अंबाला भाग १७
क्रमशः पुढे चालू......
महारुद्र आता चांगलाच मोठा झाला होता. तो धनुर्विद्येत निष्णात झाला होता. परंतु त्यास आपल्यात काहीतरी कमीपणा जाणवत होता. त्याला तो भयानक प्रसंग आठवला की त्याच्या अंगावर काटा येई. व डोळ्यात अंगारे फुलत असत. अन् मन बदला घेण्यासाठी पेटून उठत होते. त्यासाठी तो सराव करत असे. आता तो खूप मोठा झाला होता. रानात जाणे, वेगवेगळी औषधे जमवणे, शेत कामात मदत करणे , तसेच नगरात जाणे, अशा प्रकारे तो सर्व व्यवहार करू लागला.
उत्तर कुंतलात राजधानी पासून जवळ असणाऱ्या महादेव मंदिरात दरवेळी एक मोठा उत्सव भरत असे. प्रांता प्रांतातून अनेक शैवपंथी लोक येत असत. अनेक भगवाधारी लोकांची तर जत्राच उतरे. मोठा महाशिवरात्रीचा उत्सव तेथे भरत असे. भिल्लमाने देखील महारुद्रास शिवदर्शनास घेऊन जायचे ठरवले. तो आपल्या वस्तीवरील भिल्ल बांधवांना घेऊन महादेव दर्शनास निघाला. पायी मजल दरमजल करत प्रवासात कुठे निवारा भेटेल तिथे थांबत. तसेच धर्मशाळेत थांबत ती पुढे चालली. पुढे त्यांना कुंतल प्रदेशातील एक विशाल तटिनी किनारी आली. महादेवाचे तीर्थक्षेत्र जवळीच एका नगरात होते. त्या सर्वांनी वाटेत त्या नदीकिनारी आल्यावर स्नान केले. तेथे अनेक प्रांतातून साधूंचे जथ्थे आलेले होते. महादेव नगरकडे त्यांच्या व लोकांच्या अनेक रांगा लागल्या होत्या.
भिल्लम व त्याच्या सहकाऱ्यांनी नदीत स्नान संध्या करून ते नदीपार आले. जंगल वाटेने पुढे मुख्य मार्गावर आले. तो मार्ग महादेव मंदिर असणाऱ्या नगराकडे जात होता. उत्सवामुळे अनेक लोकांची यातायात होती. पुढे ते थोड्या वेळातच नगरात पोहोचले. हिरव्या गर्द झाडीत असलेल्या नगरात पुष्कळ लोकांची गर्दी जमली होती. वाद्ये वाजत होती. अनेक स्त्री पुरुष साजशृंगार करून महादेव दर्शनास आली होती. पेठेमध्ये अनेक दुकाने सजली होती. जवळच मंदिरास लागून असलेल्या सदावर्तेत भोजन व्यवस्था केली होती. महाराजांनी दर्शन घेतल्यानंतर यात्रेस जोर चढत असे. तोपर्यंत इतरांना दर्शनास मज्जाव होता. महाराज प्रभातीच दर्शन घेऊन राजधानीस गेले होते. त्यामूळे इतर लोकांची दर्शनास रांग लागली होती. भिल्लमाने महारुद्र व आपल्या सहकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले. व तो पेठेमध्ये आला. महारुद्र खूप आनंदात होता. कारण त्याने यापूर्वी कुंतल प्रदेशातील दक्षिण भगातील गर्द झाडी शिवाय काही जास्त पाहिले नव्हते. आज त्यास उत्सवामुळे खूप काही पाहायला मिळाले होते. उत्सवात फिरून दिवसभर त्याने उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला व संध्याकाळी तो आपले वडील व वस्तीवरील लोक जिथे थांबले होते तिथे आला. भिल्लमास त्याची काळजी वाटत होती.त्या दिवशी त्यांनी अन्नछत्रात जेवण केलं. व रात्री धर्मशाळेत विश्रांती करायचे ठरवले. पण तेथे खूप गर्दी असल्याने त्यांनी बाहेर पाल मारून राहणे पसंत केले. त्या रात्री मंदिर प्रांगणात चौकावर नृत्य कार्यक्रम असल्याने ती रात्र त्यांची तो पाहण्यात जाणार होती. अनेक लोक तो कार्यक्रम पाहण्यात घालवणार होते. रात्र झाली. सर्वांनी जेवण केले. सर्व जण तेथे आले. तेथे मंचकावर यक्षिणी हजर झाल्या. सैनिकांच्या पहार्यार्त नृत्याचा व गायनाचा कार्यक्रम सुरू झाला. यामधे प्रथम गणेश वंदन, तदनंतर शिवलीला, तद नंतर भिलिनीची कथा नृत्यातून सांगण्यात येत होती. भिल्ल थोड्या अंतरावर बसले होते. महारुद्र बाजूला आपल्या वर्गातील मुलांत बसून नृत्य पहात होता. नृत्याचा आनंद अनुभवत होता.
महाराज जयवर्धन दुसऱ्या दिवशी पूर्व प्रांतातील बंडखोरांना शासन करण्यास जाणार असल्याने ते नृत्य महोत्सवास जाणार नव्हते. यासाठी महाराणी अरुणावती कार्यक्रमास हजर राहणार होत्या. सुरक्षा कारणास्तव महारानींनी तिथे महोत्सवात राजकुमारी अंबालेस नेले जाणार नव्हते. कारण राज्यातील व राज्याबाहेरील अनेक लोक तिथे आलेले होते. त्यात एखाद्या शत्रू राज्यातील हेर ही असू शकतो. या कारणे अंबालेस मज्जाव केला होता. त्यामुळे यक्षिणी नृत्य पाहण्याच्या आंनादावर विरजण पडले होते. राजकुमारी आपल्या महालात तळमळू लागली. तिची ही तळमळ त्रिशलेस दिसत होती. पण तिचा नाईलाज होता. कारण महलाबाहेर व तेथे शिव मंदिर नगरात ही कडक पहारा होता.
राजकुमारी अंबालेने तरीदेखील तिथे जायचे ठरवले. त्यासाठी धाडस करायचे त्रिशलेने ठरवले. .
राजप्रासादातील आपल्या कक्षातील दिवे राजकुमारीने मालवले. व आपल्या दास्यांना तिने कक्षाबाहेर घालवले. व प्रात. सूर्योदयापर्यंत कोणीही कक्षात यायचे नाही व तिने त्याना बाहेर घालवले. थोडा वेळ झोपेचे नाटक केले. नंतर त्या दोघींनी सर्वत्र सामसूम झाल्याचे पाहिले. व त्या स्नानगृहात आल्या. तेथील चुलीवरील भांड्यांची कालिक त्रिशलेने काढली व ती अंबालेच्या हातापायावर लावली. ते पाहून राजकुमारी म्हणाली, “ त्रिशले याची काही आवश्यकता आहे का?”
त्रिशला, “ होय, कारण आज तेथे सक्त पहारा आहे. व तुला पहारेकरी सहज ओळखतील तेव्हा…”
अंबाला, “ पण या कालिकेने माझे सौंदर्य बिघडेल त्याचे काय. मजकडे कोणी पाहणार देखील नाही.”
त्रिशला, “ तुला या रंगात जो कोणी पसंत करेल तोच तुझा राजकुमार समज. नाहीतर गोरी कातडी पाहिल्यावर अनेकजन भाळतात. खर प्रेम तुला या रंगातच भेटेल. यातच कोणतरी पसंत करेल तुला.”
राज कुमारी अंबाला, “ पण आज रात्री अंधारात कोण पाहिलं. व आपण तर यक्षिणी गान पाहणार आहोत.”
त्रिशला, “ राजमहालात अनेक ललना नृत्य करणाऱ्या असताना तुम्हास तिकडे का जावे वाटते.”
अंबाला, “ इथे सर्व नतमस्तक असतात. बाहेर सर्व खुले असते. त्यातील कौतुक काही औरच असते.”
त्रिशला राजकुमारीच्या अंगावर कालिक लावते. व त्या दोघी नेहमीप्रमाणे त्या गुप्त मार्गातून बाहेर पडून त्या नगरात गेल्या. मंदिर प्रांगणात शिपायांची नजर चुकवून त्या एका छोट्या आळीतून तेथे गेल्या. तेथे कोठे जागा भेटते क ते पाहू लागल्या. राजकुमारीच्या कृष्ण कांतीमुळे कोणीही जवळ बसन्यास जागा देईना. शेवटी त्या एका बाजूस जाऊन बसल्या. व नृत्य पाहू लागल्या. नृत्याचा आनंद घेऊ लागल्या. नृत्य करणारी नर्तिका यक्षिणी असलेने तिचे नृत्य कधीही महालात होत नसे. ती देवसेवेशी संबंधित होती. अशा अनेक यक्षिणी राज्यातील तेथील अनेक ग्रामात असत. त्या देवी नृत्य सादर करत. देवसेवा करत. त्यांचे नृत्य हे रजनर्तिकींपेक्षा सरस असे. अंबाला शेजारी अनेक निमवर्गातील स्त्रिया बसल्या होत्या. नृत्य पाहताना एक खांबनी अडवी येत होती. त्या कारणे नृत्य पहाण्यात व्यत्यय येत होता. अंबाला तेथून उठली व मागे गेली. तिथे एका कट्यावर छोटीशी जागा होती. तिथे जाऊन बसली. व नृत्याचा आनंद घेऊ लागली. थोड्या वेळाने तिच्या जवळ त्रिशला आली. व दोघी यक्षिणी गान ऐकू लागल्या. तीन प्रहर होताच घंटा नाद झाला. त्रिशला तिला चलण्यास खुणावू लागली. पण अंबाला ऐकेना. त्या दोघींची खुसर फुसर एकूण तिथे जवळच मुलात बसलेल्या महारुद्रास कार्यक्रम पहाताना त्रास होऊ लागला.
क्रमशः पुढे,....





