Saturday, March 4, 2023

अंबाला भाग २३

 अंबाला भाग २३



क्रमशः पुढे चालू....

त्रिशला आता सावरली होती. तिच्या शरीरावरील वस्त्रे फाटली होती. तिला आधार देत अंबालेन उठवले. तेथील विशाल अशा झाडाला टेकून बसवले. तिची छाती दडपली गेल्याने सुस्कारे देत होती. किशोर अवस्थेतील जीवनातील कठीण प्रसंगाना त्यांना सामोरे जावे लागत होते. थोडावेळ सावरल्यावर अंबालेने त्या मृत युवकाच्या पाठीतील तलवार काढून घेतली. नंतर तिने ती जवळील नदीच्या डोहात स्वच्छ धुतली. नंतर स्नान करून त्रिशलाजवळ आली. आपले अंग त्रिशलेने आणलेल्या वस्त्रातील एका रुमालाने कोरडे केले. तदनंतर तिने आणलेला पेहराव्यातील एक पेहराव तिने परिधान केला. नंतर आपली वस्त्रे धुवून तिने घेतली. तोपर्यंत त्रिशला सावरली होती. ती ही फ्रेश झाली. नंतर त्या दोघींनी पिण्याच्या पाण्याची पिशवी भरून घेतली. व त्या दोघींनी आपले साहित्य उचलून घेतले. व पेठेतून आणलेलं खाद्य खात त्या पुन्हा अरण्य वाटेस लागल्या. अरण्यातील दक्षिण कुंतल प्रदेशाच्या दिशेने त्या निघाल्या. पुढे थोड अंतर चालून सुरक्षित ठिकाणी आल्यावर त्यांनी एके ठिकाणी विश्रांती घेतली. तिथे त्यांनी अल्पोपहार केला. तदनंतर त्या अरण्य वाटेने पुढे चालल्या. पश्चिम क्षितिजावर सूर्य अस्ताला निघाला होता. त्याचा अंदाज घेऊन त्याच्या विरुध्द दिशेने त्या निघाल्या होत्या. अरण्यातून चालून त्यांचे पाय बळकट झाले होते. या प्रवासात त्यांना अजिबात सुखासीन निद्रा भेटली नव्हती. सांज होईपर्यंत त्यांनी अपरांत सीमा पार करून त्या दक्षिण कुंतल प्रदेशात आल्या होत्या. तिथे यायला अंधार पडू लागला होता. ज्या ततलवारीच्या धाकावर त्या आपले रक्षण करत आल्या होत्या. तिचं त्यांची अंगरक्षक होती. आता रात्र झाली. त्यांनी तिथे सुरक्षित ठिकाणी मुक्काम करायचे ठरवले. आतापर्यंत अनेक रात्री त्यांनी अरण्यात काढल्या होत्या. पण ही दक्षिण कुंतल प्रदेशातील अरण्यात असणारी रात्र कंठने अवघड होते. कारण येथील अरण्य निबीड अन् हिंस्र श्वापदांनी भरलेली असल्याने तेथील रात्री अत्यंत भयावह असत. ती रात कंठने अवघड होते. त्या दोघींनी तेथील एका वटवृक्षावर रात्री विश्रांती घ्यायचे ठरवले. व त्या त्या वृक्षावर चढल्या. त्यांनी आपल्या साहित्याच्या पिशव्या त्या वृक्षाच्या ढोलीत सुरक्षित ठेवल्या. व कुठे जळावू समिधा मिळतात का? ते पाहू लागल्या.

त्यांना तिथे जवळच एक वृक्ष उन्मळून पडलेला दिसला. त्याच्या मुळाशी काही पाला गोळाकरून त्यांनी अग्नी प्रज्वलीत केला. त्रिशलेने पेठेतून आणलेल्या शिद्यामध्ये असणारे काही हरभरे व काही जोंधळे तिने आपल्या थैलीत ठेवले होते. ते काढून तिने जाळावर भाजले. व अंबालेस दिले. व थोडे तिने खाल्ले. तसेच रानातून वावरताना मिळालेली काही रानफळे देखील त्यांनी खाल्ली. व पेटपुजा झाल्यावर तिने तो विस्तव त्या मृत उन्मळलेल्या झाडाच्या मुळाशी टाकला. त्याने ते हळूहळू धुमत पेटू लागला. ते पेटल्याचे पाहताच त्या विशाल वटवृक्षावर चढल्या. रात्र आता चांगलीच झाली होती. जवळ असणारी कातडी पिशवी हाच काय तो पिण्याच्या पाण्याचा आधार होता. पण रात्र जशी होऊ लागली तशी हिंस्र श्वापदे तिथे फिरू लागली. पण अग्नीच्या भीतीने ती जवळ फिरकत नव्हती. पण काहीं माकडे या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत आली. वाकुल्या दाखवत कर्ण कर्कश आवाज करत ती या फांदीवरून त्या फांदीवर नाचू लागली. ती वृक्षावर थैमान घालत त्यांजवळ आली. तशी अंबाला अन् त्रिशला अरुंद धारदार तलवारी उपसून संरक्षणासाठी सिद्ध झाल्या. व एकमेकींना खेटून झाडाच्या बुध्यावर असणाऱ्या रुंद फांदीवर उभा राहिला. व आपला तोल जाऊ नये म्हणून त्यांनी फांद्यांचा आसरा घेतला. दिवसभर चालून संपूर्ण देह थकला होता. त्यामुळे त्यांच अंग चांगलच ठणकत होत. परंतु आता ही वेळ निद्रा घेण्याची नव्हती. त्यांच्या पुढे आपल्या दाताच्या वाकुल्या दाखवत भुभूंकार करत माकडे मर्कट चेष्टा करण्यास आली होती. त्यांनी त्यांच्या देहयष्टीवरून ओळखले होते की या दोघी स्त्रिया आहेत. त्या कारणे त्यांना अधिकच उत आला होता. ती वेगाने त्या वडाच्या झाडावर आलीत. त्या किर्र काळोख्या रात्री अंधारात तो वडाचा निसर्ग किल्ला लढवण्यास त्या दोघी सिद्ध झाल्या होत्या. माकडे एकामागून एक त्या वडाच्या पारंब्याना खेळत झाडावर चढली. व त्यांनी एक एक फांदी हेरण्यास सुरवात केली. अचानक एका माकडाने एका पारंबीच्या साहाय्याने त्यांच्या पुढ्यात उडी टाकली. तशी ती त्रिशलेच्या पायात पडली. त्रिशलेने क्षणाचाही विलंब न करता त्यास जोरदार लात मारली. एखादा वाटोळा भोपळा उंचावरून खाली पडावा तस ते पडलं. ते पडल्यावर ओरडले. तशी इतर माकडे त्यांच्याकडे खुणसी नजरेने पाहू लागली. तेवढ्यात एका माकडाने पारंबीच्या सहाय्याने झेप घेतली व अंबालेच्या दंडास वाकोरा काढला. व शेजारील फांदीवर जाऊन ते नाचू लागले. आपली खोडी यशस्वी झाली हे पाहून त्यास आणखी जास्तच चेव चढला. व पुन्हा ते पारंबीच्या साहाय्याने झेपावले. आता मात्र अंबा सावध होती. तीने आपल्या हातातील तलवारीने त्याच्या हातात असणारी पारंबी कापली. पारंबी तूटताच त्या माकडास आपण केव्हा जमिनीवर आदळलो हे लक्षातच आले नाही. एकाने तर थेट आंबेच्या अंगावर उडी मारली. त्याने आंबेचा तोल गेला. खाली पडणार इतक्यात तिने पारंबी धरली. त्या माकडाचा ही तोल जाऊन त्याने तिचे केस धरले. व ते लोंबकळू लागले. तिच्या तोंडातून वेदनेने एक कळ आली. ते त्रिशलेच्या लक्षात येताच चपळाईने तिने त्याची बोटे छाटली. ते रप्प दिशी खाली पडले. माकडांचा हल्ला त्या दोघी शांत डोक्याने एखादा उठाव योजनांबद्धरित्या मोडावा तशा त्या मोडत होत्या. अन् त्यांना या कामी साथ देणार कोण असेल तर ते शेजारी असणाऱ्या मृत वृक्षामध्ये धगधणारी अग्निदेवता.

क्रमशः पुढे........

Friday, March 3, 2023

अंबाला भाग २२

 

अंबाला भाग २२



क्रमशः पुढे चालू.....

आतमध्ये आल्यावर त्रिशलेने आपल्या कमरेला असणाऱ्या रुमालात बांधलेले ते सुवर्ण नाणे त्यापुढे सादर केले.

त्रिशला, “ महाशय ही घ्या पहा.”

ते नाणे न्याहाळून तो सोनार तीस म्हणाला, “ हे जरा खराब झाले आहे. तेव्हा मी तुला करून योग्य तो धातू दर देईन.”

त्रिशला, “ हो चालेल. पाहा करून.”

तिचे म्हणणे ऐकताच त्याने तो सुवर्ण शिक्का घेतला. त्याची तुला केली. व त्याची किंमत त्याने वीस तांब्याचे सिक्के अशी केली. तेव्हा तिने आश्चर्य मुद्रेने त्याकडे पाहिले. व ती म्हणाली, “ महाशय, या नाण्याचे मूल्य अपरांत देशी किमान ऐंशी ताम्र सिक्के आहेत. आपण शुद्ध मला फसवताय. मला माझे नाणे इथे विकावयाचे नाही. तेव्हा आपण ते परत द्या.” ती ते घेऊन बाहेर निघणार तोच तो म्हणाला “सदर नाण्यावर कुंतल देशाची मोहोर आहे. ज्या कारणे ती इथे खपणे अत्यंत अवघड आहे.”

त्रिशला, “ते माझं मी पाहीन.”

ती जातेय ते पाहून त्याने चाळीस ताम्र सिक्के देतो असे सांगितले. तेव्हा त्रिशला त्यास म्हणाली, “सत्तर सिक्क्यांच्या खाली एक छदाम कमी करणार नाही.”

 तेव्हा त्याने ते मान्य केले. व सत्तर ताम्र शिक्याचे बदल्यात तिने ते नाणे त्यास विकले. व मिळालेली रक्कम घेऊन ती त्या सुवर्णकार देवडीतून बाहेर पडली. मनातल्या मनात त्यास तिने अनेक दूषणे दिली.

“ कर्का पेक्षा ही कटू आहेत अपरान्त वासी.”

असे बोलून ती पेठेतून फिरू लागली. पेठेत फिरून तिने काही साधी सुती वस्त्रे खरेदी केली. तसेच तिने थोडा सिधा खरेदी केला. व पेठेतून आपल्याला काय हवे काय नको ते ती पाहू लागली. मनमोकळ्यापणाने खरेदी करत तिने मिठाई पेठेतून काही मिठाई खरेदी केली. आता स्वसंरक्षणासाठी काही शस्त्र हवी होती. ती लोहार पेठेत गेली. तिथून तिने धारदार लहान शस्त्र खरेदी केली. लोहाराने चौकशी करताच ती म्हणाली, माझ्या ग्रामी भुरट्या चोऱ्या होतायेत. तेव्हा संरक्षण करण्यासाठीं त्याची आवश्यकता आहे. व तिने ती खरेदी केली. व पुढे ती तेथून आलेल्या वाटेने बाहेर पडली. व थेट अरण्यात जिथे अंबाला थांबली होती तिथे आली. तिथे आल्यावर तिने पाहिले की अंबाला तिथे नाही आहे. तेव्हा ती काळजीने इकडे तिकडे शोध घेऊ लागली. आपल्याकडील साहित्य तिने एका जाळीत लपवले व ती शोध घेऊ लागली. इतक्यात तिच्या खांद्यावर मागून येत कोणीतरी हात ठेवला. ती थोडी दचकली. तिने मागे वळून पाहिले. तर तिच्या मागे एक काळसर रंगाचा एक युवक उभा होता. त्यास झिडकारून ती थोडी मागे सरली.

त्याच्या देहावरील पेहराव व रंग कांती पाहता तो इथलाच असावा हे तिने जाणले. अचानक तिच्या लक्षात आले. की ती जेव्हा पेठेत वस्त्रे खरेदी करत होती. तेव्हा हा तिथे होता. व आपल्या मागे हा आला आहे हे तिने हेरले. तो पुढे पुढे येत आहे हे पाहताच ती त्यास म्हणाली, “ कोण आहेस तू? व असे माझ्या मागे येण्याचे प्रयोजन काय?”

 तो तरुण हसू लागला. इतक्यात झाडीतून त्याचे आणखी दोन साथीदार आले. व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्रिशलेस पकडले. त्रिशला प्रतिकार करू पाहत होती. पण बेसावध होऊन त्यांनी तिला पकडले होते. व खूप चालल्याने व श्रमहार झाल्याने तिचे शरीर थकले होते. व ते खूप आडदांड होते. त्यांनी तिला घट्ट पकडले होते. तिने अंबा म्हणून हाक मारली. जवळच रानात खूप भुकेने व्याकूळ अंबा रानफळे गोळा करत होती. तिला त्रिशलेची हाक ऐकू आली. तिने आपल्या उपरण्यात घेतलेली फळे टाकून धावतच ती तिकडे आली. तिने पाहिले तिन तरुण त्रिशलेवर जबरदस्ती करत आहेत. तिने चपळाईने हालचाल केली. व त्या युवकांना जराही सावध होऊ न देता आपल्या तलवारीने हल्ला चढवला. पहिल्या घातक वाराने तिने एकास जागीच ठार केले. दुसऱ्याचा एक हात तुटला. तो बाजूस झाला. तिसऱ्यास सावध होऊ न देता तिने त्याचा कंठ छेद केला. एकच रक्ताची चिळकांडी उडाली. त्याचे मुंडके धडा वेगळे झाले. व कदंब थरथरू लागले. ही थरारक झटापट पहाता तो तिसरा युवक घाबरून पळू लागला. पण त्यास सोडणे धोक्याचे होते. अंबालेने वेगाने चपळाई दाखवत त्याचे पाय मारले. व नंतर त्याच्या पाठीत तलवार खुपसून त्यास ठार केले. तो सोडण्यासाठी विनावत होता. पण त्यास सोडणे म्हणजे आपले जीव धोक्यात घालणे होत. म्हणून अंबेने त्यास ठार केले.

क्रमशः पुढे.......

अंबाला भाग २१

 अंबाला भाग २१




क्रमशः पुढे चालू......

अचानक महाराज जयवर्धन यांची ग्रहदशा फिरली. व कुंतल देशावर शत्रू चालून आले. राज्याच्या उत्तर सीमेवर असणाऱ्या गंगेश व राजा नागदुर्ग यांनी संगनमताने कुंतल प्रदेशावर हल्ला केला. त्याचा बीमोड करण्यासाठी महाराज जयवर्धन व प्रधान वेददत्त गुंतलेले असताना याच घडीचा फायदा घेण्याचे अपरान्त देशाच्या राजा वैष्णवदत्त याने ठरविले. त्याने दक्षिण कुंतल प्रदेशातील नगर नायक व त्याचा नातलग आचार्य वृषभ यांच्याद्वारे बंडखोरी करून आणली. व आपले काही सैन्य घुसवून त्याने राजधानी वर आक्रमण केले.

अचानक झालेल्या हल्ल्यास तोंड देण्यासाठी महाराणी अरुणावतीनी नगरवाशी सैन्य व काही लोकांच्या सहकार्याने राजधानीच्या संरक्षणाची तयारी चालवली. त्यांनी जातीन नगर तट्टावर पहारा बसवला. याने जोरदार रणकंदन सुरू झाले. आचार्य वृषभ यांचे शिष्य युद्ध कलात तरबेज असल्याने त्यांनी राजधानी नगराची शिबंदी फोडली. व प्रधानाच्या वाड्यावर हल्ला चढवला. व त्यांनी प्रधान पत्नीस कैद केले. व त्यांनी सरळ राजवाड्यावर हल्ला केला. राजवाड्यात जोरदार रणकंदन सुरू झाले. राजवाड्यावर हल्ला होताच महाराणी दासी दुश्यलेस राजकुमारीला राजवाड्याबाहेर सुरक्षित काढण्यास सांगतात. व स्वतः हाती तलवार घेऊन लढू लागतात. राजकुमारीस घेऊन तसेच त्रिशलेस घेऊन दासी दुष्यला गुप्त मार्गे जाऊ लागली. जाताना ती राजकुमारीच्या गळयात आपल्या गळ्यातील पारधी दैवत असलेली चैन घालते. व काळजी घ्या अस सांगत तिला गुप्त मार्गे नेऊ लागली. जाताना अंबाला तिला म्हणाली, “ आपण मागे फिरू लढू शत्रू संगे.”

दुश्यला, “ ते एवढं सोप नाही. व आपले सैन्य देखील युद्धात गुंतले आहेत. व हे आक्रमण राज्याचा नाश करणारे ठरू शकते. इथली काळजी न करता तुम्ही इथून सुखरूप जाणे गरजेचे आहे. इथून तुम्ही बाहेर पडल्यावर वेशांतर करून दक्षिण कुंतल प्रदेशातील अरण्य आश्रयाने राहावे. व नंतर परचक्र नाही शमले तर वेशांतर करून दक्षिण कुंतल प्रदेशातील पारधी वस्तीत माझा भाऊ राहतो त्याचे नाव सुपर्ण आहे. जो मदिरापन करणार आहे. त्यास तुम्ही माझी कन्या आहात हे सांगा. व आश्रय मिळवा. पण सावधगिरीने राहावे. वेळ पडल्यास गौरवर्णीय कांती काजळी लावून झाकावी. सोबत त्रिशला आहेच. पण शत्रू पासून सावध रहा.”

त्या तिघी गुप्त मार्गे तिकडे जाऊ लागल्या. जातेवेळी अरण्य मार्ग बंद असल्याने दुश्यलेने त्या दोघींना पाण्याच्या मार्गे जाण्यास सांगितले. जो नगरा बाहेरील एका तळ्यामध्ये निघत होता. त्या मार्गे त्याना जाण्यास सांगून ती जाताना एक मोहरांची थैली त्यांकडे देत,

“ परमेश्वर कृपा झाली तर पुन्हा भेटू. त्रिश्रला आता अंबालेची काळजी तुलाच घ्यावी लागेल.” असे बोलून तीने त्यांना पाठवले. व शत्रू दिशाभूल करण्यासाठी अरण्य गुप्त मार्ग तिने उघडला. तोपर्यंत राजमहालात रणकंदन झाले. महाराणी अरूणावतींना लढता लढता वीर मरण आले. व शत्रू गुप्त मार्गात शिरले. त्रिशलेने अंबालेचा हात धरला. व तिला खेचत तिने त्या पाण्याच्या गुप्त मार्गे ती घेऊन गेली. दुश्यला गुप्त मार्ग उघडतं असताना शत्रू सैन्य तिथे आले. ती त्यांशी लढू लागली. तेथे पडलेल्या मृत सैन्याच्या भाल्याने तिने पाहता पाहता चार शत्रू सैन्य ठार केले. व ती गुप्त मार्गे बाहेर पडत असताना शत्रू सैन्याचा शर तिला लागला. त्यांच्याशी लढताना तिला वीरमरण आले.

…… …… ….. ….. …. ….. ….. ….

महालातील गुप्त मार्गे पाण्यातून वाट काढत अंबाला व त्रिशला बाहेर एका तलावात पडल्या. तो तलाव नगरा बाहेर एका अरण्याजवळ निघत होता. त्या दोघी थेट अरण्यात शिरल्या. व त्या कुंतल देशाच्या दक्षिण प्रांती असणाऱ्या निबीड अरण्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. अरण्यात असणाऱ्या काट्या कट्यातून जात त्या पुढे चालल्या. शत्रू सैन्यास चकवून त्या पुढे निघाल्या. जवळ असणारी मोहोरांची थ्यैली ही पुढील निर्वाह करण्यास मदत करणार होती. ती सांभाळणे व राजकुमारी चे संरक्षण करणे व ती शत्रू सैन्यास दिसणार नाही ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्रिशलेवर होती.

त्या दोघी त्या हिंस्र श्वापदांनी भरलेल्या निबीड अरण्यातून मार्ग काढत वाटेत मिळणारी फळे व कंदमुळे खात त्या दोघी अरण्यातून निघाल्या. पुढे त्यांना एक नदी लागली. जी अरण्यातून वाहत होती. तिच्या झुळझुळ पाण्यात स्नान करून त्यांनी जळ प्राशन केले. अरण्यातून चालून थकल्याने त्यांनी तिथे एका वृक्षाखाली विसावा घेतला. अचानक तिथे एक सर्प हजर झाला. त्यास पाहून त्रिशला घाबरली. अंबाला ने पाहता पाहता त्याचे तलवारीने तुकडे केले. थोडा वेळ विसावून त्या पुढे निघाल्या. अरण्यातून जाताना येणाऱ्या कडू गोड आठवणींचा अनुभव घेत त्या पुढे निघाल्या. अंधाऱ्या रात्री सुरक्षित अशा ठिकाणी निवारा घेत त्या अरण्यातून त्या दोन किशोर वयीन मुली , ज्या वयात लाजत मुरडत साज शृंगार करत फिरावे त्या वयात जीवन प्रवासात तारुण्याच्या उंबरठयावर अरण्य प्रवासात येणारे अनुभव घेत धीट होत चालल्या होत्या. पुढे त्या सह्यगिरी श्रृंखला पार करून अपरांत हद्दीत गेल्या. तिथे पुढे एक मोठे ग्राम लागले. शत्रूच्या हद्दीत व निबीड अरण्यास लागून ते ग्राम असल्याने शत्रू सैन्याचा तिथे राबता नव्हता. ज्याने त्यांस धोखा नव्हता. व शत्रू त्यांना तिथे शोधणे शक्य नव्हते. तेथील ग्रामाबाहेर असणाऱ्या अरण्यातील एका विशाल वृक्षावर आंबलेस थांबवून त्रिशलेने तिच्याकडील थैलितील तिने एक सुवर्ण मोहोर घेतली. ती एक सिक्का असणारी होती. ती तिने अरण्यातील एका दगडावर ठेवून ठेचली. ज्याने तिच्यावरील खूणा अस्पष्ट होतील. तदनंतर ती पुढे त्या विशाल ग्रामाकडे निघाली. तिथे जाताना कुठे शिपाई वा सैन्य नाही याची खात्री करुन ती पुढे उंच जंगल झाडीकडून त्या ग्रामी शिरली. चौकशी करत ती पुढे निघाली. तेथे असणाऱ्या सोनार पेठेची चौकशी तिने केली. तेव्हा तिला एका व्यक्तीने दक्षिणेकडे बोट करत त्या दिशेला असल्याचे सांगितले.

ती पुढे चालत गेली. पुढे कोपऱ्यावर असणाऱ्या पाणक्याशी लाघवी बोलत तिने दागिने बनवणाऱ्या सोनाराची चौकशी करताना तिला त्याकडून समजले की सोनारपेठेत कोणता सोनार व्यवहारी चांगला व वाईट आहे ते.

व ती पुढे निघाली. सोनारपेठेत असणाऱ्या मध्यभागी एका कंजूस सोनारकडे ती मोहोर घेऊन गेली. बाहेरून सोनार देवडीचे तिने निरीक्षण केले. ज्या सोनाराकडे जाऊ नको असे सांगितले होते. त्याकडेच तिने ती मोहोर विक्री करण्याचे ठरवले. व ती त्या सोनार देवडीच्या आत मध्ये गेली. तिथे गेल्यावर…

त्रिशला, “ कोण आहे का?”

देवडीच्या आत कारागिरी करणारा सुवर्णकार बाहेर तिचा आवाज ऐकून आला.

सोनार, “ काय काम आहे. अलंकार हवेत का?”

त्रिशला, “ मी जवळील ग्रामातील एक रहिवाशी असून माझे पिता कुंतल देशात एक कारागीर आहेत. काही महिन्यांपूर्वी ते इथे आले असता त्यांनी मज उदरनिर्वाह करण्यासाठी काही धन दिलेले होते. त्यातील ही एक मोहोर, ती मज विकावयाची आहे. तिचे योग्य मूल्यमापन करावे. अन् योग्य ती रक्कम द्यावी.”

गिऱ्हाईक आल्याचे पाहून त्या सोनाराने तिला आतमध्ये बोलावून घेतले.

क्रमशः पुढे......


Friday, February 24, 2023

अंबाला भाग २०

 अंबाला भाग २०



आचार्य यांचा आश्रम विशाल व खूप मोठा होता. निसर्गरम्य अशा सह्याद्री पर्वत श्रृंखलेत असल्याने त्या परिसरात अजस्त्र अशी वनसंपदा होती. महारुद्र तेथील अरण्यातून वेगवेगळी फळं गोळा करून आणून देऊन तो सर्वांच्या भोजनाची तयारी करत असे. तो हळूहळू त्यांच्या वेगवेगळ्या कला पाहून त्याचे अनुकरणाने वेगवेगळ्या कला शिकला.

आचार्य यांची देखील तो सेवा करीत असे. आचार्य यांनी त्यास स्वसंरक्षण व वाचन लेखन करण्यास शिकवले. त्यामुळे त्यास अश्मक व कुंतल प्रदेश तसेच अपरांत देशातील भाषांचा वापर करणे त्यास जमू लागले. तो एक भिल्ल असलेने त्याने आश्रमातील साधूंनाही बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणेस शिकवले. ज्याने एखादे प्रदेशात भिक्षा न मिळाल्यास भिक्षू अशा तऱ्हेच्या वस्तू बनवून विकतील व उदरनिर्वाह करतील.

 दिवस सरू लागले. महारुद्र गुरू परवानगीने आपल्या माता पित्यास भेटनेस जात असे. आता सहा वर्ष झाली त्यास या आश्रमात येऊन. त्याने तिथे बरेच विद्यार्जन केले. त्याचा स्वभाव ओळखून आचार्यांनी त्यास राज्यशास्त्र, व इतर सर्व ज्ञान दिले. ज्याने तो एक कुशल वीर म्हणून तयार झाला.

सहा वर्षात त्याने बारा वर्ष घ्यायचे ज्ञान ग्रहण केले. विद्यार्जन झाल्यावर आचार्यांनी त्यास रीतसर निरोप दिला. त्या बरोबर आपल्या काही शिष्यांना देखील निरोप दिला. मेघदूत आचार्यांच्या सांगण्याने ते धम्म प्रचारार्थ निघून गेले. महारुद्राने गो दान करून आचार्य यांचा निरोप घेतला. निरोप घेताना आपण शिकवलेल्या विद्येचा दुरुपयोग वा कुणा निर्दोष व्यक्तीस त्रास न देण्याचे वचन त्यांनी घेतले.

तेथून निरोप घेतल्यावर महारुद्रास ती कृष्णवर्णी कन्या आठवली. तो तिच्या शोधार्थ पून्हा त्या महादेव नगरात गेला. तेथे त्याने सर्वत्र शोध घेतला. पण ती त्यास दिसली नाही. शेवटी निराश होऊन तो परतला. व थेट दक्षिण कुंतल प्रदेशातील आपल्या गावच्या दिशेने मार्गस्थ झाला. वाटेत एका नगरात थांबून तिथे काही रोजगार करून त्याने काही द्रव्य मिळवले. तद नंतर त्याने तेथील लोहाराकडून एक सुंदर तलवार बनवली. तसेच काही शस्त्रे ही बनवली. नंतर तो आपल्या वस्ती वर आला. त्याने तिथे येताना आपल्या भिल्ल लोकांना सुधारून त्यांचा विकास करायचे ठरवले.

महारुद्र आता खूप मोठा झाला होता. तारुण्याची लक्षणे त्यात दिसू लागली होती. नियमित व्यायामाने त्याने आपले शरीर कसोशीने तयार केले. आता तो सुंदर गौरवर्णी रंगाचा देखणा तरुण पाहून सर्व त्याकडे पहात असतं. भिल्लम व सिंघणेस अभिमान वाटे. व त्यांना आपल्या कष्टाचे चीज झाल्या सारखे वाटे. त्याने अनेक भिल्ल तरुणांना एकत्र करून त्याने त्यांना शस्त्र ज्ञान दिले. व आपली वस्ती ही सुधारली. तसेच अनेक भिल्ल कुमारांना स्वावलंबी केले. त्यामुळे भिल्लांची प्रगती झाली.

पण सदर काळात महाराज जयवर्धन यांच्या राज्यावर परचक्र चालून आले होते.

…… ……. ……. ……. ….. ….. …… ……

महाराज जयवर्धन यांचा राजपाट चांगला चालला होता. त्यांच्या राज्यास अश्मक खोऱ्यातील बंडखोरीने ग्रासले होते. उत्तर सीमेवरून होणाऱ्या हल्ल्यांनी राज्याचा हा परिसर अशांत असे. उत्तर सीमेवरील राजे नेहमी कुरघोडी करत. महाराज जयवर्धन आपल्या प्रजेची काळजी मुलांप्रमाणे घेत असत. त्यांनी केलेली सुधारणा तसेच राज्यमार्ग यातायात व कृषी क्षेत्रातील प्रगती याने राज्याची भरभराट झाली होती. त्यामुळे कुंतल प्रदेशाची ख्याती सर्वदूर पसरली होती. त्यामुळे परराज्यातील लोक तिथे येऊन वास्तव्य करू लागले होते. विस्तृत नगरे, नगरांची व्यवस्था, व्यापारी क्षेत्रात झालेली प्रगती पाहून अन्य राज्यांचा जळफळाट होत असे. शत्रूचे हेर राज्यातून फिरत असतं. त्यांच्या कारवायांमुळे राज्याच्या उत्तर प्रांती नेहमी कोणते ना कोणते संकट येत असे. महाराज जयवर्धन यांनी अनेक बंडखोरांना शासन केले होते. पण काहीना काही घडे. प्रधान वेददत्त राजपाटात मदत करत असत. राजकुमारी ही आता तरुण झाली होती. ती त्या गुप्त मार्गे राजमहाला बाहेर जात असे. पण आता राज्यातील अशांतता निर्माण झाल्यामुळे महाराजांनी सर्वत्र कड्क व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे गुप्त मार्गावर ही पहारा ठेवला. त्यामुळे राजकुमारीच्या सर्व योजनांवर निर्बंध आले होते. राजकुमारी रूप पालटून गुप्त मार्गे जाते हे महाराणी अरुणावती यांच्या पट्ट दासीने हेरले होते. तिने ही गुप्त वार्ता राणीच्या कानावर घातली होती.

महाराणी अरुणावती एके दिवशी महालातील मुख्य दालनात बसल्या होत्या. अनेक दासी त्यांच्या सेवेत होत्या. इतक्यात दुश्यला त्यांच्या समोर आली. व त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन,

दुशला, “ महाराणींचा जयजयकार असो.”

महाराणी अरुणावती, “ बोल दुशले काय वार्ता आहे.”

दुश्यला, “ महाराणी मी एक विशेष वार्ता सांगणार आहे. तरी….”

महाराणी अरूणावती, “ एकांत..”

इतर सेवक व दासी कक्षा बाहेर जातात. महाराणी व दुश्यला दोघीच तिथे त्या दालनात असताना…

दुश्यला त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजत ते ऐकूण महाराणी,

“ मला वाटलेच होते. की राजकुमारी काही ना काही आगळीक खोड्या करतेय. आजपासून त्या ठिकाणी कडक पहारा ठेवा. व मध्यरात्री गुप्त भुयारी मार्ग दुसऱ्या मार्गे बंद करावा. मुजवून द्यावा. त्या परिसरातत गुप्त पहारा ठेवावा.”

महाराणीच्या सांगण्यानुसार त्या दिवशी दुश्यलाने दोन खात्रीचे सैनिक घेऊन तो गुप्त मार्ग जंगलाच्या वाटे मुजवला. व जंगल वाटेवर पहारा बसवला. व ही वार्ता येऊन महाराणींना सांगितली. बातमी ऐकूण महाराणी निश्चिंतत झाली.

गुप्त मार्गावर पहारा बसताच राजकुमारीस हि वार्ता समजली. तिला राग आला. ती थेट महाराणीच्या कक्षात आली. तेथे आल्यावर चिडलेली अंबाला, “एकांत…..”

सर्व दासी व सेवक तिथून बाहेर जातात. ते गेल्यावर

अंबाला, “ आई साहेब आपण गुप्त मार्गावर पहारा का ठेवलात.”

महाराणी अरुणावती, “ महालाच्या व आपल्या सुरक्षेसाठी.”

अंबाला, “ मी आता मोठी झालेली आहे. मी स्वतःच संरक्षण करू शकते.”

अरूणावती, “ थोडीशी विद्या ग्रहण केलं की जास्त आपल्याला कळतं अस नाही.”

अंबाला, “ याचा अर्थ…”

अरुणावती, “ बुद्धिवान लोकांना स्पष्टीकरण द्यावे लागत नाही.”

अंबाला, “ याचा अर्थ तुम्ही आम्हास बुद्धिहीन समजता तर.”

अरुणावती, “ हो. जर आपण सुज्ञ असता तर असे गुप्त मार्गे ये जा करून महालाची सुरक्षा धोक्यात नसती आणली असती.”

अंबाला, “ या बद्दल माफी असावी. पण…”

आरुणावतीं, “ पण वगैरे काही नाही. आपल्या काळजीस्तव आम्ही तो निर्णय घेतला आहे. उत्तर सीमेवर शत्रू डेरा टाकून आहे. राज्य सुरक्षेसाठी महाराज गुंतलेत. अन् तुम्ही तुमच्या या तारुण्य सुलभ गौण विचारातून बाहेर या. व पाहा. उद्यापासून शिपायांच्या देखरेखीत राज्याचा हालहवाला पाहून घ्या. आपणास नगरात प्रकट फिरण्याची मुभा देण्यात येईल. पण काळजी घ्या.”

महाराणींचे बोलणे ऐकताच ती चिडून अंतपुरात आपल्या दालनात गेली. नंतर महाराणीनी तिची तिथे जाऊन समजूत काढली.

……. ……. .. .. …….. …… ….

क्रमशः पुढे……


अंबाला भाग १९

 अंबाला भाग १९



क्रमशः पुढे चालू.....

तेव्हा महारुद्र त्यास म्हणाला, “मी देखील त्या व्याघ्रास ठार मारले नाही. त्यास बेशुद्ध केले.”

अशा प्रकारे गप्पा मारत ते बसले. तेवढ्यात महारुद्राच्या मनात विचारांचे काहूर उठल. व त्यास आपण युद्धकलेत तरबेज व्हायचे आहे हे जाणवले. तो त्या साधुस म्हणाला, “ हे महाराज मला आपल्या पंथाकडून शस्त्रज्ञान प्राप्त होईल का?”

साधू, “ हे सर्व आमच्या भिक्षुकांच्या आचार्यांवर अवलंबून आहे.”

तेव्हा भिल्लम म्हणाला, “ आपण तेवढी कृपा करून या मुलास विद्या दान द्यालल का?”

साधू, “ ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहीन. जर का आचार्यांनी मान्य केले तर ठीक. अन्यथा मी यास परत पाठवून देईन.”

थोड्या वेळाने ते तिथून उठले. व पुढे मार्गस्थ झाले. पुढे काही कोस चालल्यावर तेथे एका तिकटीवर ते आले. भिल्लम व त्याच्या सहकाऱ्यांनी दक्षिण दिशेस प्रयाण केले. व महारुद्र आपल्या माणसांचा व पित्याचा निरोप व आशीर्वाद घेऊन त्या भिक्षुरुपी साधूच्या मागे चालू लागला. ते पुढे पूर्व दिशेस निघाले. मजल दर मजल करत ते पुढे एक टेकडी पार करून पुढे एका ग्रामी आले. तिथे आल्यावर सांज झाली. तिथे एका मंदिरात असणाऱ्या ओवरीत त्यांनी आश्रय घेतला. त्या दिवशी रात्री त्यांनी तेथील लोकांकडून भिक्षा मागून आणलेल्या सिध्यातून अन्न शिजवून घेतले. व ते खाल्ले. त्या रात्री ते ग्रामातील लोकांचा देवविधी कार्यक्रम असलेने तिथे कथा सांगितली जाणार होती. सदर ठिकाणी एक श्वेतवस्त्र परिधान केलेला ब्राह्मण कुमार ज्याच्या हाती वीणा नावाचे वाद्य होते. त्याने जय नामक हिंदू धर्म ग्रंथातील तत्वज्ञान सांगितले. तसेच एकलव्य व गुरू द्रोण यांची कथा पण सांगितली. ते त्यांनी श्रवण केली. दोन प्रहरानंतर समारोप झाला. तदनंतर ते तिथे झोपी गेले. प्रातकाली महारुद्र उठला. व त्याने त्या साधूस उठवले. तदनंतर तेथील जवळील विहिरीवर त्यांनी जाऊन स्नान केले. नंतर मंदिर परिसरातील लोकांच्या घरून आणलेली भिक्षा ग्रहण करून त्यांनी पुढे प्रस्थान केले. आता महारुद्र व त्या साधू मध्ये चांगलीच जवळीक निर्माण झाली होती. ते दोघे पुढे मजल दरमजल करत आश्रमात पोहोचले. तेथील निसर्गरम्य असे वातावरण होते. सुंदर उपयुक्त अशा औषधी व फळा फुलांच्या वनसंपदेचे नटलेले ते ठिकाण पाहून महारुद्रास बरे वाटले. तिथे गेल्यावर महारुद्राचा परिचय त्या साधूने अचार्यांशी करून दिला. व येण्याचे त्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा आचार्य महारुद्राकडे पाहत बोलले.

 आचार्य मेघदूत, “ हा काही भिक्षू नाही. सदर विद्या ही फक्त बुध्द धर्मीय साधूस दिली जाते. जे चारिका करत धम्म प्रचारार्थ परदेस गमन करतात. व हा तर एक भिल्ल आहे. जो निरपराध पशू पक्षी यांची शिकार करत फिरतो. हा जर घर संसार त्यागून बुध्द धर्म अनुयायी होत असेल. व धम्म प्रचारार्थ दीक्षा घेत असेल. व त्यानंतर अर्धे तप तो सेवा रूपे इथे घालवत असेल तर त्यास ही विद्या दिली जाऊ शकते.”

आचार्यांचे बोल ऐकूण महारुद्रला खूप वाईट वाटले. कारण संसार त्याग करून म्हणजे आपल्या माता पित्याचा त्याग करणे होय. व तो एकमेव भिल्लम व सिंगनेचा मुलगा होता. त्या कारणे त्याने त्यास विरोध दर्शवला. तेव्हा तो निरोप घेऊन जाऊ लागला. साधू त्याची विनवणी करू लागला. तेव्हा आचार्यांनीनी त्यास विचारले. की तो संसार का त्यागून भिक्कू होत नाही.

 तेव्हा त्याने आपली सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा आचार्य मेघदूत यांनी त्याला विद्या ज्ञान देण्याचे ठरवले. मात्र त्याकडून वचन ही घेतले. की सदर विद्या तो कुणा निर्दोष व्यक्तीवर उपयोग करणार नाही. यासंबंधी वचन घेतले. व त्यास राहण्याची परवानगी दिली. अल्पावधीतच महारुद्राने आपल्या वर्तनातून व कार्यातून सर्वांचे मन जिंकले.

क्रमशः पुढे......



अंबाला भाग १८

 अंबाला भाग १८



क्रमशः पुढे चालू.....

त्याने त्यांकडे पाहिले. व तो त्यांस म्हणाला, “ शांततेनं पाहा की उगाच कशाला बोलत बसलाय.”

त्याचे हे बोलणे ऐकून त्या दोघींनी त्याकडे कठोर नयन कटाक्ष टाकला. त्याने त्या दोघींकडे पाहिले. तो घाबरला. कारण कोणत्याही स्त्रीने त्याकडे अशा नजरेने पाहिले नव्हते. तो घाबरलेला पाहून अंबालेस व त्रिशलेस हसू आले. त्याची ती अवस्था पाहून अंबाला हसू लागली. तिचे हसताना त्या काळ्या रंगात ही सौंदर्य खुलून दिसत होते. महारुद्राने अनेक स्त्रिया पहिल्या होत्या. पण त्या रात्री तेथे असणाऱ्या दिवटीच्या प्रकाशात खुलणारे ते सौंदर्य हे काही निराळेच होते. आपण तिच्यापेक्षा रंगात उजळ असलो तरी ती एक सुंदरतेची मूर्तीच आहे असे त्यास जाणवत होते. तिला सारखे पहात रहावे अशी अभिलाषा त्याच्या मनात जागृत झाली. व तो तेथून मागील बाजूस जाऊन बसला. व तीस न्याहाळू लागला. तिच्याकडे पाहण्यासाठी एक अदृश्य शक्ती त्यास खेचत होती. नृत्य पहात पहात तो तीस पहात होता.

आपणास एक अपरिचित दृष्टी न्याहाळत आहे हे अंबालेस जाणवले. पण तिला आता तिथे शांत राहावे लागणार होते. त्रिशलेच्या नजरेत महारुद्र अंबालास न्याहाळत आहे हे लक्षात आले. ग्रहणात जसे एक ग्रह दुसऱ्याच्या आड यावा. तसे त्रिशला त्या दोघांमध्ये उभा राहिली. महारुद्रला जाणवले की त्या दोघींनी त्यास पाहताना पाहिले आहे. त्याने आपली नजर नृत्य पहाण्याकडे वळवली. पण तो अधून मधून पाहत असे. थोड्या वेळाने त्रिशला अंबालेस खूणवून चलनेस सांगू लागली. अंबाला व त्रिशला तेथून उठल्या. व निघाल्या. थोड्याच समयात त्या गर्दीत दिसेनास्या झाल्या. थोड्याच वेळात त्या तेथून लपत छपत राजमहालाकडे जाणाऱ्या त्या गुप्त मार्गाकडे रवाना झाल्या. काही वेळातच त्या अरण्यातील गुप्त मार्गाजवळ आल्या

व त्या दोघींनी भुयारात प्रवेश केला. त्यांनी दिवटी लावली. व त्या महलाकडे गेल्या. व पुन्हा महालात येऊन त्यांनी मार्ग बंद केला. महालात आल्यावर राजकुमारीने सौंदर्य प्रसाधने लावून स्नान केले. व त्या दोघी झोपी गेल्या.

इकडे महारुद्राची नजर त्या अनोळखी मुलीला शोधत राहिली. पाहता पाहता रात्र सरली. नृत्याचा कार्यक्रम सरला. व दुसऱ्या दिवशी उत्सवाचा समारोप झाला. सर्व यात्रेकरू आपापल्या ग्रामी निघाले. भिल्लम व त्याचे सहकारी ग्रामस्थ आपल्या ग्रामी जाण्यासाठी सामानाची आवराआवर करू लागले. महारुद्र मात्र ती कृष्ण कांती असणारी कन्या कुठे दिसते का ते पाहू लागला. पण ती त्यास दृष्टीस पडली नाही.

सर्व भिल्लांसमवेत आता भिल्लम आपल्या प्रदेशाकडे मार्गस्थ झाला. वाटेतील तटिनीवर स्नान करून ते पुढे निघाले. मजल दर मजल करत ते अप्रांत देशाच्या बाजूने आपल्या देशी जाणार होते. कारण त्या कारणे त्याना नावीन्यपूर्ण निसर्ग पहावयास मिळणार होता. अनेक जंगले , नद्या पार करत ते पुढे मार्गस्थ झाली. वाटेत सुरक्षित ठिकाणी विश्रांती करत ती मार्गक्रमण करू लागली. काही अंतर गेल्यावर मध्य कुंतल प्रदेशातून जाताना त्याना एका वाटसरूची किंकाळी ऐकू आली. तसे सर्व  दचकले. त्यांनी पाहिले एक व्याघ्र एका भगवी वस्त्रे घातलेल्या एका वाटसरूवर एक व्याघ्र हल्ला करत आहे. त्याने त्याच्या पायाचा लचका तोडला आहे. व तो एका झाडावर जखमी अवस्थेत चढलेला होता. व तो व्याघ्र त्यास त्या वृक्षाखाली थांबून पकडण्यासाठी प्रयत्न करत होता.

महारुद्राने क्षणाचा विलंब न करता आपल्या पाठीवरील भात्यातील एक शर काढला. व अचूक नेम धरून शर सोडला. वायु वेगाने तो शर निघाला. पाहता पाहता तो शर त्या व्याघ्रास लागला. व तो तिथे बेशुद्ध पडला. ते सर्व तिथे गेले.  तो साधू खाली उतरला. त्याच्या पायातून रक्त ओघळत होते. त्यास सर्वांनी सावरले. थोडे पाणी दिले. तदनंतर भिल्लमाने आपल्या जवळील औषधी त्याच्या जखमेवर लावली. नंतर त्यास ते धीर देवू लागले. या सर्व घटनेत तो इतका घाबरला की त्याने आपल्या चिवरात लघुशंका केली. त्यास आधार देत त्यांनी उठवले. ती सर्वजण त्यास घेऊन बाजूस चालत चालत गेलीत.  त्यास आधार देत ते पुढे निघाले. काही अंतर चालल्या नंतर एका ग्रामाची हद्द लागली. काही घरे दिसू लागली. सुरक्षित अरण्य त्यांनी पार केले होते. ते ग्राम एका वेतांच्या बेटांनी वेढलेले होते. वाटेत एका वळणावर तेथील एका विहिरी शेजारील एका आम्रवृक्षाखाली ती विसावलीत. थोडा वेळ विसावा घेतल्याने त्यास बरे वाटू लागले. भिल्लानीं वाटेत गोळा केलेली फळे त्यांनी तेथे बसून खाल्ली.

भिल्लमाने त्याला विचारले, “महाशय नमस्कार आपण कोण आहात व त्या निबीड अरण्यात कशासाठी गेला होतात.”

साधू, “ मी अपरांत देशाचा रहिवासी असून मी बुद्ध धर्म प्रसारक आहे. आमच्या पंथाचे असंख्य अनुयायी असून बोधिसत्व विचारांचा प्रसार करणे हे आमचे कार्य आहे. मी हल्ली या धर्मात नवीनच रुजू झाल्याने मला शस्त्र विद्येचे ज्ञान नाही. म्हणून मी त्या व्याघ्र हल्यापासून आपले संरक्षण करू शकलो नाही. मी यामध्ये नवीनच असल्याने कुंतल आपरांत राज्य सीमेवर असणाऱ्या मठात शस्त्र व शास्त्र विद्या घेण्यासाठी तिकडे जात असता. हा विदारक प्रसंग मजवर घडला.”

तेव्हा भिल्लम म्हणाला,  “ पण आपण साधू पुरुष असताना आपणास शस्त्र विद्येची आवश्यकता का असते.”

साधू, “ आताच आपण पाहिलेल्या घटनेनुसार मजवर व्याघ्र हल्ला झाला. अशा प्रकारे आम्ही साधू धर्म प्रचारात वेगवेगळ्या प्रांती चारिका करत जात असतो.  वाटेत अनेक ठिकाणी वाटमाऱ्या होत असतात. त्यापासून संरक्षण करण्यासाठी आपणास ही विद्या शिकविली जाते. यामध्ये आपण प्रतिस्पर्धी योध्यास कोणतीही इजा न करता त्याची शुद्धा हरपवणे इतकेच कौशल्य शिकवले जाते.  तसेच अती हिंस्र जीव जेव्हा अस्तीत्व हिरावून  घेऊ लागल्यास त्यास नष्ट कसे करावे  हे देखील शिकवले जाते.  या कौशल्याने  आम्ही हिंसा न करता आपल्याला पुढील मार्गी जाणे सुकर होते. मघाशी त्या व्याघ्रास मला बेशुद्ध करावयाचे होते. पण त्याचा तो अचानक हल्ला त्यामुळे सावध होण्यास वेळच मिळाला नाही.

क्रमशः पुढे.......



अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...