Wednesday, April 19, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४१

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४१



क्रमशः पुढे चालू.....

 अंबाला, “ मरण आले तरी बेहत्तर पण या सर्व आपल्या वाताहतीस जबाबदार असलेल्या व्यक्तीस आपण धडा शिकवायचाच. आपण शिकलेली सर्व विद्या पणाला लावायची. काही दिवसातच महाशिवरात्र येत आहे. सदर काळात महाशिवरात्रीचा उत्सव राजधानी जवळील नगरात असतो. तेव्हा खूप गर्दी होते. या गर्दीचा फायदा घ्यायचा. तेव्हा त्या वेशांतर करून कधी भिकारी कधी वृद्ध असे रूप पालटून त्या तेथून वावरू लागल्या. सदर नगराचा काना कोपरा माहीत असल्याने त्या काळजी पूर्वक वावरू लागल्या. पहाता पहाता महाशिवरात्र जवळ आली. महादेव नगरात व्यापारी देवड्या सजू लागल्या. मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. होती. त्या ठिकाणी अनेक प्रांतातील यात्रेकरू उतरू लागले होते.

अंबाला एका भिकारनीचे रुप घेऊन तिथे वावरत होती. त्यामुळे सैनिक तिला हटकत नव्हते. मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांकडून तिची उपेक्षा होत असे. सर्व लोक हिन वागणूक देत लाथाडत. तर काही भिक्षा देत असत. ज्या नगरात तिच्या समोर अनेकजन नतमस्तक उभे असत. तिथे तिची चाललेली उपेक्षा पाहून त्रिशलेस वाईट वाटत होते तिच्या अंतरात वेदना होत होत्या. या ग्रहदशेबद्दल तिने शिवशंकरास अनेक दूषणे दिली. ज्या शिवलिंगाची त्या प्राणपणे पूजा करत होत्या. तोच त्यांची परीक्षा पहात होता. पण त्याने दिलेल्या या वेदना आठवत त्या पेठेच्या एका बाजूस आडोशाला आल्या. तेथील एका बोळात त्या उभा राहून भिक्षेत मिळालेला पाणीभात खाऊ लागल्या. अंबालेच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिला आपली माता अरूणावतीची खूप आठवण येत होती. इतक्यात त्यांना नगर दवंडी ऐकू आली. त्या दोघी काळजीपूर्वक ऐकू लागल्या.

दवंडी वरून नगरातील भव्य अशा मार्गपथावरून महाराज वेददत्त यांचा पुत्र महारुद्र शिवदर्शनास येत आहे, हे समजले. प्रचंड अशा सैन्याच्या बंदोबस्तात हत्तीवरून राजनैवेद्य आणण्यात येत होता. अंबालेस त्यास पाहण्याचा मोह आवरत नव्हता. ती त्या भव्य मार्गावर एका कोपऱ्यात उभे राहून त्यास पाहण्याचा प्रयत्न करत होती. पण तितक्यात तेथे उभारलेल्या माणसाने तिला ढकलले. ती जवळील गटारात पडली. त्यातील एक तिला कृष्ण वर्णी दरिद्री अराजना (राक्षसिन) म्हणाला. तिच्या मनात आले की क्षणाचाही वेळ न घालवता त्याचे मुंडके छाटावे. पण तिने आपला राग नियंत्रित केला. व ती त्रिशले जवळ आली. त्रिशलेन तिची व्यथा जाणली. व तिने आपल्या खांद्यावर पाय देण्यास सांगितले. तशी ती तेथील कथड्यावर एक व त्रिशलेच्या खांद्यावर दुसरा पाय देऊन उभा राहिली. आता अंबाला तिच्या खांद्यावर उभा राहिल्याने तिला नगर रस्त्यावरून चाललेली मिरवणूक दिसू लागली. तिने पाहिले महारुद्र हा रथामध्ये बसला होता. तो शांत होता. पण त्याच्या शेजारी एक सुंदर मुलगी होती. ती आनंदाने त्याच्या जवळ बसली होती. ते दृश्य पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आले. व हृदयात तीव्र वेदना निर्माण झाली. व ती खाली उतरली. तिचा पडलेला चेहर पाहून त्रिशलेन त्याचे कारण विचारले. तेव्हा ती शांत बसली. तिचे पाणावलेले डोळे पाहून त्रिशला धीर देत म्हणाली, “ हे बघ मी तुझी व्यथा जाणते तू महारुद्रास पाहून हिरमुसली आहेस.त्याच्या बरोबर दुसरी युवती होती का?”

असा प्रश्न विचारताच अंबाला हो म्हणाली.

तेव्हा त्रिशला तिला म्हणाली, “ हे बघ विस्मरण मानवास दिलेली महत्त्वाची देणगी आहे. त्यामुळेच मानव जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगू शकतो. अन्यथा तो दुखात बुडाला असता. महारुद्र तसा पाहता चांगल्या स्वभावाचा आहे. त्याचे स्नेहबंध जर का इश्वराने जर त्या कन्येशी बांधले असतील तर आपण कशाला दुःखी व्हावे. वास्तव जीवन जगतेवेळी असे अनेक दुर्धर प्रसंग घडत असतात. त्यास विसर व आपल्या पुढील संग्रामाच्या तयारीस लाग. मला एवढेच वाटते.” अंबाला शांतपणे ऐकून घेत होती.

दुसऱ्या दिवशी यक्षिणीगाण असल्याने राज्यातील तसेच इतर भागातील अनेक यक्षिणी तिथे हजर झाल्या होत्या. महाराज वेददत्त यांनी देवाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसाठी मंदिर खुले झाले होते. पहाता पहाता यात्रा भरून गेली होती. यात्रेच्या धामधुमीत संध्याकाळ केव्हा झाली हे समजलेच नाही. त्या दोघी काही आहार विकत घेऊन संध्या समयी तेथून बाहेर पडल्या. व त्यांनी नदी पार केली. व त्या अरण्यात आल्या. तिथे त्यांनी येथे येण्यापूर्वीच आपली शस्त्रे लपवून ठेवली होती. तिथे आल्यावर त्यांनी थोडा आहार केला. तदनंतर त्यांनी आपला पेहराव बदलला. शस्त्र सज्ज होऊन त्या पुढे राजधानी नगराकडे चालल्या. रात्रीच्या अंधारात चमकणारी चंद्रकोरीचा प्रकाश व झुडपात काजवे तेवढं चमकत होते त्यांच्या अंधूक उजेडात त्या शिवशंकराचे नाव घेत त्या निघाल्या. अरण्य वाटेने त्या राजधानी नगराजवळ आल्या. तेथील महालात जाणाऱ्या गुप्त मार्गा पैकी अरण्य मार्ग बंद केला होता. व आता राजधानी नगरा जवळील तलावातील मार्ग तेवढा शिल्लक होता. त्या तिथे पोहोचल्या. तिथे पहारा कमी होता. उत्सव असल्याने सर्व सैन्य तिकडे गुंतले होते. त्यामुळे इकडे सुरक्षा कमी होती. त्यांनी आपल्या शरांना बेशुद्ध करणारी औषधी लावली. व त्या एका एका शिपायाचा वेध घेत त्या पुढे निघाल्या. त्यांनी पहार्याचे सर्व शिपाई बेशुद्ध केले. व त्या तलावात शिरणार इतक्यात वीरभद्र तिथे आला. तो तेथील प्रभाग अधिकारी होता. त्यावर सूरक्षेची जबाबदारी होती. तो शूर व ताकदवर होता. त्या दोघींनी त्यावर ही शर चालवले. त्याने त्यांचे ते शर निष्प्रभ केले. तेव्हा त्रिशलेन इशारा केला. अंबाला आपली तलवार उपसून त्यासमोर चालून गेली. आता त्याच्याशी हातघाई करावी लागणार होती. तो शूर होता पण त्याचा सामना आता आंबेशी होता. अंबा पुढे तलवार उपसून धजावली व लढू लागली. तिचे लढाई कौशल्य पाहून तो चकित झाला.

त्याने ओळखले की ती एक स्त्री आहे. तिचा आत्मविश्वास तोडण्यासाठी तो म्हणाला, “ तू एक स्त्री माझ्यासमोर एका तांब्याच्या शिक्क्याप्रमाणे आहेस. मी आचार्य वृषभ यांच्या शिष्यांचा खात्मा करून राजधानी जिंकलेला वीर. तू तर एक नार शस्त्र टाक व शरण ये तुला राणी सारखी ठेविन.”

तेव्हा अंबालेने आपल्या तलवारीने त्यावर हल्ला चढवला. तिची ती राज तलवार अंधारात देखील चमकत होती. अत्यंत वेगाने ती हलत होती. तिचा प्रतिकार करताना त्याची दमछाक होत होती. तिचे लढणे पाहून तो खूपच भारावला. इतक्यात त्रिशलेन आपल्या भात्यातील एक शर काढला व अचूक वेध घेतला. त्याच्या पाठीत तो शर लागला. तो मुर्छीत होऊन पडला. अंबाला त्रिशलेजवळ आली. व तिला म्हणाली, “ त्यास ठार मारलेस.”

त्रिशला, “ नाही उगाच निर्दोष माणसाची हत्या नको. म्हणून फक्त त्याला बेशुद्ध केलं. व त्या दोघी तलावात उतरल्या. व त्या गुप्त वाटेने महलाकडे निघाल्या.

क्रमशः पुढे......


Sunday, April 16, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४०

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४०

क्रमशः पुढे चालू.....


महारुद्र हा राजकुमार आहे ही बातमी संपूर्ण राज्यभर पसरली. तशी ती पारधी वस्तीवर देखील येऊन थडकली. ही बातमी कळताच त्रिशला व आंबालेस म्हणावा तितका आनंद झाला नाही.

इकडे महारुद्र राजकुमार आहे, हे सिद्ध झाल्याने त्यास राज्यकारभारात लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे तो अंबालेस भेटू शकत नव्हता. त्याची अस्वस्थता महाराज वेददत्त यांनी ओळखली. व त्याबाबत दासांकडून जाणून घेतले. तेव्हा तो एका पारधी कुमरिकेच्या प्रेमात पडल्याचे समजले. त्यांनी गुप्त हेरांना तिच्याबाबत माहिती काढण्यास सांगितले. ते कामाला लागले. पारधी वस्तीत फिरून जाणून घेऊ लागले.

ते पारधी वस्तीत फिरत असताना आंबालेस व त्रिशलेस त्यांचे वागणे खटकले. त्या दोघींनी ओळखले की त्यांच्यावर कोणतरी पाळत ठेवत आहे. व ही पुढील धोक्याची चाहूल आहे. त्या मुद्दाम त्या हेरांपुढे गप्पा मारत असत. येत्या काही दिवसात इंद्रावती महाराणी होणार आहे. असे थट्टेने बोलत.

हेरांनी त्यांचे बोलणे ऐकले व महाराज वेददत्त यांच्या कानावर ही बातमी घातली.

महाराज वेददत्त यांना वाटत होते की महारुद्राने एका राज घराण्यातील कन्येशी विवाह करावा. यासाठी त्या पारधी कन्येस ठार मारले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपल्या विश्वासू तरबेज खाजगी अंगरक्षकास पाठवले.

हेरांची टेहळणी थांबल्याचे दिसताच त्या दोघींनी जाणले की लवकर एखादे संकट येणार आहे. व त्यांनी सुरक्षेसाठी महदव्वेस तिच्या बहिणीच्या घरी पोहचते केले. व आपली शस्त्रे त्यांनी रात्रीच्या समयी घरी आणून ठेवली. व त्या दोघी रात्रीच्या वेळी फेराफेराने पाळत ठेवू लागल्या. गस्त घालू लागल्या. अचानक त्यांना एका रात्री काही संशयास्पद हालचाल घराबाहेर दिसली. गुप्त शिपाई वेशांतर करून अंबालेस मारण्यास आले होते. दार वाजले. अंबालेने त्रिशलेस जागे केले. व त्या शस्त्र घेऊन स्वसंरक्षणास सिद्ध झाल्या.

अंबालेन आपली मोठी तलवार काढली. त्यांनी घरातील तेवणारा दीप विझवला. दार उघडून कोणतरी आत आले. हे लक्षात घेऊन अंबाला कुडाच्या दरवाजामागे लपली. व तो इसम आत येण्याची वाट पाहू लागली. तो धूर्त माणूस आत यायला मागील दरवाजा ही वाजू लागला. त्याला बांधलेले काथ्याचे दोर कापले जाऊ लागले. इतक्यात छतावर काहीतरी हालचाल व आवाज जाणवू लागला. त्या दोघी वेगवेगळ्या ठिकाणी लपल्या. व अंधारात स्वत:ला अन् एकमेकींना ओळखण्यासाठी त्यांनी खड्यांची काकनं घातली. त्या दोघी सावध झाल्या. अंबालेने पुढील दरवाजातून येणाऱ्याचे पाय कलम केले. व नंतर त्रिशलेन दुसऱ्याचे सिताफिणे मुंडके कलम केले. तसेच वरुन छतावरून येणार्यास देखील त्यांनी यमसदनी धाडले. बाहेरील राहिलेल्या दोघांच्या लक्षात आले. की आतमध्ये आपले साथीदार मारले जात आहेत. तेव्हा त्यांनी पेटते गोळे छतावर टाकले. व बाहेरून दारे व कुडास आग लावली. व वस्तीवरील लोक सावध होण्याआधी, ते पाळले.

त्या दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. छतावर गवात असल्याने अग्नीने जोर धरला. पहाता पहाता अग्नी वेगाने पसरू लागली. चपळाईने आपली शस्त्रे व मोहरांची थैली घेऊन त्या दोघी मागील बाजूस आल्या. व तेथील कुड कापून त्या बाहेर पडल्या. व अंधाराचा फायदा घेऊन त्या पाहता पाहता अरण्यात घुसल्या. अंधार वाटेने त्या अरण्य वाटेला लागल्या. आता त्या दोघींच्या मनात अनेक प्रश्न उमटत होते. ‘की हे कोणी केले असेल?’

इकडे अग्निचा चटचट आवाज होऊ लागला. त्यामुळे आजूबाजूचे पारधी जागे झाले. पण त्यांना ती आग विझवणे शक्य नव्हते. शेवटी त्यांनी ती आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच ती इकडे तिकडे पसरणार नाही याची काळजी घेतली. त्या अग्नीने त्यांचे राहण्याचे ठिकाण भस्मसात झाले दुसऱ्या दिवशी राखेत काही अस्थी सापडल्या. त्या पारध्याने एका कलशात गोळा केल्या. सर्वांना दुःख झाले. हेरांनी ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचवली. महारुद्रास ही बातमी समजताच तो फार दुःखी झाला. तो लगेच तिथे आला. व त्याने त्या झालेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. पण काही केल्या आगीचे कारण समजले नाही. त्याला खूप वाईट वाटले. इंद्रावतीने आपणास फसवले असे तो म्हणून तो स्वतः ला संपवणेस निघाला. मात्र महाराज वेददत्त व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्यास समजावले. काही काळ निघून गेला. आता महारुद्र हळूहळू सावरू लागला. महाराज वेददत्त यांनी याच घटनेचा फायदा घ्यायचे ठरवले. महाराजांनी त्यास राज्याच्या कामकाजात गुंतवले. व त्यांनी त्याच्या लग्नाची बोलणी उत्तर विभाग नगर नायकाच्या मुलीशी करण्याचे ठरविले. व तशी बोलणी चालवली. महारुद्राने यास विरोध केला. परंतु त्यांनी बोलणी चालवली.

….. …… ……. …… ……

अग्नी कांडातून बाहेर आल्यावर त्या दोघी महदव्वेस ठेवलेल्या तिच्या बहिणीकडे आल्या. पुढे सुरक्षेच कारण सांगून त्या तिला घेऊन तिच्या दूरच्या भावाच्या घरी अपरान्त देशी निघाल्या. महदव्वच्या बहिनिस त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. कारण कोणतरी चौकशी करत तिच्याकडे येईल व महदव्वेला तिच्या भावाकडे अपरान्त देशी सोडण्यास त्या निघाल्या. वाटेला महदव्वा अनेक प्रश्न विचारू लागली. तेव्हा त्यांनी दुषलेचे महाराज जयवर्धन यांच्या घराण्याशी राज्यपातळीवर असणाऱ्या जवळीकीमुळे आपल्याला हे कष्ट उपसावे लागत आहेत. व त्या खडतर प्रवास करून महदव्वेस तिच्या भावाकडे सुरक्षित ठेवून त्या परतल्या.

आता त्या दोघींपुढे सर्वात मोठे आव्हान होते ते पार करण्यासाठी त्या निकराच्या तयारीने निघाल्या. अरण्यात राहून त्यांना तेथील प्राण्यांचा चांगलाच अभ्यास झाला होता. मिळेल त्या ठिकाणी विसावा घेत त्या पुन्हा सह्याद्रीपार करून कुंतल प्रदेशात आल्या. अरण्यातून चालून थकल्यावर त्या एका विशाल शिळेवर विसावल्या. वाटेत एका धर्मशाळेत त्रिशलेला मिळालेल्या माहितीनुसार त्याआधारे त्रिशलेस आंबालेस दिवचण्याची संधी मिळाली. ती म्हणाली, “ काय अंबाला, तुझा जीवनसाथी दुसऱ्या कन्येशी विवाह बंधनात बंधिस्त होण्यास निघाला आहे. काय तुझ्यासाठी लावलेला पण जिंकतोय बघ. तू मृत झाल्याची वार्ता समजताच थोडे दिवस दुःखाचे नाटक करून लगेच बोहल्यावर चढतोय म्हणे, व उत्तर नायकाच्या मुलीशी विवाह करतोय.”

अंबाला, “ करेना, नाहीतर तुला तो माझ्या जीवनात नकोच होता.”

त्रिशला, “ नाहीतर मलाच म्हणत होतीस ना, की त्याचे तुझ्यावर प्रेम आहे. मग दुसऱ्या दिवशीच का नाही त्याने आत्मदहन केले. प्रेम, प्रीत या गोष्टी फक्त दंतकथेत शोभून दिसतात. वास्तव जीवनात पुरुषांना स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू आहे. एखादे वस्त्र वापरा व फेकून द्या. नाहीतर दासी बनून त्यांची सेवा करत राहावी लागते. माझ्या मातेवरील अत्याचार याचेच द्योतक आहे.”

अंबाला, “ तुझ्या अंतर्मनात पुरुषांविषयी द्वेष भरून राहिला आहे. पण तू हे विसरतेस की पुरुषांच्या सहवासात स्त्री चारित्र्याचे रक्षण होते.”

त्रिशला, “ माझ्या पित्याने केले ना माझ्या मातेचे शीलरक्षण व पुढे दिले या जगाच्या समुद्रात ढकलून. प्रधानाच्या घरचे दास्यत्व पत्करून अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. तुझ्या कारणे मी सुरक्षित राहिले नाहीतर माझी ही वाताहत झाली असती. परमेश्वर जाने आपली ही व्यथा, पण पुढील वाटचाल आपली अत्यंत बिकट आहे. कारण आपल्यावर हल्ला करणारा शत्रू काही साधा सुधा नाही. तो ताकदवान आहे. त्यास नष्ट करणे सोपे नाही.”

क्रमशः पुढे....

Thursday, April 13, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३९

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३९



क्रमशः पुढे चालू.....

तो जखमी पायाने त्यांच्यापुढे आला. त्याने पाहिले अंबाला त्याच्या समोर शांतपणे अश्रूपूर्ण नजरेने उभा होती. तिची ती आत्मीयता पाहून तो त्याच्या पायातील वेदना विसरला. त्याच्या मनात तिचे स्थान दृढ झाले. त्याचा तो लंगडत्याला पाय पाहून आंबलेचे हृदय जागृत झाले. त्या ह्रुदयात एक प्रेमभाव निर्माण झाला. महारुद्र त्याच्या मित्रांबरोबर महादेव मंदिरात गेला. तेथे त्याने शिवपूजा केली. खूप दिवसांनी तेथे पूजा झाली होती. कारण ते मंदिर गावापासून खूप लांब होते. अंबाला त्रिशलेस म्हणाली की तिने निश्चय केला आहे. की ती महारुद्रासवे लग्न करणार आहे. कारण तिच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारा फक्त तोच असेल. व प्रतिकूल वेळी रक्षण ही तोच करेल. ती मंदिरात आली. तिने महारुद्राच्या पायावर डोके ठेवले. व त्याने तिला जिंकले आहे. हे सांगितले. व त्या दोघांनी लग्नाचा निश्चय केला.

त्रिशलेन ही त्यास सांगितले. की ती त्याचा इंद्रावतीशी विवाह लावून देईल. मात्र सहा महिन्यानंतर. व त्या दोघी तिथून निघून गेल्या. महारुद्र अंबालेस जिंकल्याच्या आनंदाने प्रफुल्लित झाला. तो आता नेहमी तिला भेटायला येऊ लागला. पण अंबाला व त्रिशला त्यास कोणतीही माहीती लागू देत नसत. याबाबत त्रिशला ने वचन घेतले होते. हा बदला यशस्वी झाल्यावर अंबाला लग्न करणार होती. अंबाला त्याकडून राज्यातील हालहवाला जाणून घेत असे. पण तो ही सर्व सांगत असे. तसे पाहता त्या दोघींना राजवाडा व राजधानी नगराची खडानखडा माहिती होती. त्यामुळे त्या ही जास्त विचारत नसत. व आपला शेवटचा शत्रू हा महालात आहे व त्याचा आपल्याला बंदोबस्त करून बदला घ्यायचा आहे यासाठी त्या योजना आखू लागल्या. व तयारीला लागल्या.

….. ….. ….. ….. …..

महाराज वेददत्त यांनी आपल्या राज्याची व्यवस्था नीट लावली होती. तरी देखील त्यांनी हेर व्यवस्था नीट केली. व ते हेरांद्वारे बारीक सारीक राज्यातील हालहवाला जाणून घेऊ लागले. ते आपल्या राज्यातील निरनिराळ्या अधिकारी व सैन्यातील अधिकारी यांची ही बित्तंम बातमी ते काढू लागले. त्यांनी महारुद्राची देखील माहिती काढली. त्यामध्ये त्याचेचे प्रेम प्रकरण देखील समजले. एखादा वीर आपल्याला घातक ठरू नये यासाठी ते काळजी घेत. त्याप्रमाणे गुप्त हेरांनी टेहळणी करून सर्व माहिती काढून घेतली. तेव्हा त्यांना महारुद्राच्या पालकांकडून व इतर लोकांकडून समजले की महारुद्र हा भिल्लम व सिंगणेचा पुत्र नसून तो त्याना अरण्यात सापडला होता. तेव्हा महाराज वेददत्त यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. व त्यांनी महारुद्राविषयी जास्त जाणून घ्यायला सुरवात केली.

यासाठी महारुद्राला राज्याच्या उत्तर विभागाची पाहणी करण्यास पाठवले. व महाराज वेददत्त व शामलता स्वतः भेटण्यास भिल्लम व सिंघणा यांच्याकडे गेलीत. तेव्हा त्यांनी महारुद्रास नेमलेल्या नगराची व्यवस्था पाहिली. तेव्हा त्यांना तेथील वैशिष्ट्यपूर्ण नगराची केलेली रचना तसेच तेथील साफसफाई. नगर तट्टावरील कडक पहारा. इतकेच नाही तर नगर सैन्य सराव स्थळं. व इतर व्यवस्था त्यांना अत्यंत आवडली. तेथील कारभार पाहून प्रसन्न मुद्रेने ती दोघे महारुद्राच्या निवास स्थानी गेली. भिल्लम व सिंगणाने यथोचित पाहुणचार केला. तसेच त्यांनी आस्थेने त्यांची चौकशी केली. व हळुवारपणे महारुद्राची माहिती काढली. तेव्हा शेवटी भिल्लम व सिंघणेने सर्व माहिती सांगीतली.

व त्याच्या अंगावरील त्यावेळीची वस्त्रे व ती सोन्याची चैन दाखवली. ती पाहताच महाराणी श्यामलता आनंदित झाली. कारण त्याकडून हरवलेला लहानपणीचा त्यांचा पुत्र रत्नाकर हाच महारुद्र होता. त्यानी खूपवेळ वार्तालाप केला. व शेवटी त्यांनी सिंघणा व भिल्लम यास वचन दिले. की महारुद्र हा त्यांचाच पुत्र राहील. त्यांचेच नाव धारण करेल. व ज्या भिल्ल समाजाने त्यास आपले केले. त्यांचा उद्धार करेल. व आमच्या माघारी या राज्याचा राजा बनेल. असे वचन देवून महाराज व महाराणी राजधानीत आल्या. तिथे आल्यावर त्यांनी दुत पाठवून महारुद्र व त्याच्या सैन्य तुकडीस राजधानीत बोलावून घेतले. राजधानीत आल्यावर फुलांची उधळण व कस्तुरी शिंपून त्याचे स्वागत केले. राजमहालात आल्यावर त्यास उंच आसनावर बसवले. व त्यास सर्व इतिहास सांगितला. व तो आपला वारस असल्याचे सांगितले. त्याचे पिता भिल्लम व माता सिंघणा ही तिथे होती. तो मात्र आपण भिल्लम व सिंघणेचा पुत्र आहोत हेच मानत होता. त्यांच्यापासून दूर रहाणार नाही. शेवटी सर्वांनी त्याची समजूत घातली. तसेच भिल्लम व सिंघणा ही त्यासोबत कायम राहणार असे वचन घेतल्यावर तो शेवटी राजमहालात राहण्यास तयार झाला.

क्रमशः पुढे....

Monday, April 10, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३८

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३८




क्रमशः पुढे चालू.........

महारुद्र, “ मी इतरांचा विचार करत नाही. तुला प्रथम पहिल्यापासून माझ्या अंतर हृदयातून एक अनामिक ओढ निर्माण होते. तुला पहात रहावेसे वाटते. तू जरी कृष्णवर्णी असलीस तरी इतर सुंदर ललना मला तुजसमोर तूच्छ वाटतात. मी तुला कधीही अंतर देणार नाही. वाटत असेल तर तू परीक्षा घे.”

अंबाला, “ मी व आपली परीक्षा , मला वाटते की आपणासारखे पुरुष स्त्रियांना दासिसारखे समजतात. सुरवातीला प्रेम पाशात गुरफटतात. व नंतर मन उबगले की एखादे जीर्ण वस्त्र फेकावे तसे फेकून देतात.”

महारुद्रास ते बोलणे सहन होईना तिचा एकेक शब्द त्याची परीक्षा घेऊ इच्छित होता. कोणतीही परीक्षा असो, मी ती पार करून तुला जिंकेन. पण मी ती परीक्षा जिंकल्यावर तुला मात्र माझ्याशी विवाह करावा लागेल.”

अंबाला, “ ठीक आहे. मी तुझ्यापुढे पाच प्रण ठेवते. ते जिंक व माझ्याशी विवाह करून घेऊन जा. तुला कोणीही अडवणार नाहीत.”

महारुद्र, “ तसे मला अडवणे कोणालाही शक्य नाही. तुझ्या या वस्तीतील नायकासमवेत सारे माझ्या आज्ञेत आहेत.”

अंबाला, “ ते दास असतील, पण माझे माझ्या शरीरावर राज्य आहे. ते मी क्षणात भस्म करून टाकीन.”

तिचे ते बोलणे ऐकून तो परीक्षा देण्यास तयार झाला. पण त्यानेही आपल्या व्यवहारास पुरावा हवा आहे, असे सांगितले

तेव्हा त्रिशलेचे नाव घेतले. की ती याची साक्षीदार असेल.असे सांगितले. तेव्हा त्याने त्याचबरोबर माझेही दोन साथीदार असतील. तेव्हा त्या दोघांनी ठरवले, “ठीक आहे. उद्यापासून या परीक्षेत तू उतर व मला जींक व घेऊन जा. व ती तेथून पाण्याने भरलेली कळशी घेऊन गेली.

….. …..

दुसऱ्या दिवशी ती त्रिशला व सिपनेस घेऊन नदीतीरावर आली. महारुद्र आपल्या दोन साथीदारांना घेऊन तिथे आला. पण तत्पूर्वी तो महादेवाचे दर्शन घेऊन आला. त्या दिवशी अंबाला त्यास घेऊन केळीच्या रानात गेली. कुंतल प्रदेशात असणाऱ्या या रानकेळी या दिवसात कमी पाणीपुरवठा झाल्याने मरत असतात. या दिवसात चैत्र मास असल्याने सुर्य आग ओकत असतो. त्या बनात ती त्याला घेऊन आली. व आपल्या हातातील धारदार शस्त्र देत ती म्हणाली, “या बनात असणाऱ्या पाच रान केळी तू अशा वेधायच्या की त्याचा कापलेला भाग तसाच स्थिर राहिला पाहिजे. व त्या केळीही सुकणार नाहीत.”

महारुद्र, “ विचार करत तो त्या बनातील केळी न्याहाळू लागला. तेव्हा त्यास आठवले की लहानपणी आपण सवंगड्यांशी खेळताना बांबू बेटाचा मधील भाग तसाच ठेवत असत. ज्याने तो बांबू सुकत नसे.थोड्या तंतूवर जिवंत राहत असे. त्याचप्रमाणे त्याने तिच्यासमोर केळींचा छेद धारदार शस्त्राने घेतला. व तिच्या डोळ्यादेखत पाच केळी तिला न कळता छेदल्या. त्याची ही अप्रतिम कला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. परंतु अंबाला म्हणाली, “चार दिवसांनी कळेल. कोण जिंकले.”

ती सर्व तेथून निघाली चौथ्या दिवशी महारुद्र पहाटे तिथे गेला व त्याने मधले तंतू कापून काढले. ते ही बुंधा न हलता.तोपर्यंत त्या केळी सुकलेल्या नव्हत्या.

नंतर अंबालेसवे त्या बागेचे निरीक्षण केले असता. पूर्ण छेद व केळी हिरव्यागार होत्या. अशा पद्धतीने त्याने प्रथम पण जिंकला.

दुसऱ्या दिवशी तिने दुसरा प्रण त्यापुढे ठेवला. त्यानुसार तिने त्याच्या हाती एक मडके दिले व अरण्यात मध्यभागी असणाऱ्या एका वृक्षावरील पोळ्यातील मध काढायला सांगितला. त्याप्रमाणे त्याने योजना तयार केली. व संध्याकाळी तो त्या वृक्षाजवळ आला. अन् त्याने अरण्यातील पालापाचोळा गोळा केला. व तो पेटवला त्यामधे काही ओला पाला घालून त्याने धूर तयार केला. व एक विशिष्ट प्रकारचे तेल अंगास लावल्याने त्यास त्या पोळ्यातील मध काढणे सोपे झाले. त्याने ते सहज काम केले. कारण तो आपल्या पित्याकडून म्हणजेच भिल्लमाकडून ते शिकला होता. त्याने दुसरा प्रण ही पूर्ण केला. त्यानंतर तिने त्याला एका आम्रवृक्षावरील एक अतिशय उंचावर असणारा कैऱ्यांचा घोस एका बाणात वेधण्यासाठी सांगितला. त्यानंतर त्याला तिने नऊ दुर्मिळ धान्याची नावे सांगितली. ज्याचे बियाणे मिळणे मुश्किल होते. ते आणावयास सांगितले. ते त्याने एका आठवड्याची मुदत घेऊन गोळा केले. व तिच्यासमोर सादर केले. आता शेवटचा पण होता. अंबाला त्याच्या प्रेमात पडलीय. हे त्रिशलेस जाणवले. व ती एकदम सोपे प्रण घालत आहे हे तिला जाणवले. व तिने स्वतः शेवटचा प्रण घालायचे ठरवले. तो प्रत्येक प्रण सोडवत होता. तिच्या प्रत्येक परीक्षेत तो उत्तीर्ण होत होता. त्याच्या या वीरश्रीमुळे अंबाला त्याकडे आकर्षित होत होती व त्याच्या प्रेमात पडली होती. पण यात धोका आहे हे त्रिशला जाणत होती.

अंबा प्रेमाचे नाटक करायचे सोडून त्यात गुंतेल व आपल्या मातेप्रमाने धोका खाईल असे तीस वाटत होते. म्हणून तिने तिसरा प्रण स्वतः सांगायचे ठरवले.

दुसऱ्या दिवशी महारुद्र नदी किनारी आला. अंबाला व त्रिशला देखील तिथे आल्या होत्या. अंबाला बोलण्या आधी त्रिशला म्हणाली, “ तू आतापर्यंत अनेक प्रण जिंकलेस. या पारधी वस्तीच्या पलीकडे एक दुसरी नदी आहे. तिच्या डोहाच्या पलीकडे एक बेलाच झाड आहे. त्याचे बेलपत्रे तू नदीतून पार जाऊनन आणण्याचे व व पारधी वस्ती सीमेवर असणाऱ्या महादेव मंदिरातील पिंडीस वहायचे. व शिवपूजा करायची.”

तिचे हे वाक्य ऐकताच महारुद्राचा सहकारी मित्र त्यास म्हणाला, “ हे काय करतोस मित्रा, एका कृष्णकुमारीसाठी अनमोल जीव धोक्यात घालतोयस. ती नदी सुसरीनी भरलेली आहे. तिथे जाणे म्हणजे मृत्यूच. तुला हीच्यापेक्षा सुंदर मुली मिळतील. अनेक वेड्यापिशा असताना तू कशाला धोका पत्करतोस.”

तेव्हा त्याने अंबालेकडे पाहत हसतच, “तयार आहे.” असे सांगितले. अंबेस काही सुचेनासे झाले. ती म्हणाली, “ नको तो प्रण.बास ती परीक्षा, जो जीव धोक्यात घालेल.”

लगेच त्रिशलेन अंबास खेचले. व व गप्प बसणेस सांगितले.

महारुद्र मात्र त्रिशलेस म्हणाला, “ जर मी हा प्रण जिंकला तर तू याच घडीला माझे व इंद्रावतीचे लग्न लावून देशील.”

त्रिशला, “ मी तुझे व इंद्रावतीचे लग्न लावून देईन, पण सध्या नाही. सध्या तिचा दुर्धर काळ चालू आहे. आज पासून सहा मास झाल्यावर वृंदा एकादशी नंतर तुझ्या गळ्यात इंद्रावती वरमाला घालेल. ही काळ्या दगडावरील रेघ समज”

असे वचन मिळताच तो दुग्ध पाणी असणाऱ्या नदीकाठी त्यांसमवेत आला. त्या सर्वांना सुरक्षित स्थळी उभा करून एक धारदार शस्त्र घेऊन तो नदीत उतरला. व वेगाने पलीकडे गेला. दुपारचा प्रहर असल्याने नदीपात्रातील सुसरी सुस्तावलेल्या होत्या. त्याने पलीकडे जाऊन बिल्वपत्रे तोडली. व एका पिशवीत घेऊन ती कमरेला बांधली. व त्याने पुन्हा अंदाज घेत पाण्यात उडी मारली. आवाजाने मगरी व सुसरी सावध झाल्या. व त्याकडे झेपावल्या. तो वेगाने पलीकडे निघाला. मगरींनी पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सिताफिने निसटला. व पोहत जाऊन त्याने झेपावून पलीकडील वृक्षाची डहाळी पकडली. मगरीने त्याचा पाय धरला. त्याने एका हाताने डहाळी व दुसऱ्या हाताने त्या शस्त्राने मगरीवर वार केला. मगर जखमी झाली व तिने पाय सोडताच तो वेगाने वृक्षावर चढला. व सुरक्षित अलीकडे उतरला. व त्यांच्या जवळ आला.

क्रमशः पुढे....

Saturday, April 8, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३७

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३७



क्रमशः पुढे चालू.....

अंबाला, “ इथून पुढील लढा माझा मी एकटीने लढायचा ठरवल आहे. माझ्या या लढ्यात तू विनाकारण भरडली जात आहेस.”

त्रिशला, “ नाही मी यात भरडली जात नाहीये. अन् हा लढा फक्त तुझा नाहीये माझा पण आहे. माझी माता देखील या हल्यात मारली गेली आहे. व जीवनाच्या या दुर्धर काळात मी तुला सोडून जाणार नाही.आपले नाते फक्त मैत्रीचे नाही. तर ते अतूट स्नेहबंधनाने बांधले गेलं आहे.”

अंबाला, “ पण इथून पुढील संकटात तुझा जीव ही जाईल.”

त्रिशला, “ त्याची पर्वा नाही संघर्ष करायचा तर दोघींनी व यश मिळवायचं तर ते ही दोघींनी.”

अंबाला, “ पण यापुढे आपली योजना काय असेल. ती कशी अखायची याचा विचार करतेय.”

त्रिशला, “ त्यासाठी परमेश्वराने आपल्याकडे अमोघ अशी देणगी दिली आहे.”

अंबाला, “ ती कोणती?”

त्रिशला, “ आपले लावण्य, तुला कृष्णवर्णी केली असली तरी तुझे सौंदर्य त्यातूनही उमलते व त्यावर भाळून महारुद्रासारखा भिल्ल कुमार तुझ्या प्रेमात पडू पाहतोय,”

अंबाला, (आश्चर्याने)“पण तो साधा माझ्याजवळ जरी फिरकला तरी तुझी आग होताना मी पाहिलीय.”

त्रिशला, “ होय , ते खर आहे. पण आज तो नगरनायक आहे. व त्यामुळे तो आपल्या शेवटच्या चरणाची पायरी होऊ शकतो.”

अंबाला, “ पण त्याचा असा वापर करणे मला तरी योग्य वाटत नाही. व तसे पाहता तो मला आता जवळपास देखील फिरकू देणार नाही. कारण मी ऐकलंय त्याला अनेक युवतींनी मागणी घातली आहे. व त्या सुंदर ललना सोडून तो कशाला या कृष्णवर्णीय मुलीमागे लागेल. छे छे.”

 त्रिशला, “तू पुरुषांना ओळखत नाहीस. त्याने इतके वेळा तुझ्याभोवती एखाद्या फुलपाखरासारख्या घिरट्या घातल्या आहेत. पण जराही तुला धक्का लावला नाही. तसेच जर त्याच्या मनात आले असते. तर तो तुला उचलून घेऊन जाऊ शकला असता. त्याला तुझ्या ह्रद्यावरी स्वामित्व मिळवायचे आहे. यालाच प्रेम म्हणतात.”

अंबाला, “ पण मी माझ्या स्वार्थासाठी त्याचा वापर करणे पाप आहे. व त्यास जर मी कोण आहे हे कळले तर त्यास धक्काच बसेल. व एखादा पर पुरुष माझ्या जीवनात मी परीक्षा घेऊनच घेईन.”

त्रिशला, “ पण आपणास बदला घ्यायचा आहे. आपला शेवटचा शत्रू महालात आहे समजलं काय? तू त्याची परीक्षा घे. पण जास्त तानू नकोस. कारण जास्त ताणले की तुटते.”

अंबालाने तिच्या म्हणन्याकडे दुर्लक्ष केले. व ती आपल्या कामात राहिली.

 एकदा ती नेहमीप्रमाणे नदीला पाणी भरण्यासाठी निघाली असता तिला समोरून एक घोडेस्वार येताना दिसला. त्याने अंगावर उंची वस्त्रे घातलेली होती. तिने दुरूनच पाहून उगाच संकट नको म्हणून खाल मान घालून ती निघाली. थोड्याच वेळात तो घोडेस्वार तिच्याजवळ आला. घोड्यावरील स्वार खाली उतरला व त्याने तिच्याजवळ जात हटकले. तेव्हा तिने वर तोंड करून पाहिले. व न पहिल्यासारखे करून ती पुढे जाणार इतक्यात त्याने तिची वाट अडवली. व तिचा हात धरला.

तसे तिने त्याकडे पाहिले. तिने ओळखले की तो महारुद्र आहे ते. त्याने आपल्या बरोबर आणलेली सुवर्णमाला तिच्यासमोर धरली. ती त्याकडे पाहून हसली. व तेथून नदीकडे धावत गेली. ती हसल्याचे पाहून तो खुश झाला. व तिच्यामागे गेला. ते नदीच्या काठी गेले. नदीचे पाणी खळाळत वाहत होते. अनेक झाडांच्या निसर्गरम्य अशा सानिध्यात नदीच्या वाहत्या पाण्यात प्रतिबिंब न्याहाळत उभा असणारी विशाल झाडे. व थोड्याच अंतरावर असणारे वेताचे बेट ज्याचे प्रतिबिंब नदीच्या संत वाहत्या पाण्यात पडले होते. अंबालाने त्या पाण्यात आपले हातपाय धुतले व नदीच्या शीतल जलाने आपली मातीची कळशी धुवून स्वच्छ पाण्याने भरली. अनेक पाखरे तिच्या जवळील पाण्यात तृष्णा भागवून शेजारील वेताच्या बेटात उडून गेली. अंबाने भरलेली घागर काठी ठेवली. व ती पाण्याबाहेर आली. आतापर्यंत शांत निरीक्षण करणारा महारुद्र तिला म्हणाला, “ मला तहान लागली आहे. पाणी मिळेल का?”

अंबाला, “ जवळच इतकी सुरेख नदी वाहत आहे. आपण तिजकडे मागावे.”

महारूद्र, “ पण आपल्या हातच्या पाण्यात एक मधुर चव आहे असे आम्ही ऐकलयं. तेव्हा…”

अंबाला, “ मी काही मधमाशी नाही, जी मकरंदाचे मधात रूपांतर करणारी. जिच्या हातात चव असायला. एक साधारण पारधीकन्या आहे.”

असे बोलत तिने त्याकडे पाहिले त्याचा पेहराव पाहून तो एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. त्याला पाहताच कोणीही त्याच्या प्रेमात पडावे. पण हा या कृष्णवर्णीय कन्येत काय पाहतोय. याची परीक्षा घेतलीच पाहिजे. असे तिने मनात योजले.

ती त्यास चेष्टेने म्हणाली, “ नमस्कार महोदय, आपण आता राजाश्रय धारीत एक अधिकारी आहात. व मी अतिसामान्य पारधी कन्या, आपण असे अलंकार विभूषित आहात. व आपणास दिलेले हे ऐश्वर्य, सौंदर्य पाहता आपणास अनेक सुंदर मुली चालून येत असतील. तेव्हा आपण त्याना वरायचे सोडून माझ्या सारख्या कृष्णवर्णीय रुपी ललनेत असे काय पाहता, मी आपल्या राजपदास शोभेल आशी नाहीये. की आपली दासी ही सुंदर असेल. तेव्हा मजसोबत कोणी पाहिले तर आपणास कोणतरी हसेल. आपण माझ्यात एवढे काय पाहिले? याविषयी आपले प्रयोजन काय ते सांगावे.”

महारुद्रास तिचे बोलणे झोंबले. तो तिच्याकडे पाहत.

क्रमशः पुढे........


Friday, April 7, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३६

 अंबाला एका राजकुमारीची

 प्रेमकथा भाग ३६

क्रमशः पुढे चालू......




नगरनायक मृत पावल्याने तेथील प्रदेशात अराजकता निर्माण झाली. या घटनेचा फायदा उचलण्याचे महाराज वेददत्त यांनी ठरवले. व त्यांनी महारुद्रच्या अखत्यारीत सैन्यदल देऊन त्यास राजधानी व दक्षिण प्रांती असणारी शत्रू सैन्याच्या ताब्यातील नगरे जिंकण्यास पाठवले. महारुद्राने एकामागून एक नगरे जिंकण्यास सुरवात केली. नियोजनबद्धरित्या त्यांनी दक्षिण प्रांतातील उठाव मोडून काढण्यास सुरुवात केली. दक्षिण भागातील एक एक नगर जिंकत त्याने अपरान्त राजाचे सैन्य मागे पिटाळले. त्या सैन्यानी शेवटी राजधानी नगराचा ताबा घेतला. व ते प्रतिकार करू लागले. तेव्हा नगराची संपूर्ण नाकेबंदी महारुद्राने केली. त्यामुळे ते सैन्य नगरात कोंडले गेले. पण नगरतट्टाची शिबंदी फोडता येईना. तेव्हा त्याने व्युव्हरचना तयार केली. चांगले चांगले तिरंदाज घेऊन त्याने दक्षिन बाजूने नगरावर हल्ला चढवला. त्यासाठी त्याने सराईत पारधी नवयुवकांची योजना केली. पारधी लोक नेमबाजीत पटाईत होते. त्यात काही भिल्लकुमार ही होते. त्यांनी दक्षिण दरवाजा उघडणेसाठी तेथील बाह्य पहारा मोडून दरवाजावर रानातून गोळा करून आणलेली लाख ओतली. व त्यावर अग्निबाणांचा वर्षाव केला. लाख कडाडून पेटली. व त्या दरवाजास आग लागली. पण आचार्य वृषभ यांच्या शिष्यांनी ती विझवली. व दरवाजाची शिबंदी फोडू दिली नाही. शेवटी महारुद्राने अरण्यातील विशाल वृक्षाचा बुंधा आणून दरवाजा धडकी देवून मोडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा कठीण होता. शेवटी कमी पहारा बाजूने एक तुकडी घेऊन महारुद्राने चाल केली.

तिरंदाजांची मदत घेत त्यांनी पुढे एका बाजूने तटावर चढून प्रवेश केला. व दरवाजा उघडला. बाकीचे सैन्य आत घुसले. जोरदारपणे रणकंदन झाले. व महारुद्राने राजधानी जिंकून घेतली.

महाराज वेददत्त व महाराणी शामलता तिथे नंतर आल्या. व राजधानी ताब्यात घेतल्यामुळे त्याना खूप आनंद झाला. वेददत्त व शामलता या महालात आल्या. महारुद्राची दक्षिण प्रांतनायक पदी नेमणूक केली. व ते राज्यपाट सांभाळ करू लागले. पण वेददत्त यांना दुसऱ्या काळजीने ग्रासले. कारण एक मुलगा मरण पावला. तर दुसरा मतिमंद व राजकुमारी अंबालाचे देखील काय झाले हे ठावूक नाही. अशा अवस्थेत या राज्याचे पुढे काय होणार ही काळजी त्यांना लागली.

...... ....... ........

महारुद्राच्या पराक्रमाने त्यास दक्षिण नगर प्रदेशाचा कारभार मिळाला होता. त्यामुळे सर्व भिल्लांची ताकद त्या प्रदेशात वाढली होती. त्याने भिल्ल व पारधी वस्त्या सुधारणेस सुरुवात केली होती. तो आता आपल्या मातापित्याबरोबर दक्षिण भागातील नगरात असणाऱ्या भव्य प्रासादात राहू लागला. व आपल्या प्रामाणिक सहकाऱ्यांना आपल्या विभागातील ग्रामांचा प्रमुख नेमले. तो नगरात जरी राहत आसला तरी त्याचे मन अस्वस्थ होते. कारण त्यास त्या कृष्ण कुमारीचे वेड लागले होते. त्यास अनेक सुंदर युवतींनी लग्नाची मागणी घातली होती. तो दिसायला देखणा असल्याने त्याच्या मागे अनेक तरुण युवती लागल्या होत्या. पण त्यांमध्ये त्यास सौंदर्य दिसत नव्हते. त्याच्या नजरेसमोर फक्त ती पारधी युवती तरळत होती. त्याने तिला मागणी घालण्याचे ठरवले.

इकडे अंबाला व त्रिशला नेहमीप्रमाणे रानात कंदमुळे गोळा करत होती. खूप कष्ट केल्यावर थकून त्या दोघी एका उंच शिळेवर बसल्या होत्या. महारुद्र नगरनायक झाल्याची वार्ता त्यांना समजली होती. त्या दोघी थोडा वेळ त्या जंगलातील शिळेवर विसावल्या होत्या. त्यात त्रिशला आंबालेस म्हणाली, “ अंबा महालात राजवैभवात लोळणारी तू व तुझ्यासमोर तेथील मऊशार मखमली अशा पसरलेल्या पायघड्या निघून जाऊन, आपल्या नशिबाशी देवाने असा खेळ केला, की आपली सर्व सुख हिरावून घेतली. किती काळ हा आपला वनवास. ज्या मुलिसमोर नतमस्तक होणारे शिपाई कुठे? व ह्या पारधी वस्तीतल्या व इतर हिंस्र नजरा कुठे? त्यांच्याशी सामना करता आपल्याला सुळावरील पोळी घेण्यासारखा अनुभव येत आहे.”

अंबाला, “ होय, पण या निसर्ग रम्य अशा महालात जगण्याची सवय झाली आहे. फक्त काही कष्ट उपसावे लागत आहेत, पण मी आता ठरवल आहे.”

त्रिशला, “ काय ठरवल आहेस?.”

क्रमशः पुढे....


अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...