामुळे त्यांना राज्यातील प्रत्येक विभागाची पाहणी करावी लागे. त्यामुळे त्यांना वारंवार नगराबाहेर जावे लागे. तसेच प्रधनांना देखील जावे लागे. तेव्हा नगराचा व येथील राज्यकारभारात महाराणी अरूणावतींना लक्ष द्यावे लागे.
त्यावेळी राजकुमारी व महालातील कामकाजावरून महाराणी अरूणावती यांचे लक्ष लागत नसे. त्या वेळेचा फायदा घ्यायचे अंबाला ने ठरवले.
राज्याच्या उत्तर विभागातील व्यवस्था लावण्यासाठी महाराज जयवर्धन व प्रधान वेददत्त गेल्यामुळे कुंतल प्रदेश व नगर कारभाराची पाहण्याची जबाबदारी महाराणी अरुणावतींवर आली होती. त्यामुळे त्या राज्यव्यवस्था लावण्यात व्यस्त होत्या. या संधीचा फायदा घ्यायचे राजकुमारीनी ठरवले. राजकुमारीने आपल्या कक्षातील सर्व दासिणा आपल्या कक्षात न येण्याचा आदेश दिला. व गरज भासली तर त्रिशला आहे हे तिने स्पष्ट केले. त्यामुळे सर्व दासी तेथून निघून गेल्या. त्या गेल्याचे पाहताच राजकुमारी ने आपल्या शयन जागेवर काही लोड ठेवून झाकून दिले. व त्यावर शाल पांघरली. व त्रिशलेने आणलेली वस्त्रे तिने परीधान केली. व त्रिशलेनेही नवखा पेहराव केला. व त्या दोघी त्या गुप्त मार्गाने बाहेर पडल्या. तेथून बाहेर पडताच राजकुमारीला आपण मुक्त झालो आहोत असे वाटू लागले. राजकुमारी त्या अरण्यात बागडू लागली. तेथून त्या दोघी शेजारील त्या धार्मिक नगरात गेल्या. . कोणी ओळखू नये म्हणून राजकुमारीने आपल्या मुखावर रुमाल बांधून घेतला. त्या नगरात गेल्या. त्या पुढे नगरात प्रवेश करताना तिथे त्यांना एक कुंभार पेठ लागली. तेथून त्या निघाल्या. ग्रीष्म ऋतू असल्याने तेथे अनेक प्रकारची मडकी विक्रीस ठेवली होती. एका दुकानासमोर मडक्यांची मोठी उतरंड होती. तेथे एक काळसर पुरुष ज्याने श्वेत वस्त्र धारण केले होते. त्याच्या अंगावर उपरणे होते. ज्याच्या डोक्यास केसरी पागोटे होते. तो तेथील वृध्द कुंभाराशी हुज्जत घालत होता.
कुंभार,“ आपणास जर का मातीचे भांडे खराब लागले असेल तर बदलून देतो.”
तो इसम, “ देतो म्हणून कुणास सांगतो आहेस. तुने दिलेल्या त्या मडक्यात माझ्या कारभारणीने ठेवलेले दूध ते वाया गेले त्याचे काय.”
कुंभार, “ महाशय आपण त्यात आधी पाणी ठेवून चाचपणी करावयास हवी होती.”
तो इसम, “ तू मज अक्कल शिकवू नको. तुझे मडके खराब होते. तेव्हा तू मला मडके तर दिलेच पाहिजेत. शिवाय त्यात ठेवून वाया गेलेल्या दुधाचे मूल्य ही दिले पाहिजेस.”
असे बोलून त्या उपरणे धारण केलेल्या इसमाने त्या कुंभाराकडून दोन मडकी तर घेतलीच पण जाताना उतरंड घसरवली. त्यात एक दोन मडकी फुटली. त्याने त्या कुंभाराच नुकसान झाले. तो कुंभार हताश होऊन पाहत राहिला. तो इसम तेथून जाते वेळी अंबालेने त्याचे निरीक्षण केले, तर त्याच्या अंगावरील जानव्याने व डोक्यावरील शेंडीने तो एक ब्राह्मण आहे हे तिने ओळखले. त्या दोघी त्या कुंभाराजवळ आल्या. त्रिशलेने कुंभरास विचारले, की त्या माणसाकडे नुकसान भरपाई का मागितली नाही. त्यास असे कसे जाऊ दिले.
कुंभार, “तो उच्च वर्णीय ब्राह्मण असून त्याचे लागे बांधे प्रधानजीच्या घरापर्यंत आहेत. व त्यास दिलेल्या मडक्यांची त्याने एक छदाम ही दिली नाही. उलट कारण सांगून माझी दोन मडकी घेऊन गेला. व जाताना माझं नुकसान करुन गेला. त्या विरुद्ध कोणी तक्रार ही करत नाही त्याची ओळख या पेठेच्या नायकापासून ते राजवाड्यापर्यंत आहे.”
त्रिशला, “ महाराज जयवर्धनांकडे का तक्रार करत नाहीत.”
कुंभार, “ महाराज जयवर्धन जरी न्यायी असले तरी राज्याची व्यवस्था व इतर कामी ते गुंतलेले आहेत. व एका छोट्याशा कारणे त्यांना त्रास देणे योग्य नव्हे. आम्ही सुरक्षित आहोत. दोन वेळ भोजन मिळते त्यात समाधान मानितो.”
अंबालेस मात्र या घटनेचा राग आला होता. तिने त्या ब्राह्मनास धडा शिकवण्याचे ठरवले. व त्रिशलेस इशारा करून ती त्याच्या मागे गेली. तो पेठेतील एका कोपऱ्यात उभा होता. तिथेच थोड्या अंतरावर एक स्त्री स्वच्छतेच काम करत होती. अंबालेन तिथे जाऊन त्या स्त्रीचे हातातील झाडू काढून घेतला . व त्रिशलेस दिला व सूचना केली. तिचा इशारा समजून त्रिशलेने तिच्या हातातील तो झाडू घेत स्वच्छता करू लागली. तो इसम थोड्या वेळाने तिच्या जवळून जाताना तिने उगाच धक्का दिला. व स्पर्श केला. त्यामुळे तो चिडला. व त्याने तीस ढकलले. व तो म्हणाला, “ ए तूस दिसत नाही . एक पूजाविधी करणारा ब्राह्मण रस्त्याने जाताना दूर व्हावे . तुझ्या स्पर्शाने माझे उपरणे विटले ना. आता मज पुन्हा स्नान करावे लागेल.”
त्रिशला, “ क्षमा असावी, मी कामात मग्न होते. त्या कारणे मला माहीत नव्हते.”
ब्राह्मण, “कारणे कोणास सांगतेस. असे बोलून त्याने तीजवर आपल्या हातातील मडकी बाजूला ठेवत हात उचलला. ते पाहून त्रिशला तेथून पळाली व शेजारील छोट्याशा बोळात निघून गेली. तो ब्राह्मण तेथून पुढे सरळ नदीकिनारी गेला. ग्रीष्म ऋतू असल्याने उन्हाने पाणी कमी झाले होते. त्याने आपली मडकी एका डोहाजवळ ठेवून त्याने आपल्या अंगावरील वस्त्रे त्या नदीतील डोहाच्या काठावर उतरवून तो अंतरवस्त्रावर तो पाण्यात उतरून स्नान करू लागला. अंबाला त्याचा पाठलाग करत तेथे आली होती. तिने तो डूंबतोय हे पाहताच झाडीतून ती लपत छपत आली. व त्याची काठावरील वस्त्रे व मडकी तिने उचलली. व ती शेजारील झाडीत दिसेनाशी झाली. तेथून पुढे ती मार्गावर आली. तिने ती मडकी तेथे फोडली. व वेगाने अरण्यवाटेस लागली. व काही अवधीतच तिथे पोहोचली. गुप्त मार्गाजवळ आल्यावर तिने शहानिशा केली. त्रिशला आधीच तिथे हजर होती. तिच्या बरोबर ती जाळीतील त्या गुप्त मार्गाने शिरली. व पुन्हा महालात हजर झाली. त्या उपरण्यास व धोत्रास तिने गुप्त मार्गात लपवले. व महालातील आपल्या कक्षात ती हजर झाली. तिथे आल्यावर तिने आपला पेहराव बदलला. व ती काहीच न घडल्यासारखे महालात वावरू लागली. यामुळे तिला एक अनमोल असा आनंद प्राप्त झाला होता. तो आठवून त्या दोघी हसू लागल्या.
इकडे तो ब्राह्मण नदीतून अंघोळ करून बाहेर आला. त्याने आपली वस्त्रे पाहिली. पण ती तिथे नव्हती. त्याने इतरत्र शोधा शोध केली. पण त्यास काहीच मिळाले नाही. मडकी पण नव्हती. तेव्हा त्याने समजले की कोणत्यातरी चोराचे हे काम असणार. त्याने चोरास अनेक दूषणे दिली. व तो तेथील वृक्षाची पाने बांधून तो आपल्या वस्तीवर गेला. त्यास सर्व लोक हसू लागले.
राजकुमारी अंबाला आता नेहमी त्या वाटेने नगरात जाऊ लागली.
क्रमशः पुढे.......

No comments:
Post a Comment
This is not government websites only private , here deta is a calect to gather our saround see and hearing deta so you check to government websites and agree whit it.